नॉनव्हेज लोणची

मंजिरी कपडेकर
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष
 

कोल्हापुरी पारंपरिक मटण लोणचे
साहित्य : अर्धा किलो मटण, २ वाट्या सुक्‍या खोबऱ्याचा कीस, दोन टीस्पून खसखस, दोन टेबलस्पून तीळ, दोन टेबलस्पून तिखट, आले, लसूण पेस्ट, एक टी स्पून गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ, चार हिरव्या मिरच्या, एक वाटी तेल, प्रत्येकी अर्धा टीस्पून हिंग, हळद, चवीनुसार लिंबू रस.
कृती : मटणाला हिंग, हळद, मीठ लावून घ्यावे. भांड्यात दोन टीस्पून तेल तापवावे. त्यात मटण घालून परतून घ्यावे. थोडे थोडे गरम पाणी घालून मटण शिजवून घ्यावे. नंतर मटणाचे तुकडे बाजूला काढून गार करुन घ्यावे. एका कढईत तीळ, खसखस, सुके खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे. नंतर कढईत तेल तापवावे. त्यात मटणाचे तुकडे घालून तळून घ्यावे. राहिलेल्या तेलात आले, लसूण पेस्ट परतून घ्यावी. हिरव्या मिरच्या घालाव्या. भाजलेले सर्व साहित्य घालावे. तिखट, गरम मसाला, मीठ घालावे. मटणाचे तुकडे घालून एकजीव करावे. गॅस बंद करुन लिंबाचा रस घालावा. छान पारंपारीक कोल्हापूरी मटण लोणचे तयार होईल.

अचारी मटण
साहित्य : अर्धा किलो मटण, दोन टेबलस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी लिंबूरस, पाववाटी मोहरीची डाळ, प्रत्येकी अर्धा चमचा हळद, हिंग, एक वाटी तेल, एक टेबलस्पून किंवा आवडीनुसार साखर, एक टीस्पून मोहरी. 
कृती : मटणाला हिंग, हळद, मीठ लावावे. दोन टी स्पून तेलात मटण घालून शिजवून घ्यावे. थोडे थोडे गरम पाणी घालावे. नंतर मटणाचे तुकडे काढून गार करुन घ्यावे. तेल तापवावे. त्यात मटणाचे तुकडे तळून घ्यावे. राहिलेल्या तेलात मोहरी घालावी. गॅस बंद करुन हळद, हिंग, तिखट घालावे. हे मिश्रण मटणावर ओतावे. मोहरीची डाळ घालावी. लिंबूरस आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. मस्त चटपटीत आचारी मटण तयार होईल.

चिकनचे रॅलिश
साहित्य : अर्धा किलो बोनलेस चिकन, दोन टेबलस्पून धने, एक टेबलस्पून जिरे, दोन टेबलस्पून बडीशेप, एक टेबलस्पून तिखट, दोन टेबलस्पून भाजलेले तीळ, पाव वाटी लिंबूरस, प्रत्येकी अर्धा टीस्पून हळद, हिंग, चवीनुसार मीठ, एक टीस्पून आमचूर पावडर, अर्धी वाटी तेल, दहा बारा पाने कढीपत्ता बारीक चिरलेला, दोन कांदे उभे चिरलेले. 
कृती : दोन चमचे तेल तापवा. त्यात चिकन, मीठ घालून छान परतून घ्यावे. वाफेवर शिजवावे. नंतर तुकडे काढून गार करुन घ्यावे. कढईत तेल तापवावे. त्यात चिकनचे छोटे छोटे तुकडे तळून घ्यावे. राहिलेल्या तेलात कढीपत्ता, कांदा परतून घ्यावा. तिखट घालावे. हळद, हिंग घालावे. चिकनचे तुकडे, आमचूर पावडर घालावी. धने, जिरे, बडीशेप वाटून घालावी. छान मिक्‍स करावी.

सावजी मटण आचार
साहित्य : पाव किलो मटणाचे बोनलेस पीस, २ टीस्पून आमचुर पावडर, प्रत्येकी एक टीस्पून सेंदेलोण, पादेलोण, गरजेनुसार मीठ, चार टीस्पून तिखट, प्रत्येकी अर्धा टी स्पून हळद, हिंग, चार टेबल स्पून तेल, २ टीस्पून आले, लसूण पेस्ट, अर्धी वाटी खोवलेले ओलं खोबरे, दोन चिरलेले कांदे.
कृती : मटणाला हिंग, हळद लावून शिजवून घ्यावे. कढईत तेल तापवावे. त्यात कांदा परतून घ्यावा. आले, लसूण, ओलं खोबरे पेस्ट घालावी. तिखट, आमचुर पावडर, सेंदेलोण, पादेलोण, साधे मीठ घालावे. मटणाचे तुकडे घालावे. छान एकजीव करुन पाच मिनिटे शिजवावे.

फिशचे लोणचे
साहित्य : अर्धा किलो सुरमई मासा (पातळ चौकोनी तुकडे), तीन वाट्या सुक्‍या खोबऱ्याचा कीस, २ मोठे चमचे तिखट, चार सुक्‍या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, ४ टेबलस्पून आमसुलाचे आगळ, दोन चमचे लिंबूरस, दोन चमचे हळद, लाल तिखट, आलं, दोन टीस्पून लसूण पेस्ट, तेल तळण्यासाठी.
कृती : सुरमई स्वच्छ धुऊन घ्यावी. आले, लसूण पेस्ट, मीठ, आमसुलाचे आगळ, लिंबूरस, मीठ, हळद, लाल तिखट सर्व एकत्र करावे. सुरमईला लावून अर्धा तास ठेवावे. नंतर कढईत तेल तापवावे. त्यात सुरमईचे तुकडे घालून चांगले खुसखुशीत तळून घ्यावे. त्यातच सुक्‍या खोबऱ्याचा किस घालून घ्यावा. तो माशांच्या तुकड्यावर घालावा. त्यावर तिखट, मीठ घालावे. त्यात मिरच्यांचे तुकडे तळून घाला. छान एकजीव करावे.

कोळंबीचे (प्रॉन्सच) लोणचे
साहित्य : अर्धा किलो कोळंबी, अर्धी वाटी लिंबूरस, अर्धी वाटी तयार लोणच्याचा मसाला, दोन टीस्पून आमसुलाचे आगळ, एक वाटी तेल, एक टीस्पून हळद, दोन टीस्पून तिखट.
कृती : कोळंबीच्या आतील रेश काढून स्वच्छ करुन घ्यावे. त्यावर ज्वारीचे पीठ दोन चमचे घालून मिक्‍स करावे आणि धुवून घ्यावे. म्हणजे कोळंबीला वास येणार नाही. कोळंबीला हळद, मीठ, दोन चमचे लिंबूरस लावून अर्धा तास ठेवावे. नंतर ही कोळंबी तेलात तळून घ्यावी. त्यावर लोणच्याचा मसाला, तिखट, मीठ, लिंबूरस, आमसुलाचे आगळ सर्व घालावे. राहिलेले तेल या मिश्रणावर घालावे. छान एकजीव करावे.

मटण पिकल
साहित्य : पाव किलो मटणाचे बोनलेस तुकडे, १ टीस्पून चाट मसाला, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी तळलेला कांदा, १ टीस्पून आमचुर पावडर, एक टीस्पून तिखट, चवीनुसार मीठ, प्रत्येकी अर्धा टीस्पून हळद, हिंग, पाव वाटी तेल.
कृती : मटणाला हिंग, हळद, मीठ लावून थोडं पाणी घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे. कढईत तेल तापवावे. त्यात मटणाचे तुकडे परतून घ्यावे. त्यावर चाट मसाला, आमचूर पावडर, तिखट, कोथिंबीर, तळलेला कांदा घालून छान एकजीव करावे.

चटपटीत खिमा उंडे
साहित्य : पाव किलो चिकनचा खिमा, अर्धा इंच आले, सात ते आठ लसूण पाकळ्या, पाव वाटी कोथिंबीर, २ टी स्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ, पाव वाटी तेल, चवीनुसार चाट मसाला.
कृती : आले-लसूण, कोथिंबीर मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावे. त्यातच खिमा, मीठ, गरम मसाला पावडर, तिखट घालून वाटून घ्यावे. नंतर या मिश्रणाला तेल लावून गोळे करावे. नंतर तेलात हे गोळे परतून घ्यावे. डिशमध्ये काढावे. त्यावर चाट मसाला, तिखट, कोथिंबीर घालावी. छान मिक्‍स करावे.

अंड्याचे लोणचे
साहित्य : चार उकडलेली अंडी, १ वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तळलेला कांदा, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, २ टीस्पून तीळ, १ टीस्पून आलं, लसूण पेस्ट, २ टीस्पून तिखट, चवीनुसार मीठ, हळद ४ टीस्पून.
कृती : कढईत तेल तापवावे. त्यात आलं-लसूण परतून घ्यावे. खोबरे, तीळ घालून परतून घ्यावे. तिखट, हळद घालावे. मीठ, कोथिंबीर, तळलेला कांदा घालून छान एकजीव करावे. अंड्याचे दोन भाग करुन या मिश्रणात घालावे. अंड्याचे लोणचे तयार होईल.

चिकन लोणचे
साहित्य : अर्धा किलो चिकन, २ वाट्या सुक्‍या खोबऱ्याचा किस, २ टी स्पून खसखस, पाव वाटी तीळ, ४ लाल सुक्‍या मिरच्या, २ टेबलस्पून तिखट, १ टीस्पून आमचुर पावडर, २ टीस्पून तयार लोणच्याचा मसाला, चवीनुसार मीठ, १ वाटी तेल, प्रत्येकी अर्धा टी स्पून हिंग, हळद.
कृती : भांड्यात दोन टी स्पून तेल तापवावे. त्यात चिकनला मीठ लावून घालावे व परतून घ्यावे. चिकन शिजवून घ्यावे. कढीत तेल तापवावे. त्यात चिकन लालसर परतून घ्यावे. काढून ठेवावे. राहिलेल्या तेलात लाल मिरच्या, सुके खोबरे, तीळ, खसखस घालून छान मिक्‍स करारवे. थोडे परतून घ्यावे. त्यातच हळद, हिंग, तिखट घालावे. चिकनचे तुकडे घालावे. आमचूर पावडर, मीठ, तयार लोणच्याचा मसाला घालून छान एकजीव करावे. मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्यावी. 

Tags

संबंधित बातम्या