गुजराती-राजस्थानी लोणची

राजश्री बिनायकिया
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष
उन्हाळा म्हटले, की लोणच्याचे दिवस येतात. स्त्री वर्गाचा कल लोणची करण्याकडे असतो. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारची लोणची मिळतात. पण, आपण स्वतः घातलेल्या लोणच्याला वेगळीच चव असते. म्हणूनच या सिझनला गुजराती, राजस्थानी लोणच्यांच्या रेसिपीज...

कैरीचे तिखट गोड लोणचे
साहित्य : दीड किलो कैरी (मध्यम आकाराच्या १२-१३ कैऱ्या), ७ टेबलस्पून मिरची पूड (७५ ग्रॅम), ५० ग्रॅम मेथी दाणे, ५० ग्रॅम धने, ५० ग्रॅम कुटलेली मोहरीची डाळ, २५ ग्रॅम हिंग, २५ ग्रॅम बडीशेप, २५० ग्रॅम चिरलेला गूळ, २५० ग्रॅम मीठ, २५० ग्रॅम तेल.
कृती : आदल्या दिवशी कैरीच्या फोडी करून त्यांना थोडे मीठ, हळद लावून बरणीत भरून ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी पाणी सुटेल, ते पाणी टाकून द्यावे. फोडी स्वच्छ कापडावर टाकून थोड्या कोरड्या कराव्यात. कुटलेली मोहरीची डाळ, थोडे तेल, मीठ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करून ठेवावे. धने, मेथी, बडीशेप थोड्या तेलावर वेगवेगळी भाजून घ्यावी. नंतर त्याची बारीक पूड करावी. थोड्या तेलावर थोडी मिरची पूड परतून घ्यावी. तेलाखेरीज सर्व वस्तू एकत्र कराव्यात. त्यामध्ये मसाला कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात. नंतर वरून तेल, हिंग, मोहरीची फोडणी गार झाल्यावर लोणच्यामध्ये टाकावी. हे मिश्रण व्यवस्थित मिसळावे. हे तिखट गोड लोणचे छान लागते. लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

कैरीची लौंजी 
साहित्य : कच्ची कैरी २५० ग्रॅम, मोहरी, जिरे, हिंग, मेथी दाणे, अर्धा टीस्पून हळद, दीड टीस्पून लाल मिरची पूड, १५० ग्रॅम किसलेला गूळ, १ टीस्पून बडीशेप पूड, १ टीस्पून जिरे पूड, २ टेबलस्पून तेल, मीठ.
कृती : कैरीची साले काढून घ्यावीत. नंतर त्याचे लांब लांब किंवा मध्यम आकाराचे तुकडे करावेत. कैरीचे तुकडे नरम होईपर्यंत गरम पाण्यात शिजवून घ्यावेत. नंतर कैरीचे तुकडे निथळून घ्यावेत. तेलामध्ये मोहरी, मेथी दाणे, हिंग, जिरे टाकून फोडणी करावी. त्यामध्ये हळद, मिरची पूड, किसलेला गूळ टाकावा. मिश्रण व्यवस्थित मिसळावे. गूळ पातळ झाला, की त्यामध्ये कैरीचे तुकडे, जिरे पूड, बडीशेप व मीठ टाकावे. थोडे शिजू द्यावे, मग लौंजी तयार!

राजस्थानी केर-सांगरी लोणचे 
साहित्य : एक वाटी केर, १ वाटी सांगरी, दीड वाटी तेल, पाव कप मोहरी डाळ, ८ ते १० वाळलेल्या लाल मिरच्या, १ टेबलस्पून मेथी दाणे, १ टीस्पून हळद, ३ टीस्पून लाल मिरची पूड, हिंग, चवीनुसार मीठ, १ टीस्पून बडीशेप.
कृती : केर, सांगरी स्वच्छ साफ करून ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावी. केर सांगरी भिजल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन व निथळून घ्यावे. नंतर केर सांगरी कुकरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये पाणी घालावे. भांड्यावर झाकण ठेवून कुकरमध्ये ठेवावे. मोठ्या आचेवर एक शिट्टी होऊ द्यावी. नंतर गॅस मंद करावा. कुकरचे प्रेशर आपोआप कमी होईल. नंतर गॅस बंद करावा. कुकरमधून केर सांगरी काढून घ्यावी. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. मिश्रणाचा चुरा होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर केर सांगरी चाळणीवर ओतून पुन्हा निथळून घ्यावी. एका स्वच्छ सुती कपड्यावर केर सांगरी पसरून ठेवावी व पूर्ण कोरडी करावी. (त्यामध्ये पाण्याचा अंश नको.) नंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मेथी दाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. मसाला भाजल्यावर गॅस बंद करून त्यामध्ये हिंग, बडीशेप, हळद, वाळलेली लाल मिरची, मोहरीची डाळ, लाल मिरची पूड, मीठ, केर सांगरी टाकून मिश्रण व्यवस्थित मिसळावे. केर सांगरी लोणचे केल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापरावे. ते मुरल्यावर जास्त छान लागते. 
टीप : केर व सांगरी या राजस्थानी भाज्या असून संबंधित दुकानांमध्ये उपलब्ध असतात.

भावनगरी मिरची लोणचे (जाड बुटक्‍या मिरच्या) 
साहित्य : एक वाटी गोल मध्यम चिरलेली मिरची (मिरची धुऊन, पुसून घेणे.), २ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून तीळ, अर्धा टीस्पून जिरे, २ टेबलस्पून शिंगाडा पीठ, अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस, चवीनुसार काळे मीठ.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तीळ व जिरे टाकावे. नंतर शिंगाडा पीठ टाकून ४ ते ५ मिनिटे भाजावे. त्यामध्ये भावनगरी मिरचीचे तुकडे, लिंबू रस, मीठ टाकून मंद गॅसवर पाच मिनिटे परतावे व गॅस बंद करावा. हे लोणचे गरमागरमच सर्व्ह करावे. ताजे बनवावे.

कांदा-कैरी तक्कू
साहित्य : एक मोठी कैरी, १ मोठा कांदा, २ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, मिरची पूड, साखर, चवीनुसार मीठ, २ टेबलस्पून कोथिंबीर, फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, जिरे, १ टीस्पून जिरे पूड.
कृती : कैरीचे साल काढावे व कैरी किसून घ्यावी. कांदा किसून घ्यावा. दोन्ही एकत्र करावे. त्यामध्ये मिरची पूड, जिरे पूड, मीठ, साखर व कोथिंबीर टाकावे. मिश्रण एकत्र करावे. तेल गरम करून मोहरी, हिंग, जिऱ्याची फोडणी त्या मिश्रणावर टाकावी. व्यवस्थित ढवळावे. कांदा-कैरी तक्कू तयार. हे लोणचे आयत्या वेळेस करावे. एक दिवसच टिकते.

गाजराचे लोणचे
साहित्य : गाजर २५० ग्रॅम, एक टीस्पून लाल मिरची पूड, दोन टेबलस्पून मोहरी डाळ, एक टेबलस्पून बडीशेप, चवीनुसार मीठ.
कृती : गाजर स्वच्छ धुऊन साले काढून घ्यावीत. त्यांच्या लांब पण पातळ फोडी कराव्यात. त्या फोडींना थोडे मीठ चोळून ठेवावे. बडीशेप बारीक करून घ्यावी. नंतर सर्व मिश्रण एकत्र करावे. हे सर्व मिश्रण २-३ दिवस कडक उन्हात ठेवावे व नंतर वापरावे.

गोड लोणचे
साहित्य : ३ कैऱ्या (सोलून किसून घेणे.), २ वाटी साखर, अर्धा टीस्पून हळद, ३ टीस्पून लाल मिरची पूड, १ टीस्पून जिरे पूड, चवीनुसार मीठ.
कृती : सर्वात प्रथम एका भांड्यात किसलेली कैरी, हळद व मीठ एकत्र करावे. हे मिश्रण एक ते दीड तास ठेवावे. कैरीला पाणी सुटेल. नंतर कैरीचे मिश्रण एका स्वच्छ कापडात घट्ट बांधून लटकवून ठेवावे. कैरीमधील सर्व पाणी निथळून जाईल. नंतर कैरीचा कीस एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावा. त्यामध्ये साखर मिसळावी. मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. नंतर त्या भांड्यावर स्वच्छ कापड बांधावे व ते भांडे रोज (८ ते १० दिवस) उन्हात ठेवावे. रोज संध्याकाळी भांडे आत घ्यावे. त्यावरील कापड काढून झाकण ठेवावे. उन्हात ठेवताना कापड बांधावे. मिश्रण दररोज कोरड्या चमच्याने ढवळावे. कैरीच्या मिश्रणात साखरेचा पाक घट्ट होईल व ते मिश्रण बोटांना चिकट लागेल, तेव्हा त्यामध्ये लाल मिरची पूड व जिरे पूड एकत्र करावी. नंतर हे गुजराती गोड लोणचे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावे. हे लोणचे पराठे, पुरीबरोबर छान लागते.

हळदीचे लोणचे
साहित्य : किसलेली एक वाटी ओळी हळद (हळद स्वच्छ धुऊन सोलावी व किसून घ्यावी.), १० ते १२ मेथी दाणे, ६ ते ७ हिरव्या मिरच्या, २ टीस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून किसलेले आले, १ टीस्पून कुटलेली मोहरी डाळ, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग.
कृती : कढईत तेल गरम करून त्यामध्ये मेथी दाणे तळून घेऊन बाजूला काढावेत. त्याच तेलात मोहरी टाकावी व तडतडू द्यावी. हिंग घालून फोडणी तयार करावी. ही फोडणी दुसऱ्या भांड्यात ओतून गार होऊ द्यावी. हिरव्या मिरच्या बारीक चिराव्यात. तळलेले मेथी दाणे कुटून घ्यावेत. एका भांड्यात किसलेली हळद, आले, लिंबाचा रस, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, कुटलेली मोहरी डाळ, मेथी दाणे असे सर्व एकत्र करावे. थंड केलेली फोडणी लोणच्यावर घालावी. मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. हे लोणचे १५ दिवस फ्रीजमध्ये टिकते.

छुंदा
साहित्य : चार वाट्या कैरीचा कीस, ६ वाट्या साखर, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी लाल मिरची पूड, २ टेबलस्पून जिरे पूड.
कृती : कैरीच्या किसाला अर्धा तास मीठ लावून ठेवावे. नंतर त्यामध्ये साखर घालावी. एका जाड बुडाच्या कढईत किसलेली कैरी घालावी. पाणी आटेपर्यंत परतावे, जेणेकरून कढईला पाक चिकटणार नाही. थोड्या वेळाने गॅस बंद करावा. नंतर त्यामध्ये लाल मिरची पूड घालावी व मिश्रण मिसळून घ्यावे. थंड झाल्यावर बरणीत भरावे. 

संबंधित बातम्या