इन्स्टंट लोणची

सविता कुर्वे
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष
आपल्याकडे कैरी, लिंबू, आवळा, मिरचीची वर्षभराची टिकाऊ लोणची करण्यात येतात. पण १५ दिवस एक महिना वापरता येणारी तसेच तोंडी लावणे म्हणून होणारी इन्स्टंट लोणचीपण करता येतात. अशा लोणच्याच्या रेसिपी...

आवळ्याचे लोणचे
साहित्य : आठ-दहा आवळे, १ लिंबू, अर्धी वाटी गूळ, अर्धा चमचा तिखट, मीठ, १ चमचा लोणचे मसाला.
कृती : आवळे स्वच्छ धुऊन  कोरडे करावेत. जाड किसणीने किसून घ्यावेत. त्यात चिरलेला गूळ, मीठ, तिखट, लोणचे मसाला घालून कालवावे. शेवटी लिंबाचा रस घालून बरणीत भरावे. लिंबाचा रसाने आवळ्याची जी तुरट चव असते. ती जरा कमी होते व चविष्ट लागते.

लिंबू - मिरची - आल्याचे लोणचे 
साहित्य : ३ लिंबे, ४ लिंबांचा रस, ७-८ हिरव्या मिरच्या, २ इंच आले, मीठ, साखर, हळद, हिंग, मोहरी, तेल 
कृती : लिंबाच्या फोडी कराव्यात आल्याचे लांब काप कापवेत, मिरच्यांचे तुकडे करून सर्व एकत्र करावेत. त्यात ४-५ लिंबाचा रस घालावा. मीठ, साखर घालून एकत्र करावे. मग कढईत तेल गरम करावे. त्यात हिंग, मोहरी, हळद घालावी व ही फोडणी जरा कोमट झाली, की लिंबू मिरचीवर ओतावी. हे मिश्रण ढवळावे व बरणीत भरावे.

लसणाचे लोणचे 
साहित्य : दोनशे ग्रॅम लसूण (सोललेले), १ चमचा शोप, अर्धा चमचे मेथी दाणे, १ चमचा मोहरी, १ लिंबू, तेल, हळद, तिखट, मीठ, गूळ 
कृती : कढईत तेल गरम करावे. मग त्यात लसूण पाकळ्या घालून जरा परताव्यात. शोप, मोहरी, मेथी हे मिक्‍सरमधून बारीक करावे. लसूण ३-४ मिनिट परतले की त्यात अर्धा चमचा हळद १ चमचा तिखट व पाव चमचा हिंग घालून परतावे. मग त्यात तयार मसाला व मीठ घालावे व मंद आचेवर परतत राहावे. मग त्यात गूळ घालावा. गूळ विरघळला, की गॅस बंद करावा. मग हे मिश्रण गार झाले, की त्यावर लिंबाचा रस घालून ढवळावे.

बोराचे लोणचे
साहित्य : एक पाव कच्ची पिकलेली बोरे, १०-१२ ओल्या लाल मिरच्या, एक चमचा शोप, १ चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, १ चमचा मोहरी डाळ, ३ लाल मिरच्या, १ चमचा धने, तिखट, मीठ, हळद, चाट मसाला, साखर
कृती : बोरे व मिरच्या धुऊन पुसून घ्याव्यात. त्याचे तुकडे करावेत. त्यात १ टेबलस्पून मीठ, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा चाट मसाला, २-३ चमचे गूळ किंवा साखर घालावी. शोप,जिरे, ओवा, मोहरी डाळ व धने जरा परतून मग त्याची पावडर करावी. ती घालून चांगले मिक्‍स करावे. मग गरम करून गार केलेले तेल घालावे.

आल्याचे लोणचे 
साहित्य : अडीचशे ग्रॅम आले, २ लिंबू, काळे मीठ, भाजलेले जिऱ्याची पूड, मिरेपूड, मीठ
कृती : आले स्वच्छ धुऊन मग त्याची साले काढावीत व त्याचे लांब काप करावेत. मग त्यात लिंबाचा रस, १ चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा साधे मीठ, अर्धा चमचा मिरे पूड घालावे व मिक्‍स करून ठेवावे.

गाजर-मुळ्याचे लोणचे 
साहित्य : दोन गाजरे, एक मोठा मुळा, २-३ हिरव्या मिरच्या, दोन चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा साखर, दोन चमचे कैरी लोणचे मसाला, मीठ, तेल, हिंग
कृती : गाजर मुळ्याची साले काढून पातळ व लांब - लांब फोडी कराव्यात. त्यावर लोणच्याचा मसाला, मीठ, साखर व लिंबाचा रस घालावा. मग तेल गरम करून त्यात अर्धा चमचा हिंग घालावे व फोडणी गार झाली, की लोणच्यावर घालून ढवळून बरणीत भरावे. मुळा व गाजरांना कापले, की जरा मीठ चोळा व अर्धा तास ठेवावे. त्याला पाणी सुटेल ते काढून टाका आणि मग लोणचे बनवा. पाणी काढले, की फोडी २ तास उन्हात सुकवून पण हे लोणचे बनवू शकता.

लसूण व खारकेचे लोणचे 
साहित्य : एक वाटी सोललेले लसूण, १ वाटी खारकेचे तुकडे ४-५ सुक्‍या लाल मिरच्या, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी व्हीनेगर, मीठ, हळद, १ चमचा तिखट, २ चमचे मोहरीची डाळ, ४ चमचे तेल
कृती : कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी डाळ व लसूण घालावा. खारकेचे तुकडे मिरच्यांचे तुकडे व्हीनेगरमध्ये २ तास भिजवून ठेवावे. दुसऱ्या कढईत गूळ व व्हीनेगर गरम करायला ठेवावा. गूळ विरघळला, की गॅस बंद करावा. लसूण ३-४ मिनिट परतावा. मग खारकेचे व मिरच्यांचे तुकडे घालावे. मीठ, हळद, तिखट घालून ढवळावे. त्यावर गूळ व व्हिनेगरचे मिश्रण घालावे. ५ मिनिटे ते गरम करावे. थंड झाले की बरणीत भरावे.

ओल्या हळदीचे झटपट लोणचे
साहित्य : १ वाटी हळदीचा कीस, ३ चमचे लोणचे मसाला, १ चमचा गूळ, २ लिंबाचा रस, ४ चमचे तयार गार फोडणी (हिंग, मोहरीची), मीठ
कृती : साल काढून किसलेली हळद घ्यावी. त्यात बाकीचे ३ चमचे लोणचे मसाला, १ चमचा गूळ, २ लिंबाचा रस, ४ चमचे तयार गार फोडणी (हिंग, मोहरीची), मीठ या सर्व जिन्नस घालाव्यात व ढवळून बरणीत भराव्यात.

लाल मिरचीचे आंबट - गोड लोणचे 
साहित्य : १ वाटी लाल मिरच्यांचे तुकडे, ४ चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी डाळ, १ चमचा शोप, अर्धा वाटी गूळ, ४ चमचे चिंचेचा कोळ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हिंग व मीठ, गरम मसाला, एक चमचा मेथ्या.
कृती : कढईत तेल गरम करावे. एका वाटीत मोहरी डाळ, शोप गूळ, मीठ, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, सर्व एकत्र करून तेलात हिंग घालून मेथ्या व सर्व मसाला घालावेत. त्यावर मिरच्यांचे तुकडे, चिंचेचा कोळ घालून परतावे. मग बरणीत भरावे.

कांदा कैरी लोणचे 
साहित्य : २ कांदे मध्यम आकाराचे, १ मोठी कैरी, तिखट, मीठ,  अर्धा चमचा साखर , फोडणीचे साहित्य
कृती : कांदा व कैरीच्या बारीक फोडी कराव्यात. त्यावर तिखट मीठ घालून ढवळावे. ४ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग घालून गॅस बंद करावा. मग अर्धा चमचा हळद घालावी व ती फोडणी कांदा कैरीवर घालावी. व्यवस्थित ढवळावे. लगेच खाण्यास लोणचे तयार. असेच तोंडली, कारली, फुलकोबी, मिक्‍स व्हेज तसेच पपई, द्राक्षे, चिकू अशी विविध फळभाज्या व फळे यापासून लोणची तयार करू शकतो. 

संबंधित बातम्या