ड्रायफ्रूट लोणची

उषा लोकरे
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष
ड्रायफ्रुट्‌स अर्थात सुक्‍या मेव्यातील मुबलक कॅलरीजमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसेच आवश्‍यक आहारामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहाते. ताणतणाव दूर होतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व आपल्यात सतर्कता वाढवण्यात ड्रायफ्रुट्‌सची मोलाची मदत असते. त्यामुळेच त्यांना नैसर्गिक टॉनिक व खत (fertilizers) म्हटले जाते. तसेच लोणच्यात लिंबू, आवळा, आले हे मोसमी घटक वापरल्याने पित्तासारख्या व्याधीही दूर राहतात.

चटकमटक लोणचे
साहित्य : दहा बारा मनुका, ४ खजुराच्या बिया, २ खारीक बिया, अर्धा चमचा आले किसून, २ लवंगा, ४ काळी मिरी जरा जाडसर कुटून, अर्धा चमचा शेंदेलोण, अर्धा चमचा पादेलोण, अर्धी वाटी तयार मोरावळा, (पाव वाटी किसलेले आवळे, अर्धी वाटी साखर शिजवून, अर्धा चमचा घट्ट मुरंबा.)
कृती : खारकेतील बिया काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. खजूर स्वच्छ करुन त्यातील बिया काढून बारीक तुकडे करावेत. काळ्या मनुकांची देठे काढून साफ करुन घ्यावी. मोरवळ्यात/मुरंब्यात किसलेले आले, लवंगा, मिरीची भरड, खजूर, खारीक, मनुका मिसळून घ्याव्या. त्यात शेंदेलोण, पादेलोण (मीठ) घालावे. पाचकदार चटकमटक लोणचे तयार.

सुकामेवा लोणचे
साहित्य : एक वाटी खारीक, १ वाटी मनुका, १ वाटी खजूर, पाव वाटी आल्याचा कीस, २ वाट्या लिंबाचा रस, १ चमचा पादेलोण, शेंदेलोण, १ चमचा काळमिरी पावडर.
कृती : खारीक, खजूर बिया काढून स्वच्छ करुन बारीक तुकडे करावे. मनुका स्वच्छ करुन देठ काढून घ्यावे. स्वच्छ बरणीत सुकामेवा एकत्र करुन त्यात लिंबाचा रस, आल्याचा कीस, शेंदेलोण, पादेलोण, काळी मिरपूड घालून मिश्रण चांगले कालवून घ्यावे. हे उत्तम चवीचे व औषधी आहे.

खजुराचे लोणचे
साहित्य : पंधरा वीस खजुराच्या बिया काढून, दीड टेबलस्पून लिंबाचा ताजा रस, १ टेबलस्पून कैरीचा कीस, १ चमचा तिखट, पाव वाटी साखर, चवीला मीठ, १ चमचा आल्याची पेस्ट/किसून
कृती : खजूर स्वच्छ करुन त्याचे लांबट बारीक (सळीसारखे) बारीक तुकडे करावेत. स्वच्छ बरणीत/बाऊलमध्ये तुकडे घेऊन त्यात साखर, मीठ, तिखट, किसलेले आले व लिंबाचा रस घालून मिश्रण नीट कालवून घ्यावे. हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवावे म्हणजे टिकते.

पारशी आंबटगोड लोणचे
साहित्य : पाव किलो खजूर, ५० ग्रॅम जर्दाळू, ५० ग्रॅम मनुका, अर्धा किलो गाजर, १५ ग्रॅम मीठ, ५० ग्रॅम लसूण, ५० ग्रॅम तिखट, दीड वाटी व्हिनेगर, पाव किलो गूळ, 
कृती : गाजर स्वच्छ धुऊन साले काढून जाडसर किसणीने किसावी. खजुरातील बिया काढून स्वच्छ धुवून बारीक चिरावे. व्हिनेगरमध्ये गूळ बारीक चिरुन चांगला मिसळून घ्यावा. त्यात तिखट, मीठ मिसळावे. लसणाच्या पाकळ्यांची साले काढून त्याची पेस्ट करावी. त्यात खजूर, मनुका, गाजर कीस व जरदाळूचे तुकडे मिसळावे. सर्व मिश्रण एकजीव कालवून मंद आचेवर घट्टसर शिजवावे. गार करुन स्वच्छ बरणीत भरावे. 
(पारशी लोक लग्नासाठी हे खास लोणचे १०-१५ दिवस आधीच करुन ठेवतात. त्यामुळे ते चांगले मुरते व चविष्ट होते.)

काजूचे लोणचे
साहित्य : दोन वाट्या काजू तुकडा, १ चमचा, हळद, दीड चमचा तिखट, २ टेबलस्पून लिंबाचा रस, साखर व मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून रिफाईंड तेल, १ चमचा चांगल्या हिंगाची पूड.
कृती : काजू तुकडे नीट स्वच्छ निवडून घ्यावे व साधारण सारख्या आकारात कापून घ्यावे. मीठ, साखर व तिखट काजूच्या तुकड्यांना चांगले चोळून घ्यावे. तेल गरम करुन त्यात हिंग व अर्धा चमचा तिखट घालून फोडणी करावी. फोडणीत वरील काजूचे मिश्रण चांगले मिक्‍स करुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस मिसळावा व कालवावे. हे लोणचे ताजेच खावे. ३-४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. 

ड्रायफ्रूट कैरीचे लोणचे
साहित्य : एक वाटी कैरीचे बारीक तुकडे, पाऊण वाटी अंजीर, बेदाणे, जर्दाळू, १ चमचा ताजी भरडलेली मिरेपूड, १ वाटी व्हिनेगर, अर्धा वाटी साखर, पाव वाटी मीठ, पाव वाटी तिखट.
कृती : अंजीराचे बारीक तुकडे करावे. जर्दाळूतील बी काढून त्याचे बारीक तुकडे करावे. बेदाणे स्वच्छ करुन त्याची देठे काढून टाकावी. व्हिनेगरमध्ये साखर ढवळून विरघळून घ्यावी. त्यात मीठ, मिरपूड व तिखट नीट मिसळून घ्यावे. कैरीचे तुकडे व सुकामेवा त्यात मिसळून घ्यावा. स्वच्छ कोरड्या बरणीत लोणचे भरुन २-४ दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यावर मुरते व खाण्यास योग्य होते.

काजूचे लोणचे
साहित्य : दोन वाट्या काजू तुकडा, १ चमचा, हळद, दीड चमचा तिखट, २ टेबलस्पून लिंबाचा रस, साखर व मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून रिफाईंड तेल, १ चमचा चांगल्या हिंगाची पूड.
कृती : काजू तुकडे नीट स्वच्छ निवडून घ्यावे व साधारण सारख्या आकारात कापून घ्यावे. मीठ, साखर व तिखट काजूच्या तुकड्यांना चांगले चोळून घ्यावे. तेल गरम करुन त्यात हिंग व अर्धा चमचा तिखट घालून फोडणी करावी. फोडणीत वरील काजूचे मिश्रण चांगले मिक्‍स करुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस मिसळावा व कालवावे. हे लोणचे ताजेच खावे. ३-४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. 

कैरी-खजूर गोडे लोणचे
साहित्य : एक वाटी साखर, अर्धी वाटी व्हिनेगर, ३ टेबलस्पून कैरीचा जाड कीस, अर्धी वाटी खजुरातील बिया काढून बारीक तुकडे, १ टेबलस्पून मीठ, २ चमचे दालचिनी पूड व जिरे पूड.
कृती : साखर कढईत वितळून घेऊन त्याचे कॅरमल करावे. म्हणजे पातळ पाक करावा. कैरीच्या किसाला मीठ चोळून १ तासभर ठेवावे. या कैरीत व्हिनेगर घालून ५-७ मिनिटे शिजवून मऊसर करावे. हे मिश्रण वरील साखरेच्या पाकात घालावे. मिश्रणात २-३ चमचे पाणी घालून उकळावे. थोडे सरसरीत झाले, की गॅस बंद करुन त्यात दालचिनी, जिरे पावडर व खजुराचे तुकडे घालून ढवळावे. लोणचे स्वच्छ बरणीत साठवावे.

ड्रायफ्रूट लिंबू लोणचे
साहित्य : पाव वाटी खारीक तुकडे, पाव वाटी काळ्या मनुका, पाव वाटी जर्दाळूचे तुकडे व त्यातील बदाम, पाव वाटी बदाम, पाव वाटी खजुराचे तुकडे, २ टेबलस्पून आल्याचे बारीक तुकडे, २ टेबलस्पून आंबे हळदीचे बारीक तुकडे (ऐच्छिक), १०-१२ लिंबांचा रस, दीड वाटी साखर, १ चमचा जिऱ्याची पावडर, २ चमचे मीठ, २ टेबलस्पून तिखट.
कृती : लिंबाचा रस काढून त्यात तिखट, मीठ, जिरे पावडर घालून मिसळून घ्यावे. त्याच ड्रायफ्रुटस, आले व आंबे हळद सर्व मिसळून पातेल्याला पातळ कपड्याचा दादरा (झाकण) बांधून उन्हात दोन दिवस मुरु द्यावे. हे मिश्रण मग स्वच्छ बरणीत काढून त्यात साखर मिसळून ८ दिवस बरणीला दादरा बांधून उन्हात ठेवावी. 

ड्रायफ्रूट लिंबू लोणचे
साहित्य : पाव वाटी खारीक तुकडे, पाव वाटी काळ्या मनुका, पाव वाटी जर्दाळूचे तुकडे व त्यातील बदाम, पाव वाटी बदाम, पाव वाटी खजुराचे तुकडे, २ टेबलस्पून आल्याचे बारीक तुकडे, २ टेबलस्पून आंबे हळदीचे बारीक तुकडे (ऐच्छिक), १०-१२ लिंबांचा रस, दीड वाटी साखर, १ चमचा जिऱ्याची पावडर, २ चमचे मीठ, २ टेबलस्पून तिखट.
कृती : लिंबाचा रस काढून त्यात तिखट, मीठ, जिरे पावडर घालून मिसळून घ्यावे. त्याच ड्रायफ्रुटस, आले व आंबे हळद सर्व मिसळून पातेल्याला पातळ कपड्याचा दादरा (झाकण) बांधून उन्हात दोन दिवस मुरु द्यावे. हे मिश्रण मग स्वच्छ बरणीत काढून त्यात साखर मिसळून ८ दिवस बरणीला दादरा बांधून उन्हात ठेवावी. 

कैरी सुकामेवा लोणचे
साहित्य : दहा-बारा कैऱ्या, १०० ग्रॅम मनुका, १०० ग्रॅम खारकेचे तुकडे, अर्धी वाटी व्हिनेगर, २ वाट्या गुळ, अर्धी वाटी तिखट, (चवीनुसार कमी) १ वाटी मीठ, अर्धा वाटी बडीशेप पावडर.
कृती : कैरीच्या चौकोनी बारीक फोडी कराव्या. खारीक धुऊन बिया काढून बारीक तुकडे करावे. मनुकांचे देठ काढून टाकून स्वच्छ करुन घ्याव्या. स्वच्छ कोरड्या बरणीत कैरीचे तुकडे, खारकेचे तुकडे, मनुका, बडीशेप पावडर, तिखट, मीठ एकत्र कालवावे. गुळाचा पाक करावा, गार करुन वरील मिश्रणात घालावा.  व्हिनेगर मिसळून घ्यावे. आंबटगोड लोणचे तयार!

काश्‍मिरी शाही लोणचे
साहित्य : एक कप चिंचेचा घट्ट कोळ, २ कप गुळाचे बारीक तुकडे, अर्धा चमचा सुंठ पावडर, पाऊण चमचा पादेलोण, १ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव वाटी किसमिस, पाव वाटी साखरेचे तुकडे, पाव वाटी बदामाचे काप, पाव वाटी अक्रोडचे तुकडे, पाव वाटी मगज.
कृती : चिंचेचा कोळ, गूळ, सुंठ, जिरे पावडर, पादेलोण एकत्र करुन त्यात सर्व सुकामेवा एकत्र घालून मिश्रण शिजवावे. घट्टसर लोणचे करावे.

चटकदार सुकामेवा लोणचे
साहित्य : आठ-दहा सुके अंजीर, १२-१५ बदाम, १ टेबलस्पून खरबूज बिया/मगज, २ टेबलस्पून रिफाईंड तेल, ३ टेबलस्पून कांदा बारीक चिरुन, १ चमचा तिखट, मीठ, साखर चवीनुसार, २ चमचे लिंबाचा रस.
कृती : अंजीर व बदाम वेगवेगळे भिजवावे. बदाम सोलून त्याचे जाडसर तुकडे करावे. १ टेबलस्पून तेल गरम करुन त्यात कांदा व लसूण परतून घ्यावे. त्यात तिखट, मीठ, भिजलेले अंजीर, थोडे बदामाचे तुकडे घालून मिश्रण परतावे. हे मिश्रण मिक्‍सरमधून जरा जाडसर काढावे. उरलेल्या १ टेबलस्पून तेलात उरलेले बदामाचे तुकडे व मगज खमंग भाजून घ्यावे. भरड मिश्रणात प्रथम लिंबाचा रस मिसळून कालवून घ्यावा. त्यातच तळलेले बदामाचे तुकडे व मगज मिसळावे. 

संबंधित बातम्या