हवामानबदलाचे वास्तव 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

विश्‍लेषण
गेल्या काही दिवसांत थंडी, उकाडा यांचा सतत चाललेला खेळ आपण अनुभवत आहोत. आज गारवा असेल तर उद्या तो असेलच याची खात्री नसते. या सततच्या बदलाचे कारण काय? असे बदल उत्तरोत्तर वाढत जाणार आहेत का? त्यावर काही संशोधन सुरू आहे का? तसेच या बदलांचा आरोग्यावर काय परिणाम होतो? या अनुषंगाने दोन लेख...

गेल्या काही दिवसांपासून भारताचा फार मोठा भूभाग थंडीच्या तीव्र लाटेमुळे गारठून गेला होता. उणे चार ते उणे सोळा अंश सेल्सियस इतके नीचांकी तापमान आणि त्याबरोबर येणारे वारे व दाट धुके यामुळे, भारतातील - विशेषतः, उत्तर भारतातील जनजीवन कोलमडून गेले. महाराष्ट्रात फक्त सकाळच्याच वेळी दिसणारा दाट धुक्‍याचा थर उत्तर भारतात त्याहीपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या लाटेचा परिणाम महाराष्ट्रासह दक्षिणेकडच्या काही राज्यांतही जाणवला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या काही भागांत अजूनही बोचऱ्या थंडीचे अस्तित्व जाणवतेच आहे. उत्तर भारताचा फार मोठा भाग दरवर्षी या दिवसात थंडीच्या लाटेच्या प्रभावाखाली येतो असे दिसून येते. असे असले तरी त्यातील तीव्रतेत होणारे बदल आणि बदलते सातत्य यांचा संबंध जागतिक हवामान बदलाशी असावा असे आता शास्त्रज्ञांना खात्रीने वाटू लागले आहे. 

यंदाची अमेरिकेने अनुभवलेली थंडीही अशीच बोचरी होती. २०१८ मध्ये उत्तर गोलार्धात अनेक ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त होते. कित्येक ठिकाणी जंगलांना आगी लागल्या. अमेरिकेत जंगलांच्या जवळच्या अनेक शहरांनी या आगी अनुभवल्या. अनेक देशांत दुष्काळ पडले, पाणीटंचाई वाढली. चक्रीवादळांनी गावेच्या गावे उद्‌ध्वस्त केली. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आले. भारतालाही याचा सामना करावा लागला. कार्बन डायऑक्‍साईड, क्‍लोरोफ्लुरोकार्बन आणि मिथेन यांच्या वातावरणातील वाढलेल्या प्रमाणामुळे जागतिक तापमानात वाढ झाली. 

पूर्वी भारतात शीतलहरींमध्ये जे विशिष्ट कालसातत्य दिसत असे ते आजकाल दिसत नाही. गेल्या काही वर्षांत तर हे सातत्य अगदीच बेभरवशी झाले आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये विविध प्रदेशांत ज्या शीतलहरी अनुभवास येतात त्या पाच लाख चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त भूभाग व्यापतात, असे आता दिसून आले आहे. वर्षभरातील हवामानातही पूर्वी आढळणारे सातत्य गेल्या काही वर्षांतील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, उन्हाळ्याची वाढती तीव्रता, थंडीच्या प्रमाणात आढळणारी वाढ, ढगफुटी आणि गारपीट या अतिशय अनपेक्षित अशा घटनांनी बिघडून गेले आहे. एवढेच नाही, तर हवामान बदलाच्या अशा प्रक्रिया तीव्र होत असून बदलांचा वेगही खूपच वाढल्याचे जाणवते आहे. सगळ्यांनाच गोंधळात टाकणारी ही स्थिती आहे, यात शंका नाही. हे बदल तात्पुरते आहेत की पृथ्वीवर होऊ लागलेल्या एका मोठ्या संक्रमणाचे द्योतक आहेत हे नेमकेपणाने सांगता येत नाही, यामुळे अशी संभ्रमावस्था तयार झाली आहे. 

हवामानातील हे बदल आता जगात अनेक मोठ्या आणि विस्तृत क्षेत्रात दिसू लागले आहेत. याचे मुख्य कारण मनुष्याच्या सततच्या एकाच प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, एकाच विशिष्ट पद्धतीने पृथ्वी भोवतालचा नजीकचा वातावरण थर (तपाम्बर, Troposphere) अल्प काळापुरता बदलतो आहे. या थराची वरची मर्यादाही (तपस्तब्धि, Tropopause) वाढते आहे. त्यामुळे जाणवणारे हवामानबदल अल्प काळापुरतेच, पण तीव्र स्वरूपाचे असल्याचेही लक्षात येते आहे. 

पृथ्वीवर विविध ठिकाणी असे अल्पकालीन तीव्र हवामानबदल यापूर्वी अनेक वेळा झालेले आहेत. मात्र त्या वेळची बदलामागची कारणे  आत्तापेक्षा खूपच वेगळी होती आणि त्यातली बरीचशी कारणे नैसर्गिक होती. प्राचीन काळातले हे बदल संख्येने आणि तीव्रतेने खूपच जास्त होते, असे उपलब्ध नोंदी आणि पुराव्यांवरून लक्षात येते. आजही हे बदल कमीअधिक प्रमाणावर आणि कमीअधिक वेगाने  पृथ्वीवरच्या विविध भागांत होतच आहेत. आज जगभरात वाढत असलेला माणसाचा हस्तक्षेप सध्याच्या हवामानबदलास मोठ्या प्रमाणावर हातभार लावतो आहे, हे मात्र नक्की. 

अगदी नजीकच्या काळातच भारतातील जवळपास सर्वच राज्ये, ज्याचा अंदाजही करता येणार नाही, अशी आत्यंतिक अनियमित हवा अनुभवतील, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. महाराष्ट्राने तापमानात होणारी वाढ, कडाक्‍याची थंडी, गारपीट या स्वरूपात याचा अनुभवही घेतला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती अशा चरम (extreme) घटना, बदलत्या हवामानात आणखीनच तीव्र होतील, असाही एक अंदाज आहेच. भारतातील ऋतुचक्रात गेल्या काही वर्षांपासूनच बदल जाणवू लागल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे निरीक्षण सांगते. भारतातील हवामानबदलाचा सगळ्यात मोठा व नेमका निर्देशक म्हणजे इथल्या मॉन्सूनच्या वृत्तीत होणारे बदल हाच आहे. भारतात जाणवत असलेल्या हवामानबदलामागे इथे होणारे कार्बन डायऑक्‍साईडचे उत्सर्जन हे एकमेव कारण असल्याचेही अनेकांना वाटते आहे. 

गेल्या काही हजार वर्षांत, पृथ्वीवरच्या हिमआवरणाचे प्रमाण ३३ हून जास्त टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. समुद्राची पातळी अनेक मीटरनी सर्वत्र उंचावली आहे. बर्फाच्या आवरणाचा दाब कमी झाल्यामुळे त्याखालच्या भूभागाची उंची वाढली आहे. वनस्पती आणि अरण्य प्रदेशांचे विषुववृत्तापासून धृवापर्यंतच्या प्रदेशांत अनेक वेळा स्थानबदल व आंदोलन झाले आहे. जगभरातील अनेक सरोवरांत पाण्याचे प्रमाण वारंवार कमीजास्त झाले आहे. वाळवंटी प्रदेशांचा विस्तार वाढला आणि कमीही झाला आहे. बदलाच्या या आपत्तीत अनेक सस्तन प्राण्यांचा बळी गेला आहे. 

हवामानबदलांमुळे विविध जलाशयातील मत्स्य जिवांचे वितरण थोड्याफार फरकाने बदलते आहे. हिमक्षेत्रातील बर्फाचे प्रमाण कमीजास्त होते आहे. अनेक नदी-खोऱ्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते आहे. तापमानात कधी वाढ, तर कधी एकाएकी घट होते आहे. शेतीप्रधान देशात पावसाचे आणि शेतीचे वेळापत्रक कोलमडते आहे. आर्क्‍टिक व अंटार्क्‍टिक, तसेच ग्रीनलंड प्रदेशातील बर्फाचे विलयन आणि समुद्रावरील बर्फाची कमी होणारी जाडी, महासागर, उपसागर आणि आखाते यातील जलचरांच्या नष्ट होणाऱ्या जाती, प्रजाती, वाळवंटे आणि जंगलांच्या बदलत्या सीमा, वनस्पतींचे बदलणारे साहचर्य या घटना आधुनिक काळातील हवामानबदलाच्या प्रमुख सूचक घटना आहेत. 

जागतिक तापमानवृद्धी हा सध्याच्या काळातला मुख्य हवामानबदल आहे. तापमानवृद्धी आणि हवामानबदल हे सध्याच्या काळाचे वास्तव बनले आहे. ‘आयपीसीसी’चा (इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्‍लायमेट चेंज) हवामानबदलाविषयीचा नवीन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यानुसार सध्या जगभरात सुरू असलेला तापमानबदलाचा वेग असाच पुढे सुरू राहिला, तर भविष्यात पृथ्वीवरील तापमानात १.५ अंश सेल्सिअसनी वाढ होईल आणि त्याचे अनेक गंभीर परिणाम होतील. सध्याचा तापमानवाढीचा वेग असाच राहिला, तर २०४० पर्यंत ही वाढ २ अंश सेल्सिअस इतकी होऊ शकेल. सध्याची होणारी वाढ ही १.५ अंशांपर्यंतच स्थिर राहावी म्हणून जगातील सर्वच देशांनी कसून प्रयत्न करणे आता आत्यंतिक गरजेचे आहे. 

जगातल्या सगळ्या महासागरांच्या सरासरी तापमानात सध्या वाढ होत आहे. समुद्राच्या सातशे मीटर खोलीपर्यंतच्या भागांत एक दशांश अंश सेल्सिअसने वाढ जाणवते आहे. अंटार्क्‍टिकच्या द्वीपकल्पीय भागात समुद्राचे तापमान पाच दशांश अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले आहे. पृष्ठीय तापमानात होणाऱ्या या वाढीमुळे हिमआवरणाचे खालचे थरही आता वितळू लागले आहेत. याचाच अर्थ असा, की नजीकच्या भविष्यात या वाढीचे विध्वंसक परिणाम सगळीकडे जाणवू लागतील. समुद्राची पातळी वाढेल, किनारी प्रदेश जलमय होतील, प्रवाळ नष्ट होतील आणि अन्नाचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवेल! तापमानात होणारी १.५ अंशापासून २ अंशापर्यंतची वाढ आणि त्यामुळे येणारी संकटे थांबवायला आपल्या हाती केवळ डझनभर वर्षेच उरली आहेत, याबद्दल अनेक शास्त्रज्ञांमध्ये एकमत दिसून येते. हे आव्हान खरोखरच खूप मोठे आहे. 

तापमानवाढीमुळे जगातील व विशेषतः आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिकवरील हिम वितळत असून हिमालय, युरोपियन आल्प्स येथील हिमनद्याही वेगाने वितळत आहेत. गेल्या दशकात पूर्व अंटार्क्‍टिकवरील बर्फाच्या थरात दर वर्षी दोन सेंमी या वेगाने वाढ झाली आणि पश्‍चिम अंटार्क्‍टिकवरचा थर दर वर्षी नऊ मिमी या वेगाने वितळला. १९५७ पासूनची अंटार्क्‍टिकवरील हवेची निरीक्षणे असे सांगतात, की इथल्या हिमस्तरांचे तापमान एका दशकात एक दशांश अंश सेल्सिअस या वेगाने वाढते आहे. जगभरात होत असलेल्या जीवाश्‍म इंधनाच्या वापरातून तयार होणाऱ्या हरितगृह वायूमुळे ही तापमानवाढ होत असल्याचे ‘नासा’चे निरीक्षण सांगते. अंटार्क्‍टिकवरील हवामानबदलाच्या सध्या चालू असलेल्या अभ्यासातून असेही लक्षात येते आहे, की भविष्यात अंटार्क्‍टिकवर हिम वितळण्यापेक्षा हिमवृष्टीचे प्रमाण अधिक असेल. 

अंटार्क्‍टिकच्या तापमानातील वाढीचा नजीकच्या काळात जाणवू शकेल, असा मोठा परिणाम म्हणजे जागतिक सागर पातळीतील वाढ होय. दरवर्षी ३ मिमी वेगाने ही वाढ होऊ शकते. हिमविलयन क्रियेमुळे जागतिक समुद्रात गोडे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळून सगळ्या समुद्रांच्या पाण्याची क्षारता कमी होईल. वाढत्या उष्णतेमुळे आणि हिम विलयनामुळे अंटार्क्‍टिकच्या थंड प्रदेशात कधीही न आढळणारे पक्षी व प्राणी दिसू लागतील. आत्तापासूनच या खंडावरच्या पक्ष्यांच्या काही प्रवृत्तींत बदल होऊ लागल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. अंटार्क्‍टिकवरचे तापमान वाढू लागल्यावर आणि त्यामुळे बर्फ कमी होऊ लागल्यावर अनेक भाग बर्फाच्या आवरणातून मुक्त होतील व खंडावरील खनिजे काढण्याचे प्रयत्नही वाढतील! 

हवामानात होणारे प्रदेशविशिष्ट, अचानक आणि अल्पकालीन बदल हे सध्याच्या हवामानबदलाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हा परिणाम प्रामुख्याने त्या त्या प्रदेशातील पर्यावरणात व नैसर्गिक परिसरात माणसामुळे चालू असलेल्या बदलांचा परिपाक असल्याचे दिसून येते. पृथ्वीपृष्ठानजीकच्या वातावरणाच्या थरांचे गुणधर्म व वैशिष्ट्येही अल्पकाळासाठी झपाट्याने बदलतात, ऊर्जा संक्रमणाची नैसर्गिक प्रक्रिया बिघडते आणि हवामानात बदल जाणवतो. पृष्ठभागाजवळचे हवामान हे आत येणाऱ्या सौर उर्जेचे प्रमाण व त्यांचा विनियोग यावर ठरते. त्यामुळे उष्णतेत एकाएकी होणारी तीव्र वाढ, तितक्‍याच वेगाने अल्पकाळात कमी होणारे किंवा सामान्य स्थितीला येणारे तापमान, अल्पकालीन वृष्टी, गारपीट यांचा संबंध वैश्‍विक हवामानबदलाशी न लावणेच बरे, असेही अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. 

हवामानात होणाऱ्या दीर्घकालीन बदलांचा कालखंडच खूप मोठा असतो आणि हे बदल अगदी संथ गतीने होत असतात. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे भ्रमण, पृथ्वीच्या आसाचा कल व त्याचे प्रमाण, पृथ्वी व सूर्य यातील अंतर, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणपातळीचा कल, भूमी खंडाचे वितरण व त्यांचे स्थानबदल अशा अनेकविध गोष्टींमुळे पृथ्वीभोवतालच्या वातावरणात संथ गतीने बदल होत असतात. त्यातून जागतिक पातळीवर तापमान, पर्जन्यमान यांचे आकृतिबंध बदलत असतात. त्यामुळे हवामानबदल निश्‍चितच संभवतात. मात्र, ही एक अति दीर्घकालीन प्रक्रिया असल्यामुळे माणसाच्या नेहमीच्या जीवनाशी त्याचा दुरान्वयानेही संबंध येण्याची शक्‍यता कमी असते. मात्र, या दोन्ही अल्प आणि दीर्घकालीन बदलांचा तापमान हा प्रमुख निर्देशक आहे. 

ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे वितळणे, सागरपातळीत वाढ होणे, पर्वत प्रदेशात वृक्षरेषात (Treeline) होणारी आंदोलने, ध्रुवीय प्रदेशात हिमनग वितळून त्यांचे विषुववृत्तीय प्रदेशाकडे होणारे संचलन यामुळे स्थानिकदृष्ट्याही हवामानात थोडेफार बदल निश्‍चितच होतात. पण सध्या आढळणाऱ्या हवामानातील बदलत्या प्रवृत्ती यांचा संबंध मर्यादित क्षेत्रात होत असलेल्या पर्यावरण बदलांशीच लावणे इष्ट ठरेल, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटते. 

पृथ्वी - समुद्र - वातावरण ही यंत्रणा एका निश्‍चित पद्धतीने परिणामकारकपणे कार्यरत असते. हवामानात होणाऱ्या दूरगामी बदलासाठी या यंत्रणेतील सर्व नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. मात्र सध्या सर्वत्र आढळणारे हवेतील अल्पकालीन व तीव्र बदल हे पृष्ठभागानजीकच्या तपाम्बर या वातावरण थरात होत असलेली माणसाची ढवळाढवळ आणि अमर्याद हस्तक्षेप याचाच परिपाक आहेत. असे बदल होऊ नयेत म्हणून निसर्गाचे संतुलन राखणे नेहमीच आवश्‍यक असते आणि माणसाच्या वातावरणातील व पर्यावरणातील हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवण्यामुळेच हे साध्य होऊ शकेल.

संबंधित बातम्या