परदेशातलं ‘बाबापण’ 

गौतम पंगू 
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

अनुभव
 

अलीकडची गोष्ट. आमच्या चार वर्षांच्या मुलीबरोबर आम्ही दोघं बाल गणेशाची ॲनिमेशन फिल्म बघत होतो. गणपतीच्या जन्माचा सीन चालू होता. अंगाला लावलेल्या हळदीपासून तयार केलेल्या मुलाच्या पुतळ्यात पार्वती जीव फुंकते आणि गणपतीचा जन्म होतो. आई स्नान करत असताना बाहेर राखण करत बसलेला गणपती पार्वतीपती शंकरालाही आत जाऊ देत नाही. हा सगळा तपशील मुलगी रंगून जाऊन पाहात होती. 

फिल्म बघता बघता ती आईकडे वळली आणि म्हणाली, ‘पण आई..’ 
तिचे हे शब्द म्हणजे प्रश्‍नांची सरबत्ती सुरू होण्याची पूर्वसूचना असते हे माहीत असल्यामुळं मी फिल्म पॉज केली. 
‘बोला!’ तिची आई म्हणाली. 
‘शंकर म्हणजे बेबी गणेशाचा बाबा ना?’ 
‘हो..’ 
‘मग बेबी गणेशानं त्याच्या बाबाला ओळखलं कसं नाही?’ 
‘कारण जेव्हा गणेशाचा जन्म झाला, तेव्हा त्याचा बाबा तिथं नव्हता. मग तो बाबाला कसा ओळखणार?’ 
‘ओह.. ’ थोडा विचार करून ती माझ्याकडं वळली, ‘बाबा, वेअर यू देअर व्हेन आय वॉज बॉर्न? मी तुला लगेच ओळखलं होतं का?’ 
क्षणभर विचार करून म्हणालो, ‘हो, तुझा जन्म झाला तेव्हा मी त्याच खोलीत होतो. तू मला लगेच ओळखलं होतंस का, हे नक्की सांगू शकत नाही. पण मला मात्र तू बाहेर आल्याक्षणीच ओळखीची वाटू लागली होतीस.’ 

तिला माझं उत्तर कितपत कळालं ते माहीत नाही, पण या संवादामुळं ‘बाबा’पणाचा सुरुवातीचा काळ माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. 

***

अमेरिकेत राहणाऱ्या बहुतेक जोडप्यांमध्ये प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीच्या कालावधीत नवराही बायकोबरोबर सगळ्या गोष्टींत गुंतलेला असतो. याचा अर्थ भारतातले नवरे या सगळ्यापासून अलिप्त असतात असं सरधोपट विधान अजिबात करायचं नाही, पण अमेरिकेत बरेचदा ही एक आवश्‍यकता बनून जाते. त्यात दोघंही नोकरी करत असतील आणि भारतातून अशा वेळी येणारी हक्काची कुमक मागवता येत नसेल तर दुसरा पर्यायच उरत नाही. ‘आपण प्रेग्नंट आहोत’ हे कळाल्यावर दोघांचा एक आतुरतेनं भरलेला सुंदर प्रवास चालू होतो, पण त्या प्रवासाचा वेग मात्र दोघांसाठी वेगवेगळा असतो. तिच्या पोटात एक नवीन जीव आतमधून ढुशा देत आणि स्वतःसाठी जागा निर्माण करत वाढायला लागलेला असतो. त्या दोघांमध्ये संपर्काचे आणि दळणवळणाचे रस्ते तयार व्हायला लागलेले असतात आणि त्यामुळं तिच्यात अनेक बदल व्हायला सुरुवात झालेली असते. पण ‘आपण बाप होणार’ हा आनंद वगळला तर त्याशिवाय त्याचा तिच्या पोटातल्या बाळाशी कुठलाच डायरेक्‍ट दुवा इतक्‍यात जोडला गेलेला नसतो. पण तिची गाडी सुसाट सुटलेली असते. तिचे मूड स्विंग्ज सुरू झालेले असतात, खाण्यापिण्याच्या आवडी बदलून गेलेल्या असतात. तिच्यात होणाऱ्या बदलांचा वेग इतका जास्त असतो, की त्याला बरेचदा यामध्ये ‘कॅच अप’च खेळावं लागतं. अगदी कालपर्यंत आपल्याबरोबर टिवल्याबावल्या करणारी ही मुलगी एकदम इतकी कशी बदलली याचं आश्‍चर्य त्याला या काळात वाटल्यावाचून राहात नाही. अर्थात या सगळ्या प्रक्रियेशी काही नवरे इतके तद्रूप होऊन जातात, की त्यांच्यामध्ये ‘सिंपथेटिक प्रेग्नंसी’ म्हणजे प्रेग्नंट नसतानाही प्रेग्नंसीची काही लक्षणं दिसू लागण्याचा प्रकार होतो. मीही माझ्या बायकोला खाण्याच्या प्रत्येक डोहाळ्यांमध्ये पुरेपूर साथ दिली होती आणि माझंही वजन वाढवून प्रेग्नंसीमध्ये मनानं (आणि तनानं) किती गुंतलेलो आहे हे दाखवून दिलं होतं. आता डिलिव्हरीनंतर तिचं वजन लगेचंच उतरलं आणि माझं तेव्हा सुटलेलं पोट मुलगी चार वर्षांची झाली तरी अजूनही उतरलेलं नाही हा भाग वेगळा! मग हळूहळू सोनोग्राफीमधून सुरुवातीला दिसणारी बाळाच्या हृदयाची स्पंदनं, नंतर सोनोग्राफीत प्रत्यक्ष दिसणारं बाळ, पाचव्या-सहाव्या महिन्यापासून हाताला लागणाऱ्या बाळाच्या लाथा या माध्यमांतून तोही बाळाशी जोडला जाऊ लागतो. तरीही बाळ आणि तो या दोघांमधला दुवा नेहमी तीच असते. संशोधन असं सांगतं, की गर्भातल्या बाळाशी बोलण्याचे, त्याला गाणी गाऊन दाखवण्याचे बाळाच्या मेंदूच्या जडणघडणीमध्ये अनेक फायदे असतात. 

माझा एक नाटकवेडा मित्र बायकोच्या पोटातल्या आपल्या बाळाला मराठी आणि इंग्रजी नाटकांतली मोठमोठी स्वगतं म्हणून दाखवत असे. आता ‘कुणी घर देता का घर’ किंवा ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्‍चन’ वगैरे ऐकून त्या सहा महिन्यांच्या गर्भाची काय अवस्था होत असेल याची कल्पना केलेलीच बरी. मग त्यानं ‘ओ बाबा, किती पकवताय’ असं म्हणून आतून वैतागून लाथा मारल्या तर त्यात काय नवल? पण अशा गोष्टी सोडल्या तर नवऱ्याला या काळात बाळाचा पाळणा, चेंजिंग टेबल वगैरे गोष्टी जोडणं, गाडीत कार सीट बसवून घेणं, त्यात बाळाला कसं बसवायचं याचं ट्रेनिंग घेणं, बाळाच्या जन्माच्या वेळी आणि पहिले काही दिवस काय केलं पाहिजे याची माहिती देणाऱ्या लमाझ किंवा तत्सम क्‍लासेसना तिच्याबरोबर जाणं, हॉस्पिटलमध्ये कधीही जावं लागेल म्हणून ती सुप्रसिद्ध बॅग भरून ठेवणं वगैरे गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते. 

***

यानंतरचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष बाळाचा जन्म! डिलिव्हरीमधली बापाची इन्व्हॉल्व्हमेंट काळाप्रमाणं बदलत गेली आहे. पूर्वीच्या काळी बायको प्रसूतिवेदनांनी तळमळत असताना राजेमहाराजे लांब कुठंतरी आपल्या महालात निवांत असायचे, मग एखादी दासी सतारीचं बॅकग्राउंड म्युझिक चालू असताना पळतपळत राजाच्या महालात यायची आणि अपत्यजन्माची आनंदवार्ता द्यायची. मग राजा त्याला झालेल्या खुषीच्या प्रमाणात तिला कुठं एखादी अंगठी किंवा कंठा वगैरे बहाल करायचा. अगदी फारच खूष असेल तर ‘कधीही एखादी इच्छा मागून घे, पूर्ण होईल’ असं नंतर पश्‍चात्ताप होईल असं आश्‍वासन द्यायचा (संदर्भ ः मुगल-ए-आझम मधला बुलंद इत्यादी आवाजाचा अकबर). नंतर मग डिलिव्हऱ्या हॉस्पिटलमध्ये व्हायला लागल्या. बाप लोक डिलिव्हरी रूमच्या बाहेरच अस्वस्थपणे वाट बघायला लागले आणि नर्सनं बाहेर येऊन ‘आपको बेटा हुआ है।’ वगैरे सांगितलं की खूष व्हायला लागले. माझ्या एका मित्राची बायको २०११ च्या भारत - ऑस्ट्रेलिया फायनलच्या वेळी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ती आत तळमळत असताना बाहेर हा पठ्ठ्या आरामात मॅच बघत बसला होता. नर्स मुलाच्या जन्माची बातमी घेऊन बाहेर आली आणि नेमका तेव्हाच गौतम गंभीर चौकार मारायच्या प्रयत्नात ९७ वर आउट झाला. तिनं त्याला आनंदवार्ता द्यायला आणि याच्या तोंडातून काही शेलके अपशब्द बाहेर पडायला एकच गाठ पडली. या घटनेनंतर त्याच्यावर कुठल्याही खेळाच्या वर्ल्डकपची लाइव्ह, रेकॉर्डेड किंवा अन्य कुठल्याही स्वरूपातील कोणतीही मॅच बघायला आयुष्यभर बंदी घालण्यात आलेली आहे, हे वेगळं सांगायला नकोच. 

***

अमेरिकेत तर बायकोबरोबर नवरा डिलिव्हरी रूममध्येच असतो. तिच्यासाठी डिलिव्हरी हे दिव्य असतंच, पण त्याला हा प्रकार कितपत झेपतो यावर हे त्याच्यासाठीसुद्धा दिव्य ठरू शकतं! कारण हे प्रकरण काही तासांपासून ते अक्षरशः काही दिवस चालू शकतं. एकदा का ॲक्‍टिव्ह लेबरचा हलकल्लोळ सुरू झाला की बरेचदा धांदल उडून आधी शिकलेली श्‍वासोच्छवासाची तंत्रं, आधी बनवलेले डिलिव्हरी प्लॅन्स कुठल्याकुठं विसरले जातात. डॉक्‍टर्स आणि नर्सेस काहीतरी बोलत असतात, भराभर काहीतरी करत असतात, समोर ती यातनांमध्ये तळमळत असते, अशावेळी आपण नक्की काय करावं आणि करू नये याबाबत त्याला गोंधळल्यासारखं होतं. आपण काहीतरी करायला गेलो आणि ते तिला रुचलं नाही तर, याची भीती असते. शिवाय यावेळचे देखावे, आरडाओरडा वगैरे कमजोर हृदयाच्या व्यक्तींसाठी नसतात. डिलिव्हरी रूममध्ये आलेला नवराच बेशुद्ध पडला आणि त्याच्यावर शेजारच्या रूममध्ये उपचार करावे लागले असे किस्सेही घडलेले आहेत. एकंदरीतच यावेळी त्यानं हे लक्षात ठेवलं, की इथं आपली भूमिका दुय्यम आहे आणि आपण फक्त तिला शक्‍य तितकी मदत करायची आहे आणि आधार द्यायचा आहे, तर हा अनुभव सुद्धा खूप आनंददायी ठरू शकतो. अर्थातच यातला सर्वाधिक आनंदाचा भाग असतो तो म्हणजे शेवटी हातात येणारा छोटासा मांसाचा गोडगोड गोळा! 

***

एकदा का दोनाचे तीन होऊन ते हॉस्पिटलमधून घरी आले की सगळंच बदलून गेलेलं असतं. ताज्या ताज्या आई झालेल्या तिची रिकव्हरी सुरू असतेच, पण नुकताच जगात आलेला तो छोटा प्राणी ताबडतोब सगळ्या रुटीनचा ताबा घेतो. किती गोष्टी सांभाळायच्या असतात. ब्रेस्टमिल्क की फॉर्म्युला, बाळ त्याला कसं ॲडजस्ट होतंय, दुधाचा किंवा फॉर्म्युल्याचा त्याला काही त्रास होत नाही ना, बाळाच्या झोपेचं रुटीन कसं बसतंय (आणि त्याप्रमाणं आपल्याला किती झोप मिळतेय), त्याचं ब्लॅंकेट त्याला गुदमरवून तर टाकत नाही ना, त्याला थंडी तर वाजत नाही ना, ते नक्की का रडतंय, त्याच्या ‘शी-शू’ची फ्रिक्वेन्सी आणि रंग वगैरे डॉक्‍टरांनी सांगितल्यासारखेच आहेत ना, डायपर्स कापडी वापरायचे की डिस्पोजेबल, बाळाच्या अंघोळीची तयारी... अशा अनेक गोष्टींचा त्या दोघांना सामना करावा लागतो. पण त्यातही या सगळ्यात ती त्याच्यापेक्षा आधीच कैक योजनं पुढं निघून गेलेली असते आणि बरेचदा ती बाळाच्या संगोपनाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकते. तिला बाळाशी जोडणारी नाळ जरी जन्मानंतर कापली असली तरी बाळ तिच्या गंधाची, आवाजाची ओळख आतूनच घेऊन आलेलं असतं. ती नव्यानं बाळाच्या प्रेमात पडत असते, त्या दोघांमधले नाजूक दुवे अजूनच घट्ट होत असतात आणि नवानवा बाबा झालेला तो मात्र पुन्हा काहीसा गोंधळून जातो. शिवाय तिचा ‘तोसुद्धा बाळाची काळजी घेऊ शकतो’ यावर विश्‍वास बसायला बराच वेळ जातो. पण सगळंच ती एकट्यानं करू शकत नाही. मग बरेचदा भेटायला आलेल्या लोकांना तोंड देणं, दुधाच्या बाटल्या निर्जंतुक करणं, डायपर बदलणं (यावेळी कराव्या लागणाऱ्या झटापटी आणि होणारे खास गंधस्पर्शयुक्त अपघात हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे!) अशा कामांसाठी बाबा लोकांना कंबर कसावी लागते. शिवाय अमेरिकेतले पॅटर्निटी लीव्ह, म्हणजे बाळाच्या जन्मानंतर वडिलांना मिळणाऱ्या सुटीबद्दलचे कायदे अगदीच मागासलेले आहेत. त्यामुळं बहुतेक वेळा बाबाला बाळाच्या जन्मानंतर एक-दोन आठवड्यांत कामावर रुजू व्हावं लागतं. तिला दिवसभर बाळाकडं बघावं लागणार याची गिल्ट, बाळ आणि तिच्याबरोबरचा फॅमिली टाइम चुकणार याची चरफड, ऑफिसमधल्या कामाचं ओझं आणि पुरेशी झोप न मिळाल्यामुळं रेंगाळत चालणारा मेंदू या गोष्टींशी लढत त्याला ऑफिसमधला दिवस ढकलावा लागतो. या काळात आमच्या मुलीचं मध्यरात्रीचं फिडींग झालं की तिला कडेवर घेऊन burping करण्याचं काम माझं असे. बायकोनं कोपरानं हलवून उठवलं, की मी अर्धवट झोपेतच हात पुढं करत असे. बायको मुलीला माझ्या हातांत देत असे आणि मी तिला कडेवर घेऊन  तिची पाठ थोपटून burping करवत असे. हे सगळं इतक्‍या सवयीचं झालं होतं, की अपुऱ्या झोपेमुळं एकदा ऑफिसात स्टाफ मीटिंगमध्ये डुलकी लागली असताना कलिगनं हळूच कोपर मारून उठवायचा प्रयत्न केला तर मी झोपेत त्याच्याकडं वळून माझे दोन्ही हात पुढं केले होते. त्याचा काय समज झाला कुणास ठाऊक, पण नंतर मीटिंग्जमध्ये लोक माझ्या शेजारी बसणं टाळायला लागले! 

***

तर असे पहिले काही आठवडे जातात आणि मग हळूहळू बाळाला लक्षात यायला लागतं, की आपल्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या आपल्या आईबरोबर हा दुसरा कोणीतरी इसमसुद्धा आजूबाजूला नेहमी असतो. हो, हा माणूस थोडा धांदरट आहे, अधूनमधून काहीतरी गोंधळ घालून ठेवतो, मग आई त्याला रागावते, पण तसा बाकी बरा आहे. हे दोघं एकमेकांवर आणि आपल्यावर खूप प्रेम करतात. हळूहळू बाबाचा आवाज, चेहरा बाळाच्या ओळखीचा होऊ लागतो आणि मग एखाद्या दिवशी आई जवळ नसताना बाबाच्या चेहऱ्याकडं टक लावून बघताना बाळ चक्क हसतं. आईच्या मध्यस्थीशिवाय बाळ आणि बाबामध्ये झालेला हा पहिलावहिला संवाद बाबाच्याही चेहऱ्यावर मोकळं हसू फुलवतो. तो मनात म्हणतो, ‘अब आया है उंट पहाड के नीचे।’ आणि आनंदानं आईला ही बातमी सांगायला जातो. 

***

असा हा बाबा होतानाचा आणि बाबा झाल्यावरच्या पहिल्या काही दिवसांचा प्रवास. आपलं आणि बाळाचं स्वतंत्र नातं विकसित करताना बाबाला आई आणि बाळाच्या नाजूक आणि अतिशय जवळच्या नात्याचं महत्त्व जाणून त्याला कुठलाही धक्का न लावण्याचं संतुलन साधावं लागतं. आईलाही काहीवेळा बाबावर विश्‍वास ठेवून त्याला आणि बाळाला जवळ येऊ देण्यासाठी एक पाऊल जाणीवपूर्वक मागं घ्यावं लागतं. एकदा हे जमून गेलं, की मग त्या तिघांमध्ये हळूहळू रेशमाचे मऊ, सुखद बंध विणले जाऊ लागतात. बाळ आईबाबांना त्याच्याच नव्हे, तर एकमेकांच्याही नव्यानं जवळ आणतं आणि मग खरी धमाल सुरू होते. बाबा आणि बाळाच्या बाँडिंगचे काय फायदे असतात यावर बरंच संशोधन झालंय. त्यातला एक फायदा म्हणे असाही आहे, की बाळाबरोबर वेळ घालवल्यानं बाबाचा आत्मविश्‍वास आणि कामातला ताण सहन करायची ताकद वाढते. बहुधा ऑफिसमधला बॉस लहान बाळासारखाच आहे अशा दृष्टिकोनातून त्याच्याकडं बघितलं की डोक्‍याला होणारा ताप कमी होत असावा. पण बाळाबरोबर वेळ घालवताना, त्याच्यासाठी लहानसहान गोष्टी करताना, त्याच्याबरोबर मूल होऊन खेळताना आयुष्यभर टिकणाऱ्या आनंदाच्या ठेवी त्याला पदोपदी मिळत असतात, हा एकमेव फायदा पुरेसा नाही का? 

***

अर्थात वरवर निरागस, सोऽऽऽ क्‍यूऽऽऽट वगैरे वाटणारी मुलंही लवकरच ‘तयार’ होतात आणि आईबाबांना पद्धतशीरपणे गुंडाळायला सुरू करतात. सध्या आमचं कन्यारत्न तर डोक्‍यावर चढून बसायची एकही संधी दवडत नाही. सुरुवातीला लिहिलंय त्या बालगणेशाच्या फिल्ममध्ये पुढं शंकर रागावतो आणि गणपतीचं मस्तक धडापासून वेगळं करतो वगैरे भाग होता. हे बघून साहजिकच तिची खूप रडारडी झाली. डोळ्यातून वाहणाऱ्या गंगायमुना काही केल्या थांबेनात. शेवटी गाडी ‘पेपा पिग’ वगैरे ओळखीच्या आणि निरुपद्रवी रस्त्यांकडं वळवावी लागली. त्यातला तो सुटलेल्या पोटाचा डॅडी पिग पडद्यावर आला. त्याला बघून मुलगी लगेच रडणं विसरली आणि म्हणाली, ‘आई, बाबाची टमी अगदी डॅडी पिग सारखीच मोठी आहे नाई?’ आईनं अर्थातच अगदी मनापासून दुजोरा दिला. मायलेकी अस्मादिकांकडं बघून खुसूखुसू हसू लागल्या आणि पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं.    

फोटो फीचर

संबंधित बातम्या