विनाशकारी ‘काजवा महोत्सव’

सायली पलांडे-दातार
गुरुवार, 28 जून 2018

भाष्य
दरवर्षी ‘काजवा महोत्सव’ या गोंडस नावाखाली तो बघायला सह्याद्रीच्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वास्तविक हा काळ काजव्यांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे ‘महोत्सवा’च्या नावाखाली होणाऱ्या गर्दीमुळे या प्रक्रियेत अडथळा येतो. या अनावश्‍यक गर्दीमुळे काजवे नामशेष होण्याचा धोका आहे... 

काल परवा कोसळलेल्या धुव्वाधार पावसाच्या सलामीने लोकांचा उन्हाळ्याचा क्षीण पार धुऊन निघाला आहे! तीन चार महिने घरात कोंबून बसलेल्या, आपल्या सर्वांना आता पावसाळी सहलीमध्ये बागडायचे वेध लागले आहेत. भटक्‍या लोकांना पावसाळी सहली काही नवीन नाही. पावसाळ्याच्या सुरवातीचे कुंद वातावरण तर सगळ्यांचाच विकपॉइंट! विविध टूर कंपन्या, ट्रेकिंग कंपन्या माणसाच्या या नैसर्गिक ओढीचे व्यावसायिक संधीत रूपांतर करत असतात. अनेक ठिकाणी, गावकरी, स्थानिक सहकारी संस्था, रोजगाराची संधी म्हणून असे उपक्रम राबवताना दिसतात. पर्यटन व्यवसाय म्हटलं तर ग्राहकांना नवनवीन अनुभव देणं आलं, अनुभवातले नावीन्य आणि वेगळेपण हा ग्राहकांना खूष करण्याचा मार्ग! 

अशाच एका वैभवी निसर्ग सोहळ्याचा केल्या ४-५ वर्षांत आपण बाजार होताना बघत आहोत. शतकानुशतके निसर्गात अविरत सुरू असलेल्या, काजव्यांच्या मिलन सोहळ्याच्या सौंदर्याने माणसाला भुरळ घातली. या अप्रतिम निसर्गक्रियेची वर्णनं वर्तमानपत्र व सोशल मीडियावर फिरू लागली, त्याचे झळाळणारे रूप छायाचित्रांमधून झळकू लागले. अशा आकर्षक जाहिरातींनी घरात बसलेल्या एरवी न भटकणाऱ्यांनासुद्धा न्यूनगंड वाटून 'काजवा महोत्सव' इंन्जॉय करावासा वाटू लागला आहे. 

आज सोशल मीडिया वर अशा 'इव्हेंट्‌स'आणि 'फोटोशॉप' छायाचित्रांची चढाओढ लागली आहे. आज अनेक संस्था, गाडया भरभरून, पश्‍चिम घाटातील संवेदनशील भागात जाऊन, तिथे जेवण-खाणे -पिणे राहणे अशी व्यवस्था करून, महोत्सव साजरे करत आहेत. त्यात सर्व प्रकारचे हवशे, नवशे, गवशे सामील झाले असून ते एक प्रकारचे 'फॅड' बनले आहे. एरवी नैसर्गिक भान असणाऱ्या संस्थासुद्धा यात मागे नाहीत, अभ्यासाचे, माहितीचे कारण पुढे करून अनेक ठिकाणी व्यावसायिक पर्यटन राबवलेले दिसते; पण किती झाले तरी, पायी भटकंती करताना अचानक एका जंगल कोपऱ्यात काजव्यांच्या मिलन पाहायला मिळणे वेगळे आणि ठरवून, मोठ्या संख्येने, वाहनाने जाऊन तिथे पिकनिक करणे वेगळे! 

माणसाला 'साजरा' करावासा वाटणाऱ्या या महोत्सवमुळे काजव्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होऊ शकतात. 

काजव्यांची दुनिया! 
काजवा हा कणा नसलेल्या (अपृष्ठवंशीय) बीटल समूहातील लॅंम्पिरिडी या कीटक कुटुंबातील प्राणी आहे. त्यांच्या २१०० हुन अधिक प्रजाती, उष्णकटिबंध (tropical) आणि समशीतोष्ण (temperate) पट्ट्यात नांदतांना दिसतात. पाणथळ, दलदल, दमट भरपूर झाडी असलेले भाग यांच्या वाहिवाटेच्या जागा! त्यात काजव्यांच्या बऱ्याच जाती रात्री कार्यरत असतात तर काही अपवादात्मक, दिवसा! 

आज स्वच्छतेच्या जमान्यात सगळ्यांना 'किटाणू' अच्छे नाहीत, असे वाटते! पण बीटलवर्गीय प्राणी हे जैविक कचऱ्याच्या विघटनाचे मोठे कार्य पाडतात, परागीभवनाच्या क्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक कृमी कीटकांचा यथेच्छ समाचार घेऊन, झाडांना त्रासदायक कीटकांचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. निसर्गातील सर्व गोष्टींमध्ये 'उपयुक्तता' शोधणाऱ्यांना काजव्यांबद्दल प्रेम वाटायला एवढे कारण पुरेसे आहे. 

पश्‍चिम घाटातील, काजव्यांच्या बहुतांशी जातींमध्ये मादी ही पंख विरहित असते व अळी स्वरूपात असते. काजव्यांमध्ये निर्माण होणारा प्रकाश, सहित स्वरूपाचा, रासायनिक क्रियेतून होणारा जैविक-प्रकाश (bioluminescence) आहे. मॅग्नेशिअम व प्राणवायूच्या उपस्थितीत, काजव्यांच्या पोटात लुसिफेरसचे (luciferase) व लुसिफेरीन (luciferin) रसायनांची प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मिती होते. सुरवातीला असा समज होता, की काजव्यांची प्रकाशनिर्मिती भक्षकांना घाबरवण्यासाठी, पळवून लावण्यासाठी होत असावी. पण, प्रकाश मुख्यतः मादीला आकर्षित करण्यासाठी निर्माण केला जातो, हे आता विविध संशोधनातून मान्य झाले आहे. 

काजवा महोत्सव का नाजूक मिलनकाल! 
कुठल्याही दोन ऋतूंचा वेशीवरचा संक्रमणाचा काळ हा विलक्षण असतो. उन्हाळा संपून पावसाळ्याच्या सुरवातीला हवा कुंद, दमट होऊन झाडी असलेल्या प्रदेशात एक वेगळं वातावरण तयार होतं. अंधार असलेले, पाऊस नसलेले, वारा नसलेले, ढग नसलेले तरी दमट,ओलसर संध्याकाळचे वातावरण हे काजव्यांच्या प्रजननासाठी पोषक असते. हा कालावधी इनमीन दहा ते पंधरा दिवसांचा असतो. असे आर्द्र वातावरण सह्याद्रीतील जंगलांच्या विशिष्ट भागात तयार होते. अशा वैशिष्ट्यपूर्ण रंगमंचावर काजवे आपले प्रणयाराधन सुरू करतात. सुरवातीला एखादं दुसरा लुकलुकणारा काजवा दिसतो व थोड्याच वेळात तिथे ग्रॅंड ऑक्रेस्ट्रा सारखी देखणी मैफील जमते. विविध प्रजातींमध्ये जैविक प्रकाशाचे प्रमाण, रंग, आणि फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. त्यानुसार, विविध काजव्याचे पट्टे फुलत जातात. मधेच, सगळा मंच उजळून निघतो आणि स्वर्गीय सौंदर्याचा प्रत्यय येतो. विशिष्ट जातीचे नर काजवे एकमेकांशी रासायनिक फेरोमोन वापरून संपर्क साधतात. त्यांच्या रासायनिक संवादातून ते एक एक प्रकाश बिंदू निर्माण करत, मोठा देखावा निर्माण करतात.या देखाव्याच्या मूळ प्रेक्षक, जमिनीवर बसलेल्या मादी काजवा असतात, ज्यांना उडता येत नाही. या देखाव्याला दाद म्हणून त्याही मधून मधून क्षीण प्रकाश संकेत देत असतात. नर काजव्याकडून येणाऱ्या प्रकाशातून त्यांना काजव्याच्या प्रजनन क्षमतेची माहिती मिळत असते. मोठा प्रकाश पडणारा, जास्त वेगाने लुकलूक करणारा काजवा, 'काजविणीं'ना जास्त प्रभावित करतो. हे सर्व करण्यासाठी नर काजव्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते तसेच भक्षकांना बळी पडण्याचा जास्त धोका संभवतो. 

एकदा संकेतांची देवाण घेवाण झाली, की नर काजवे खाली उतरून मादींशी मिलन करतात. काही मादी काजवे खोटे संकेत देऊन नर काजव्यांना भुलवून त्यांचा चट्टा मट्टा करून मोकळ्या होतात. एकूण, आपला वंश पुढे नेण्यासाठी काजव्यांना निसर्गतःच जिवाची बाजी लावावी लागते. पुढे, काही दिवसात पाणथळ जागी अंडी घातली जातात व काजव्यांचा पुढील जीवनक्रम सुरू होतो. 

आपण काय करतो? 
सोहळा विलक्षण आहे, स्वर्गीय आहे यात दुमत नाही! पण माणसाने हे लक्षात घ्यायला हवे, की ही सर्व धडपड निसर्गातील वंश सातत्यासाठी आहे. माणसाच्या उपभोगाची नाही! हा प्रसंग दुर्मिळ, वर्षातून एकदाच, मोजक्‍या ठिकाणी होणारा आहे; पण दुर्दैवाने त्याबद्दल पुरेशी संवेदनशीलता बाळगली जात नाही. वरील वर्णनातून तुम्हाला हे तर लक्षात आलेले असे, की काजव्यांसाठी अशा ठिकाणी अंधार असणे, किती आवश्‍यक आहे! आपण जेव्हा मोठ्या संख्याने टॉर्च विजेऱ्या घेऊन जातो. छायाचित्रकार फोकस व्हावं, म्हणून विविध रंगांचे, फ्रिक्वेन्सीचे दिवे लावताना दिसतात. तसेच, आपण नेलेल्या वाहनांचा प्रकाश, कॅम्पवरचा प्रकाश मूळ नैसर्गिक क्रियेवर विपरीत परिणाम करत असतात. प्राण पणाला लावून मादीला आकर्षित करणाऱ्या काजव्यांचा तग या कृत्रिम प्रकाशासमोर लागणार कसा? मादी काजव्यांची या प्रकाशाच्या भाऊगर्दीत दिशाभूल होते, गोंधळ उडतो. झाडांवर सोहळे बघण्यात गर्क असल्या मंडळींना पायदळी मादी काजवे तुडवले जात आहेत,याचे भान नसते. आपल्या वाहनांनी आपण पश्‍चिम घाटातील संवेदनशील जंगलांमध्ये काजव्याच्या लोभाने आत आत शिरत जातो व अधिवासाचा विध्वंस करत जातो. 

आज सह्याद्रीच्या उत्तरेतील पुरुषवाडी-अकोले, रतनगड, हरिश्‍चंद्रगड, पाबे घाट, राजमाची, ताम्हिणी, अंधारबन, भीमाशंकर, वरंधा, महाबळेश्वर पासून ते दक्षिणेकडील राधानगरी, पारगड-कोल्हापूरपर्यंत सर्व ठिकाणी झुंडीच्या झुंडी काजवे पाहायला जात आहेत. वर उल्लेखलेल्या सर्व जागा या अभयारण्याचा किंवा संरक्षित जंगलांचा भाग आहे. तिथे राजरोसपणे जाणे योग्य नाही, किंबहुना, परवानगीशिवाय जाणे बेकायदेशीर ठरते. या जंगलांमध्ये काजव्यां व्यतिरिक्त दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती प्रजातींचा वास आहे. संध्याकाळी व रात्री जंगलात जाण्याने त्यांच्या पाण्याच्या, शिकारीच्या, अन्न मिळवण्याच्या कार्यात व्यत्यय येतो व त्यांना इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागतो. तिथे जाऊन, आपण त्यांच्या उरलेल्या जागेत, त्यांच्या वेळेवर अतिक्रमण करत आहोत. गोंगाट, हवेतील प्रदूषण ,कचऱ्यामुळे मूळ नैसर्गिक अधिवासाची कधीही न भरून निघणारी हानी करत आहोत. जसे जसे 'काजवा महोत्सव' लोकप्रिय होत चालले आहेत तसे तसे जास्त संख्येने लोक अशा ठिकाणी भेटी देत आहेत. हे, असेच अनिर्बंध चालत राहिले तर काजव्यांचा प्रजाती मुख्यतः प्रदेशाधिष्ठित (endemic) प्रजाती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. 

उद्या एखाद्या ठिकाणचे काजवे संपले तर ग्राहकांना खूष करण्यासाठी व्यावसायिक संस्था काजवे शोधत जास्त आडवाटेच्या अधिवासांकडे वळतील! हे सह्याद्रीच्या जैवविविधतेसाठी प्रचंड धोक्‍याचे आहे. सन २०१० पासून जगभरात काजवे कमी होताना आढळत आहेत व त्याबद्दल संशोधकांची ओरड चालली आहे. ट्रॅफिक, प्रकाशाचे प्रदूषण, जंगल व पाणथळ जागा कमी होणे व औषधासाठी गोळा करणे ही त्यांच्या नष्ट होण्याची मुख्य करणे आहेत. आजही, आपल्याला पश्‍चिमघाटातील काजव्याबद्दल पुरेशी माहिती नाही. सर्व प्रजाती माहीत नाही, त्यांच्या प्रकाश संभाषणाचा अभ्यास नाही. आपल्या पर्यटनामुळे त्यांच्यावर व परिसंस्थेवर काय दूरगामी परिणाम होत आहेत याचा संख्यात्मक अंदाज नाही. त्याचा पुरेसा अभ्यास करायला ही आज अवकाश नाही, हे दुदैव आहे. समज पूर्णपणे विकसित नाही तर संवर्धन दूरची गोष्ट आहे! काजव्यांचा सोहळा हा निसर्गातील अत्यंत दुर्मिळ दृश्‍यांपैकी एक आहे. सह्याद्रीच्या वैभवशाली जंगलांमध्ये तो घडतो यात आपण आनंद आणि अभिमान मानायला हवा. एकदा नाहीसे झाल्यास कितीही किंमत देवून आपल्याला हे दृश्‍य निर्माण करता येणार नाही, आणि महत्त्वाच्या प्रजाती नष्ट झाल्याने निसर्ग साखळीतले दुष्परिणाम थांबवता येणे अशक्‍य होईल. 

लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी काडेपेटीत, काचेच्या बाटलीत काजवा पकडून, हरखून जाऊन, त्या प्रकाशाची मजा अनुभवली असणार! त्यात एक निरागसता होती, निसर्गाबद्दलचे कुतूहल होते. माणसाला नेहमीच सौंदर्याची लालसा राहिलेली आहे. त्यात काजव्यांचे सामूहिक मिलन तर अद्भुत प्रकरण आहे; पण सर्व आजूबाजूचा निसर्ग हा आपल्याच मनोरंजनासाठी निर्माण केला आहे, हे मानणे चुकीचे आहे. संवर्धन करणाऱ्या अनेक संस्थांनी असे मांडले आहे, की माणसाला त्याच्यासारखे असणारे प्राणी, मोठे प्राणी हे संवर्धनासाठी जास्त मौल्यवान, योग्य वाटत आले आहे. यांच्या तुलनेत, काजवे हे कणा नसलेले कीटक म्हणजे किस झाड की पत्ती! पण म्हणून, त्यांच्या अधिवासात जाऊन, मिलनाचे खासगी क्षण असे चवीचवीने बघत, त्यात व्यत्यय आणणे कितपत बरोबर आहे! जगभर अपृष्ठवंशीय प्राण्यांबद्दल माणसाची आस्था आणि प्रेम कमी पडते आहे व संवर्धनाला पुरेसा हातभार लागत नाही. निसर्गाकडे पाहताना एक सहवेदनेच्या पातळीवर आपण या सर्व जीव सृष्टीकडे, स्वार्थी मानावाधिष्ठित दृष्टिकोनातून न बघता 'वसुधैव कुटुंम्बकम्‌' या भावनेने नक्कीच बघू शकतो. दैवी वाटणाऱ्या काजव्यांचा प्रकाश चिरकाल टिकावा आणि त्यांची पुरेशी संख्या निसर्गात कायम राहील याकरता प्रयत्न करायला हवे. 

मलेशिया, न्यूझीलंड अशा अनेक देशात काजव्यांचे 'पर्यावरण पूरक' पर्यटन होत आहे. पर्यावरणपूरक म्हणजे फक्त पर्यावरणाची ओळख आणि उपभोग नव्हे तर त्याने पर्यावरण संवर्धनाला कसा हातभार लागेल हे बघणे! तेथील स्थानिक समूह काजव्यांचा सोहळ्याचे निवडक लोकांसाठी पर्यटनाचे आयोजन करतात. त्यातून होणारा फायदा ते छोट्या कीटक आणि इतर प्रजातींच्या संवर्धनासाठी वापरत आहेत. हे करताना कडक नियम पाळून मर्यादित स्वरूपात हे उपक्रम सुरू आहेत. लोकांची हे बघण्याची कळीची इच्छा आणि संवर्धनसाठीचे निकष सांभाळणे, ही तारेवरची कसरत आहे. पण, भविष्यातील अशा तरतुदींची आपल्याकडे व्यवस्था करणे अपरिहार्य आहे, प्रसंगी सह्याद्रीतील पर्यटनावर कठोर निर्बंध घालणे आवश्‍यक वाटते. 

काजवा महोत्सवातून होणारे निसर्गाचे नुकसान हा प्रश्न सोपा वाटला तरी उत्तरं सोपी नाही. आज या अधिवासातील माणसाचा वावर नियंत्रित करायला पुरेशी यंत्रणा नाही, वनविभाग विविध मर्यादांमुळे मोठया प्रदेशात अशी अंमलबजावणी करू शकत नाही. काजव्यांची सुंदर प्रकाश आरास पाहू नका, असे सरसकट म्हटलं तर 'तुम्ही कोण आम्हाला सांगणार', असा प्रश्न हमखास उपस्थित होईल. पण, काजवा प्रजाती व अधिवासाच्या संवर्धनासाठी आपल्या इच्छेला मुरड घालणे, हाच यावर जालीम उपाय आहे. 

कट्यार काळजात घुसली चित्रपटात, तळ्याकाठच्या गाण्यात काजव्यांची प्रकाशबेटे फुलवताना अशीच निसर्ग जगताशी संवाद साधणारी भावना व्यक्त केली गेली आहे. निसर्ग साधक व्हायचे असेल तर इतर प्राणिमात्रांबद्दलची सहवेदना अनुभवायला हवी! पृथ्वीवरील ही स्वर्गीय दृश्‍ये आणि त्याचे निर्माते जपणे आपल्याच हातात आहे! 
मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका, 
संवेदना संवादे, सहवेदना जपताना!   

फोटो फीचर

संबंधित बातम्या