रोजगार संधी ः एक मागोवा

दत्तात्रेय अांबुलकर
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या रोजगार संधीच्या संदर्भात २०१७ हे वर्ष अस्थिर असतानाच्या या पार्श्‍वभूमीवर २०१८ हे वर्ष या क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायी ठरेल असे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात उद्योग - व्यवसाय इत्यादींशी संबंधित ज्या तरतुदी आणि ध्येय-धोरणे घोषित करण्यात आली आहेत, त्याचा प्रतिसाद पण यासंदर्भात पूरकच ठरला आहे.

या साऱ्या बदलत्या पार्श्‍वभूमीवर मॅनपॉवर ग्रुप या रोजगार व कर्मचारी निवड करणाऱ्या संस्थेतर्फे केलेल्या सर्वेक्षणात पण २०१८ च्या संदर्भात जे अभ्यासपूर्ण अनुमान मांडण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे आहे,

सर्वेक्षणात प्रामुख्याने नमूद केल्यानुसार यावर्षी होणाऱ्या कर्मचारी निवडीच्या संख्या - प्रमाणात यावर्षी संगणक सेवा क्षेत्रापेक्षा मूलभूत सुविधा तंत्रज्ञान व सेवा क्षेत्रातील रोजगार संधींमध्ये लक्षणीय स्वरूपात वाढ होईल असे नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी संगणक सेवा क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्यांना अंतर्गत प्रगती-संधींचा लाभ मिळू शकेल, असे नमूद करण्यात आले असून, ही बाब या मंडळींना नक्कीच दिलासा देणारी ठरणार आहे.

विद्यमान स्थितीत कंपन्या वा व्यवस्थापनांचा विशेष भर हा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच त्यांच्या कौशल्य पातळीवर पण असल्याचे याठिकाणी नमूद करण्यात आले आहे. याला मुख्य कारण म्हणजे आज प्रत्येक उद्योग वा सेवा क्षेत्रात तंत्रज्ञान व प्रगत व्यवसाय प्रक्रिया यांचा मोठाच बोलबाला आहे. यातूनच नव्या कौशल्यविकास व कार्यपद्धतीवर सर्वांचा वाढता भर असल्याने नोकरी - रोजगार शोधणाऱ्या उमेदवारांनी आपले शिक्षण व गुणांच्या टक्केवारीला कौशल्याची जोड देणे अगत्याचे ठरते.

कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भातील लवचिकता ही बाब आता आपल्याकडे बऱ्यापैकी स्थिरावली आहे. व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांचा यावर वाढता भर असल्याचे दिसून येते. या लवचिक कार्यपद्धतीमध्ये उमेदवारांनी आपले केवळ चाकोरीबद्ध स्वरूपाचेच काम न करता बहुविध स्वरूपाचे, परस्पर पूरक व हटके अशा पद्धतीचे काम करावे व त्याद्वारे स्पर्धात्मक परिस्थितीतील बदलांना सामोरे जावे यावर सध्या भर देण्यात येत आहे. याशिवाय या लवचिक कामकाज व कार्यपद्धतीमध्ये विशेषतः महत्त्वपूर्ण व जबाबदारीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किती तास काम केले यापेक्षा आपले काम नेमकेपणे व अचूक स्वरूपात करण्यावर भर देण्यात येत असून, यामध्ये कामाचे नेमके ठिकाण, घरी काम करणे या बाबी गौण ठरल्या आहेत.

बदलता काळ आणि परिस्थितीनुसार कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांचे ज्ञान वा पूर्वानुभव यांचे प्रमाण बदलत जात आहे. याचे प्रत्यंतर सद्यःस्थितीत प्रामुख्याने येत आहेच. यावर्षी कर्मचाऱ्यांचे पगारमान, पगारवाढ, वार्षिक बोनस, विशेष प्रोत्साहन राशी इ. ना. पण हेच तत्त्व लागू होताना प्रकर्षाने दिसणार असून, त्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.

यामागची महत्त्वपूर्ण पार्श्‍वभूमी म्हणजे कंपन्यांची कार्यपद्धती व तंत्रज्ञान यामध्ये झालेले व होणारे बदल. त्यामुळे कंपनीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळणे अपरिहार्य ठरले असून, परिणामी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत शैक्षणिक पात्रता व पूर्वानुभव यांचा बदलता कार्यपद्धतीशी ताळमेळ घालणे हा मुद्दा आता व्यवस्थापकीय संदर्भात ऐरणीवर आला आहे, ही बाब महत्त्वपूर्ण ठरते. चाकोरीबद्ध स्वरूपातील पगारमान - पगारवाढ या आर्थिक मुद्यांवर याचा अपरिहार्यपणे व मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ लागला आहे.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, ज्ञान व पूर्वानुभव यांची नव्या व बदलत्या स्वरूपातील व्यावसायिक गरजांशी सांगड घालताना विद्यापीठ वा व्यवस्थापन शिक्षण संस्थांतून नव्याने व नव्या शैक्षणिक - व्यावसायिक संकल्पनांसह नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच वाढीव व्यावहारिक महत्त्व प्राप्त झाल्याचे अथवा प्राप्त होणार असल्याचे दिसून येते.

यासाठी अर्थातच आगामी वर्ष दोन वर्षांच्या दरम्यान पदवी वा व्यवस्थापन विषयातील पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या जोडीलाच संगणक प्रणाली, इंग्रजी संभाषण, सादरीकरण, मुद्यांची प्रभारी मांडणी, नेतृत्त्व विषयक व्यवस्थापकीय संकल्पना यांचे ज्ञान प्राप्त करणे आवश्‍यक असून, त्यांना संबंधित शैक्षणिक-व्यवस्थापन संस्थेद्वारे उचित, पुरेसे व व्यवहारपर मार्गदर्शन मिळणे पण तेवढेच गरजेचे ठरते.

बदलत्या आर्थिक - औद्योगिक परिस्थितीनुसार प्रचलित नोकरीतील बदल व स्थिरता हे उभय मुद्दे आपापल्यापरीने व विशेषत्वाने कळीचे ठरत आहेत. ही स्थिती चालू वर्षात पण अशीच कायम राहणार आहे. यापैकी नोकरीतील बदल व नव्या जबाबदारीसह नवी रोजगार संधी ही बाब संबंधित उमेदवार - कर्मचाऱ्यांच्या योग्यता - कौशल्य पात्रता व नेमका अनुभव या बाबींवर मुख्यतः अवलंबून राहणार आहे. यासंदर्भात एक अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे बदलत्या व्यवसाय प्रक्रियेनुरूप व संगणक - तंत्रज्ञान आणि अद्ययावत कार्यपद्धतीमुळे नव्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि आवश्‍यकता यामध्ये लक्षणीय स्वरूपात घट झाली आहे. याचा थेट परिणाम उमेदवारांना नवा रोजगार संधी यांचा शोध घेताना कराव्या लागणाऱ्या वाढीव स्पर्धेमध्ये झाला असून, या स्पर्धेवर यशस्वीपणे मात करून आपली पात्रता आणि निवड सार्थ करण्याचे काम उमेदवारांना आता करावे लागत आहे.

रोजगार संधीच्या संदर्भात दुसरी अन्य व महत्त्वाची बाब म्हणजे नव-नव्या योजना व औद्योगिक चालनेच्या पार्श्‍वभूमीवर उद्योग-व्यवसायात रोजगारवाढीला चालना अवश्‍य मिळाली आहे. याची सरकारी स्तरावर व संघटित उद्योगांमधील नव्या रोजगार संधींची अधिकृत व एकत्रित स्वरूपात आकडेवारी मिळण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून मिळणारी प्रगत आकडेवारी यासंदर्भात आशादायी चित्र निर्माण करणारी आहे.

नव्या रोजगारांमध्ये प्रामुख्याने समावेश होतो, तो नवागत कर्मचारी वा उमेदवारी स्वरूपातील नोकरी, अशा स्वरूपाच्या रोजगार संधीसाठी उमेदवारांच्या कामाच्या अनुभवाची अट वा अपेक्षा नसल्याने नवागतांसाठी ही संधी विशेष फायदेशीर ठरते. अशा प्रशिक्षणार्थी उमेदवारांना त्यांनी त्यांचे ठराविक कालावधीतील रोजगार विषयक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर नियमित वेतनश्रेणीसह रीतसर रोजगार संधींचा लाभ मिळू शकतो ही यासंदर्भातील एक अन्य जमेची बाब म्हणावी लागेल.

कर्मचाऱ्यांच्या नोकरी टिकून राहण्याच्या संदर्भातील अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे व्यवसाय प्रक्रिया वा तंत्रज्ञानाच्या बदलानुरूप प्रचलित कर्मचाऱ्यांनी हे बदल आत्मसात करीत असतानाच त्या बदलांसह आपल्या जबाबदारी वा कामकाजाला उपयुक्त व उत्पादक बनविले किंवा कसे याची चाचपणी - पडताळणी वेळोवेळी करण्यात येऊन त्यावरच सध्या कर्मचाऱ्यांची कामाच्या संदर्भातील उपयुक्तता व त्याद्वारे त्यांची काम आणि रोजगारातील शाश्‍वती या मूलभूत व महत्त्वपूर्ण बाबींवरच अवलंबून असते, ही बाब आज मुळातून समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

या साऱ्या बदलत्या पार्श्‍वभूमीवर कंपन्यांमध्ये उपलब्ध व पात्रताधारक उमेदवारांमधून नेमक्‍या उमेदवाराची कर्मचारी म्हणून निवड करण्यासाठी अधिकाधिक काळजी घेतली जात आहे,
अशी वाढीव काळजी घेण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे सद्यःस्थितीत व्यवस्थापनाकडून नेमक्‍या पण कार्यक्षम कर्मचाऱ्यांकरवी अपेक्षित काम करण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. व्यवस्थापन व व्यवस्थापकांसाठी पण उत्तम उमेदवारांमधून सर्वोत्तमांची निवड करणे हे मोठे आव्हानपर काम सध्या करावे लागत आहे. अशा प्रकारे कंपन्या आणि कर्मचारी या उभयतांसाठी पण २०१८ या कालावधीत या आणि अशा बदलांना सामोरे जाणे व त्यावर गरजांनुरूप यशस्वीपणे उपाययोजना करणे यानिमित्ताने अपरिहार्य ठरले आहे.

संबंधित बातम्या