करिअरसाठीचं भांडवल!

धनश्री बेडेकर, कम्युनिकेशन कन्सल्टंट, बीज कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
वेळ असतो, कौशल्य असतं, कष्ट करण्याची तयारीही असते. पण नेमकं काय करायचं हे समजत नाही. जिद्दीत आपण कुठेतरी कमी पडतो. अगदी लहान वयात या तीन गोष्टींच्या आधारे व्यवसायाचं बाळकडू घेतलेल्या आजच्या एका यशस्वी उद्योजिकेचा प्रेरणा देणारा अनुभव.

तुझ्याकडं असं काय आहे, जे तुला कायम आयुष्यभर पुरेल?’ काकांच्या या प्रश्‍नानं मी अगदी तीन ताड उडाले. या प्रश्‍नांची उत्तरं माहीत असणारं वयच नव्हतं. नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्यामुळं त्या वयात इतका विचार खरंतर केला नव्हता. आई-बाबा आणि बहीण यांच्या उबेतल्या घरात राहून मला असे विश्‍वव्यापी प्रश्‍न ना पडले होते, ना त्याची उत्तरं मिळाली होती. काकांनीच प्रश्‍नाचा खुलासा केला. ते म्हणाले, ‘बाळा, तुझ्याकडं अशा तीन गोष्टी आहेत. जर तू नीट वापरल्यास, तर तुझ्या करिअरचं सोनं होईल. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वेळ. दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे असलेलं कौशल्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे कष्ट करण्याची तयारी! या तीन गोष्टींकडं कधीच बाळबोधपणं किंवा सहजपणं पाहू नकोस. हे तुझं भांडवल आहे. तुझ्या करिअरचं भांडवल. तू पुढं नोकरी कर नाहीतर व्यवसाय या गोष्टी मात्र गांभीर्यानं घे.’ काकांचे शब्द आजतागायत कानात आहेत. काकांचं म्हणणं ऐकून झाल्यावर खरोखरच मी कामाला लागले आणि माझ्या प्रत्येक सुटीचा उत्तम वापर केला. त्याप्रमाणं दहावी तसंच बारावीच्या सुटीत काम केलं आणि अनुभवांची गाठोडीच पदरात पडली. 

बारावीनंतर मी आर्टसला गेले. सकाळी सात ते फार फार तर अकरा असं कॉलेज असायचं. उरलेल्या वेळात काय करायचं असा प्रश्‍न कधीच पडला नव्हता. कारण त्याचं प्लॅनिंग ॲडमिशन घेण्याअगोदरच केलं होतं. मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असं पक्कं ठरलं होतं. सायन्सला असताना अकरावी-बारावीचा अभ्यास अजिबात आवडत नव्हता. ज्याला जे आवडतं, ते त्यानं करावं, आपल्या कामानं आपल्या आयुष्यात सुंदर अनुभव मिळावा, मस्त मजा यावी, अशी घरची शिकवण होती. मला अकरावी-बारावी दोन वर्षं सायन्सला काढल्यावर असं लक्षात आलं, की केमिस्ट्रीच्या तासाला आपल्याला प्रचंड झोप येते. फिजिक्‍सच्या तासाचा ताण येतो आणि मॅथ्सबद्दल बोलण्यातच अर्थ नाही. काकांची वाक्‍यं डोक्‍यात घोळत असल्यानं अत्यंत विचारपूर्वक साइड बदलून आर्टसला प्रवेश घेतला. आता विषय आवडीचे होते. मुख्य म्हणजे हातात सबंध दिवस शिल्लक राहणार होता. मग छोटीशी नोकरी करावी का, या उद्देशानं जरा धडपड करायला सुरवात केली. तुटपुंज्या शिक्षणाच्या जिवावर चालून येणाऱ्या नोकऱ्यापण साधारण तशाच होत्या. पैसे कमावून ‘स्वतःच्या पायावर उभं राहणं’ हा एकमेव उद्देश नव्हताच. त्याबरोबरीनं अनुभव मिळायला हवा. असा अनुभव जो आपल्या पुढील आयुष्याला दिशा देऊ शकेल. 

असं करता करता खाण्याची आणि खिलवायची अशा दोन्ही आवडी असल्यानं आपण ‘फूड’ या क्षेत्रात व्यवसाय करावा, हे सुचलं. नोकरी नक्की करायची नाही, हे पक्कं ठरलं होतं. वयही वेडं होतं. नवीन उत्साह, कल्पनांनी भारलेलं जग होतं तेव्हाचं! व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल हवं. ते कुठून आणायचं, असा प्रश्‍न अजिबात पडला नाही. कारण, काकांच्या शिकवणुकीनुसार वेळ, कौशल्य आणि कष्ट याच्या जिवावर उभं राहायचं ठरवलं. माझ्या मैत्रिणीला बटाट्याचे वेफर्स उत्तम करता यायचे. मग आमच्या ट्रायल्स घरातल्या लोकांवर सुरू झाल्या. किती किलो वेफर्ससाठी किती बटाटे लागतात, अन्य सामान किती रुपयांचं लागेल, सामग्री किती लागेल, गॅस कोण देणार, पॅकिंग कसं करणार आणि मुख्य म्हणजे हे सगळं विकणार कुणाला? तेही किती रुपयांत? त्याची जाहिरात कशी करणार? एक ना दोन असे नाना प्रश्‍न होते. पण आम्ही मस्त एंजॉय करत या प्रश्‍नांची उत्तरं सोडवत राहिलो. घरचा झाडांच्या नर्सरीचा व्यवसाय होता. त्यामुळं पिशव्या कुठून आणायच्या हे माहीत होतं. मेणबत्तीवर पॅक करता येतं हा शोधही असाच लागला होता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही ठरवलं, की घरच्यांकडून पैसे घ्यायचे नाहीत. सुरवातीला हजार-दीड हजार रुपये आमच्या आधीच्या चुटपुट उद्योगांमधले आणि पॉकेटमनीतले शिल्लक होते. त्यातून बटाटे, तेल, मीठ, अशी सामग्री आणली. घरातील ठेवणीतली मोठी कढई व झारा, ओळखीतून एक गॅस बर्नर अशी जमवाजमव केली. घरातील सिलिंडरची हिशोबासाठी नोंद केली. (पैसे परत द्यायचे होते ना!) सुरवातीला दहा किलो बटाटे आणले. आयुष्यात एवढे बटाटे ना कधी उचलले होते, ना घरी पाहिले होते. मैत्रिणीचं घर तळमजल्यावर असल्यानं आमचा कारखाना तिथं सुरू झाला. ज्या दिवशी हे बटाटे घरी आणले, त्या दिवशी झोपच लागली नाही. कारण हे जर चुकलं किंवा गणित फिस्कटलं तर पैसे, श्रम आणि उमेद सगळंच पाण्यात अशी भीती होती. पण लहानपणी वाचलेल्या ‘कार्व्हर’चं स्मरण केलं आणि सकारात्मक विचार सुरू केला. ट्रायल म्हणून थोडे वेफर्स केले. जेवढे केले तेवढे प्लॅस्टिक बॅगमध्ये भरले, त्याचा ‘ढीग’ झाला. दुसऱ्या दिवशी झोप न लागण्यासाठी हा ‘ढीग’ पुरेसा होता. परत स्वतःला समजावलं. बॅगेत ढीग भरला आणि चक्क ओळखीच्या लोकांकडं गेले. सकाळपासून दुपारपर्यंत सगळी पाकिटं संपली होती. विकलेल्या मालाची बोहनी सुखावून गेली. 

दुपारी हातात आलेले पहिले पैसे पाहून आम्ही दोघी रडवेल्या झालो होतो. त्यानंतर आम्ही कामांची विभागणी केली. बाजारात जाऊन कच्चा माल स्वस्त दरात मिळवणं आणि पक्का माल ग्राहकांपर्यंत पोचवणं, या दोन गोष्टी मी सांभाळायचं ठरलं. हातानं वेफर्स करणं, त्याची उत्तम चव राखणं, वेगवेगळ्या तारखांच्या पिशव्यांमध्ये साठवून त्यावर प्रयोग करत राहणं अशा आघाड्या माझी मैत्रीण सांभाळत होती. बटाटे सोलणं, किसणं, पिशव्या भरणं, वजन करणं अशा कामांत मी मदत करत होते. 

असं करता करता सकाळचं कॉलेज संपवून साडेअकरा ते दोन मग पुढं अडीच ते सहा अशा शिफ्ट्‌स आम्ही करू लागलो. आमच्या दोघींच्या घरातला प्रचंड जनसंपर्क आम्हाला ग्राहक मिळवून देत होता. पण असं लक्षात आलं ,की हे किती दिवस पुरणार? आपल्याला अन्य ग्राहक मिळायला हवा. आमच्याकडं लेबल, सरकारी लायसन्स अशा गोष्टी नसल्यानं आम्ही दुकानांमध्ये विक्री करू शकत नव्हतो. मग हळूहळू सुरू झाला इतर ग्राहकांचा शोध! आमच्याकडं ऑर्डर्स येत होत्या. मग जागा पुरेना म्हणून शेजारच्या काकांनी त्यांचं आऊटहाऊस आम्हाला वापरायला दिलं. मग बाबांच्या गाडीत पेट्रोल घालून चाकणच्या आठवडी बाजारातून बटाटा खरेदी करायला लागलो. त्याच सुमारास एक सरकारी प्रशिक्षण वर्ग सुरू झाला. ज्याचं प्रमाणपत्र आम्हाला लायसन्ससारखं वापरायला मिळणार होतं. मग तिथं आम्ही लोणची, जॅम आणि सॉस शिकलो. 

माझ्या लक्षात येत होतं, की बाबांच्या गाडीचे पेट्रोलचे पैसे आपण देतोय आणि फक्त बटाटेच आणतोय. मग हळूहळू मिरची, लिंबं, आवळे आणि कैऱ्या मार्केटमधून उचलू लागलो. आता आमच्या प्रॉडक्‍ट्‌समध्ये विविधता आली. वेफर्स, तीन प्रकारची लोणची आणि चटण्या अशा ऑर्डर्स घ्यायला लागलो. 

असं होतानाच एके दिवशी एका अनोळखी माणसाने प्रत्येकी शंभर किलो अशा तीनशे किलो लोणच्याची ऑर्डर दिली. उत्साहाच्या भरात साठलेल्या पैशातून आम्ही माल आणला. मोठ्या बरण्या आणल्या आणि ऑर्डर तयार केली. त्या दिवशी त्या माणसाचा फोन लागेना. शोधाशोध केल्यावर कळलं, की तो एक फ्रॉड माणूस होता. घरच्यांची बोलणी, स्वतःच्या मनाला लागलेली बोच एक दिवस पुरली. काहीतरी धडपड करणाऱ्या माणसालाच अडचणी येतात, हे पक्कं माहीत होतं. उत्साहाच्या भरात ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं होतं. पण, हे पाऊल व्यावसायिकदृष्ट्या आततायीपणं उचललेले होतं. पण, शोक करत बसून अजून वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. दुसऱ्या दिवशी बाबांच्या मदतीनं एक औद्योगिक क्षेत्र गाठलं आणि त्यांना लोणच्याची टेस्ट दाखवली. त्यांनी दर पाडून मागितला. मी तोऱ्यात ‘नाही’ म्हणाले. तर तो म्हणाला, ‘दर महिन्याची एवढीच ऑर्डर देतो.. आणि हो पर्चेस ऑर्डर आणि ॲडव्हान्स पण देतो.’ मग आमचे डोळे लकाकले. त्या माणसाला आधी नाही म्हणताना कच्चेपणा ध्यानात आला. व्यवसायाचं मोठं दार उघडलं. एकंदरीत तीन वर्षं हा व्यवसाय व्यवस्थित फायद्यात केला आणि मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतली. खाऊ फूड प्रॉडक्‍ट्‌सला रामराम ठोकला आणि करिअरचा पुढचा प्रवास सुरू झाला. पण पुढच्या प्रवासातही भांडवल तेच. वेळ, कौशल्य आणि कष्ट! आजही जेव्हा या व्यवसायात भेटलेले लोक वेफर्सची आठवण काढतात, तेव्हा हा व्यवसाय वसूल झाला असं वाटतं.

संबंधित बातम्या