वैद्यक क्षेत्रातील क्षितिजे 

डॉ. अविनाश भोंडवे 
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

मृत्यूच्या दारात असलेल्या एखाद्या रुग्णावर उपचार करणारा वैद्यकीय व्यवसाय, म्हणजे ज्ञान, समाजसेवा आणि लोकाभिमुखता याचा उत्कृष्ट संगम असतो. अनेक विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा डॉक्‍टर होण्याची असते. 

वैद्यकीय सेवा ही रुग्णांच्या जीवन-मरणाशी संबंधित असते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण खूप काळजीपूर्वक आखलेले असते. डॉक्‍टर होण्यासाठी आज भारतात ५ प्रकारच्या वैद्यकीय प्रवाहांचे शिक्षण प्रमाणित आहे. यामध्ये - १. आधुनिक वैद्यक शास्त्र - मॉडर्न मेडिसीन किंवा ॲलोपॅथी २. आयुर्वेद ३. होमिओपॅथी ४. युनानी ५. सिद्ध या वेगवेगळ्या वैद्यकीय पद्धतींच्या शिक्षणाचा समावेश होतो. 

या साऱ्या पद्धतींना नियंत्रित करण्यासाठी अंशतः सरकारी अमलाखाली असलेल्या आणि वैद्यकीय कायद्याने संचालित होणाऱ्या कौन्सिल्स आहेत. या कौन्सिल्स आपापल्या वैद्यकीय पद्धतींचा शिक्षणक्रम आखतात. या शिक्षणासाठी प्रवेश, त्याच्या परीक्षा, पदव्या आणि वैद्यकीय सेवेसाठीचा परवाना या बाबींचे नियंत्रण करतात. त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवेमधील नीतिमत्ता आणि कायद्याचे पालन याकडेही लक्ष देतात. त्यासाठी या प्रत्येक कौन्सिल्सचे स्वतंत्र कायदे आणि नियमावली आहेत. या नियमांचे पालन न केल्यास त्या डॉक्‍टरांचा वैद्यकीय सेवेचा परवाना स्थगित किंवा रद्द करण्याचा अधिकार या कौन्सिल्सना असतो. वैद्यकीय सेवा देण्यासाठी केवळ पदवी प्राप्त करून चालत नाही, तर या कौन्सिलकडून वैद्यकीय सेवा देण्यासाठी पंजीकृत मान्यता (रजिस्ट्रेशन) मिळवावी लागते. 

वैद्यकीय सेवेतील शिक्षणाला असलेला वाव जाणून घ्यायला विविध पदव्या आणि पदव्युत्तर शिक्षणातील पदव्या यांची माहिती करून घेणे आवश्‍यक आहे. 

पात्रता परीक्षा 
 वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ - म्हणजेच एन.इ.इ.टी. (नीट) ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. २०१६ मध्ये, इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्‍टमध्ये बदल करून देशातील सर्व वैद्यकीय आणि दंतपदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘नीट’ या परीक्षेद्वारेच देणे कायद्याने बंधनकारक केले आहे. यामध्ये शासकीय, महानगरपालिका संचालित, खासगी, अल्पसंख्याक महाविद्यालये तसेच अभिमत विद्यापीठांचादेखील समावेश आहे. 

भारतीय संसदेच्या कायद्यान्वये स्थापन झालेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (दिल्ली, भोपाळ, पाटणा, जोधपूर, रायपूर, ऋषिकेश, भुवनेश्‍वर) आणि जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पुदुच्चेरी) या संस्थांवरील नियमाला अपवाद आहेत. या दोन्ही संस्था त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. 

या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरावे लागतात. या परीक्षेच्या अर्जांसाठी आणि इतर माहितीसाठी www.cbseneet.nic.in ही वेबसाइट पाहावी. प्रवेश परीक्षांचा सविस्तर अभ्यासक्रम वेबसाइटवर दिला आहे. 

प्रश्‍नपत्रिकेचे साधारण स्वरूप 
नीट परीक्षेचा अभ्यास करताना एनसीआरटीने प्रसारित केलेल्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. 

 • ‘नीट’मध्ये पीसीबी (फिजिक्‍स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) हे विषय असतात. प्रश्‍न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे (मल्टिपल चॉईस) असतात. 
 • एका प्रश्‍नासाठी ४ पर्याय असतात. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड करायची असते. 
 • परीक्षेसाठी कालावधी तीन तासांचा असतो. 
 • प्रश्नपत्रिका इंग्रजी, हिंदी भाषेत आणि प्रादेशिक भाषेत (मराठी) काढल्या जातात. 
 • उत्तर बरोबर आले तर चार गुण मिळतात, पण चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा होतो. 
 • परीक्षेच्यावेळी तिथे दिल्या जाणाऱ्या बॉलपेनचाच वापर करायचा असतो. 
 • यामध्ये ४५ फिजिक्‍सचे, ४५ केमिस्ट्रीचे आणि ९० प्रश्न बायोलॉजीचे असे एकूण १८० प्रश्न असतात. 
 • प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात. 
 • ही संपूर्ण परीक्षा ७२० गुणांची असते. 
 • १८० प्रश्नांपैकी ६० सोपे, ७० मध्यम आणि ५० कठीण प्रश्न असतात. 
 • भौतिकशास्त्रातील तीस टक्के प्रश्न कठीण असतात, चाळीस टक्के मध्यम आणि तीस टक्के सोपे असतात. 
 • रसायनशास्त्रात वीस ते पंचवीस टक्के कठीण आणि उरलेले सोपे प्रश्न असतात. 
 • जीवशास्त्रात चाळीस टक्के कठीण तर तीस टक्के मध्यम आणि तीस टक्के सोपे प्रश्न असतात. 
 • प्रश्नपत्रिका ज्ञान, समज, कृती यावर आधारित अशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयार केली जाते. त्यामुळेच परीक्षेचा अकारण बाऊ करू नये. 

प्रवेश 
प्रत्येक कॉलेजमध्ये ८५ टक्के विद्यार्थी त्याच राज्यातील असतात तर १५ टक्के जागा इतर राज्यातील मुलांसाठी राखीव असतात. यासाठी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (बोनाफाईड सर्टिफिकेट) गरजेचे आहे. ‘नीट’ परीक्षा ‘एक खिडकी’ तत्त्वाने कार्यरत आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीओएमएस या बरोबरच सगळ्या पॅरामेडिकल कोर्सेससाठीही ती आवश्‍यक करण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला नसला, तरी भविष्यात तसा निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

नीटची तयारी  
या परीक्षेसाठी अकरावी-बारावीचा अभ्यासक्रम असतो. प्रत्येक गोष्टीतील मध्यवर्ती संकल्पना समजून घेणे विषय समजण्याच्या आणि प्रश्‍नांची उत्तरे देण्याच्या दृष्टीने गरजेचे ठरते. या परीक्षेत बारावीतही चांगले गुण (किमान ५० टक्के किंवा अधिक) मिळवणे अपेक्षित आहे. अनेकदा ‘नीट’मध्ये उत्तम गुण मिळतात, पण बारावीला पीसीबीमध्ये ५० टक्केही गुण मिळत नाहीत. त्यामुळे वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सरासरी पीसीबीमध्ये ५० टक्के गुण मिळवावेत. 

विशेष काळजी 
या परीक्षेत कुठलाही गैरव्यवहार होऊ नये यासाठी या परीक्षेला जाताना मुलांनी आणि मुलींनी घालायचे कपडे, पादत्राणे, बरोबर कुठल्या वस्तू नेऊ नयेत आणि कोणत्या गोष्टींना परवानगी आहे, याबाबत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. वेबसाइटवर याची माहिती वेळोवेळी दिली जाते, त्याचे काटेकोरपणे पालन करावे. 

ॲलोपॅथीमधील पदव्या 
एमबीबीएस ही सर्वांत मूलभूत पदवी. बारावीनंतर स्पर्धा परीक्षा देऊन यात गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो. साडेचार वर्षे आणि त्यानंतर शहरी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये एक वर्षाचा प्रत्यक्ष कार्यानुभव देणारी इंटर्नशिप, असा साडेपाच वर्षांचा कालावधी यामध्ये लागतो. त्यानंतर पदवी आणि व्यवसायासाठी नोंदणी प्राप्त होऊ शकते. 

साडेचार वर्षांच्या अभ्यासात आधुनिक वैद्यकातील शरीरशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, वैद्यकीय रसायन शास्त्र, शरीर विकृती आणि रोगजंतूंच्या सूक्ष्म अभ्यासाचे विज्ञान, वैद्यकीय न्याय आणि कायदे, औषधशास्त्र, वैद्यकीय औषधोपचार शास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूती अशा वैद्यकीय शाखांमध्ये शक्‍यतो समतोल राखण्यात येतो. 

या अभ्यासक्रमात प्रथमावस्थेनंतर विद्यार्थी रुग्णालयात रुग्णचिकित्सा अनुभव प्राप्त करू लागतो. या पदवी अभ्यासात ग्रामीण आरोग्य, सामाजिक वैद्यक, रोगप्रतिबंधक उपाय, कुटुंबनियोजन, अंधत्व, कुष्ठरोग, एड्‌स, क्षयरोग, हिवताप यांसारख्या राष्ट्रीय समस्यांच्या दृष्टीने विशेष शिक्षण दिले जाते. तसेच प्रत्यक्ष भेटी घडवून आणून ग्रामीण आरोग्याविषयी माहिती दिली जाते. 

आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकेतर शास्त्रांमधील प्रगतीचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवसांख्यिकी, जीवभौतिकी, जीवरसायनशास्त्र, मानसशास्त्र, किरणोत्सर्ग वैद्यक यांसारख्या विषयांचा परिचय करून दिला जातो. 

एम.डी. ः एमबीबीएसनंतर ३ वर्षे पदव्युत्तर उच्च शिक्षण घेतल्यावर ही पदवी मिळते. जनरल मेडिसीन, त्वचा रोग, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र, ॲनॅस्थेशिया किंवा भूल विज्ञान, पॅथॉलॉजी किंवा जंतूरोगनिदान शास्त्र, रेडिऑलॉजी, छातीचे विकार, मानसरोग शास्त्र अशा विविध विषयांसाठी एमडी ही पदवी मिळते. हे पदवीधारक या विषयांचे तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा करू शकतात. 

    एम.एस. ः शस्त्रक्रियेसंबंधी असलेली ही पदवी स्नातकोत्तर ३ वर्षे उच्च शिक्षण घेतल्यावर प्राप्त होते. जनरल सर्जरी, नाक-कान-घसा, नेत्रचिकित्सा, अस्थिरोग शास्त्र, अशा विविध उच्च शाखांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा दिल्यावर ही पदवी मिळते.

    डी.एम. ः पदव्युत्तर शिक्षणाची एम.डी. ही पदवी मिळाल्यानंतर ही सुपरस्पेशलायझेशन पदवी असते. एंडोक्रायनॉलॉजी, हृदयविज्ञान, मज्जासंस्था, मूत्रपिंडरोग अशा विषयांसाठी ही डॉक्‍टरेट दर्जाची पदवी असते. ही पदवी प्राप्त झाल्यावर हे डॉक्‍टर्स त्या विषयातील सुपरस्पेशालिस्ट म्हणून काम करतात. 

    एम.सी.एच. ः शल्यचिकित्सेमध्ये हृदय आणि रक्ताभिसरण संस्था यांच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया, मूत्ररोगाच्या शस्त्रक्रिया अशा अतिविशेष आधुनिक शस्त्रक्रियांचे ज्ञान आणि प्रशिक्षण घेऊन यातील पदवी मिळते. 

    डी.एन.बी. ः डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड ही पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर ३ वर्षे विशेष प्रशिक्षण घेऊन मिळते. मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग व प्रसूती, यापासून हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग अशा सर्व वैद्यकीय विषयांच्या पदव्या यात प्राप्त होऊ शकतात. यासाठी प्रमाणित केलेल्या रुग्णालयात, प्रमाणित केलेल्या प्राध्यापकांच्या साह्याने ३ वर्षे अध्ययन करून आणि प्रशिक्षण घेऊन परीक्षा घेतल्या जातात. ही पदवी एम.डी. किंवा एम.एस.च्या तुलनेत बरोबरीची मानली जाते. सुपरस्पेशालिटीच्या मान्यताप्रत पदव्यादेखील या शिक्षणक्रमात आहेत. 

सी.पी.एस. 
कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्स, मुंबई यांच्यामार्फत ॲलोपथीमधील पदव्युत्तर शिक्षणाचे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण राबवून काही मान्यताप्राप्त पदव्या आणि पदविका दिल्या जातात. यामध्ये एमसीपीएस, मेडिसीन, सर्जरी, नेत्रचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती, बालरोग, त्वचारोग, नाक-कान-घसा, ऑर्थोपेडिक्‍स, बालरोग, भूलविज्ञान या विभागातील पदव्युत्तर एफ.सी.पी.एस. ही पदवी आणि तसेच या विभागातील पदविका प्रशिक्षण आणि परीक्षा घेऊन दिल्या जातात. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशननंतर प्रशिक्षण घेतल्यावर एचआयव्ही, मधुमेह यातील प्रमाणपत्रे दिली जातात. 

दंतवैद्यक शास्त्र 
यामध्ये बी.डी.एस. हा चार वर्षांचा दंतविज्ञानामधील रोगनिदान, उपचार आणि शस्त्रक्रियांचे ज्ञान आणि प्रशिक्षण देणारा पायाभूत अभ्यासक्रम असतो. एम.डी.एस. हा दंतवैद्यक शास्त्रातील उच्च अभ्यासक्रमाचा शिक्षणक्रम आहे. यामध्ये ऑर्थोडोंटिक्‍स, एंडोडोंटिक्‍स,फेशियो-मॅक्‍झिलरी सर्जरीज, पेरीओडोंटिक्‍स, प्रॉस्थोडोंटिक्‍स, लहान मुलांचे दंतविज्ञान व शस्त्रक्रिया अशा विविध शाखांमधील आधुनिक आणि उच्च शिक्षण घेतले जाते. 

आयुर्वेद 
भारतामध्ये आयुर्वेदिक ज्ञान, प्रशिक्षण आणि व्यवसाय नोंदणी सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन (सीसीआईएम) द्वारा संचालित केली जाते.  बी.ए.एम.एस. ः आयुर्वेदामध्ये साडेपाच वर्षांचे पदवीपूर्व शिक्षण घेतल्यावर बॅचलर ऑफ मेडिसीन अँड सर्जरी ही पदवी दिली जाते. यालाच बीएएमएस किंवा आयुर्वेदाचार्य असे नाव आहे. ही पदवी सोडून पूर्वी प्रचलित असलेल्या काही जुन्या पदव्या आता कालबाह्य ठरल्या आहेत. 

एम.डी. ः मान्यताप्राप्त आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये सीसीआईएम आणि भारत सरकारच्या आयुष विभागाद्वारे मान्य असलेल्या एम.डी. आयुर्वेद ही उच्च शिक्षणाची पदवी दिली जाते. यासाठी ३ वर्षांचा शिक्षणक्रम आहे. १९८० पासून काही महाविद्यालयांत पीएच.डी.चे शिक्षण मिळण्याची सोय झाली आहे. 

होमिओपॅथी 
बी.एच.एम.एस. ः सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथीतर्फे या मान्यताप्राप्त पदवीची नोंदणी केली जाते. याचे शिक्षण होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात दिले जाते. साडेपाच वर्षांच्या या प्रशिक्षणानंतर बीएचएमएस ही पदवी दिली जाते. 

एम.डी. (होमिओपॅथी) ः या वैद्यकीय शास्त्रांतर्गत उच्च शिक्षण घेतल्यावर ही पदव्युत्तर मान्यता मिळते. 

स्वातंत्र्योत्तर काळानंतर बी.यु.एम.एस. ही युनानी वैद्यकशास्त्रातील पदवी, या वैद्यकीय शास्त्रातील मान्यताप्रत महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर दिली जाऊ लागली आहे. सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, या भारत सरकारच्या इंडियन मेडिसीन सेन्ट्रल कॉन्सिल ॲक्‍ट १९७० आणि आयुष विभागाच्या मान्यतेप्रमाणे स्थापन झालेल्या संस्थेतर्फे युनानी तसेच सिद्ध पद्धतीच्या पदवीची मान्यता आणि नोंदणी केली जाते. 

परदेशातील वैद्यक शिक्षण आणि पदव्या 
वैद्यकीय क्षेत्रात भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. 

 • डॉक्‍टर होण्याची इच्छा असलेल्या म्हणजेच वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वैद्यकीय क्षेत्रातल्या जागांपेक्षा तुलनेत कितीतरी अधिक आहे. साधारणतः २५०० जागांसाठी अडीच लाख विद्यार्थी ‘नीट’ देतात. 
 • जागेच्या मर्यादेमुळे मुलांना शासकीय कॉलेजांत प्रवेश मिळत नाहीत. 
 • खासगी कॉलेजांच्या फी वर्षाला ३५ ते ४० लाखांच्या घरात असल्याने अनेकांच्या क्षमतेबाहेर असतात. 
 • परदेशी विद्यापीठात आकारली जाणारीही फी तुलनेत कमी असते. पाच वर्षांचा हा कोर्स पूर्ण करण्यासाठी सर्व खर्चांसह २५ लाखांच्या आसपास पडतो. 
 • परदेशातल्या वैद्यकीय शिक्षणामध्ये एका गटात केवळ दहा-बारा विद्यार्थी असल्याने प्राध्यापकांशी संवाद साधणे सोपे असते. 
 • बहुतेक शिक्षण समुपदेशन संस्थांनी अनेक परदेशी विद्यापीठांशी करार केलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक देशांचे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. 

तोटे  

 • शिक्षणाचा दर्जा भारताच्या तुलनेत फार उच्च नसतो. 
 • परदेशात पदवी घेऊन आल्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची एमसीआय परीक्षा द्यावी लागते. पास झाल्यानंतर मिळणारी एक वर्षाची ॲडिशनल इंटर्नशिप ही स्टायपेंडशिवाय असते. 
 • सर्व पदवीधरांना नॅशनल बोर्ड ऑफ एक्‍झामिनेशन्स, दिल्लीद्वारे घेण्यात येणाऱ्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एन्ट्रन्स (एफ.एम.जी.ई.) द्यावी लागते. 
 • यामध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे केवळ १४ ते २६ टक्‍क्‍यांदरम्यान असते.
 • भारतीय विद्यार्थ्यांना चीन, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युक्रेन, रशिया, नेपाळ आणि कझाकिस्तान या देशात वैद्यकीय शिक्षण घेता येते. या देशांत वैद्यक क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी इ.सी. एफ.एम.जी. ही परीक्षा देणे आवश्‍यक असते.

संबंधित बातम्या