हॉटेल मॅनेजमेंट (आदरातिथ्य) 

गजेंद्र बडे
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

भारतातील बहुराष्ट्र कंपन्यांची वाढती संख्या, विस्तारलेले उद्योग आणि बदलल्या जीवनशैलीमुळे हॉटेल उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. जागतिकीकरणामुळे विविध बैठका, परिषदा, परिसंवाद, विविध प्रदर्शने आणि सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा आदी क्षेत्रातील घडामोडी व महोत्सव यांच्या वाढत्या आयोजनामुळे हॉटेल व्यवसाय आज दमदार वाटचाल करू लागला आहे.

देशात १९३६ पासून केंद्र सरकारची मान्यता असलेले १६३ मोठे हॉटेल्स कार्यरत होते. आज ही संख्या हजाराच्या घरात पोचली आहे. रेस्टॉरंट, क्‍लब्ज, हेरिटेज, हॉटेल्स असे हॉटेल्सचे विविध प्रकार पहायला मिळत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन आणि आदरातिथ्य या विषयीच्या अभ्यासक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हॉटेल उद्योगासोबत क्‍लब मॅनेजमेन्ट, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन अँड केटरिंग, इन्सिट्यूशनल अँड इंडस्ट्रिअल केटरिंग, केटरिंग डिपार्टमेन्टस इन बॅक्‍स अँड इन्शुरनश हाऊसेस, रेल्वे, संरक्षण दलांचे केटरिंग विभाग आदी ठिकाणी कामाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रातील करिअरच्या वाढत्या संधी पाहता दहावी बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर, त्या विद्यार्थ्याला लवकर आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते.

हॉटेलमधील करिअरच्या संधी ः प्रशासकीय विभाग ः हा हॉटेल्समधील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. विविध विभागांचा परस्परांशी समन्वय साधण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील असतो.

फ्रंट ऑफिस ः हॉटेलमध्ये प्रवेशकरताना समोर दिसते ते फ्रंट ऑफीस, यालाच आपण स्वागत कक्ष असेही म्हणतो. व्यवस्थापक हा या विभागाचा प्रमुख असतो आणि त्याच्या हाताखाली सहाय्यक व्यवस्थापक, रिसेप्शनिस्ट (स्वागतिका) लॉबी एक्‍झिक्‍युटिव्ह, इन्फर्मेशन असिस्टंट, बेल बॉय, बेल कॅप्टन, डोअरमन आदी विविध कर्मचारी काम करत असतात. फ्रंट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या मदत करण्यास तत्पर आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या असणे अपेक्षित असते.

विक्री आणि विपणन ः या विभागाचे महत्त्वाचे काम म्हणजे प्रवास एजंटाशी संपर्क साधणे, ग्राहकांची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने व्यावसायिकांशी सातत्याने संबंध ठेवणे, चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदांच्या आयोजनासाठी मोठमोठ्या कंपन्यांच्या संपर्कात राहणे. याशिवाय या विभागांद्वारे जनसंपर्क व जाहिरात हा विभाग सांभाळला जातो.

हाउस कीपिंग ः हॉटेल्समध्ये स्वच्छता राखण्यासाठी हा विभाग कार्यरत असतो. हॉटेल्सच्या रुम्स स्वच्छ राखणे, ग्राहकाला रुम्समधील सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यांच्या बारीक सारीक गरजांकडे लक्ष देणे, स्वच्छता करुण देणे, खोल्यांची अंतर्गत सजावट योग्य राखणे आदी कामे हा विभाग करत असतो. या विभागात हाऊसकीपर , फ्लोअर सुपरवायझर, चेंबर बॉय, सफाईवाले, मदतनीस काम करत असतात.

खानपान विभाग ः ज्याप्रमाणे फ्रंट ऑफीस हा हॉटेलमधील मोठा संवेदनशील विभाग समजला जातो. तीच बाब खाद्य, पेय विभागाची आहे. कारण पदार्थांच्या चवीवरच हॉटेलचे भवितव्य अवलंबून असते. या विभागाचे दोन विभाग केले जातात.  एका विभागाचा प्रमुख केटरिंग व्यवस्थापक असतो. तर दुसऱ्या विभागाचा प्रमुख हा खानपान सेवा संबंधीचा व्यवस्थापक असतो. यापैकी केटरिंग विभागाची कामे म्हणजे विक्री- प्रतिनिधींना, पुरवठादारांना भेटणे हे होय. पदार्थ बनविण्याच्या कच्च्या मालाचा साठा, नियोजन, कटलरी, स्वयंपाकाची भांडी आणि संपूर्ण विभागासंबंधीची देखभाल करणे ही कामे खानपान विभागाच्या व्यवस्थापकांची असतात.

वित्त विभाग ः हॉटेलचा दैनंदिन अर्थव्यवहार पाहणे, हॉटेलची आर्थिक घडी बसवणे, व्यवसाय वाढीचे आर्थिक प्रकल्प तयार करणे, व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी निरनिराळ्या आर्थिक योजना आखणे आणि प्रत्यक्ष आर्थिक गुंतवणूक करणे ही कामे या विभागातर्फे केली जातात. या विभागात एका बाजूने चार्टर्ड अकाउंटंट, फायनान्शियल ॲनालिस्ट, मार्केट रिसर्चर महत्त्वाची भूमिका बजवतात. तर दुसऱ्या बाजूने हॉटेलच्या दैनंदिन व्यवहारात अकाउंटंट, चीफ कॅशिअर, कॅश क्‍लार्क, बिल क्‍लार्क ही पदे महत्त्वाची असतात. या कामांसाठी उमेदवार कार्यतत्पर आणि आकडेवारीत गती असलेला असावा लागतो.

अभियांत्रिकी विभाग ः हा विभाग हॉटेलची तांत्रिक यंत्रणा सांभाळत असतो. त्यात एअर कंडिशनर्स, बॉयलर्स, वीज व्यवस्था, बांधकामातील छोटे बदल आदी तांत्रिक बाबी येतात. मुख्य अभियंत्याच्या हाताखाली मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्‍ट्रिकल कर्मचारी व आर्किटेक्‍ट काम करीत असतात. कॅबिनेट मेकर, वायरमन यांना विभागात संधी असते. पर्चेस विभाग हा खरेदी विभागाशी संबंधित असून यात पर्चेस मॅनेजर, पर्चेस क्‍लार्क, स्टोअरकीपर, स्टोअर क्‍लार्क आदी पदे येतात. 

अकादमी ऑफ क्‍युलिनर एज्युकेशन एडेड, दि गोवा बीच रिसॉर्ट, गोवा येथे तीन वर्षाचा केटरिंग अँड फूड सायन्स अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

कर्नाटकातील मणिपाल येथील वेलकम ग्रुप ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल ॲडमिनिस्टेस्ट्रिक व्हॅली या संस्थेतर्फे तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो. यात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेश दिला जातो. 

ऑबेरॉय सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट यांच्या ओबरॉय स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेतर्फे नवी दिल्लीत हॉटेल ऑपरेशन अँड मॅनेजमेंट हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. 

ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, ट्रेनिंग मॅनेजर, द ताज महाल हॉटेल, मानसिंग रोड, नवी दिल्ली येथे दोन वर्षाचा या विषयाचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यातील उमेदवारांना उत्तम विद्यावेतन मिळते. बारावीला ४५ टक्के गुण आहेत, असल्यास ॲप्रेटिंस म्हणून भरती केली जाते आणि तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. 

याशिवाय राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंगचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण असावे लागते.

हॉटेल अभ्यासक्रमातील देशामधील सर्वोच्च संस्था म्हणजे केंद्र सरकारची नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल अँण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी ही होय. त्यांच्या आधिपत्याखाली देशभर १९ प्रशिक्षण संस्था असून महाराष्ट्रात केटरिंग टेक्‍नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर मुंबई २८, ही संस्था मुंबईत कार्यरत आहे. अन्य काही प्रमुख संस्था पुढीलप्रमाणे आहेत.

गव्हर्नमेन्ट इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंगच्या डेहराडून, अलमोरा येथे हॉटेल मॅनेजमेंट संस्था आहेत. या दोन्ही ठिकाणी तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

नवी दिल्लीच्या आर.एम.इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आणि चार वर्षाचा हॉस्पिटॅलीटी अभ्यासक्रम शिकविण्यात येतो.

इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्‍नॉलॉजी अँड सप्लाइड न्यूट्रिशन, मिरत येथे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट इन्सिट्युशनल एरिया पुंडग, रांची तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आहे.

इंडियन इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कोलकत्ता येथे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

आर्मी इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, ए.एस्सी.सेंटर, बंगळूर येथे तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

आवश्‍यक शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतून १२ वी इंग्रजी विषयासह 
उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र असतात.

प्रवेश परीक्षा स्वरूप 
कौन्सिलशी संलग्न संस्थांमध्ये अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी २०० गुणांची, तीन तास कालावधीत ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. पेपरचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. ( प्रश्‍नपत्रिका हिंदी व इंग्रजी भाषेत असते)

अंकगणिती क्षमता व विश्‍लेषणात्मक अभियोग्यता, आकलन क्षमता, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांवर प्रत्येकी ३० गुणांचे, इंग्रजी ६० गुणांचे, सेवा व स्वागतशीलतेवर आधारित ५० गुणांचे प्रश्‍न विचारले जातात.

हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा ः
 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयांतर्गत नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. या कौन्सिलद्वारे तीन वर्षांच्या बीएस्सी हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन व अन्य ११ अभ्यासक्रमांचे नियमन करण्यात येते. हॉटेल मॅनेजमेंटच्या २१ केंद्रीय संस्था, तसेच फ्रुड क्राफ्टशी संबंधित अभ्यासक्रम चालवणाऱ्या नऊ संस्थादेखील संलग्न आहेत. कौन्सिल मान्यताप्राप्त संस्थेतील विद्यार्थांना देशात व परदेशात नोकऱ्यांच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.

तीन वर्षांचा बीएस्सी अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासोबत चालवला जातो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रयोगशाळांत प्रात्यक्षिकाद्वारे अन्नपदार्थ निर्मिती, शीतपेय, फ्रंट ऑफीस सेवा, हाउस कीपिंग आधीचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे हॉटेल अकाउंटिंग, अन्नाची सुरक्षा व गुणवत्ता, मनुष्यबळ विकास, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, टुरिझम मार्केटिंग अँण्ड मॅनेडमेंट या सारख्या व्यवस्थापकीय कौशल्यांचे प्रशिक्षणदेखील अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात ही परीक्षा घेण्यात येते. लेखी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागतो. बीएस्सी हॉस्पिटॅलिटी व हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासक्रमासाठी ५१ कॉलेजांमधून एकूण ७,४८२ जागा उपलब्ध असतात. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागतात.

अधिक माहितीसीाठी बेबसाइट www.nchm.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बी.एस्सी.इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन 
 प्रवेश पद्धती ः या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेद्वारे तीन वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश दिला जातो. एकुण उपलब्ध जागांपैकी यापैकी १५ टक्के जागा अनुसूचित जाती (एस.सी) आणि ७.६ टक्के जागा अनुसूचित जमाती आणि ३ टक्के जागा अपंग संवर्गासाठी राखीव आहेत. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्थामध्ये मुंबईतील इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, वीर सावरकर मार्ग, दादार पश्‍चिम, मुंबई ४०००२८ या संस्थेचा समावेश आहे.

देशभरातील २७ शहरांमध्ये सामाजिक प्रवेश चाचणी घेतली जाते. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर या शहरांचा समावेश होतो. या परीक्षेचा पेपर बहुपर्यायी पद्धतीचा असतो.

शिष्यवृत्ती  
हॉटेल मॅनेजमेंटच्या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित आखिल भारतीय स्तरावरची शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती प्रत्येक सत्रातील गुणांवर आधारित पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. संस्थेत प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
 अधिक माहितीसाठी www.nchmct.nic  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी
हैदराबाद येथील डॉ. वाय.एस. आर नॅशनल इन्सिट्यूट ऑफ टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट संस्थेत  हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या संस्थेत पुढीलप्रमाणे उपलब्ध आहेत.
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी. कालावधी तीन वर्ष.
बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी. कालावधी चार वर्ष.
दोन्ही अभ्यासक्रम हैदराबादच्या जवाहरलाल नेहरु टेक्‍नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत. हे अभ्यासक्रम दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होतात. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे दिला जातो. लेखी परीक्षा ५० गुणांची असते. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतील बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेत खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी ५० टक्के गुण व अनुसूचित जाती व जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५ टक्के गुण मिळायला हवेत. वयोमर्यादा २२ वर्ष. ( राखीव संवर्गासाठी २५ वर्ष)
 अधिक माहितीसाठी www.nithm.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या