पोलिस भरती

पांडुरंग सरोदे
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्‍य खांद्यावर लावून आयुष्यभर जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेणारा पोलिस. वेळप्रसंगी कुटुंबाऐवजी देशबांधवांचा पहिल्यांदा विचार करणारा आणि त्यांच्या प्राणासाठी दहशतवाद्यांशी दोन हात करत निधड्या छातीवर गोळ्या झेलणारा पोलिस. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या ‘बुलेट’लाही तितक्‍याच छातीठोकपणे उत्तर देणारा पोलिस. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा भारतीय जवान, तर इकडे देशबांधवांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस झटणारा पोलिस ! आपल्या कामगिरीमुळे लोकांच्या मनात घर करणाऱ्या पोलिसांसमवेत आपलाही मुलगा, मुलगी असावी, असे कोणत्या नागरिकाचे स्वप्न असणार नाही. त्यादृष्टीने बहुतांश तरुण-तरुणींना ‘पोलिस’ या पदाची भुरळ पडू लागली आहे. परंतु ‘पोलिस भरती म्हणजे रोजगाराचे ठिकाण किंवा नोकरी नाही, तर स्वेच्छेने करावी वाटणारी सेवा आहे’ एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हे वाक्‍य खाकी वर्दीतील ‘पोलिसा’चे कर्तव्य स्पष्ट करताना पोलिस बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना क्षणार्धात त्याची व्याप्ती दाखवून देतात. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिसांची गरज वाढत असताना, राज्यातील तरुणाईकडून त्यास उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे वास्तव आहे.  

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दिवसेंदिवस स्थलांतरितांचा लोंढा वाढत आहे.  रोजगार, व्यवसाय व उद्योगांमुळे वाढणाऱ्या या शहरीकरणामुळे साहजिकच शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होऊन विविध प्रकारचे गुन्हे घडण्याचे प्रमाणही तितकेच वाढते. विशेषतः संवेदनशील घटना, दहशतवादी कारवायांबरोबरच सायबर क्राईमसारख्या वेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे शहरे अंतर्बाह्य ढवळून निघाली आहेत. तर दुसरीकडे त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये राजकीय व्यक्ती, विविध समाजघटक व अन्य वेगवेगळ्या कारणांमुळे तेथीलही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न कायमच ऐरणीवर असल्याचे मागील काही वर्षांपुर्वीपासुनचे वास्तव आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरे व ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याची जबाबदारी साहजिकच पोलिस प्रशासनावर येते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या गृह विभागाकडून दरवर्षी  पोलिस भरती प्रक्रिया राबवून हजारो पदे भरली जातात. या भरती प्रक्रियेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होतात. पोलिस भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार करणाऱ्या उमेदवारांच्या खांद्यावरच पुढे पोलिस म्हणून आपल्या शहराच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडते.

राज्य सरकार दरवर्षी प्रत्येक शहर व जिल्ह्यांच्या मागणीनुसार एकाचवेळी भरती प्रक्रिया राबविते. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येतात. नोकऱ्यांचा अभाव, वाढती बेरोजगारी, सुरक्षित नोकरीचा अभाव आणि कुटुंबासाठीची उपयुक्तता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे उमेदवारांकडून पोलिस भरतीला प्राधान्य दिले जात असल्याचे वास्तव आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये एका मोठ्या शहरामध्ये दोनशे जागांसाठी तब्बल ३० ते ४० हजार उमेदवारांचे अर्ज आले होते. यावरूनच पोलिस भरतीकडे तरुणांचा मोठ्या प्रमाणात कल वाढत असल्याची सद्यःस्थिती आहे.

कमीत कमी शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी पोलिस भरती ही एक उत्तम संधी असते. असे असूनही उच्चशिक्षित तरुण-तरुणीही या भरती प्रक्रियेमध्ये आपले नशीब अजमावून पाहण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील मुले, ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांची मुले पोलिस भरतीकडे नोकरीची संधी म्हणून मोठ्या आशेने पाहतात. पोलिस भरतीमुळे संबंधित उमेदवाराला  एकाच शहरात नोकरी करता येते, अन्य शहरांमध्ये बदली होण्याची शक्‍यता कमी असते. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्‍य होते. शिक्षण, रुग्णालये, बाजारपेठ यांसारख्या सोई-सुविधा जवळ असल्याने कुटुंबासाठी त्या उपयुक्त ठरतात. बहुतांश उमेदवार हे केवळ पोलिस शिपाई या पदापुरते मर्यादित राहात नाहीत. तर प्रारंभी पोलिस शिपाई पदासाठी भरती होऊन पुढे हेच कष्टाळू, हुशार व अभ्यासू उमेदवार पोलिस उपनिरीक्षकापासून ते पोलिस खात्यातीलच वेगवेगळ्या प्रकारच्या वरिष्ठ पदापर्यंत पोचण्यासाठी अवश्‍य प्रयत्न करतात. त्यासाठी खात्याअंतर्गत असणाऱ्या विविध परीक्षा देऊन मोठ्या पदापर्यंत मजल मारतात. काही वर्षांपासून पोलिस भरतीसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना सहजसोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज भरता येतात. त्यानंतर भरती प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात बायोमेट्रीक पद्धतीने उमेदवारांची तपासणी केली जाते. त्यामुळे गैरप्रकार घडण्याची शक्‍यताही कमी असते. काही अपवाद वगळता ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याचे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. त्यामुळेच पोलिस भरती होऊन नागरिकांची सेवा करण्यासाठीची ऊर्मी उमेदवारांमध्ये जागृत होते. पुढे भरती झाल्यानंतरही हीच ऊर्मी कायम राहते.

पोलिस भरती प्रक्रिया दरवर्षी होत असल्याने तरुणांना या क्षेत्रात नोकरीची संधी आहे. मात्र त्यासाठी तितकेच कष्ट करणेही गरजेचे आहे. केवळ शरीरयष्टी चांगली आहे, म्हणून पोलिस होऊ शकतो, ही शक्‍यता कमी आहे. पोलिस भरतीसाठी आपले गाव, शहर, राज्य, देश एवढेच नव्हे, तर जगाचा तितकाचा अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. आपल्या सभोवतालचा इतिहास, भूगोल माहिती असणे आवश्‍यक असते. त्याचबरोबर आपल्या मायमराठीचे सखोल ज्ञान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरणापासून ते मराठी साहित्य, कला, संस्कृतीचाही तितकीच जाण असणे आवश्‍यक आहे. गणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यांसारख्या गोष्टींचाही अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. चालू घडामोडींसाठी दैनंदिन वृत्तपत्र वाचन ठेवल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.या अभ्यासाशी निगडित गोष्टींबरोबरच शारीरिक क्षमताही तितकीच उच्च कोटीची असणे आवश्‍यक असते. त्यासाठी दररोज भरपूर धावणे, व्यायामावर अधिक भर देणे, लांब उडी, पुलअप्स, गोळा फेक यांसारख्या मैदानी चाचणीसाठी स्वतःला तयार करणे आवश्‍यक आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता, प्रत्यक्षात भरतीच्यावेळी अधिक वेळ लागतो. अशावेळी स्वतःच्या  शरीराची क्षमता वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. सध्या तालुकास्तरावरही पोलिस प्रशिक्षण केंद्र निघू लागले आहेत. त्या ठिकाणीही पोलिस भरतीसाठी आवश्‍यक प्रशिक्षण मिळते. परंतु वैयक्तिक पातळीवरही 

पोलिस भरतीसाठीची तयारी करणे सहज शक्‍य आहे. अभ्यास, मैदानी चाचणीसाठी व्यायामाची तयारी यांना जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व आवश्‍यक कागदपत्रे जवळ बाळगण्यासही आहे. पोलिस भरतीसाठी नमूद केलेली आवश्‍यक सर्व कागदपत्रे, त्यांच्या छायांकित प्रती काळजीपूर्वक जवळ बाळगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भरतीच्या ठिकाणीही आपल्या कागदपत्रांची अधिक काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. केवळ एवढ्यावरच न थांबता पोलिस भरतीच्यावेळी जर काही  गैरप्रकार घडत असेल, तर असा गैरप्रकार संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्काळ निदर्शनास आणून देणे तितकेच महत्त्वाचे आहे.पोलिस भरतीसाठी इच्छुक तरुण-तरुणींनी भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होताना, या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्‍यक आहे. तसेच पोलिस भरतीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीस आपण किंवा अन्य कोणीही बळी पडणार नाही, याकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. इथूनच तर खरी पोलिसाच्या कामाची सुरवात होते.

पोलिस भरती केव्हा होते? 
दरवर्षी जानेवारी ते जून या कालावधीमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. ४५ ते ६० दिवसांमध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण होते. 

पोलिस भरतीचे विभाग 

 • ग्रामीण ः पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अमरावती
 • रेल्वे  ः मुंबई, पुणे, नागपूर 
 • शहर ः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अकोला, वाशीम, बुलढाणा, वर्धा, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, नांदेड, लातूर, हिंगोली, गडचिरोली, सांगली, भंडारा आदी.. 
 •  शैक्षणिक अर्हता ः १२ वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा उत्तीर्ण
 •  आवश्‍यक कागदपत्रे ः शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणीचे वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी. 
 •  वयोगट ः सर्वसाधारण गट ः १८ ते २८ (एससी/एसटीसाठी ५ वर्षे, ओबीसीसाठी ३ वर्षे, खेळाडूंसाठी ५ वर्षे सवलत)
 •  शारीरिक चाचणी ः 
 •  उंची पुरुष - १६५, महिला - १५५
 •  छाती - पुरुष - न फुगविता ७९, फगवून ८४ सेंमी
 •  पुरुषांसाठी ः धावणे, गोळा फेक, लांब उडी, पुलअप्स.
 •  महिलांसाठी धावणे, गोळाफेक, लांब उडी
 •  लेखी चाचणी (वेळ ९० मिनिटे)
 • अंकगणित  
 • सामान्यज्ञान व चालू घडामोडी  
 • बुद्धिमत्ता चाचणी  
 • मराठी व्याकरण  

 पोलिस भरतीसाठी आवश्‍यक संकेतस्थळ ः www.maharashtra.gov.in 

पोलिस भरती प्रक्रियेतून पोलिस शिपाई या पदावर तरुण-तरुणींना भरती होता येते. पोलिस शिपाई पदानंतर पुढे या उमेदवारांना खात्याअंतर्गत परीक्षा दिल्यास विविध पदांवर जाता येते. मात्र पोलिसांचे काम ही नोकरी आहे, असा समज तरुणांनी काढला पाहिजे. प्रत्यक्षात पोलिसांचे काम हे सेवार्थ पद्धतीचे आहे. त्यादृष्टीने पोलिस सेवा बजावताना उमेदवारांनी भरपूर शिकण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. तरच स्वतःबरोबरच समाजासाठीही आपला उपयोग होऊ शकतो. 
- शेषराव सूर्यवंशी, 
    पोलिस उपायुक्त, पुणे पोलिस प्रशासन  विभाग.

संबंधित बातम्या