दीपस्तंभ

विनय सहस्रबुद्धे (राज्य सभासदस्य, भाजप)
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
आदरांजली

 

स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रीय राजकारणावर पहिली जवळपास तीन दशके नेहरू आणि इंदिरा गांधी यांचीच छाया होती. पं. नेहरूंना महात्मा गांधीजींचा भरभक्कम पाठिंबा होता. शिवाय त्यांच्याकडे एक खानदानी, राजस व्यक्तिमत्त्वही होतेच. स्वतंत्र देशाला आपली वैश्‍विक ओळख निर्माण करण्यासाठी जगाच्या पाठीवर आधीच ज्ञात झालेले नेतृत्व या नात्यानेही पं. नेहरूंना विना आव्हान पंतप्रधानपद भूषविण्यासाठी अनुकूलता होती. त्यांच्या नंतर तशीच अनुकूलता आणि तसाच वारसा जवळजवळ तशाच स्वरूपात इंदिरा गांधींना लाभला. घराण्याची पार्श्‍वभूमी, करिष्मा आणि नेतृत्व, शरण सहकाऱ्यांची भाऊगर्दी या भांडवलावर त्यांनी आपले नेतृत्व सहजी रुजवले. 

पं. नेहरू आणि इंदिराजींना ही जी परिस्थितीजन्य अनुकूलता लाभली तिचा लवलेशही अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाट्याला नव्हता. असं असूनही आज नेतृत्वाच्या गुणवत्तेच्या कसोटीवर खरे उतरतात ते केवळ आणि केवळ अटल बिहारी वाजपेयीच!  १९८४ ते २०१४ या तीन दशकात काँग्रेसकडे तब्बल वीस वर्षे सत्तेची सूत्रे होती. राजीव गांधी, नरसिंह राव आणि मनमोहनसिंग असे तीन काँग्रेसी पंतप्रधान देशाने या काळात बघितले. अटलजी जेमतेम सहाच वर्षे पंतप्रधान होते. पण प्रश्‍न राजकीय शुचितेचा असो वा इच्छाशक्तीचा, सुशासनाचा असो वा गतिमान विकासाचा, देशाच्या राजकारणात नवी समीकरणे स्थापन करण्याचा असो वा गृहीतके मोडून काढण्याचा; जे अटलजी करू शकले ते या काळात पंतप्रधानपदी राहिलेल्या एकूण सात पंतप्रधानांपैकी कोणालाही जमले नाही. 

अटलजींचे सार्वजनिक जीवन सुरू झाले ते संघाचा स्वयंसेवक या नात्याने. शिक्षणानंतर पुढे ते प्रचारक झाले. पण त्यांना कामे मिळाली ती मुख्यतः पत्रकारितेच्या संदर्भातली. मनात अंगीकृत विचारांबद्दलची अव्यभिचारी निष्ठा असली की असाध्यही साध्य होते. राष्ट्रधर्म या मासिकाचे आणि पांचजन्य या साप्ताहिकाचेही ते काही काळ संपादक होते. विपरीतता आणि प्रतिकूलता एवढी  होती की स्वतःच लिहायचे, छपाईकडे लक्ष द्यायचे, वितरणाची व्यवस्थाही बघायची असा संसाधनांन अभावी लादला गेलेला ‘एकखांबी तंबू’चा प्रकार होता. नंतर संघाच्या रचनेतच त्यांच्याकडे जबाबदारी आली ती जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांना सर्व प्रकारे साहाय्य करण्याची. १९५३ मध्ये याच जबाबदारीचा भाग म्हणून अटलजी पहिल्यांदाच मुंबईत आले ते सुमारे ३६ तास दिल्ली-मुंबई प्रवासासाठी घेणाऱ्या डेहराडून एक्‍स्प्रेसने. पक्षाने त्यांना हात खर्चासाठी दोन-पाच रुपये दिले होते, ते जवळजवळ तसेच शाबूत ठेवून अटलजींनी प्रवास केला. सांताक्रुझचे एक बक्षी नावाचे त्यावेळचे कार्यकर्ते सांगायचे की पुढे कालांतराने दादरला कथ्थक लॉज या ठिकाणी पक्षाचे कार्यालय झाल्यावर अटलजी तिथे उतरायचे आणि कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी बॅगेतून सुई-दोरा काढून उसवलेला सदरा किंवा विरलेलं धोतर टाके घालून नीट करायचे. ठाण्यात वसंतराव पटवर्धन हे जुन्या काळातले जनसंघ-भाजपाचे कार्यकर्ते. ते अटलजी सायकलवर डबलसीट बसून निधी संकलनासाठी बाजारपेठेत कशी चक्कर मारायचे  त्याची हकिगत सांगत. राजकीय अस्पृश्‍यतेचेही अनेक दाहक चटके त्या काळातल्या जनसंघाच्या मंडळींनी सोसले. परिणामी निवडणुकीतले यशही खूप कष्टसाध्य. जनसंघाची उमेदवारी स्वीकारणे म्हणजे डिपॉझिटची रक्कमही न वाचण्याची खात्री असे त्या काळातले वातावरण होते. या प्रकारच्या प्रतिकूलतेशी लढत, झगडत अटलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनसंघ रुजविला आणि आणीबाणी पश्‍चातचा जनता पार्टी प्रयोग फसल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा ‘वेलू’ गगनावरी नेला.

जनसंघाचे संस्थापक डॉ. मुखर्जी होते आणि सैद्धांतिक भूमिकेचे व संघटनेचेही सुरवातीचे शिल्पकार होते ते पं. दीनदयाळ  उपाध्याय. पण या दोघांचेही अकाली आणि दुर्दैवी अंत घडून आल्यानंतर जनसंघाची आणि पुढे भाजपाचीही ‘ओळख’ बनले ते अटलजी. आडवानींचा उदय होईपर्यंत ही परिस्थिती अशीच होती. अटलजींचे ओजस्वी वकृत्व, त्यांची प्रतिभाशाली लेखणी आणि त्यांचा देशभरात सर्वदूर संचार याबरोबरच काव्य-शास्त्र विनोदात रमण्याचा त्यांचा पिंड यामुळेही अटलजी लोकप्रियतेत अग्रेसर राहिले. संघटनशीलता, विचारधारेशी बांधिलकी आणि राजकीय चातुर्य व रणनीतीनिपुणता यांचा एक अनोखा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता असं म्हणणं अतिशयोक्तीचं होणार नाही. 

अटलजींच्या वक्तृत्व गुणांबद्दल लिहावे तेवढे कमीच. त्यांनी कधीच वक्तृत्वाचे प्रशिक्षण घेतले नसणार. पण त्यांच्या शब्दांना धार होती. कारण त्यामागे भावना अस्सल होत्या, विचारांवर एक प्रगाढ निष्ठा होती आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची तळमळही होती. 

त्यांच्या कवितेतही एक जीवनदृष्टी होती.
मेरे प्रभू।
मुझे इतनी उँचाई कभी मत देना
गैरो को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना..

 ही कविता काय किंवा 

दाँवपर सत्व कुछ लगा है,
रुक नही सकते,
टुट सकते है मगर
हम झुक नही सकते।
यासारखे काव्य काय,

   अटलजींच्या प्रतिभेतून समोर येत होता तो एक विचारशील राजकारणी. मृत्यूला देखील त्यांनी एका कवितेत बजावून सांगितले, की चोरपावलांनी येऊ नकोस, उघड उघड समोर उभा ठाक! आणि त्याच कवितेत पुन्हा आपल्या प्रवृत्ती आणि निवृत्तीकडे पाहण्याच्या समदृष्टीचा परिचय देताना अटलजी म्हणतात, 
मै जी भर जिया,
मै मन से मरु;
लोटकर आऊंगा,
कूच से क्‍यो डरुँ?

जनसंघ स्थापन झाला तो एका विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद म्हणून. पण देशात स्वातंत्र्याचा अर्थ समजून नव्याने देश उभारणीचे काम करायला हवे याची जाण आणि त्या जाणिवेचे भान निर्माण करण्याची आत्यंतिक गरज होती. त्या दृष्टीने काँग्रेसच्या महाकाय सत्तेला समर्थपणे आव्हान देऊ शकेल असा एक विश्‍वसनीय पर्याय उभा करण्याचीही गरज होती. अटलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही हे जाणून धोरणविषयक चिंतनातून काही मुद्यावर ठळकपणे वेगळी मांडणी करण्यास सुरवात केली. देशाच्या सार्वभौमत्वासंदर्भात कोणत्याही तडजोडीला ठाम विरोध, शेजारी देशांशी मधुर संबंध; पण भारत हिताचा बळी न देता, समाजवादी अर्थव्यवस्थेला पर्यायी अशी मिश्र अर्थव्यवस्था, समताधिष्ठित समाज रचनेत सामाजिक न्यायाला प्राधान्य आणि आर्थिक विकासात्मक चिंतनात अंत्योदयाच्या संकल्पनेला मध्यवर्ती स्थान इत्यादी काही मुद्दे जनसंघातर्फे ठामपणे मांडले गेले, ज्यात अटलजींच्या विचारांचे प्रतिबिंब होते. ‘हर हाथ को देंगे काम, हर खेत को देंगे पानी’ ही घोषणा हा या चिंतनाचाच आविष्कार होती.

अटलजी गेल्यानंतर त्यांच्याबाबत वृत्तपत्रातून खूप काही लिहून आलंय. अटलजी उदारमनस्क होते, ते खुल्या विचारांचे आणि आधुनिक दृष्टीचे होते आणि त्यांच्या पक्षापेक्षा वा ते ज्या वैचारिक आंदोलनाच्या मुशीतून वर आले त्या विचारसरणीच्या तुलनेत ते खूप वेगळे होते; असा सूर लावून एक व्यूहात्मक मांडणीही केली गेली. पण खुद्द अटलजींनीच अनेकदा या निरीक्षणांतला फोलपणा उलगडून दाखविला होता. अथवा त्यामागची व्यूह दृष्टी खोटी असल्याचे सांगितले होते. ‘‘माझ्यातील उदारमनस्कता  हा पं. दीनदयाळ उपाध्यायांच्या माझ्यावरील संस्कारांचा परिणाम आहे’’ असं एका मुलाखतीत खुद्द अटलजींनीच सांगितलं आहे. ‘‘मी जर एवढा चांगलाय तर तुम्ही काँग्रेसवाले वा कम्युनिस्ट मला तुमच्यात घ्यायला तयार होणार आहात काय?’’ असा प्रश्‍नही त्यांनी बेधडकपणे विचारला होता. मरणोत्तर अटलजी विषयी गुणगान गाणाऱ्यांच्या लिखाणात त्यांच्या शासकतेबद्दलची चर्चा अभावानेच आढळून आली आहे. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राला जय विज्ञानाची जोड देऊन त्यांनी जी आधुनिक दृष्टी दाखवली ती नदीजोड प्रकल्पाला चालना देतांनाही दिसून आली. एकूणच बहुआयामी संपर्क निर्मितीचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. ग्रामीण विकासाला पोषक ठरलेल्या ‘‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला’’ तर त्यांनी गती दिलीच, पण ‘सुवर्ण चतुष्कोन’ सारखी महामार्गीय रचनाही त्यांनी निरंतर पाठपुरावा करुन साकारली. शिवाय दूरसंचार व्यवस्थेचे भक्कम जाळेही त्यांच्याच कारकिर्दीत विणले गेले. विमानतळांचे आधुनिकीकरण प्रत्यक्षात पुढे घडून आले असले तरी त्याचा गृहपाठ अटलजींच्याच काळात घडून आला होता. 

अटलजींनी परराष्ट्र संबंधाच्या विषयातही अनेक नवीन गोष्टी घडवून आणल्या. परराष्ट्रव्यवहार मंत्री या नात्याने संयुक्त राष्ट्रसंघात पहिले हिंदी भाषण हे त्यांचेच झाले आणि भारत-इस्राईल संबंधाची सुरवातही त्यांच्यामुळेच झाली. पोखरण अणू चाचण्या, कमालीची गुप्तता राखून यशस्वी करण्याचा त्यांचा निर्धार मोलाचा होता. या चाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला हे खरेच पण अमेरिका आणि अन्य राष्ट्रांच्या निर्बंधामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा कौशल्याने मुकाबला करण्याचे कर्तृत्वही त्यांच्याच खात्यावर जमा आहे. पाकिस्तानच्या विषयात पारंपरिक भूमिकेला बाजूला सारुन लाहोर-बस यात्रा करण्याचा आणि तिथे जाऊन मीनार-ए-पाकिस्तानला भेट देण्याचा मुत्सद्दीपणा दाखविणाऱ्या अटलजींनी कारगिलच्या युद्धात आवश्‍यक तो कणखरपणाही दाखविला. पुढे परवेझ मुशर्रफ यांना आग्रा शिखर परिषदेसाठी पाचारण केल्यानंतरही पाकिस्तानचा आडमुठेपणा लक्षात आल्यानंतर शिखर परिषद गुंडाळण्याचे साहसही त्यांनी दाखविले. 

अटलजींच्या काळात आर्थिक सुधारणांना गती मिळाली हे खरेच. पण कदाचित त्या ही पेक्षा अधिक महत्त्वाच्या होत्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दिशेने गेलेल्या सुधारणा. अटलजींच्या कारकिर्दीत पूर्वीच्या समाजकल्याण मंत्रालयाने कात टाकली आणि सामाजिक न्याय मंत्रालय अस्तित्वात आले. हा केवळ नामांतराचा प्रकार नव्हता. समाज कल्याणात कोणीतरी कोणावर तरी  उपकार करीत असल्याची भावना होती. अनुसूचित जातीच्या बांधवांचा लढा होता न्यायाकरिता. त्यासाठीच मंत्रालयाचे नवे नामकरण झाले आणि जन-जाती कल्याण असे एक नवे खातेही निर्माण झाले. शिवाय ईशान्य भारतातील आठही राज्यांची उपेक्षा संपुष्टात आणण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन म्हणजेच ‘डोनर’ नावाचे नवे खातेही अटलजींनीच निर्माण केले. ग्रामीण दळणवळणासाठी वरदान ठरलेली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाही अटलजींच्याच काळातली आणि तसाच सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पही! अटलजींनीच सर्वशिक्षा अभियान राबवून शालेय शिक्षणाचा परीघ विस्तृत केला. 

शासकतेच्या आघाडीवरील त्यांच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा म्हणजे तीन छोट्या राज्यांची निर्मिती. उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड ही तीन नवी छोटी राज्ये अस्तित्वात आल्यामुळे मागास भागांना न्याय मिळाला. मुख्य म्हणजे या तिन्ही राज्यात भाजपाची सरकारे नसतानादेखील अतिशय सौहार्दपूर्ण आणि समन्वयाच्या भूमिकेतून हा प्रस्ताव हाताळला गेल्याने विनाविवाद आणि विना कटुता ही छोटी राज्ये बनली आणि त्या प्रक्रियेच्या सुविहित संचालनात अटलजींचा मोठा वाटा होता. अटलजींची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे भ्रष्टाचार आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांनी अंमलात आणलेल्या दोन सुधारणा. त्यांनी राज्यसभेच्या निवडणूका पारदर्शी केल्या आणि त्यातून निवडणुकीतला घोडेबाजार आटोक्‍यात आला. शिवाय राजकीय स्थैर्यासाठी आमदारांना मंत्रिपदाची लालूच दाखविण्याचा शिरस्ता, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळांच्या संख्येवर मर्यादा आणून अटलजींनीच मोडीत काढला. सारांशाने सांगायचे तर स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंप्रज्ञेच्या बळावर, परिश्रमाने आणि मूल्यविवेकाने विश्‍वसनीय राजकीय विकल्प उभा करण्याचे मोठे काम अटलजींनी केले. आघाडीचे राजकारणही मूल्यांशी तडजोड न करता यशस्वी करता येते हे त्यांनी दाखवून दिले. 

काव्य, शास्त्र, विनोदात रमणाऱ्या अटलजींनी मनात आणले असते तर यशस्वी पत्रकार किंवा साहित्यिकही होता आले असते. पण ध्येयनिष्ठेपायी त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि मुळातच निसरड्या क्षेत्रात आत्मविश्‍वासाने आणि निर्धाराने दमदार आणि ठाम, न डगमगता ते वाटचाल करीतच राहिले. देशाच्या राजकारणात सर्वदूर घराणेशाहीचाच मार्ग मजबूत होत असण्याच्या काळात अटलजींनी विचाराधिष्ठित राजकीय पक्षाचा सिद्धांत खंबीरपणे मांडला आणि वास्तवातही आणला.

फोटो फीचर

संबंधित बातम्या