बदलत्या जीवनशैलीचा भाग?

डॉ. राजेश धोपेश्‍वरकर 
गुरुवार, 21 जून 2018

कव्हर स्टोरी : आरोग्य विशेष
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढते आहे. वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे, त्यामुळे बदलती जीवनशैली म्हणजे काय? त्याच्यामुळे हृदयरोग कसा होऊ शकतो? याविषयी विचार व्हायला हवा; तरच त्यावर तोडगा काढता येऊ शकतो...

आपल्याच ओळखीतला तरुण अथवा मध्यमवयीन व्यक्‍ती अचानक हृदयरोगाच्या तीव्र धक्‍क्‍याने दगावली, ही काही न ऐकलेली घटना नक्कीच नाही. याला कारण काय? हे बदलत्या जीवनशैलीमुळे ओघानेच आलेले आजार आहेत का? बदलती जीवनशैली म्हणजे नक्की काय? याचे आपल्या जीवनावर आणि प्रकृतीवर कुठले परिणाम होतात आणि त्यावर आपण कोणता तोडगा काढू शकतो? 

बदलत्या जीवनशैलीचे काही प्रमुख पैलू आपण पाहू 
मानसिक ताण ः आधुनिक जगात सुखसुविधा आल्या, पण ओघानेच त्या सुखसुविधा मिळवण्यासाठी आपली शर्यत सुरू झाली. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे - आयुष्य ही शर्यत नाही, प्रवास आहे.. पण रोजच्या कामाच्या रगाड्यात आपण हे विसरतो आणि अर्थार्जनाच्या मागे लागतो. This world is for you to enjoy, but while doing so do not forget your own self - Sri Sri. 

या शर्यतीत यश संपादन केले तरी आपला हव्यास संपत नाही आणि निराशा आली तर आपण खचून जातो. त्यातूनच मानसिक ताण निर्माण होतो. बऱ्याच वेळा तो आपल्याला कळतदेखील नाही. थकवा येणे, चिडचिड होणे, उत्साह नसणे इत्यादी लक्षणे मानसिक ताणाचीच! क्वचित असे झाले तर काही हरकत नाही, पण सातत्याने या ताणात राहिल्याने आपल्या शरीरात आरोग्याला बाधक असे अनेक बदल होऊ लागतात. जसे- 

१) उच्च रक्तदाब २) रोग प्रतिकारशक्ती कमी होणे ३) स्थूलपणा ४) मधुमेह ५) हृदयविकार. 
हृदयविकाराचा झटका का येतो? 
असे म्हणतात, की ४५% हार्ट ॲटॅक्‍सच्या मागे अति मानसिक किंवा शारीरिक ताण असतो. सवय नसलेल्या व्यक्तीने अचानक खूप श्रमाचे काम केले तरी देखील हार्ट ॲटॅक येऊ शकतो. माझ्या माहितीतील असे काही प्रसंग ऐकण्यासारखे आहेत. एक १९ वर्षांचा मुलगा अचानक छातीत दुखायला लागल्याने ॲडमिट झाला. त्याला हार्ट ॲटॅक आला होता. त्याच्या हृदयाच्या एका रक्तवाहिनीमध्ये गाठ तयार होऊन रक्तपुरवठा बंद पडला होता. ती रक्ताची गाठ अँजिओप्लास्टीद्वारे काढण्यात आली व रक्त पातळ करायच्या औषधांवर तो घरी गेला. हे घडले त्या दिवशी त्याने ढोल ताशा पथकात ढोल वाजवला होता. दोन वर्षांनी समजले, की तो झोपेतच गेला. त्याच दिवशी त्याने फुटबॉल मॅचमध्ये भाग घेतला होता. 
अशा अनेक रुग्णांमध्ये आपण अचानक आणि पुरेसा सराव नसताना घेतलेल्या शारीरिक श्रमांमुळे हार्ट ॲटॅक आल्याचे पाहतो. 

त्याप्रमाणेच प्रचंड मानसिक ताणदेखील हार्ट ॲटॅकला कारण होऊ शकतो. अर्थातच त्या रुग्णाची पूर्व परिस्थितीसुद्धा याला कारणीभूत असतेच. 

हार्ट ॲटॅक म्हणजे काय? 
आपल्याला सर्वांनाच हार्ट ॲटॅकबद्दल माहिती आहे. हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार होऊन रक्तपुरवठा बंद झाला, की रुग्णाला अचानक त्रास होऊ लागतो. या त्रासाचे स्वरूप प्रत्येकामध्ये वेगळे असू शकते. छातीत मध्यभागी, डावीकडे, खांदे व हात तसेच जबडा यापैकी कुठल्याही ठिकाणी दुखणे हे हार्टॲटॅकचे लक्षण असू शकते. पण त्याशिवाय अचानक जीव कासावीस होणे, खूप धाप लागणे, घाम सुटणे किंवा मळमळ अथवा उलटी हीदेखील हार्ट ॲटॅकची लक्षणे असू शकतात.

वेळीच इलाज केला नाही तर हृदयाला कायमची इजा होऊन हृदयाची कार्यक्षमता कमी होते. तसेच काही वेळा मृत्यूदेखील येऊ शकतो.

हार्ट ॲटॅकनंतर पहिल्या तासात हॉस्पिटलमध्ये पोचणे गरजेचे असते. रुग्णाची लक्षणे व ईसीजी यांवर हार्ट ॲटॅकचे निदान होते. ताबडतोब रक्तपुरवठा सुरळीत केल्यास हृदयाला कायमस्वरूपी इजा होण्यापासून वाचवता येते. ज्या ठिकाणी शक्‍य असेल तिथे प्रायमरी अँजिओप्लास्टीद्वारे रक्ताची गाठ काढून व स्टेंटचा वापर करून रक्तपुरवठा सुरळीत केला जातो. पण जर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसेल तर रक्ताची गाठ विरघळण्याचे औषध थोडाही विलंब न करता देणे गरजेचे असते.

मानसिक ताणावर तोडगे 
१) व्यवस्थित झोप घेणे २) नियमित व्यायाम करणे ३) सात्त्विक आहार घेणे ४) योग, प्राणायाम आणि ध्यान याचा आपल्या दिनचर्येत समावेश करणे ५) आयुष्याबद्दल विशाल दृष्टिकोन ठेवणे ६) आपल्याला आवडणारा छंद जोपासणे ७) जीवन स्वकेंद्रित न ठेवता समाजाच्या उपयोगी होईल असे पाहणे. 

अपुरा व्यायाम 
आज आपण शारीरिक व्यायामाला फारच कमी महत्त्व देतो. आपल्यापैकी किती लोक नियमित व्यायाम करतात? 

याची कारणे अनेक असतील, अपुरा वेळ, आळस, व्यायामाच्या फायद्यांची पुरेशी जाणीव नसणे. 
अपुऱ्या शारीरिक कष्टांच्या अभावी स्थूलपणा, मधुमेह असे रोग होतात आणि ओघानेच हृदयरोग, पॅरालिसिस यासारखे आजार येतात. नियमित व्यायाम हे एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे आपले रोग प्रतिबंधक कवचच आहे. आपल्या दिनचर्येमध्ये जेवढा शारीरिक व्यायामाचा समावेश होईल तेवढे चांगले. रोज अर्धा तास चालणे व जर शक्‍य असेल तर निसर्गात चालणे अधिक चांगले. 

फास्टफूड आणि रोगवर्धक आहार 
आहाराबद्दल आयुर्वेदात खूप चांगले सांगितले आहे. आहार योग्य प्रमाणात आणि सात्त्विक असणे आवश्‍यक आहे. योग्य आहार व निरोगी पचनसंस्था ही पूर्ण शरीराच्या स्वास्थ्यासाठी आवश्‍यकच आहे. शक्‍यतो शाकाहाराचा अवलंब आरोग्यास उत्तम. त्यात गोडाचे प्रमाण कमीत कमी ठेवणे गरजेचे आहे. तेल योग्य प्रमाणात वापरण्यास काहीच हरकत नाही. फक्त स्थूलपणा येऊ न देणे महत्त्वाचे. तसेच फळे व पालेभाज्या याचे सेवन अधिक करावे. वेळेच्या अभावामुळे आपण आहाराकडे दुर्लक्ष करतो. वेळच्या वेळी आणि शक्‍य असेल तर ताजे, नुकतेच शिजवलेले अन्न उत्तम. 

विद्यार्थी व व्यावसायिकांमधील व्यसनाधीनता 
आज सिगारेट, तंबाखू व दारू या व्यसनामध्ये तरुण पिढी ओढली जातेय. मोठ्या शहरांमध्ये तर याही पुढे म्हणजे ड्रग्ज (गांजा वगैरे) हे देखील तरुण पिढी उद्‌ध्वस्त करू पाहताहेत. या सर्व व्यसनाधीनतेने एखादी व्यक्तीच नव्हे तर कुटुंबे व समाजही उद्‌ध्वस्त होतोय. नीतिमत्ता लयाला चालली आहे.

बदललेली दिनचर्या 
आपल्या शरीरात एक ‘बायोलॉजिक क्‍लॉक’ असते. त्यावर आपले झोपणे, उठणे आणि दिवसभराची कार्यक्षमता अवलंबून असते. आज काही जणांना नोकरीनिमित्त रात्रपाळी करावी लागते. अशावेळी काही दिवस जागरण करावे लागले तर एकवेळ ठीक; पण नित्यनियमाने काही जण रात्रपाळी करतात, जसे टॅक्‍सीवाले, चहावाले, ड्रायव्हर इत्यादी. हे निश्‍चितच रोगाला आमंत्रण आहे. अशावेळी मी सांगतो, की कमीत कमी पहाटे ३-५ या वेळेत कामाची पर्यायी व्यवस्था करून थोडी का होईना झोप घ्यावी.

अपुरी झोप हे आजाराचे कारण ठरू शकते. ‘गोल्डमन सॅच’ या इन्व्हेस्टमेंट कंपनीत सर्वेश्‍वर गुप्ता नावाचा एक २२ वर्षीय युवक काम करत होता. अतिशय हुशार आणि गुणवान मुलगा, एक दिवस त्याच्याच गाडीत पार्किंगमध्ये मृत आढळला. आदल्याच आठवड्यात आपल्या वडिलांशी फोनवर बोलताना त्याने दिवसातून वीस - वीस तास काम करावे लागते अशी तक्रार केली. पण आयुष्यात पुढे जाण्यास हे आवश्‍यक आहे असेदेखील म्हणाला. ‘A son never dies’ या नावाने त्याच्या वडिलांनी एक ब्लॉग लिहिला आहे.
निद्रा ही देवी आहे. या शरीरातील बऱ्याच आजारांना रोखण्यास आणि झालेला आजार दुरुस्त करण्यास निद्रेचीच गरज असते. 

ध्यान, व्यायाम व योगासने 
असे म्हणतात की सात्त्विक आहाराने शरीराची शुद्धी होते, प्राणायामाने प्राणाची शुद्धी, ज्ञानाने विचारशुद्धी, गायन भजने याने भावनांची शुद्धी होते आणि ध्यानाने आत्मशुद्धी होते. २० मिनिटे ध्यान हे २-३ तास झोपेइतकेच प्रभावी आहे. निरोगी जीवनासाठी आहार, व्यायाम याबरोबरच योग प्राणायाम व ध्यान यांची गरज आहे. 

वेळीच लक्षणे ओळखा 
वेळेत हार्ट ॲटॅकची लक्षणे ओळखली तर मृत्यू टाळणे शक्‍य आहे. काही जणांना हार्ट ॲटॅकच्या काही दिवस आधीपासून लक्षणे असतात. अशा लक्षणांसाठी योग्य तपासण्या केल्या तर हार्ट ॲटॅक टाळता येतो. माझ्या माहितीतल्या काही प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांनादेखील वेळीच लक्षणांकडे लक्ष न दिल्याने प्राण गमवावा लागला आहे. 

बायपास चांगली की अँजिओप्लास्टी 
बायपास व अँजिओप्लास्टी या दोन्ही, हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहेत. रक्तवाहिन्यांमधला अरुंदपणा अर्थात ब्लॉक कुठे व किती प्रमाणात आहे यावर याचा इलाज ठरविला जातो. त्यासाठी काही मापदंड ही वापरले जातात. अर्थातच आपण ज्या हृदयरोग तज्ज्ञांकडे इलाजासाठी जाता ते यात निष्णात असतात. त्यामुळे त्यांच्याकडून दोन्ही इलाजांचे फायदे व तोटे समजून घेऊन मग योग्य तो निर्णय घेणे उत्तम. 

बायपास किंवा अँजिओप्लास्टी टाळता येते? 
आपल्याला या दोन्ही इलाजांबद्दल पुरेशा माहितीअभावी मनात भीती असते. म्हणून काहीजण हे इलाज टाळण्यासाठी अन्य पर्याय शोधतात जे बहुधा अवैज्ञानिक आणि अपरिणामकारक असतात. किंबहुना अशा अवैज्ञानिक उपचारांमुळे बऱ्याचदा असलेला आजार वाढतो आणि काही वेळा रुग्णाला प्राणदेखील गमवावा लागतो. त्याशिवाय नाहक पैसा खर्च होऊन मनस्तापदेखील होतो.

आपण एरवी एवढे विज्ञानाला धरून वागतो मग काहीवेळी असे का करतो याचा विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा रुग्ण मला अशा उपायांबद्दल विचारतात तेव्हा मी त्यांना काही प्रश्‍न विचारतो, जसे, मोतीबिंदू किंवा हर्निया किंवा ॲपेंडिक्‍स यासाठी कधी ऑपरेशनची वेळ आली तर तुम्ही इतर उपचारांवर वेळ व पैसा खर्च कराल का? उत्तर अर्थातच नाही असेच असते. हृदयरोगासाठीदेखील विज्ञानाने सिद्ध केलेल्या उपचार पद्धती सोडून इतर उपचार करणे सूज्ञपणाचे ठरेल का? 

सेकंड ओपिनियन घ्यावे का? 
अँजिओग्राफीद्वारे ब्लॉकचे निदान झाले की हृदयरोग तज्ज्ञ काही वेळा आपल्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी असे दोन पर्याय देतात. अशावेळी दोन्ही पर्यायांचे फायदे तोटे समजून आपल्याला योग्य निर्णय घेता आला तर उत्तम; पण काही वेळा अजून एका हृदयरोग तज्ज्ञाला भेटून त्याचा सल्ला घेणे हे चांगले. त्यातून आपल्याला आजार व इलाज याच्या सर्व पैलूंची अधिक माहिती मिळू शकते आणि म्हणूनच आपण जास्त आत्मविश्‍वासाने योग्य पर्याय निवडू शकतो. कुठलाही डॉक्‍टर सेकंड ओपीनीयन घेण्यास कधीच अडवत नाही. अर्थातच इर्मजन्सीमध्ये त्यासाठी वेळ दवडणे हे निश्‍चितच योग्य नाही. पण इतर वेळी सेकंड ओपिनियन घेण्यास काहीच हरकत नाही. तसे करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणेच योग्य असते. 

नव्या जगाची नवी आव्हाने 
बदलत्या जीवनशैलीने आपल्या शरीर व मनासमोर नवी आव्हाने उभी केली आहेत. ज्या वेगाने आपल्या आयुष्यात सुखसुविधा येत आहेत, त्या प्रमाणात आपण आपल्या दैनंदिन जीवनात बदल आणणे ही काळाची गरज आहे. जर वेळीच आपण याकडे लक्ष दिले तरच पुढची पिढी निरोगी आणि दीर्घायुषी होईल. यासाठी सर्वांनी शारीरिक स्वास्थ्याला आणि मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देणे आवश्‍यक आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या