साथीचे आजार टाळताना...

डॉ. सुहास नेने 
गुरुवार, 21 जून 2018

कव्हर स्टोरी : आरोग्य विशेष
हवेत असणाऱ्या विषाणू व जिवाणंूमुळे साथीच्या आजारांचा प्रसार झपाट्याने होतो. बदलती जीवनशैली आणि वाढत्या शहरीकरणामुळे या आजारांचे रूपही बदलत आहे. इबोला, निपाह यासारखे नवे आजार समोर आले आहेत. या आजारांपासून बचाव करण्यासाठी मूलभूत उपाय कोणते? याविषयी...

जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परोपजीवी जंतूंमुळे संसर्गजन्य आजार होतात. यापैकी कित्येक जंतू आपल्या शरीरात किंवा शरीरावर नेहमीच असतात. यातले बरेच जंतू कोणतीच इजा करत नाहीत किंबहुना त्यांचे असणे फायदेशीर असते. क्वचित प्रसंगीच त्यांच्यामुळे आजार उद्‌भवतात.
साथीचे आजार प्रत्यक्ष संपर्कामुळे, एकापासून दुसऱ्याला काही कीटकांच्या, जनावरांच्या चाव्यामुळे तर काही बाधित अन्न, पाणी खाण्यात आल्यामुळे पसरतात. काही आजार हवेमधून संक्रमित होतात. प्रत्येक आजाराची स्वतःची अशी वेगळे लक्षणे, तक्रारी असल्यास, तरी बऱ्याच आजारात ताप, कसकस, अंगदुखी, सांधेदुखी, उलट्या, जुलाब, अशक्तपणा, खोकला हे सर्वसाधारणपणे आढळतेच. आजार सौम्य स्वरूपात असल्यास, घरच्या घरी विश्रांती घेऊन किंवा घरगुती औषधे घेऊन तो आटोक्‍यात येतो. काही आजार जीवघेणे ठरू शकतात, तेव्हा इस्पितळात भरती व्हावे लागते.

डासांमुळे होणाऱ्या साथीच्या आजारांचा आढावा घेतला तर सध्या डेंगीचा प्रथम क्रमांक राहील. एका माणसाला अनेक वेळा डेंगी होण्याची शक्‍यता खूप आहे. प्रमाणाबाहेर ताप, कपाळाच्या भागात डोके दुखणे, डोळ्यामागे दुखणे, स्नायू व सांधेदुखी, मळमळ, उलट्या ही त्याची प्रमुख लक्षणे. अंगावर पुरळ उठते. केशवाहिन्यातून प्लाझमा पाझरण्यामुळे जिवावर बेतू शकते. डेंगीवर लस उपलब्ध नाही.

मलेरियाची साथ अधूनमधून थैमान घालतेच. यामधील फॅलसिपॅरम मलेरिया मेंदूवर घाला घालत असल्याने जास्त भयावह आहे. मलेरियाविरोधी औषधंदेखील जंतूंनी पचवल्यामुळे भीती वाढली आहे. एकाच प्रकारच्या औषधावर अवलंबून न राहता दोन-तीन औषधे एकाच वेळी वापरली तर आजार पटकन आटोक्‍यात येतो. दुर्दैवाने आजही मलेरियावर परिणामकारक लस उपलब्ध नाही.

जॅपनीज एनसेफ्प्लायटिस (JE) ची साथ ग्रामीण भागात, तांदुळाची शेती, दलदल, तळी असणाऱ्या ठिकाणी, पाळीव डुकरे आणि क्‍यूलेक्‍स डासांमुळे पसरते. उत्तरप्रदेश हे या आजाराचे माहेरघर ! फ्लू सहज लक्षणे, अशक्तपणा मळमळ, डोकेदुखी, चिडचिडेपणा, असंबद्ध वागणे अशा पद्धतीने येणाऱ्या तापात, मेंदूला संसर्ग झाला की मृत्यू येऊ शकतो. जे लोक वाचतात, त्यानाही चेतासंस्थेशी संबंधित आजारपण राहातेच. सुदैवाने अतिशय परिणामकारक लस यावर उपलब्ध आहे.

चिकनगुनिया हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार. याच डासांमुळे डेंगी होतो. या आजारात जितके सांधे दुखतात, तेवढे इतर कोणत्याच आजारात दुखत नाहीत. यामध्ये मृत्यू होत नाही पण आजारात आलेले व्यंग, दुखरे पाय वर्षानुवर्षे पिच्छा सोडत नाही. यावरही लस नाही.

हत्तीपाय (एलिफंटायसिस) या डासांनी होणाऱ्या आजारात, फिलेरियाचे जंतू क्‍लूलेक्‍समार्फत पसरतात. लसिका ग्रंथांना सूज येऊन, पाय सुजतात, चालणे पण अशक्‍यप्राय होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने, इतरही आजार होण्याची शक्‍यता वाढते.

रॉस रिव्हर, फीवर, ईर्स्टन इक्वाइन एनकेफ्लायटिस, वेर्स्टन एनकेफ्लायटिस, बर्मा फॉरेस्ट फीवर हे पण डासांमार्फत पसरतात पण सुदैवाने त्यांचा जोर भारतात नाममात्र आहे.

डासांमुळे होणाऱ्या आजारात डासांची उत्पत्ती थांबवणे, डासांचा प्रभाव कमी करणे व व्यक्तिगत सुरक्षा या तीन प्रमुख बाबी आहेत. एडिस इजिप्ती हा दिवसा, वारंवार चावणारा डास आहे. तो घरात, घराभोवती, अंधारे कोनाडे, लटकवलेल्या छत्र्या, कपडे, फर्निचरची खालची बाजू अशा ठिकाणी लपलेला असतो. अगदी थोडे पाणी असलेल्या ठिकाणीसुद्धा तो अंडी घालतो. ही अंडी एक वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. उघडी पिंपे, माठ, बादल्या, भांडी, फुलदाण्या, घरातली झाडे, बाटल्या, जुने चायर, फ्रीजखालचे पाणी साठणारे ट्रे नारळाच्या वाट्या, झाडे या ठिकाणी त्याला नेस्तनाबूत करायला हवे म्हणजे त्यांची संख्या वाढणार नाही. कोठलेही साचलेले पाणी आठवड्यातून एकदा तरी बदलावे; पाणी फवारून जागा स्वच्छ करावी. डास प्रतिबंधक औषधे अंगावर लावावी, हातपाय झाकतील असे कपडे घालावे. मच्छरदाण्यांचाही वापर करावा.

झिका, यलो फीवर, करोना व्हायरस, एव्हियन इन्फ्लूएंझा या साथीदेखील डासांच्यामार्फत पसरतात आणि घातक ठरू शकतात.

इबोला व्हायसडिजीज
हा चार प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतो. या व्हायरसचा प्रसार रक्त; शरीरातील स्त्रावांचा प्रत्यक्ष संपर्क आल्यास किंवा रक्तस्राव पडलेल्या कपड्यातून किंवा बाधित सुयांमार्फत होतो. ठराविक अशी उपचार पद्धती यासाठी उपलब्ध नाही आणि २५ ते १०० टक्के लोक मृत्युमुखी पडतात. विषाणू शरीरात शिरल्यावर २ ते २१ दिवसात ताप, प्रचंड डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या, जुलाब, पोटदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी, भूक न लागणे अशा तक्रारी सुरू होऊन, पुरळ अथवा लाल ठिपके अंगावर उमटतात. अंतर्गत रक्तस्राव होऊन डोळे लाल होणे, उचक्‍या, उलटीतून रक्त पडणे, हिरड्यातून रक्त येणे, छाती दुखणे, मानसिक संभ्रमावस्था होऊन मृत्यू ओढवतो. वेळीच ओळखता आल्यास, पुढील गुंतागुंत टाळता येईल.

NipaH (Niv) 
हा घातक विषाणू डुकरे आणि फअरूट बॅट (वटवाघूळ) यांच्यामार्फत पसरतो. फ्लू सहज तक्रारी ३ ते १४ दिवसात जंतूसंसर्ग झाल्यावर न्यूमोनिया, श्‍वासाला त्रास, फीट्‌स, बेशुद्धावस्था येऊन मृत्यू होतो. या आजाराला उपाय नाही किंवा विवक्षित रोगोपचार पद्धतीही नाही. ४० ते १०० टक्के केसेसमध्ये मृत्यू होतो. सध्या तरी त्यासाठी लस उपलब्ध नाही.

स्वाईन फ्लू (H1N1) 
हा विषाणू माणूस, डुक्कर, पक्ष्यातील ए गटातील विषाणूंच्या संकराने निर्माण झाला आहे. याची लक्षणे साध्या फ्लूसारखी असली तरी रोग बळावल्यास, उपचार त्वरित न मिळाल्यास मृत्यू ठरलेला आहे. गर्भवती महिला, मधुमेही, हृदयविकाराचे रुग्ण, लहान मुले, वृद्ध, लठ्ठ माणसे यांना या आजाराची शक्‍यता जास्त आहे. तापामुळे चेतासंस्थेच्या कार्यक्षमतेत अडथळे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, न्यूमोनिया होऊ शकतो. अत्यवस्थ आजारी माणसाच्या शिंकण्या - खोकल्याद्वारे पसरणाऱ्या विषाणूंमुळे किंवा विषाणूयुक्त द्राव टेबल, दूरध्वनी, पुस्तक, यासारख्या पृष्ठभागावर पडून निरोगी माणसाच्या हातावाटे कान, नाक, डोळे यांना लागल्याने जंतू शरीरात प्रवेश करतात. हात स्वच्छ धुण्यास, Nas प्रतीचे मास्क वापरण्यास महत्त्व आहे. सुदैवाने आजार ओळखण्यासाठी चाचण्या उपलब्ध आहेत. तसेच जिवाणू प्रतिबंधक टॅमी फ्लूचे औषध, तसेच लसीपण उपलब्ध आहेत. थोड्या कालावधीनंतर विषाणूंची रचना बदलत असल्याने, नवीन लसीची निर्मिती प्रत्येक वेळी बदलते.

साधा सर्दी-खोकला 
यातील विषाणूबाधित माणसाच्या शरीरातील स्रावाशी संपर्क आल्याने किंवा हवेत उडणाऱ्या द्रवकणांच्यामुळे पसरतो. नाक लाल होणे, लाल पडणे, पाणी येणे, डोळे चिकटणे, डोके जड होणे, घसा खवखवणे, ताप, खोकला, बेचैनी, कंटाळा ही त्याची लक्षणे. यासाठी प्रतिजैविकांची जरुरी नाही. निसर्गतः दोन ते तीन दिवसात मनुष्य बरा होतो. यावर लस उपलब्ध नाही आणि रामबाण उपायही नाही. अशाच तक्रारी कमी वेळात, खूप त्रास देत असतील तर तो इन्फ्ल्युन्झाचा आजार असतो. यात त्रास जास्त होतो.

साथीचे रोग टाळण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी पाळल्या तर रोगप्रतिबंधक टाळता येतो. यामध्ये हात धुण्याचे महत्त्व मोठे आहे. काहीही खाण्यापूर्वी, कोणाला स्पर्श करण्यापूर्वी, कचरा काढल्यावर, संडासला जाऊन आल्यावर, कोणाला भेटायला गेल्यावर, पाळीव प्राण्यांशी खेळल्यावर १५ ते २० सेकंद नळाच्या पाण्याखाली साबणाने हात चोळून धुवावे. तळवा, नखे, बोटातले बेचके, हाताचा - पाठीचा भाग सर्व धुवून हवेत वाळवावे किंवा स्वच्छ कागदी टॉवेलने पुसावे. नाक शिंकरणे, शिंक आली तर टिश्‍यू वापरावा. तो टाकून झाल्यावर हात धुवावे. टिशू नसल्यास, कोपराचा उपयोग करून तोंड, नाक लपवावे, आजारी माणसाने घरीच विश्रांती घ्यावी. कोणाशी हस्तांदोलन करू नये.

सरकारी यंत्रणा जनताभिमुख हवी. साथीचे आजार पसरण्यापूर्वीच त्याबाबत सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाय तयार हवेत. ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. लशींची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा, याकडे विशेष लक्ष द्यावे. सांडपाणी, मलनिस्सारण यांचे महत्त्व खूप आहे. दूषित अन्न मिळू नये यासाठी कार्यक्षम यंत्रणा असली पाहिजे. सरकार शेवटी आपणच निवडून देत असतो; त्यामुळे लोकांनीसुद्धा यामध्ये स्वेच्छापूर्वक योगदान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

फारसा विचार न करता, वेगाने वाढलेले शहरीकरण, प्रवास, व्यापार यातील प्रचंड वाढ, बदललेल्या शेतीच्या पद्धती, वातावरणातले बदल यामुळे जास्त लोक जंतूसंपर्कात येत आहेत. कुपोषित आणि प्रतिकारशक्ती कमी असणारे असे लोक त्यामुळे या साथीच्या आजारांना बळी पडतात. हे सर्व आपण सारे एकत्र येऊन नक्की थांबवू शकू. पण त्यासाठी वैचारिक एकजूट महत्त्वाची आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या