मनातल्या पाऊसकथा

आशा साठे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

अखेर एकदाचा तो आला. नाहीतर भोवतीच्या अस्वस्थ वर्तमानाला मनाच्या चिडचिडीला जणू तोज जबाबदार होता. म्हणजे तो त्याच्या ‘नेमेचि येतो’ प्रमाणेच येणार होता. पण यावर्षी त्याने थोडा उशीरच केला. त्यामुळे कधी भेटायचे, पाऊस पडू दे एखादा तरी. मग सुचेल. ‘गडद निळे, गडद निळे जलद भरून आले’ एवढ्याने नाही होत मन शांत. ‘टपटप पडती थेंब’, तरच ‘मनिवतीचे विझती डोंब’ हेच खरे. ‘वत्सल ये वास भूमी अशीच बोले’ असे वातावरण झाले म्हणजे तो आपला परिचित पाऊस आला म्हणायचे. मन निर्धास्त होते मग. शांत, शांत होते. 

पाऊस अनेकांचा आवडता. किती कथांनी, किती गीतांनी तो मनात लहानपणापासून रुजलेला. त्याच्याशी परकेपणा उरतच नाही. खरे तर तसा तो स्वभावाने लहरीच पण एकदा त्याला आपले म्हटले त्यामुळे तो कसाही भेटला तरी त्याच्या स्वभावाचा एक धागा प्रेमानेच जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्याचा माणसांशी जो मनःसंवाद साधतो त्याचा मनावरचा परिणाम शुभंकरच असतो.

लहानपणीच कावळा-चिमणीच्या गोष्टीत तो बहुधा प्रथम भेटतो. मग कावळ्याचे घाणेरडे कसेतरी आळशीपणाने उभारलेले घर त्याच्यामुळे वाहून जाते. शहाण्या चिमणीचे घर वाचते. कावळा काळा, बेशिस्त, आळशी वगैरे समजुती करून घेणे चुकीचे; हे मोठेपणी कळले. तरी मन कथाकाराचे स्वातंत्र्य मान्य करून टाकते आणि गोष्टीतल्या पावसावर काही रागावत नाही. मग तो अनेक कथांतून भेटत राहतो. कधी तो कसा येतो हे सांगणारी गोष्ट असते, तर कधी इंद्रधनुष्याची गोष्ट असते. सुट्टी देणाऱ्या पावसाची वार्ता भोलानाथाला विचारली जाते. खोटा पैसा दिला तरी मोठ्ठा पाऊस येतो. आपण फक्त मडके भरायला सांगितले होते. तरीही त्याची सर बरोबर धावून आली आणि मडके गेले वाहून त्याचे काहीऽऽही वाटत नाही, मजाच वाटते. असा प्रेमबंध वाढतच जातो.

मग एक काळा मेघ, स्वर्गाची वाट न धरता आपला पृथ्वीवर येतो आणि सर्वस्व अर्पण करून टाको पृथ्वीला! तिकडे पांढरा मेघ स्वर्गाच्या दारात पोचणार त्या आधीच बरसून जाणाऱ्या काळ्या मेघाला मग आपण स्वर्गात जागा देऊन टाकतो. आपल्या मनात वस्तीला आलेला हा शुभंकर पाऊस अनेक कथांतून भेटत राहतो. कृष्ण जन्माच्या वेळी असा बरसतो, की सृष्टीचे जणू आकांडतांडव सुरू आहे. पण वासुदेवाला त्या अंतराळातूनच चहू बाजूंनी सुरेल स्वरलहरींचे संगीत जाणवू लागते. बाकी भोवतालाला जणू मोहनिद्रा लागते न्‌ वसुदेवाचे आणि टोपलीतल्या बाळाच्या भोवती संरक्षक कवच उभारून तो पाऊस त्यांना सुखरूप नंदाघरी पोचवतो. 

आणि मग पुढे अनेक कथांतून तो भेटत राहतो. कथेच्या आरंभी तरी किंवा शेवटी तरी. मनातली त्याची ओळख अधिकच गडद होत राहते. त्याचा शुभंकर स्वभाव कथांना प्रिय बनवत राहतो. रवींद्रनाथ टागोरांची एक साधीशी वाटणारी कथा अशीच माझी आवडती कथा बनली ती त्यात हजर असलेल्या पावसामुळे. बालपणाची मैत्रीण किंवा मित्र मोठेपणी अचानक समोर येतात एकमेकांच्या लक्षात येते, की ती किंवा तो सध्या काय करतो याबद्दलचे कुतूहल असतेच. मनात संमिश्र भावना असतात. आपणही त्याच्या किंवा तिच्या मनात आहोत का नाही याविषयीही उत्सुकता असते. टागोरांच्या ‘एक रात्र’ कथेत एका लहानशा गावातली ‘सुरबाला’ आणि ‘तो’ असेच लहानपणी शेजारी राहणारे एकाच शाळेत जाणारे, एकत्र खेळणारे. ती सुंदर तो हुशार. नवरा बायको अशा खेळही खेळलेले. इतरांनाही वाटायचे त्यांचा जोडा शोभून दिसतो. मग ‘तो’ म्हणतो कथा सांगताना, की मीही तेव्हा टिपिकल नवरेगिरी गाजवायचा. तीही सहिष्णुभावाने सगळे ऐकायची. पण नंतर मात्र त्याला शिकण्याची ओढ वाटून तो कलकत्त्याला जातो. आधी पळूनच, तिथे त्याच्या विचारांना वेगळेच वळण लागते. शिकण्यापेक्षा देशासाठी सर्वस्व झोकून देणारा गॅरिबाल्डी व्हावेसे वाटत असते. 

सुरबालेच्या लग्नाचा विचार सुरू असतो. तेव्हा त्यालाच प्रथम विचारलं जाते. पण तेव्हा आपले शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्याला लग्नाचा विचार करायचा नसतो. तिचे लग्न रामलोचन या वकील बाबूशी होते.

अचानक त्याच्या वडिलांचे निधन होते. त्याच्यावर आई, बहिणी सगळ्यांची जबाबदारी असते. सगळी स्वप्ने गुंडाळून ठेवून एका लहानशा गावात त्याला शिक्षकाची नोकरी पत्करावी लागते. गावापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या शाळेची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात येते. शाळेतच राहण्याची सोय करण्यात येते. अन थोड्याच अंतरावर राहणाऱ्या सरकारी वकीलबाबू रामलोचनराय यांच्याशी परिचय वाढतो. ते घरी बोलावतात. तर त्या घरात त्यांची पत्नी सुरबाला हिचे दर्शन होते. शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी लिहिलेली कथा आहे. तेव्हाच्या खेड्यातील वातावरणात सुरबाला इतकी परकी, की चार शब्द बोलणेही गुन्हा, चिंतन कणे पाप. लग्नाच्या चार मंत्राने रामलोचनने तिला दूर नेलेच.

आणि एक दिवस असा येतो. रामलोचन सरकारी कामासाठी परगावी गेलाय. ती एकटीच घरी आहे. सकाळपासून पाऊस सुरू झालाय. इतका, की  हेडमास्तरांनी शाळेलाही सुटी दिली. रात्र वाढत जातीय. पाऊस, वारा, वादळही जोर धरून आहे. तिच्या घरापेक्षा शाळेची इमारत पुष्कळच पक्की आहे. कितीवेळा मनात येते तिला बोलवावे शाळेत. आपण काढू रात्र पुष्करणीच्या काठी. पण मनाचा निश्‍चय होत नाही. 

रात्री उधाणाचा कल्लोळ ऐकू येतोय. समुद्र आत घुसतोय. शेवटी तो तिच्या घराकडे निघतो. थोड्या उंचावरील जागेवर पोचतोय तर अंधारात समोर एक व्यक्ती येत असते. ती सुरबाला असते. दोघांच्या अंतरात्म्याला ते कळते. त्या प्रलयकाळात काही बोलायला हरकत नव्हती पण ते बोलत नाहीत. नुसते उभे! पायाखालून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यात पाय रोवून, भोवतीच्या अंधाराला अन पावसाला झेलत! त्याच्या मनात काय चाललेय ते टागोर बरोबर वाचतात. तो म्हणतोय मृत्यृच्या प्रवाहात हे फुललेले फूल माझ्यापाशी आलेय. आता केवळ एक पाण्याचा जबर लोंढा आला, की या पृथ्वीच्या प्रांतापासून तुटून पडून आम्ही कदाचित दोघेही एक होऊन जाऊ. तो मनात प्रार्थना करतोय, तो लोंढा न येवो. घरदार, पती आणि मुलेबाळे घेऊन सुरबाला सुखात राहो. 

रात्र संपत येते, वादळ थांबते. पाऊस थांबतो. पाणी ओसरते. एक शब्दसुद्धा न बोलता सुरबाला घरी निघून जाते. तो ही . टागोर कथेत अजूनही त्याचं मन वाचताहेत. वाचकही ते ऐकताहेत. तो म्हणतो, ‘मला वाटले, मी नाझर झालो नाही, शिरस्तेदार झालो नाही. गॅरिबाल्डीही झालो नाही. मी आहे एक मोडक्‍या शाळेतला सेकंड मास्तर! माझ्या या लोकीच्या साऱ्या जीवनात एक क्षणापुरती एक अनंत रात्र उदय पावली होती. ही एकुलती एक रात्र म्हणजेच माझ्या तुच्छ जीवनाची एकुलती एक परम सार्थकता. आपल्या मनातला विचारांचा गोंधळ दूर होऊन दुसऱ्याबद्दल शुभभावना उत्पन्न होणे ही त्याला जीवनाची सार्थकता वाटते. सगळ्या शूद्र जीवनाला मागे टाकून माणसाच्या अस्तित्वाला अर्थ देणारे असे क्षण पावसाच्या उपस्थितीत कथांमधून घडतात तेव्हा तो पाऊस अधिकच सुंदर होतो. 

असाच एक सुंदर पाऊस दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेत भेटतो. कथेची सुरवात भयंकर पडणाऱ्या पावसात होते. थडथडा पावसाचे थेंब पडत असतात. शिवा नेमाणेची गाय अगदी व्यायला झाली आहे. पावसाचे पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहतीय नि रामजी लोहाराच्या एकुलत्या एक मुलाला तिने आपल्या खळबळत्या धारात वाहून नेले आहे. निसर्गाचे थैमान सुरू झाले, की माणसे अशी निपचित का पडतात? म्हणत कथेला सुरवात होते. 

कोकणातले केंबळे नावाच खेडे. रात्रभर पाऊस. रामजींचा एकुलता एक मुलगा वाहून गेलेला. तो आता शोकाने मूढ. तो येत नाही म्हणून वाण्याच्या माळ्यावरचे रोजचे ज्ञानेश्‍वरीचे पारायण थांबलेले. रामजीचा परमेश्‍वरालाच सवाल. वर्षानुवर्षे ज्ञानेश्‍वरी वाचूनही आपल्यावर अशी आपत्ती का यावी. तरुण मुलगा मरावा नि मागे म्हाताऱ्याने शोक करीत राहावे हे का?

शिवा नेमाणेची गाय अडलेली. वेणांच्या 
वेदना असह्य होऊन हंबरडा फोडणारी. 

गायीची सुटका करू शकणारा गावात एकच माहीतगार रामजी लोहार! तो तर पार दुःखात बुडलेला. आपण मुलासाठी जगत होतो याची जाणीव होऊन स्वतःच शरीरही निरर्थक वागवतो आहोत अशा विचारातून सुटू शकत नव्हता. केंबळ गावही पावसातून सुटू शकत नव्हते. 

अखेर गायीच्या हंबरड्याने व नेमाणेच्या बायकोच्या विनवण्याने रामजी भानावर येतो. पावसात भिजत गायीची सुटका करण्यासाठी उठतो. शांतपणे, कुशलतेने तिच्या सुटकेसाठी हालचाल करतो. बाकी सगळे स्तब्ध झालेले. पाऊसही स्तब्ध. पृथ्वीवर शुभ अशुभाचा झगडा सुरू होता. रामजीला वाटत होते हा जीव वाचवला पाहिजे. कुठेतरी एक दुवा तुटला आहे, तो सांधला गेला पाहिजे. तोच आता काहीतरी सिद्ध करायच्या पवित्र्यात. काहीतरी गमावलेले मिळवायचे आहे. आणि त्याला यश मिळते. एकदम न कळल्यासारखे वासरू त्याच्या आवाक्‍यात. नेमाणेला पुढचे सगळे समजावून तो बाहेर येतो. आपले काढून ठेवलेले कुडते अंगावर चढवतो. बाहेर पडतो. बाहेर पाऊस लागताच सर्व भान पुन्हा जागे होते. गमावलेल्या पोराची आठवण येते. पावले संतू वाण्याच्या दुकानाकडे चालू लागतात. सगळे त्याचीच वाट पाहात असतात.  तो आल्यावर संतू अनुभवामृताची पोथी पुढे घेऊन वाचू लागतो. 

आता आमोद सुनासि आले.
अर्थ पूर्वीही फार कळत नव्हता. आताही कळत नसतो. पण वाचण्याचा सूर, शब्दांचा नाद त्यांना रंगवू लागतो. माना हलू लागतात. रामजीचा चेहरा भावनांनी भरू लागतो. शोकमोहाच्या पल्लिकडले काहीतरी, कर्म करण्याचे महत्त्व सांगणारे काहीतरी जाणवते. रामजीच्या वर्तनाने सर्वांना शांतवलेले असते. आणि रामजी? त्याचे डोळे पाझरू लागतात. विठ्ठलाला जाब विचारणे थांबणार असते. 

कर्म, भक्ती, ज्ञान या साऱ्या 
जीवनधारणा; त्यांचा साक्षात्कार मोकाशी 
कथेत घडवतात. रामजीला आणि त्याच्या सोबत्यांना शांतवून जाणाऱ्या साक्षात्कारी क्षणापर्यंत लेखक मोकाशी वाचकांना नेतात. मागे सतत पावसाची धून वाजत असते. पावसाच्या साथीने उभ्या राहिलेल्या अशा कितीतरी कथा ‘पाऊसकथा’ मग मनाला नेहमीच शांतवत राहतात. सोबत करत 
राहतात. मन कधी चिडचिडे झाले, 

अस्वस्थ झाले, की मग एकच दिलासा उरतो आश्‍वासक पाऊस येईल आणि मनाला शांतवेल! 
 

संबंधित बातम्या