‘थेंबभर’ पावसाची ‘पानभर’ गोष्ट

अमृता देसर्डा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
 

टपटप पडणारे थेंब म्हणजे ढगांनी जमिनीवर घातलेली थेंबांची भिजकी आणि खमंग फोडणी. जसे, की कढई तापल्यावर त्यात मोहोरी टाकल्यावर जसा चर्र आवाज येतो तसा आभाळातून थेंब जमिनीवर पडताना आवाज येतो. जमीन पावसाच्या थेंबांनी तृप्त होते, इतकी तृप्त होते, की कधीकधी पाण्याने ओथंबून जाते, जमिनीचा चिखल होतो, आणि सूर्य जणू काही सुट्टीवर निघून जातो. सूर्याला तेवढाच आराम; पण अधेमध्ये जेव्हा तो डोकावतो तेव्हा सातरंगांची कमान घेऊन आभाळात काहीकाळ मिरवत राहतो.  

 पावसाची मजाच काही और असते. पाऊस नेहमी माणसाच्या मनाला उभारी देतो, ओलावा देतो, आणि जगण्याची आशा वाढवतो. पावसात करुणा असते. एकप्रकारचा आपलेपणा असतो. तापून कोरड्या झालेल्या जमिनीला तो शांत करतो. निसर्गाच्या अनेक घटकांना पावसाळा समृद्ध करतो. तो माणसाच्या संस्कृतीला पूरक ठरतो आणि अनेक जीव-जिवाणू पावसाळ्यात नव्याने जिवंत होतात. 

अनेक माणसांना पावसाळी चिकचिक नको वाटते. निसर्गाचा खरंतर या दिवसांत वेगळाच लहेजा असतो. अगदी बंद दाराच्या ओल्या फळीवर साठणारे शेवाळे असो, किंवा जुन्या झाडाच्या खोडांना आलेली कुत्र्यांची छत्री असो. या दोन्ही गोष्टींत पावसाचे सौंदर्य ओतप्रोत भरलेले असते. जमिनीखालच्या, जमिनीवरच्या प्राण्यांची त्रेधातिरपीट होते खरी, पण प्रत्येकाला पावसाळा हवा असतो. शहरात, गावांत, डोंगररांगांमध्ये पाऊस आला की सगळीकडे तो हिरवा रंग घेऊन येतो. त्या हिरव्या रंगात कितीतरी छटा असतात ज्या फक्त आणि फक्त याच पावसाळी वातावरणात दिसतात. 

  आभाळातले ढग तर जेव्हा धुक्‍याच्या रुपात जमिनीवर येतात तेव्हा तो पृथ्वीचा तुकडा जणूकाही स्वर्गच झाला आहे, असे  वाटत राहते. ते धुके जर अंगावर घेतले तर आपणही त्या धुक्‍यात मिसळून जातो आणि संपूर्ण पावसाळी कधी होतो ते कळतच नाही. 

धो धो पाउस हा नेहमी आवाजाला सोबत घेऊन येतो. तो जमिनीला खरेतर काहीतरी सांगत असतो. त्याच्या थेंबांची धार, थेंबाच्या गारा जेव्हा जमिनीवर कोसळू लागतात तेव्हा छप्परापासून ते अगदी डांबरी रस्त्यापर्यंत पाऊस त्यांच्यावर समान प्रेम करत असतो. मग कुणाला किती थेंब द्यायचे, कुणाच्या वाट्याला किती थेंब वाटायचे हे पाऊस ठरवतो आणि आवाज करूनही कुठल्याही बिनशब्दांच्या भाषेत पाऊस संवाद साधत जातो. 

पाऊस कधी उन्हासारखा आणि हिवाळ्यासारखा एकटा येत नाही. त्याच्या बरोबर तो अगणित थेंब, मोजता न येणारे धुक्‍याचे कण आणि ओलसरपणा घेऊन येतो. तो कधीच कोरडा नसतो. म्हणजेच कधी एकल नसतो. म्हणून पाऊस  हा एकप्रकारे आपले कुटुंब घेऊन जमिनीवर येत असतो, आणि गेल्यावरही जमिनीत मुरून राहून त्याचे अस्तित्व दाखवत राहतो. त्याच्याच थेंबांची जेव्हा जिवंत झरी पाझरू लागतात तेव्हा पावसाळा ऋतू जणू काही त्याच्या आठवणी ठेवून जातो असेच वाटत राहते. 

कोऱ्या कागदावर जसे शब्द पडत राहतात, तसे कोरड्या जमिनीवर थेंब पडत राहतात. थेंबांची कथा होत राहते, आणि पाऊस हलकेच पडत राहून भरलेल्या आभाळाला मोकळे करत राहतो. माणसं सुद्धा त्यांच्या मनातला कोंडमारा कागदावर वादळासारखा मांडू पाहतात आणि भरलेल्या मनाला लेखणीतून कोसळू देतात. घरांच्या छतांवर थेंब कोसळतात, काही घरात जातात तर काही घराबाहेर पाण्याचा तलाव करतात. मग घरातली छोटी मुले शाळेतल्या वहीच्या पानांची होडी करतात आणि त्या तलावाच्या प्रवाहात आपल्या होडीला प्रवास करायला पाठवतात. गळक्‍या छपरांच्या घरात राहणाऱ्या माणसांची धांदल उडते आणि स्वयंपाक घरातली भांडी एक एक पडणारा थेंब घरभर साठवत राहतात. घरांच्या भिंती देखील रडू लागतात आणि एक एक कणखर वीट पावसात नरम होते आणि घरातल्या भांडणांना आपोआप शेवाळ चढत जाते. काहीकाळ का होईना पण घरे पावसाच्या आगमनाने माणसाळतात. किमान एका छताखाली पावसाच्या भीतीने माणसे एकत्र येतात. 

काहींच्या बाल्कनीतून दिसणारा पाऊस हा हातात वाफाळता चहा घेऊन येतो आणि काहींच्या घरातून दिसणारा पाऊस अनुभवलेल्या आठवणी घेऊन येतो. सकाळी पडणारा पाऊस बाहेर जाणाऱ्यांना अडचणीत आणतो. दुपारी पडणारा पाऊस हा खूप वेगळा असतो, तो हळूहळू घरघरत राहणाऱ्या पंख्यासारखा निवांत आणि सुखांत असतो. तर संध्याकाळचा पाऊस हा उरात कोसळणाऱ्या भूतकाळाच्या आठवणींसारखा हुरहूर वाढवणारा असतो, आणि रात्रभर पिरपिरत राहणारा पाऊस तर अंधारातल्या उजेडातसुद्धा मोठा होतो आणि कधीकधी पावसाळी दुष्काळ घेऊन येणारा असतो. 

शहरातला पाऊस लोकलच्या डब्ब्यात घुसतो आणि भुकेल्या इंजिनाला घोटभर पाणी पाजून आराम करायला सांगतो. रस्त्यांवर गुढगाभर पाणी साठवत ठेवतो आणि वाहनांना थांबायला सांगतो. संपूर्ण शहर मग अंधाराच्या धुक्‍यात हरवून जाते आणि घराघरात मेणबत्ती मिणमिणत राहते. रंगबेरंगी छत्र्या आभाळाला वाकुल्या दाखवू पाहतात आणि फुटलेल्या आभाळाची नजर नको लागायला म्हणून कायम पुढे पुढे चालत राहतात. भिजणारे रेनकोट आतल्या कोरड्या कपड्यांना स्पर्श करू पाहते आणि गालांवर ओघळणारे थेंब माणसाचा चेहऱ्यावर शृंगार करते. तर असा हा पाऊस निर्मितीच्या लाटांवर स्वार होत राहतो आणि मुग्ध होऊन पृथ्वीवर बरसत राहतो. 

पाऊस जेव्हा थांबायचे नाव घेत नाही, तेव्हा मात्र त्याचे बरसणे अंगावर येते. त्याचे चिंबपण रौद्ररूप धारण करू लागते. माणसे उगाच घरात घुटमळत राहतात. काम करणारे हात रिकामे होतात आणि आपल्या घरातल्या खिडकीतून कोसळणारा पाऊस निर्हेतुकपणे बघत राहतात आणि येणारा पावसाळी दिवस चुलीच्या उबेत घालवत राहतात. रस्ते पाण्यात हरवून जातात. वृद्ध झालेले झाड थेंबांच्या माऱ्याने कोसळून निपचित पडते आणि रस्त्यावरच्या वाहत्या पाण्यात गुडूप होऊन जाते. पावसाला थांब म्हटले तरी तो थांबत नाही. तो अखंड कोसळत राहतो. इतका कोसळतो, की नदी अनेकांच्या घराला भेट द्यायला येते. त्यांचे सामान आपल्या डोहात तरंगत ठेवते. माणसे आपली  घरे  वाचवू पाहतात आणि ओल्या जमिनीवर आपला हक्क जेव्हा सांगत राहतात तेव्हा पावसाची जोरदार लाट माणसाला, त्याच्या घरादाराला बेघर करते आणि वाहणाऱ्या पाण्याची ताकद एका क्षणात सांगून जाते.

बहरून आलेली पिके अतिपावसाने गळून जातात, आणि कोंब आलेल्या शेतांना बेचिराख करून टाकतात. शेतकरी हवालदिल होतो आणि खूप दिसणाऱ्या पाण्याकडे कोरड्या डोळ्यांनी पाहू लागतो. गावातली कौलारू घरे मूकपणे भिजत राहतात, आणि खाटेवर निजलेली अनेक पिकून गेलेली माणसे मृत्यूची वाट पाहत पाऊस झेलत पडून राहतात. अंगणातली तुळस गारठून जाते आणि भिजून गेलेली लाकडे मऊ होऊन एकमेकांवर पहडून बिनकामी होतात. घरातली कर्ती माणसे घराच्या कोपऱ्यात दिवस दिवस बसून पावसाचे जोरात चालू झालेले काम ओल्या डोळ्यांनी पाहत राहतात आणि तो कधी जाईल याची वाट पाहत दाराच्या कोनातून आभाळाला थांबण्याची याचना करत राहतात. 

कधीतरी पाऊस थांबतो आणि मग थांबलेलं सगळं हळूहळू सुरळीत होऊ लागतं. वाहणारी नदी शांत होते, ती माघार घेते आणि तिच्यासोबत अनेक गोष्टींना वाहून नेते. कोलमडून गेलेली पिके, कोमेजून गेलेले कोंब आभाळाकडे आशेने पाहत राहतात आणि शेतकरी पुन्हा एकदा हातात नांगर घेऊन सज्ज होतो. शहरातल्या लोकल उठून उभ्या राहतात आणि उघड्या झालेल्या छत्र्या हळूहळू बंद होतात. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्यातरी आशेने आणि जाणीवेने माणूस त्याची वाट पाहत राहतो, आणि तो जर आला आणि परत गेलाच नाही तर कंटाळून पावसाला जायला सांगतात. पाऊस जसा एकटा येत नाही तसा तो एकटा जात देखील नाही. तो घेऊन जातो त्याच्याबरोबर असंख्य जगण्याचे पुरावे. तो घेऊन जातो त्याच्याबरोबर कैक न अनुभवलेल्या आठवणी आणि मुरतो देखील माणसांच्या आणि जमिनीच्या उरात. असा हा पाऊस प्रत्येक वर्षी मुरतो, उरतो आणि संपतो. तरीही पुन्ह:पुन्हा येत राहतो. 

पावसाला फक्त कोसळणे ठाऊक असते. त्याला फक्त आभाळाची वेदना ठाऊक असते. तो फक्त येत राहतो आणि मानवी मनाला वेगवेगळे अर्थ देत राहतो. तो उन्हाचे आणि थंडीचे महत्त्व पटवून देतो. तो अनेक जिवांना बरोबर नेतो तसे अनेक जिवांना जीवनदान पण देतो. तो एक निसर्गाचा चमत्कार असतो. जमीन आणि आभाळाच्या पोकळीतला एक ओलसर दुवा असतो. तो कविमनाच्या मेंदूचा एक बारीक रेणू असतो जो शब्दांच्या माध्यमातून कागदांवर रिमझिमत असतो आणि शब्दांना नवनवीन अर्थ देणारा हिरवा ऋतू असतो. पाऊस हाच एक सोहळा असतो जो निसर्गाची समृद्धी मांडत असतो आणि तरल मनाच्या माणसाला ओलावा देऊन आणखीन तरल करत असतो. फक्त त्याच्या वेगवेगळ्या रूपांची ओळख व्हावी आणि तो कितीही कोसळला, तुडुंब भरला तरीही आपल्या आत सतत जागा राहावा आणि मनाच्या बांधांवर कोसळून तृप्तपणे भरून धबधबा होऊन जावा असे थेंबथेंब उगाच वाटत राहते. 

संबंधित बातम्या