आश्‍वासक चेहरा 

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

भारतीय राजकारणाने उजवे वळण कायम ठेवल्यास आगामी काळात भारतीय जनता पक्षातले तीन नेते भविष्यातले महत्त्वाचे चेहरे ठरतील. विद्यमान अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ आणि  महाराष्ट्राचे उच्चविद्याविभूषित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ती तीन नावे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपद स्वीकारणार नाहीत. मित्रांच्या मदतीने सरकार स्थापन करताना गृहमंत्री राजनाथसिंह किंवा सर्वपक्षीय संबंध असलेले रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नावे पंतप्रधानपदासाठी पुढे येतील असे भाकीत केले जाते आहे.

भारतीय राजकारणाने उजवे वळण कायम ठेवल्यास आगामी काळात भारतीय जनता पक्षातले तीन नेते भविष्यातले महत्त्वाचे चेहरे ठरतील. विद्यमान अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ आणि  महाराष्ट्राचे उच्चविद्याविभूषित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ती तीन नावे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपद स्वीकारणार नाहीत. मित्रांच्या मदतीने सरकार स्थापन करताना गृहमंत्री राजनाथसिंह किंवा सर्वपक्षीय संबंध असलेले रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नावे पंतप्रधानपदासाठी पुढे येतील असे भाकीत केले जाते आहे. नव्या परिस्थितीत उजवे राजकारण बळकट होत गेले तर ५,१० वर्षांनी शहा, योगी किंवा फडणवीस यांना पक्षाची आगामी दिशा ठरवावी लागेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा मायावती, ममता बॅनर्जी यांच्याकडे देशाची सूत्रे गेली तरी विरोधी बाजू सांभाळण्याची कसरत या तीन चेहऱ्यांनाच करावी लागेल. या तिघांचेही वय थोड्या फार फरकाने सारखेच आहे. 

महाराष्ट्राचे राजकारण कायम काँग्रेसी वळणाचे. शरद पवार यांना महाराष्ट्राचे नसनस माहिती. त्यांचे व्यक्‍तिमत्त्व, विचारसरणी पुरोगामी. ते काँग्रेसमधून बाहेर पडले तरी महाराष्ट्रातले सर्वात महत्त्वाचे नेते पवारसाहेबच. काँग्रेस (आणि नंतर ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला शह दयायला भाजपने महाराष्ट्रात मदत घेतली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. ज्येष्ठ भाजपनेते प्रमोद महाजन हे अत्यंत धोरणी आणि चतुर नेते. ते या हिंदुत्ववादी युतीचे शिल्पकार. त्यांच्याच मैत्रीमुळे राजकारणात आलेले अन त्यांच्या परिसस्पर्शाने तयार झालेले गोपीनाथ मुंडे हे भाजपला लाभलेले महाराष्ट्रातले एकमेव लोकनेते. २०१४ मध्ये भारतात मोदी पर्व सुरू झाले अन्‌ त्याच लाटेमुळे महाराष्ट्रात सत्तापालट होणार, भाजप सत्तेत येणार हे स्पष्ट झाले. केंद्रात मंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांचा दुर्दैवी अंत झाला. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा एकेकाळी सांभाळलेल्या नितीन गडकरींना महाराष्ट्रात परत यायचे नव्हते अन मोदींनाही त्यांना पाठवायचे नसावे यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्‍चित मानले गेले अन तसे घडलेही. मोदी लाट होती हे खरेच पण त्याचे कुशल व्यवस्थापन करीत महाराष्ट्रात लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवून देण्याची श्रेय फडणवीसांचे होते. निवडणूक प्रचारादरम्यान मोदींशी सातत्याने होणारा संपर्क, रणनीती आखण्यासाठी त्यांच्याशी झालेल्या चर्चा यामुळे फडणवीसांची गुणवत्ता मोदींच्या लक्षात आली असणार. विरोधी बाकांवरून केलेली कामगिरी लक्षणीय होतीच. महाराष्ट्रातले नवे नेतृत्व कोणते याबद्घल मोदींनी या काळात निश्‍चित निर्णय घेतला असणार. विधानसभा निवडणुकीच्या आधीच दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे सोशलमिडीया कॅम्पेन सुरू झाले होतेच. खरे तर फडणवीस ब्राह्मण. राजकारणात ही जात म्हणजे अडसर. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते, जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची कित्येक वर्षे पकड. निर्णयक्षमतेत ते अत्यंत तल्लख. त्यामुळे राज्याचे प्रमुख होण्यावर मुंडेंच्या निधनानंतर खरे तर त्यांचा हक्‍कच, पण विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला कौल दिला आणि फडणवीस हेच राज्याचे नेते होणार या चर्चेवर शिक्‍कामोर्तब झाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी मिळवून दिलेल्या यशाची ही पावती होती. बहुमत होते पण स्पष्ट नव्हते. फडणवीस यांना न आवडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना न मागताच पाठिंबा देवून टाकला होता अन आजवर हिंदुत्वाचे एकत्रित राजकारण करणारी शिवसेना विरोधी बाकावर होती. विश्‍वासमत आवाजी मतदानाने मिळाले पण भाजप अस्वस्थ होती. समर्थक मतदारांनाही सत्य स्वीकारता येत नव्हते. विरोधी बाकांवर बसलेली सेना सवयीची नव्हती. याच काळात दिल्लीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांचे शिवसेनेशी असलेले संबंध कमालीचे ताणले गेले होते. फडणवीसांनी काय किमया साधली माहीत नाही पण शिवसेना सरकारमध्ये सामील झाली अन त्यांच्या नेतृत्वातील आश्‍वासकता मुख्यमंत्री म्हणून प्रथमच समोर आली. महाराष्ट्राचे सरकार त्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला लागले. आजवर फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या वाटचालीचा हा प्रारंभ होता. सुडाचे राजकारण न करता वैचारिक जवळीक असलेल्यानां समवेत घेवून जायचे असते, हा विचार मतदारांना भावला. सेनेशी जवळीक साधतानाच फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेससंबंधी सुरू असलेल्या पाटबंधारे घोटाळ चौकशीची गती वाढवली नव्हती. तुम्ही नसाल तर दुसरे आहेत असा संदेश देण्यात ते यशस्वी झाले होते.

प्रारंभीच्या काळात फडणवीस यांना नेता म्हणून त्यांच्या पक्षातील बहुतेकांनी स्वीकारले नव्हतेच; पण या नेत्यांभोवती कंत्राटांची, संशायाची सुई फिरू लागली अन फडणवीस हेच महत्त्वाचे नेतेआहेत. एकमेव स्वच्छ नेते आहेत हा समज सर्वदूर पसरला. एकनाथ खडसे वगळता मंत्रिमंडळातल्या एकाही नेत्याला अनुभव नव्हता. तरीही राज्य चालवायचे होते. आजवर केवळ राजकीय वाटचालीची चर्चा होत होती, आता प्रशासकीय क्षमताही समोर येणार होत्या. फडणवीस याबाबतीत पूर्णत: प्रशासनावर अवलंबून राहणार होते कारण सहकाऱ्यांकडे अनुभव नव्हता. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या प्रांताबाबतची त्यांची मते याच काळात समोर येवू लागली. त्यातून त्यांच्या आश्‍वासक नेतृत्वाची चुणूक दिसू लागली. महाराष्ट्र हा पुरोगामी, देशाचा नेता. पण अनेक आघाड्यांवर प्रगतीने प्रश्‍न निर्माण केलेले. सिंचनाखाली आलेली जमीन जेमतेम १४ टक्‍के. महाराष्ट्रातल्या मोठ्या भूभागावर धरणे बांधली जाऊ शकत नाही अशी स्थिती. पाण्याअभावी शेतीची प्रगती उणे वर्गात मोडणारी. फडणवीसांनी नवा प्रयोग जाहीर केला. जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी जलयुक्‍त शिवार हा अभिनव उपक्रम राबवण्याचा. हा उपक्रम लोकसहभागातून राबवण्याची तयारी त्यांनी जनतेला समवेत घेवून सुरू केली. गावोगावी पाणी साठवण्याचे वातावरण निर्माण झाले. जनता कामाला लागली. या प्रयत्नातून किती जलसाठा निर्माण झाला याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी तळी खणली जात आहेत.

फडणवीस हे राज्यातील मागास भागाचे प्रतिनिधी. एकेकाळी आमदार असताना त्यांनी विदर्भविरोधकांनी चालते व्हावे, अशी आरोळी ठोकून खळबळ उडवून दिली होती. ते मुख्यमंत्री झाल्यावर अर्थातच या भागाला न्याय देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले असणार. समन्यायी विकासाचे तत्त्व प्रत्यक्षात आणण्याचे आव्हान समोर आल्यावर फडणवीस यांनी सर्वप्रथम विदर्भात मराठवाड्यात नियुक्‍ती नाकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर वेसण घालण्यासाठी रोस्टर प्रणाली लागू केली. नोकरशाहीवर फडणवीस सरकारला अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. तरीही या निर्णयाने त्यांनी आपल्या कारभाराची दिशा स्पष्ट केली. महाराष्ट्रात गुंतवणूक खेचण्यासाठी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ’मॅग्नेटिक महाराष्ट्र हा उपक्रम सुरू केला. औद्योगिक गुंतवणुकीत सध्या प्रचंड शैथिल्य आहे; पण त्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचा संदेश मात्र फडणवीसांचे प्रयत्न देताहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात आलेल्या परकीय गुंतवणूकदारांची तसेच शिष्टमंडळांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय आर्थिक राजधानीचा प्रमुख या नात्याने फडणवीस यांनी निरनिराळया देशांच्या दुतावासांशी उत्तम संबंध जोडले आहेत. मोदींच्या राजवटीचा मंत्र आहे तो डिजिटल होण्याचा. फडणवीस आधुनिक नेते असल्याने त्यांच्याकडून डिजिटल युग अंमलात आणण्याबददलच्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात हरिसाल या मेळघाटातील विजनगावात त्यांनी तंत्रसहाय्याने आदिवासींचे जीवन सुधरवण्याचे प्रयत्न सुरू केले. ते महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प फार यशस्वी होऊ शकलेला नाही पण गावागावात बॅण्डविडथ तयार करण्याचे, डिजिटल सेवा देण्याचे प्रयत्न फार महत्त्वाचे आहेतच. या मंत्रिमंडळाने पहिला निर्णय घेतला तो सेवा हमी कायद्याचा. नागरिकांना वारंवार ज्या कामांसाठी सरकारचे उंबरठे जिवावे लागतात त्या सेवा विशिष्ट कालावधीत केवळ क्‍लिकवर उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय प्रत्यक्षात आला तर तो गेम चेंजर ठरेल. मुंबईत दळणवळणाचा प्रचंड ताण. लोकलचे जाळे ब्रिटिशकालीन. अशा परिस्थितीत ठिकाणे जोडण्यासाठी मेट्रो उभारणीचे जे अभियान आज प्रत्यक्षात आणले जाते आहे त्यास  तोड नाही. पुण्यात तसेच नागपुरातही अशी  मेट्रो तयार करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. या सर्व उपक्रमांची गती वाढवणे आवश्‍यक आहे पण चंद्राबाबू नायडूंच्या खालोखाल अशा भविष्यागामी प्रकल्पांची माहिती असणारा दुसरा नेता सध्या तरी विरळा आहे. भारताने इंडिया होण्याची गरज कधी नव्हे इतकी तीव्र झाली आहे. फडणवीस ती लक्षात घेवू शकतात हे विशेष.

भारत हा तरुणांचा देश आहे. या देशातील ६५ टक्‍के जनता चाळिशीच्या आसपासची आहे. या पिढीला समोर जायचे आहे. पूर्वी ज्याप्रमाणे पंथ प्रांत यांचा पगडा असायचा तशी स्थिती आता काहीशी बोथट होते आहे. या पिढीला जे हवे आहे ते आहे प्रगतीचे धोरण. गोहत्येच्या आरोपांवरून निष्पाप नागरिकांच्या हत्या झाल्या त्याच सुमारास ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्या आपकी अदालत मध्ये फडणवीस यांना यासंबंधातला प्रश्‍न विचारला गेला तेंव्हा ते उत्तरले, ‘‘हत्या करणाऱ्याला मी हिंदू मानत नाही.’’ आजच्या पिढीला भावणारी ही संस्कृती आहे. विधानसभा निवडणुकीतले यश हे मोदीलाटेतले होते.त्यानंतर सत्तेत आपण आहोत याचा संदेश योग्यप्रकारे जावा यासाठी फडणवीसांनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकात यश मिळवणे आवश्‍यक होते. सहकाऱ्यांमधील चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे दोघे कारभार जाणू शकले होते, मदत करत होते पण राज्यातील प्रशासनावर आपली मोहोर उमटवणे शक्‍य झाले नव्हते. ते आजही फारसे साधलेले नाहीच पण भाजप हा येथे सत्तेत आलेला पक्ष आहे, एकदा मिळालेले यश वारंवार मिळणारे आहे हे दाखवण्यासाठी पुन:पुन्हा निवडणुका जिंकणे आवश्‍यक होते. जातीचे पाठबळ नसलेल्या आणि मराठा समाजाचे मूक 

मोर्चे या नेतृत्वाला आव्हान देणार अशी शक्‍यता वाटत असतानाही फडणवीस मिनी विधानसभा निवडणुका जिंकू शकले. ही सर्वमान्यतेची मोहोर महत्त्वाची होती. फडणवीस यशस्वी आहेत काय? त्यांच्या कारकिर्दीचा जमाखर्च काय हे योग्यवेळी मांडली जाईल. ती योग्य वेळ लोकसभा विधानसभा निवडणुकीची असेल. सेवा हमी कायदा, जलयुक्‍त शिवार या योजनांचे यश काय? कर्जमाफी योजना कितपत यशस्वीपणे राबवली गेली या प्रश्‍नांची उत्तरेही तपासावी लागतील. मात्र फडणवीस नावाचे नवे नेते महाराष्ट्रातले डिसिजन मेकर, अजेंडासेटर बनले आहेत हे सध्या तरी मान्य करावे लागेल. त्यांचे आश्‍वासक, अभ्यासू नेतृत्व भारतातल्या बिनीच्या नावांमधले एक होण्याची शक्‍यता आहे. त्यांच्या वाटचालीकडे त्यामुळेच लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे, राजकीय अभ्यासकांसाठी अपरिहार्यही. 

संबंधित बातम्या