आधुनिक स्वयंपाकघर

आशिष देशपांडे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

‘अन्नदाता सुखी भव’ या वाक्‍याचा उपयोग  प्रत्येक कुटुंबातून पिढ्यान्‌पिढ्या होतो. पण हे वाक्‍य पूर्णत्वास नेण्यासाठी त्या घरातील गृहिणी व स्वयंपाकाची जागा देखील तेवढीच प्रसन्न पाहिजे. जेणेकरून या वाक्‍याला ‘तथास्तु’ असा आशीर्वाद मिळेल. आजकाल बिल्डरच्या प्लॅननुसार उपलब्ध जागेत आपला संसार बसविताना प्रत्येकाची दमछाक होते. पण त्यावर इंटिरियर डिझाइनरने बरेच चांगले उपाय उपलब्ध करून बऱ्याच नवीन संज्ञा बाजारात आणल्या व या मानसिकतेचा अभ्यास अगदी ग्राहकांच्या आरोग्यापर्यंत केला गेला. त्यामुळे अँटी अलेर्जीक, अँटी स्किड, लो मेन्टेनन्स असे काही शब्द कानावर पडायला लागले आहेत.

‘अन्नदाता सुखी भव’ या वाक्‍याचा उपयोग  प्रत्येक कुटुंबातून पिढ्यान्‌पिढ्या होतो. पण हे वाक्‍य पूर्णत्वास नेण्यासाठी त्या घरातील गृहिणी व स्वयंपाकाची जागा देखील तेवढीच प्रसन्न पाहिजे. जेणेकरून या वाक्‍याला ‘तथास्तु’ असा आशीर्वाद मिळेल. आजकाल बिल्डरच्या प्लॅननुसार उपलब्ध जागेत आपला संसार बसविताना प्रत्येकाची दमछाक होते. पण त्यावर इंटिरियर डिझाइनरने बरेच चांगले उपाय उपलब्ध करून बऱ्याच नवीन संज्ञा बाजारात आणल्या व या मानसिकतेचा अभ्यास अगदी ग्राहकांच्या आरोग्यापर्यंत केला गेला. त्यामुळे अँटी अलेर्जीक, अँटी स्किड, लो मेन्टेनन्स असे काही शब्द कानावर पडायला लागले आहेत.

असो, आपला विषय हा किचनशी निगडित असल्याने या स्वयंपाकघरात नेमके कोणते फायद्याचे शब्द जन्मास आले ते पण लक्षात घेतले पाहिजे. कोणतीही वास्तू ही विकत घेतलेली असो किंवा स्वतःच्या सोयीने बांधलेली असो प्रत्येक रूमच्या जागा या ठरलेल्या असतात. तसेच आपले माजघरदेखील ऐटीत तयार असते. त्यामुळे प्रथम वास्तू घेतल्यावर त्या जागेचा कसा व किती जणांसाठी वापर होणार आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याचबरोबर वास्तुशास्त्राकडचा वाढत चाललेला कलदेखील लक्षात घ्यावा लागेल. जेवढा आणि जिथे जमेल तिथे याचा वापर करावा. यातील काही ठोकताळे म्हणजे उत्तरेकडील किचन टाळावे. दक्षिणेकडे पाण्याचा वापर टाळावा. स्वयंपाकाची जागा ही पूर्वेकडे तोंड करून असावी. संपूर्ण जागेच्या आग्नेय दिशेला किचन असावे. या ठोकताळ्यांनुसार जागा उपलब्ध झाल्यास उत्तम, नाहीतर पूर्व पश्‍चिम ही दिशा योग्य धरली जाते.

किचन रचनाबद्ध करताना नेहमी हवेशीर, नैसर्गिक प्रकाश, मोकळी जागा यांनी उपयुक्त असावे. या जागेचे इंटिरियर हे सगळ्यात आवश्‍यक व लोकांच्या गरजेची गोष्ट आहे. घर घेतल्यानंतर प्रथम प्राधान्य हे किचनलाच दिले जाते. या गरजेमुळेच मॉड्युलर किचन शोरूम्स बाजारात उपलब्ध आहेत. आणि घरात गेल्यानंतरची तात्पुरती गरज या शोरूम्समधून काही दिवसात पूर्ण करून मिळते. खरंतर किचनचे फर्निचर करणार असतो, तेव्हा बऱ्याचशा गोष्टींचा विचार केला पाहिजे, मग तुम्ही बाकी इंटिरियर न करता नुसते किचन करणार असला तरी! आज कित्येक वर्ष यात काम करताना ग्राहक वर्गातून येणारा गृहपाठ वाचला की आमच्या संशोधनाला वेग मिळतो. कित्येक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईनिंगमध्ये बरेच बदल करावे लागतात. किचनमधील प्रत्येक वस्तू ही त्या गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची असते व त्याला योग्य जागा देणं हे डिझाइनरसाठी महत्त्वाचे असते.

किचन रचनाबद्ध करताना प्रत्येक गोष्टीचा काटेकोरपणे विचार करावा लागतो. त्यामुळे नवीन घर घेत असाल तर बांधकाम चालू असतानाच याचे प्लॅनिंग करून घेणे गरजेचे असते. कारण किचन म्हणजे प्रत्येक घराचा श्वास असतो व प्रत्येक गृहिणी व तिच्या गरजेनुसार याची रचना वेगळी असते. साधारणपणे रचना करताना,

  •      अँथ्रोप्रोमॅट्रिक मेजरमेंट
  •      वर्किंग ट्रॅंगल
  •      इलेक्‍ट्रिकल गॅजेट्‌सचा वापर
  •      इतर वस्तूंचा वापर
  •      गृहिणीच्या सवयी
  •      स्ट्रेस फ्री होण्यासाठी लागणारी तजवीज
  •      मेन्टेनन्स
  •      हायजिन

असे कितीतरी मुद्दे आरोग्यपूर्ण किचन होण्यासाठी आवश्‍यक असतात. आरोग्यपूर्ण का? तर किचन ही घरातील एकमेव जागा असते जिथे सामानाची अडगळ असते. त्यामुळे कीटकांचा सर्रास वावर असतो. फर्निचर करताना या पाहुण्यांचादेखील विचार करणे गरजेचे असते. त्यासाठी फर्निचरमध्ये लाकडाचा कमी वापर, स्टीलचा योग्य वापर, अँटीरस्टींग मटेरियलचा योग्य वापर, ओटे किंवा प्लॅटफॉर्म मोकळे राहण्याची तजवीज, असे अनेक मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. बांधकाम चालू असताना प्लॅनिंग केल्यास मेन्टेनन्स संबंधीचे काही मुद्दे आटोक्‍यात आणता येतील. त्यासाठी बाजारातील नवीन उपलब्ध असलेल्या मटेरियलचा जरूर अभ्यास करावा. जसे टाईल्समधील ग्लास फिनिश किंवा ग्लेझ टाइल्स यांचा छतापर्यंत वापर करावा. जॉइंट-फ्री-टाइल्स वापरल्याने किचन मोठे वाटते व स्वच्छ ठेवण्यात मदत होते. किचन प्लॅटफॉर्म हे नेहमी शक्‍यतो ग्रॅनाइटचेच असावेत. कारण हा दगड मेन्टेनन्सला सोप्पा असतो. मार्बल दिसण्यास सुरेख असला तरीही त्याचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. शिवाय मार्बलवर किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामानाचे डाग लवकर पडतात व मेंन्टेन करणे अवघड असते. याच कारणाने किचन टॅन झालेले दिसते. किचन सिविल स्टेजला प्लॅन केल्यास काही न लागणाऱ्या भिंती काढणे सोप्पे जाते व त्या जागेचा वापर योग्य कारणासाठी केला जातो. त्यामुळे मेन्टेनन्स हा मुळातच कमी हवा असे वाटत असेल तर नक्की या गोष्टी करून घ्याव्यात.

माजघरातून आधुनिक किचन करताना आजची जीवनशैली लक्षात घेता स्वयंपाकासाठी मिळणारा वेळ अतिशय कमी असतो. त्या कारणाने इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌सचा वाढता वापर आणि त्यासाठी लागणारी जागा याचा विचार करावा लागेल. रेडी-टू.-मेक कूकिंगमुळे त्याला लागणारे उपकरण हाताशी असणे गरजेचे वाटते. आधुनिक स्त्रीच्या मानसिकतेचा विचार करून IOT तत्त्वावरील उपकरणे बाजारात लवकरच उपलब्ध होतील. जेणेकरून वर्किंगवूमनला याचा फायदा घेता येईल. यासोबतच काही दिवसातच रिमोट ऑपरेटेड गॅजेट्‌स उपलब्ध झाल्याने स्वयंपाक सोप्पा होईल. किचनमध्ये लायटिंग व रंगसंगती ही नेहमीच रिफ्रेशिंग असावी. गॅजेट्‌सचा उपयोग वाढल्या कारणाने त्याला लागणारे प्लग्स, कॉउंटर्स याचा नेहमी प्लांनिंगमध्ये विचार व्हावा.

आरोग्यपूर्ण किचन करताना स्पॉण्डिलायटिस व पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्यास ओट्याची उंची आपल्या सोयीने नक्कीच कमीजास्त करावी. टॉवर स्टोरेजचा वापर जास्त करावा. अशाप्रकारच्या किचनमध्ये वर्किंग ट्रॅंगलचा वापर अवश्‍य करावा. जेणेकरून स्ट्रेस फ्री किचन अनुभवता येईल. अशा किचनमध्ये ट्रान्सपरंट व काचेचा जास्तीतजास्त वापर असावा. सगळ्या वस्तू आय लेवलला दिसतील अशाप्रकारे मांडणी करावी. किचन मेन्टेंनन्सच्या दृष्टीने वेस्ट मॅनॅजमेंटसाठी बाजारातील नवीन किचन क्रशर्सचा वापर नक्की करावा. जेणेकरून किचन तुंबण्याचा त्रास कमी होतो. वेळोवेळी पेस्टकण्ट्रोल करणे हे तर प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेली गोष्ट आहेच. तसेच आजकाल मेन्टेनन्ससाठी बाजारात पोर्टेबल रोबोट्‌स उपलब्ध असल्याने काचा व इतर गोष्टी स्वच्छ ठेवणे सोप्पे झालेले आहे. बाजारात उपलब्ध शेल्फ लायनर्स, वॉटर ॲबसॉर्बन्ट मॅट याचा पुरेपूर वापर करावा. चिलटांचा वावर कमी करण्यासाठी बेसिनलीड्‌स जरूर वापराव्यात. आजकाल मेन्टेनन्ससाठीचे बरेचसे प्रॉडक्‍ट ऑनलाइन उपलब्ध असल्या कारणाने प्रत्येकालाच वापरणे सोपे झाले आहे.

‘अन्नदाता सुखी भव’ या वाक्‍याची पूर्तता करण्यासाठी फर्निचरमधील बारकावे लक्षात घेऊन प्लॅनिंग करावे. जेणेकरून प्रत्येक किचनमधील वस्तूला योग्य जागा मिळेल. ट्रॉलीज डिझाईन करताना आपला वापर, आपण वापरतो ती भांडी यांचा जरूर विचार करावा. कारण बऱ्याचदा किचन केल्यामुळे भांडी बदलायची वेळ येते आणि या गोष्टींबाबत आपल्या डिझाइनरशी आधी चर्चा करावी. जेणेकरून या गोष्टींचा विचार केला जाईल. शक्‍यतो आवश्‍यक तेवढ्याच वस्तू किचनमध्ये ठेवाव्यात. म्हणजे ते मोकळा श्वास घेईल व ‘तथास्तू’ म्हणेल.    

फोटो फीचर

संबंधित बातम्या