दुर्गदृष्टी जोपासताना

भगवान चिले
गुरुवार, 24 मे 2018

कव्हर स्टोरी
 

महाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट इतिहासप्रेमींसाठी अत्यंत आनंददायी आहे. दर शनिवार-रविवारी व सलग सुट्ट्यांच्या दिवशी, पाठीला सॅक अडकवून सह्याद्रीत ट्रेकींगला बाहेर पडलेल्या तरुण-तरुणीचे जथ्ये रेल्वे स्टेशनवर व बसस्टॅण्डवर दिसणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. आता जंगल पर्यटन, धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, लेणी पर्यटन याबरोबर दुर्ग पर्यटन ही संकल्पना समाजामध्ये रुजत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील लोकप्रिय कादंबऱ्या वाचून म्हणा, ऐतिहासिक मालिका व चित्रपट पाहून म्हणा किंवा सोशल मिडीयावरील फोटो व माहिती वाचून म्हणा, गडकिल्ले पाहणे आता लोकांना आवडू लागले आहे. त्यामुळे इतिहास प्रसिद्ध असलेल्या रायगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, देवगिरी अशा अनेक किल्यांवर आपणास सुट्टीच्या दिवशी लोकांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. हे चित्र गडकोटांसाठी, इतिहासप्रेमीसाठी नक्कीच आशादायक आहे. काही वर्षांपूर्वी किल्ल्यांमधला ‘क’ जरी उच्चारला तरी लोकं ‘काय पाहायचे त्या दगडधोंड्यात’ असे कुचेष्टेने म्हणत असत. या पार्श्‍वभूमीवर वरील चित्र नक्कीच स्वागतार्ह आहे. या गडकिल्ल्याकडे वळलेल्या तरुणांसाठी आपण गड पाहायचा म्हणजे नक्की काय पहायचे ? कसे पहायचे? किती वेळात एखादा गड पाहायचा? कसा पाहायचा? या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी या लेखाचा प्रपंच मांडला आहे.

सर्वप्रथम एखाद्या नवीन गडाला भेट देत असताना त्या गडाचा इतिहास जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. इतिहास जाणून न घेता गडकोट करत तंगडतोड करून घेण्यासारखेच आहे. आपण ज्या गडाला भेट देत आहोत त्याचा इतिहास जर आपण आधी जाणून घेतला, तर तो गड पाहताना एक वेगळीच मजा येते. उदा. पन्हाळगडावरील सुप्रसिध्द तीन दरवाजाच्या प्रांगणात आपण गेलो, की याच ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या अंगावर कोंडाजी फर्जंद व दत्ताजीपंत यांनी सोन्याची फुले उधळून स्वागत केले होते. हा प्रसंग आठवला की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. असे कित्येक गडांबाबत आपणास सांगता येईल. इतिहासातील जो-तो प्रसंग आपण ज्या त्या किल्यावर आठवला, की जे सुख आपल्या अंर्तमनास मिळते त्या सुखाची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. इतिहास जाणून, तो गड वेळ देऊन बघितला, की मग तिथला दगड अन्‌ दगड जणू तुमच्याशी हितगूज साधतो.  इतिहास जाणून घेतला, की दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गडाचे भौगोलिक स्थान समजावून घेणे हे होय. उदा. प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत असताना तेथील जावळीच्या जंगलाचे महत्त्व आपण समजावून घेणे गरजेचे आहे. आता याठिकाणी आपण जावळीचे जंगल, पेठ पारचा ऐतिहासिक दगडी फूल, रामवरदायिनीचे मंदिर ही सर्व ठिकाणी पाहून मग प्रतापगडावर पाऊल टाकले पाहिजे. एकंदरीत प्रतापगडावरील एके अन्‌ एक दुर्गअवशेष पाहताना आपण अफजलखानाचा प्रसंग आठवला पाहिजे. या युद्धप्रसंगाचा नायक शिवरायांनी अचूकतेने बांधलेल्या भोरप्या डोंगरावरील प्रतापगड हा किल्ला होता. ही बाब आपण विसरता कामा नये. असेच मालवणच्या सिंधुर्दुगाबाबतही बोलता येईल. कुरटे बेटावर बांधलेला हा किल्ला पाहायला जात असताना आपली नाव दर्यातून सरळ न जाता वाकडी तिकडी वळणे घेत का जाते ? हे आपल्याला माहीत असायला हवे. हा जलदुर्ग बांधत असताना शिवरायांनी कुरटे बेटाच्या आजूबाजूला असणाऱ्या समुद्रात ओहोटीच्या वेळी मोठे-मोठे खडक अनुभवले होते. भरतीच्या वेळी हे दगड डोळ्यांना दिसत नसत. त्यामुळे शत्रू सैन्याच्या बोटी या गडाच्या जवळ येताना एक तर या खडकांना धक्का लागून फुटत वा पलट्या होत असत. त्यामुळे सिंधुदुर्गाला आपसूकच नैसर्गिक संरक्षण मिळत असे.

भौगोलिक स्थानाचा अभ्यास केल्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्गअवशेष. आपण जेव्हा एखाद्या किल्लाला ‘किल्ला’ म्हणतो त्यावेळी तो गड तटबंदी, बुरूज, महादरवाजा, चोर दरवाजा, गडावरील मंदिरे, पाणटाकी, तलाव, तोफा अशा दुर्गअवशेषांनी बनत असतो. एखाद्या किल्लाची ओळख ही सर्व प्रथम त्याच्या तट-बुरूज या अवशेषांनी बनत असते. तट बुरूज हे नेहमी ज्या ठिकाणी किल्ला बांधला जात आहे त्या ठिकाणच्या उपलब्ध दगडात बांधला जात असत. त्यामुळे आपणास कोकणातील देवगड, विजयदुर्ग, जयगडसारखे किल्ले जांभ्या दगडात बांधलेले दिसतात. तर सह्याद्रीतील काही किल्ले हे काळ्या दगडात बांधलेले दिसतात. काही ठिकाणी वेगळाच दगड दिसतो. उदाहरण द्यायचे तर दूर कर्नाटकातील इतिहास प्रसिद्ध भीमगडाच्या जंगलात फिरत असताना लोहाचे भरपूर प्रमाण असणारा ’खण-खण’ असा लोखंडासारखा आवाज असणारा दगड आपणास पाहायला मिळतो. हा दगड चौकोनी आकारात कापता येत नाही कारण त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे भीमगडाची तटबंदी ही याच दगडाच्या कपऱ्या कपऱ्या काढून बांधण्यात आली आहे. तटबंदीबाबत दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवराय जेथे गरज आहे तेथेच तटबंदी बांधत असत. ज्या बाजूला खोल दरी आहे त्या बाजूला कधीही तटबंदी बांधत नसत.  

या तटामध्ये गडावर चालून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बुरूज बांधण्यात येतो. या बुरुजांचे आकार वेगवेगळे असतात. काही ठिकाणी त्याची रचना कॅप्सूलप्रमाणे असे. किल्ला जर मोठा असेल तर या बुरुजात विश्रांती घेण्यासाठी खोल्या ही बांधत. सोलापूरजवळील नळदुर्ग किल्ल्यावर स्वतंत्र बांधणीचा उपळ्या बुरूज वा तटातील नऊ पाकळ्या असणारा ’नऊगजी बुरूज’ खरोखर पाहावा असाच आहे. बुरुजानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवाजा. रायगडाचा महादरवाजा, राजगडाच्या बालेकिल्ल्याचा अष्टकोनी महादरवाजा, विजयदुर्गाचा महादरवाजा किंवा कर्नाळा किल्ल्याचा महाकाली दरवाजा दुर्गप्रेमींनी एक वेळ नक्की पाहिला पाहिजे. या दरवाजाला गोमुखी रचना, दुर्गद्वार शिल्पे, शिलालेख, पहारे करायच्या देवड्या, दरवाजावरील शत्रूवर... मारगिरी करायच्या जागा, दरवाज्याची लाकडी प्रवेशद्वारे, त्यावरील लोखंडी मोळे अशा कितीतरी गोष्टींची आपण लक्ष्यपुर्वक पाहणी करायला हवी. प्रत्येक गडावर याशिवाय अनेक इमारती असतात. उदा. सदर, राजवाडा, दारूगोळ्याची कोठारे, धान्यकोठार, शिबंदीची घरटी, मंदिरे, मशिदी, चर्च या सर्व गोष्टी पाहिल्याशिवाय आपली दुर्गफेरी कशी पूर्ण होणार. राजगडवरील विशिष्ट देवळ्या असणाऱ्या सदरेच्या इमारती (गडाचा संपूर्ण कारभार या सदरेच्या वास्तूमधूनच चालत असे) पन्हाळा गडावरील सज्जाकोठी वा सदर ई महल नावाने ओळखली जाणारी दुर्गवास्तू न चुकता पाहावी अशीच आहे. याशिवाय प्रत्येक गडावर धान्यकोठाराची इमारत असेच असे. ’सैन्य हे पोटावर चालते’ जर गडावरील शिबंदीच्या पोटालाच घातले नाही घातले नाही तर ते लढणार कसे? म्हणून गडावर भात, नाचणी, वरी, गूळ यांचा भरपूर साठा करून ठेवत असत. पन्हाळगडावरील ‘गंगा-यमुना’ या धान्य कोठ्या, जीवधनगडावरील धान्यकोठ्या खूपच सुंदर आहेत. या धान्यकोठीला नियमित सूर्यप्रकाश मिळावा म्हणून वरच्या बाजूला वायुविर्जनासाठी झरोके ठेवत असत.

  याशिवाय गडावरील महत्त्वाची वास्तू म्हणजे दारुकोठार. हे नेहमी गडाच्या एकाबाजूला असे. शक्‍यतो दारुकोठाराची..... चुन्नेगच्ची वास्तू दरीकाठाला एकाकी बांधण्यात येत असे. आज आपण उत्तम स्थितीत दारुकोठारे पाहायचे झाल्यास ते सातारगड ऊर्फ अजिंक्‍यतारा किल्लावर पाहात येईल. बऱ्याच किल्लावरील दारुकोठारे इंग्रजांनी उडवून लावल्याने ती आज आपणास उद्‌ध्वस्त स्थितीत पाहायला मिळतात.

गडकोटावरील आणखीन एक महत्त्वाची वास्तू म्हणजे राजवाडा होय. याला ‘हवालदाराचा वाडा ’ असेही म्हणत असत. शिवरायांच्या काळात महाराज वेगवेगळ्या गडाला भेट देत असताना त्याच गडावर मुक्काम करण्याची वेळ आल्यास त्यांचा मुक्काम हवालदाराच्या वाड्यात असे. या दगडी वाड्याच्या भिंतीवर नळीच्या खापरांचे छत असे. ही महत्त्वाची वास्तू गडावरील मुख्य मंदिराच्या जवळच असे. नंतरच्या काळात अनेक गडावरील वाड्यांच्या भितींत गुप्तधन पुरलेले आहे या लोभाने अनेक वास्तू उद्‌ध्वस्त करण्यात आल्या.

वाड्यानंतर गडावरील महत्त्वाची वास्तू म्हणजे गडदेवतेचे मंदिर होय. गड बांधत असताना प्रथम गडदेवतेचे मंदिर बांधत असत. राजगडावरील पद्मावती देवीचे मंदिर, रायगडावरील जगदीश्‍वराचे मंदिर आजही पाहण्यासारखी आहेत. गडावर गडदेवतेशिवाय महादेव , भैरोबा,मारुती, वेताळ या देवतांचीही घुमटीवजा मंदिरे असत. आजही गड फिरत असताना ट्रेकर मंडळींना पथाऱ्या पसरण्यासाठी या मंदिरांचाच आसरा घ्यावा लागतो. ’पाणी म्हणजे जीवन’ हे आपण जाणतोच. गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी पुरेल याची तजवीज करणे गरजेचे असते म्हणून गडावर तलाव, टाकी, विहिरी खोदण्यात येत असत. या पाण्याची अत्यंत काटकसरीने वापर करण्यासाठी काळजी घेत असत. रायगडावरील गंगासागर तलाव वा शिवनेरीवरील खांबटाकी, राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील चंद्रकोर तळे आजही उत्तम अवस्थेत आहेत. या आणि अशा अनेक गडावरील दुर्ग अवशेषांचा अभ्यास गड बघत असताना आपण करायला हवा. याशिवाय वासोटा, भैरवगड, रांगणा, प्रचितगड अशा वनदुर्गांवर आजही समृद्ध जैवविविधता आढळून येते. प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, वनस्पती यांचा अनेक अंगाने विविध अभ्यासकांना गडकिल्ल्यांवर अभ्यास करता येईल. महाराष्ट्रातील विविध गडकिल्लांच्या जैवविविधतेच्या अंगाने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. आज सह्याद्रीतील अनेक गडांभोवतीचे जंगलपट्टे हे खुद्द शिवरायांनी करड्या नजरेने राखलेले जंगल आहे. हे ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या लक्ष्यात येते.

चला तर मग आपण आपले गडकोट सर्वांगाने जाणून घेऊया. एक वेगळी दुर्गदृष्टी तयार 
करूयात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या