‘चपाती एक्‍स्प्रेस’

आशिष तागडे
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
व्यवसायाला प्रतिष्ठा मानून काम केल्यास इतरांनाही आपण मदतीचा हात देऊ शकतो, हे सिद्ध केलंय ‘देशपांडे किचन’च्या आरती देशपांडे यांनी. एक-दोन नव्हे त्यांच्या पोळ्यांच्या कारखान्यात तब्बल २५ हजार पोळ्या प्रतिदिन लाटल्या जातात आणि त्याही कोणत्या मशिनशिवाय. त्यांच्याकडील मशिन म्हणजे महिलाच. स्वतः अडचणीतून मार्ग काढत इतर महिलांनाही त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले आहे. या स्वयंपाक घरात महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते.

पोळ्या लाटणे हे अत्यंत जिकरीचे काम. रोजच्या रोज पोळ्या लाटणे महिलांना विशेषतः नोकरदार महिलांना अशक्‍य वाटते. अर्थात त्यामागे कारणही तसंच सक्षम असते. आठ तास नोकरी, त्यानंतर घरी पोचायला लागणारा वेळ याचा विचार करता पोळ्या लाटणे ही बाब जिकिरीचीच असते. आरती देशपांडे यांनी एका अपघातातूनच हा व्यवसाय सुरू केला. साधारण नऊ वर्षांपूर्वी आरती देशपांडे यांच्या पतीची नोकरी अचानक गेली. अर्थार्जनासाठी काय करायचे हा मोठा प्रश्‍न उभा राहिला. त्यावेळी त्यांच्या विहिण आसावरी देशपांडे मदतीला धावून आल्या. ‘आपण घरगुती का होईना व्यवसाय सुरू करू’ हा विहिणबाईंचा सल्ला प्रमाण मानून आरती देशपांडे यांनी घरगुती पद्धतीने पोळ्यांचा व्यवसाय सुरू केला. विहिणबाई मदतीला होत्याच. सुरुवातीला शंभर-दीडशे पोळ्या तयार करून त्याची परिसरात विक्री सुरू केली. पोळीचा दर्जा लक्षात घेता ही संख्या लवकरच तीनशेच्या घरात गेली. मात्र त्यासाठी त्यांना खूपच संघर्ष करावा लागला. सकाळी लवकर उठून पोळ्या तयार करायच्या; त्या योग्य पद्धतीने बांधून ठेवणे जिकरीचे काम होते. सुरुवातीला पाच-पंचवीस पोळ्यांची ऑर्डर मिळायची. कधीतरी हा आकडा पन्नासवर जायचा. परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावेळी मुलगा निर्मल याला मदतीला घेऊन हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा चंग आरती देशपांडे यांनी बांधला. सुरुवातीला भांडवलाचा मोठा प्रश्‍न होता. त्यामुळे इच्छा असूनही मोठी झेप घेणे शक्‍य होत नव्हते. वर्षभर फार प्रगती झाली नाही. परंतु त्यानंतर भांडवलाचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटल्यावर ‘चपाती एक्‍स्प्रेस’ला काहीशी गती मिळाली. आपल्या प्रमाणे अनेक महिलांना आर्थिक पाठबळाची आवश्‍यकता असल्याचे लक्षात आल्यावर काही महिलांना घेऊन पोळ्या तयार करण्यास सुरवात झाली. आईने आणि तिच्या सहकारी महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार पोळ्या घेऊन निर्मल सकाळीच बाहेर पडायचा. पुण्यातील यच्चयावत हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचा. कधी-कधी २०-२५ पोळ्यांसाठी त्याची ३-४ किलोमीटरची फेरी व्हायची. परंतु मागे हटायचे नाही, हे मनाशी पक्के ठरविले असल्याने कष्टाची फिकीर नव्हती. सून शिवानी कणीक भिजवून त्याचे गोळे करून द्यायची आणि आरती यांच्यासह सर्व महिला पोळ्या तयार करायच्या. आजही तीच पद्धत आहे. सुरुवातीला काही हॉस्पिटलमधून पोळ्यांची ऑर्डर यायला लागली. परंतु त्याची संख्या फारशी नव्हती. अर्थात आलेली ऑर्डर माघारी जाऊ द्यायची नाही, हे गृहितक मांडून रोज पोळ्या देण्याचा क्रम काही चुकला नाही. एवढे सगळं करत असताना पोळ्यांबरोबर कच्च्या मालाची खूप अडचण यायची. गहू, त्याचे पीठ, तेल, गॅस यासाठी खूप पैसा खर्च होत होता. त्याप्रमाणात आवक मात्र तुटपुंजी होती. असे असले तरी देशपांडे यांनी कोणाचे पैसे कधी थकविले नाहीत. प्रसंगी स्वतः:च्या पोटाला चिमटा घेतला, परंतु पोळ्या तयार करण्यासाठी मदतीला येणाऱ्या महिलांना वेळच्यावेळी मोबदला देण्याचा पायंडा त्यांनी कायम ठेवला. कच्च्या मालासाठी लागणारी रक्कमही त्यांनी कधी थकविली नाही.

अडचणींवर मात!
सुरवातीला अनेक अडचणी आल्या. त्यावर मात कशी केली, यावर आरती देशपांडे म्हणाल्या, ‘‘कष्टाची कमी नव्हती, समस्या होती ती पैशांची. मुलगा पोळ्या घेऊन खूप ठिकाणी जायचा. कधी-कधी अगदी किरकोळ स्वरूपाची ऑर्डर मिळायची. म्हणजे तो दुचाकीवर जाण्यायेण्यासाठी येणारा पेट्रोलचा खर्चही निघायचा नाही. दिवसभर कष्ट केल्यावर रात्री हिशोब करायचो, त्यावेळी जेमतेम पैसे हातात आलेले असायचे. बरं यामध्ये अडचण अशी, की, दर वाढवूनही चालणार नव्हते. आमच्या कामाला खरी उभारी मिळाली ती २०१२मध्ये. एका मोठ्या आयटी कंपनीच्या कॅन्टीनची ऑर्डर मिळाली केवळ ऑर्डरच मिळाली नाही, तर त्यासाठीची काही रक्कम आगावू स्वरूपात दिली. आता आम्हालाही चांगले प्रोत्साहन मिळाले. आमच्या पोळीचा दर्जा पाहून अन्य काही कंपन्यांची ऑर्डर यायला सुरवात झाली. काही झाले तरी पोळीचा दर्जा कायम ठेवायचा हे आमचे ब्रीद आहे.’’

कामगारांचीही उन्नती
‘कामगारांच्या उन्नतीवरच आपल्या व्यवसायाची प्रगती अवलंबून असते’, असे स्पष्ट करत त्या म्हणाल्या, ‘आमच्याकडे बहुतांश महिलाच काम करतात. आमचे हे छोटेखानी स्वयंपाकघर हे एक कुटुंबच आहे. पहाटे साडेतीनला कामाची सुरवात होते, महिलांना आणण्यासाठी आणि काम झाल्यावर सोडण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था केली आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, स्वयंपाकघरातील काही महिला एका बैठकीत  पंधराशेच्या आसपास पोळ्या लाटतात. साडेतीन वाजता सुरू झालेला भटारखाना सकाळी ११ पर्यंत चालतो. सध्या आमच्याकडे प्रतिदिन २५ हजारांच्या आसपास पोळ्या तयार होतात. कधी-कधी हा आकडा पन्नास हजारांपर्यंतही जातो. साध्या पोळी बरोबर पुरणाच्या, गुळाच्या, खव्याच्या पोळ्याही तयार करतो. पोळ्या तयार केल्यानंतर त्या ग्राहकांपर्यंत वेळेत पोचविण्याचे काम चोखपणे केले जाते. त्यासाठी विशिष्ट आकाराचे चांगल्या पद्धतीचे डबे तयार करून घेतले आहे. यामुळे पोळी खूप वेळ नरम राहते. पोळ्या वेळेत पोचण्यासाठी खास ‘चपाती एक्‍स्प्रेस’ तयार केली आहे. काळानुसार आपण बदलले पाहिजे आणि महिलांना अधिकाधिक सक्षम करावे, हीच माझी इच्छा आहे.’’

नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष
हा व्यवसाय सुरू केल्यावर काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. ‘पोळ्या करणे’ या व्यवसायाला कायम दुय्यम स्थान दिले जाते. परंतु कष्टाने आणि जिद्दीला केलेल्या व्यवसायाला निश्‍चितच चांगले दिवस येतात, यावर विश्‍वास असल्याचे सांगत देशपांडे म्हणाल्या, ‘आपल्याला कुटुंब सावरायचे, की नातेवाइकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवर लक्ष द्यायचे याचा प्राधान्यक्रम ठरविला. कोणाला काय बोलायचे आपण ठरवू शकत नाही, परंतु आपल्याला आयुष्यात काय करायचे हे मात्र आपण ठरवू शकतो. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. जसजसे व्यवसायाने बाळसे धरायला सुरुवात केली, तसतशा प्रतिक्रियांमध्ये बदल व्हायला लागला. व्यवसायाच्या सुरुवातीला येत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया आता सकारात्मकतेकडे वळाल्या आहे. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा कामाला प्राधान्य दिले. आपल्याकडे दुधाचे, वृत्तपत्राचे असतात तसे पोळ्याचेही रतीब सुरू व्हावेत, अशी मनोमन इच्छा आहे. त्यासाठीही माझे प्रयत्न सुरू आहेत. अन्य कुटुंबांना येतात तशा आम्हालाही अडचणी येतात. कोणत्या कौटुंबिक कार्यक्रमाला जायचे असल्यास मी किंवा माझी सून यापैकी कोणाला एकालाच जावे लागते. या व्यवसायाला उभारी मिळण्यात सून शिवानीचा खूप मोठा हातभार आहे. आजही ती पहाटे कारखान्यात येते. कामगारांना काय हवे, काय नको, हे पाहते. त्यांच्या नाश्‍त्याची सोय करते. आमचे कामगार हे कुटुंबाप्रमाणेच झाले आहेत. ‘देशपांडे किचन’ हे मोठे कुटुंब झाले आहे.’’

  •      दररोज तयार होणाऱ्या पोळ्या : २५ हजार
  •      लहान पोळीचे वजन : ३० ग्रॅम
  •      या पोळीचे वजन : ५२ ग्रॅम
  •      प्रतिदिन लागणारे पीठ : ७०० ते ८०० किलो
  •      एका किलोत होणाऱ्या पोळ्या : ३६
  •      प्रतिदिन लागणारे तेल : १८ ते २० किलो
  •      एकूण कामगार : ४०

मी धायरीला राहायला आलो तेव्हा जेवणाचा प्रश्‍न माझ्यासमोर होता. मात्र देशपांडे स्वयंपाकघरामुळे कधीच जेवणाचे हाल झाले नाहीत. इथल्या जेवणाची चव घरच्यासारखीच सात्विक असते. त्यामुळे या जेवणाचा कधीच त्रास होत नाही. विशेषतः इथल्या पोळ्या या कायम गरम आणि ताज्या असतात. तसेच इथे जेवण वाढताना किंवा पार्सल देतानाही हात कधीच आखडता नसतो. आता तीन वर्षे झाली, मी देशपांडे स्वयंपाकघरात नियमित जेवायला येतो पण इथल्या जेवणाच्या दर्जात कधीच फरक पडलेला नाही.
- रोहित हरीप
 

संबंधित बातम्या