भारतीय खाद्यजत्रा

शेफ चिन्मय पाटील
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळी म्हटले, की फराळाचे पदार्थ आलेच. लाडू, चकली, शेव, चिवडा यासारखे पदार्थ घरोघरी केले जातात. यंदाच्या दिवाळी फराळासाठी नामवंत शेफ्सनी त्यांच्या काही खास पाककृती 'सकाळ साप्ताहिक'च्या वाचकांसाठी दिल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या आणि रुचकर पदार्थांच्या पाककृती दिवाळीची रंगत नक्कीच वाढवतील.

सीताफळ कुल्फी
सोळाव्या शतकात मुघल साम्राज्यात कुल्फीचा जन्म झाला. ‘कुल्फी’ या शब्दाची उत्पत्ती पर्शियन भाषेतील ‘कवर कप’ या शब्दापासून झाली आहे. भारतामध्ये पूर्वीपासून दुधाचे आटवलेले पदार्थ प्रसिद्ध होते. मुघलकाळामध्ये या आटवलेल्या दुधाच्या मिश्रणामध्ये पिस्ता व केसर टाकण्यात आले. हे मिश्रण पोटॅशियम नायट्रेटमध्ये ठेवण्यात आले. मुघल काळामध्ये पोटॅशियम नायट्रेटचा वापर आपल्या सर्वांच्या घरात असणाऱ्या फ्रीजप्रमाणे केला जात असे. याचे संदर्भ आपल्याला मुघल काळातील ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये आढळतो.
साहित्य : अडीच कप दूध, अडीच कप सीताफळ गर, पाव कप साखर, चवीप्रमाणे केशर, १२ ते १५ पिस्ते, २ ते तीन चमचे बदामाची पेस्ट, अडीच ते तीन चमचे तांदळाचे पीठ 
कृती ः दूध व केशर एकत्र करून चांगले १५ ते १८ मिनिटे उकळू द्यावे. त्या मिश्रणामध्ये साखर घालावी. ती पूर्णपणे वितळू द्यावी. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून चांगले मिक्‍स करून घ्यावे. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी. व चांगले शिजून घ्यावे. आच बंद करून त्यामध्ये बदामाची पेस्ट, सीताफळाचा गर, बारीक कापलेले बदाम, पिस्ता घालावे,  फ्रीजमध्ये ८ ते १० तासांसाठी ठेवावे. व मजा घ्या थंडगार सीताफळ कुल्फी.

चिकन पकोडा
साहित्य : चारशे ग्रॅम बोनलेस चिकन, ६ चमचे कॉनफ्लावर, १० पाकळ्या लसूण, १ इंच आलं, १ चमचा चिंचेचा कोळ, चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या, तेल, चवीप्रमाणे मीठ
कृती ः चिकनचे पीस घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मिरची व थोडे तेल चिंचेचा कुळ, मीठ हे सर्व पदार्थ घालून एक तास एकत्र होण्यासाठी बाजूला ठेवावे. कढईमध्ये तेल गरम करावे. कॉनफ्लॉवरच्या पीठामध्ये मीठ घालावे. चिकनच्या पीसला कॉनफ्लावरमध्ये बुडून मस्तपैकी घोळून घ्यावे. 
तयार करण्यासाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे , 
कॅलरीज -  ३८०

मिष्टी दोही
बांगलादेशातून हा पदार्थ आपल्या देशामध्ये आला आहे अशी मान्यता आहे. पश्‍चिम बंगालमध्ये हा पदार्थ सणाच्या दिवशी आवर्जून बनवला जातो. दुर्गा पूजेच्या दिवशी या पदार्थाला जास्त महत्त्व असते.
साहित्य : एक लिटर फूल क्रीम दूध, अडीचशे ग्रॅम साखर, तीन चमचे दही, मातीचे भांडे
कृती ः एका भांड्यामध्ये दूध गरम करत ठेवावे. ते दूध अर्धे होईपर्यंत आटवावे. दूध आटल्यानंतर दूध आचे वरून काढून घ्यावे. आता त्या दुधामध्ये अर्धी साखर व वेलचीपूड टाकावी. उरलेली साखर कॅरमलाइज करून घ्यावी. कॅरमलाइज करण्याकरिता साखर एका भांड्यामध्ये टाकून मंद आचेवर टाकून सतत हलवत राहावी. यावेळी साखर भांड्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी. सोनेरी रंग येईपर्यंत हलवत राहावे. आता तयार कॅरमलाइज दुधामध्ये घालून चांगले एकजीव करून घ्यावे. आता हे दूध मातीच्या भांड्यामध्ये घ्यावे. व त्यावर दही घालावे. व हे १० ते १२ तासांसाठी एकत्र होण्यासाठी ठेवून द्यावे. थंड झाल्यावर आनंद घ्यावा मिष्टी दोहीचा! कॅलरी ८५  ग्रॅम.  तयार करण्यासाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे.

चॉकलेट बर्फी
साहित्य : एक चमचा कोको पावडर, दीड चमचा दूध, कंडेन्स मिल्क, १ चमचा बटर, काजू पावडर, बिस्किटचा चुरा, अक्रोडाचे तुकडे, वितळलेले चॉकलेट
कृती ः एका भांड्यामध्ये कोको पावडर घ्यावी. त्यामध्ये दूध, कंडेन्स मिल्क, बटर, टाकून मिश्रण तयार करून घ्यावे. मंद आचेवर थोडेसे गरम करावे. हे मिश्रण सतत मिक्‍स करत राहावे. आता या मिश्रणामध्ये काजू पावडर, बिस्किटचा चुरा, टाका व चांगले शिजवून घ्यावे. त्यामध्ये गार्निशिंगसाठी अक्रोडचे तुकडे टाकावे. वरून वितळलेले चॉकलेट टाकावे. हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून द्यावे.

मैसूर पाक
साहित्य : एक वाटी डाळीचे पीठ, दोन वाटी साखर, ३ वाटी तूप,  चिमूटभर सोडा
कृती ः साखरेत दीड वाटी पाणी टाकून एक तारी पाक तयार करून घ्यावा. त्यामध्ये डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे. त्यानंतर त्यात थोडे थोडे तूप घालावे. मिश्रण हलवत राहावे. त्यात चिमूटभर सोडा टाकून गुलाबी रंग येईपर्यंत मिश्रण हलवत राहावे. हे मिश्रण ताटामध्ये टाकून त्यावर पाण्याचा शिडकावा करावा. थंड झाल्यावर त्याचा वड्यांचा आकार द्यावा. त्यावर ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. खाण्यासाठी तयार आहे शाही मैसूर पाक. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या