आवडते मिष्टान्न

शेफ मेघना कामदार  
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळी म्हटले, की फराळाचे पदार्थ आलेच. लाडू, चकली, 
शेव, चिवडा यासारखे पदार्थ घरोघरी केले जातात. यंदाच्या 
दिवाळी फराळासाठी नामवंत शेफ्सनी त्यांच्या काही खास पाककृती 
'सकाळ साप्ताहिक'च्या वाचकांसाठी दिल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या आणि रुचकर पदार्थांच्या पाककृती दिवाळीची रंगत नक्कीच वाढवतील.

पायसम (केरळची प्रसिद्ध खीर )  
  मी काही वर्षांपूर्वी केरळला गेले असता माझ्या आयुष्यात प्रथमच पायसम हे गोड पक्वान्न आलं . मला ते पहिल्या घासातच खूप आवडलं. जरी हे दाक्षिणात्य मिष्टान्न असले तरी या पदार्थाची चव आणि उपयुक्तता सगळ्यांसाठीच आहे . कारण यात साखरेचा नव्हे तर गुळाचा वापर केला जातो, शिवाय यातील मुख्य घटक म्हणजे डाळींचा वापर. डाळी प्रोटीनचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे पायसम या मिष्टानाचे फायदे अधिक जाणवतात . 
साहित्य : १०० ग्राम मूग डाळ , (वाटल्यास चणा डाळ देखील घेऊ शकता), २०० ग्राम गूळ, २०० मिलिलिटर पाणी, १०० मिली नारळाचे दूध ( ऑप्शनल ) , ४ ते ५ वेलचीची पूड , खोबरं किसलेले किंवा खवलेले 
कृती ः एका पॅनमध्ये मुगाची किंवा चण्याची डाळ घेऊन खोबरेल तेलाचे २-४ थेंब घालून गुलाबी होईपर्यंत ती भाजून घ्यावी. आता ही भाजलेली डाळ प्रेशर कुकरमध्ये घालून ४ - ५ शिट्या होईपर्यंत शिजवावी. डाळ भाजलेल्या पॅनमध्ये थोडे खोबरेल तेल घालून खवलेल्या खोबऱ्याला भाजून घ्यावे. काजू , बेदाणे हलकेसे भाजून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात पाणी आणि गूळ यांचे मिश्रण करुन गूळ  वितळेपर्यंत हे मिश्रण शिजवावे . आता शिजलेल्या डाळींमध्ये हे गुळाचे पाणी मिसळून ह्यात नारळाचे दूध , वेलची पूड , ड्राय फ्रुटस आदी घालून ४- ५मिनिटे शिजवावे.  आता तुमचे पायसम तयार झाले. सजावटीसाठी वरून खोबरे, ड्रायफ्रुट्‌स वापरू शकता. 

डोनट्‌सचा पौष्टिक ढोकळा 
गुजराती समाजात त्यांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक म्हणजे ढोकळा . डोनट्‌सचा ढोकळा या पदार्थात मी मुद्दामहून गाजर आणि बीटरूट्‌स यांचा समावेश केला. त्यामुळे ढोकळा पौष्टिक तर होतोच शिवाय त्याची चव देखील वाढते. हा पदार्थ दिवाळीत एक वेगळे नावीन्य म्हणून करता येईलच शिवाय गाजर आणि बिट खायला एरवी नकार देणारी बच्चे कंपनी आणि प्रौढसुद्धा ढोकळ्यातुन गाजर-बिट यांचा फडशा सहजच पाडतील. विशेष म्हणजे हा पदार्थ डोनट दिसतो, पण असतो ढोकळा . या डोनटवर फोडणी करून ओतायची असते जसं आपण ढोकळ्याला करतो . 
साहित्य : २ कप इडली किंवा डोसा पीठ, चवीप्रमाणे मीठ, १ चमचा साखर , किसलेले गाजर ३ ते ४ चमचे , मध्यम किंवा लहान बीटरूट किसलेले . 
फोडणीसाठी ः रिफाइंड तेल, कढीपत्ता पानं, हिरवी मिरची , मोहरी (राई )
कृती ः इडली करायची असल्यास इडली पात्रात इडलीचे पीठ भरावे.  किसलेले गाजर- बिट दुसऱ्या बाऊलमध्ये भरावे. दोन्ही बाऊलमध्ये किंचित मीठ आणि साखर घालावे. डोनट पात्रात ढोकळा पीठ घातल्यास त्याला सहज ढोकळ्याचा आकार येईल . 
१५ मिनिटांच्या वाफेने हा ढोकळा कम डोनट तयार होईल. ढोकळा थंड झाल्यावर त्याला हिंग, मोहरी , कढीपत्ताची पानं घालून फोडणी देता येईल.  हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत हा डोनट ढोकळा चविष्ट लागतो जो स्वादिष्ट-पौष्टिक देखील असतो.

आलू टिक्की 
आपल्या देशांत जो विविध प्रांत आणि भाषांचा आहे . त्यात चाट पदार्थ आवडत नाहीत अशा व्यक्ती फारच विरळ आहेत. आता आपण आलू चाट बद्दल बोलतोय. उत्तर भारतात अतिशय प्रसिद्ध असलेल्या आलू चाट या चाटबद्दल सांगायचे झाल्यास गरम असतानाच त्याचा आस्वाद घ्यावा . 
साहित्य :  २ मोठे उकडलेले आणि लगदा केलेले बटाटे , १ हिरवी मिरची , लसणाच्या १-२ पाकळ्या, आलं लहान (आलं आणि लसूण ठेचून घ्यावे .) चवीप्रमाणे मीठ , अर्धा चमचा आमचूर पावडर , ४ चमचे तेल, २चमचे कोथिंबीर चिरलेली, २ चमचे ब्रेड क्रम्स , हिरवी चटणी
कृती ः कुस्करलेल्या बटाटयात हिरवी मिरची, आले, लसूण, आमचूर पावडर, आवडीप्रमाणे मीठ इत्यादी पदार्थ मिसळून घ्यावे. त्याला पॅटिसप्रमाणे किंवा टिक्कीचा शेप द्यावा. हे पॅटिस अथवा टिक्की ब्रेडक्रम्समध्ये वरून लावा. अथवा टिक्किनां ब्रेडक्रम्स  चारही बाजूना लागेल असे पहा . पॅनमध्ये तेल घालून पॅन  गरम झाली,  की  या टिक्की शॅलो फ्राय कराव्यात . साधारणपणे एक बाजू शॅलो फ्राय होण्यासाठी ४ ते ५ मिनिटांचा अवधी लागतो. टिक्कीच्या दोन्ही बाजू शॅलो फ्राय व्हाव्यात .या आलू टिक्की तळून (डीप फ्राय ) देखील खाता येतात . पण शॅलो फ्रायमध्ये कॅलरीज १९० पण सर्व्हिंग तर डीप फ्रायमध्ये हा आकडा थेट २७० होतो !

बकलावा 
बकलावा हा खाद्य पदार्थ टर्किश आहे. टर्की देशाचा पारंपरिक खाद्य पदार्थ असे म्हणता येईल. घरच्या घरी हा नवा आणि वेगळा मिष्टान्न म्हणून नक्की बनवता येईल . 
साहित्य : फिलो पेस्ट्री (२ शीट्‌स ) मिक्‍स्ड सुका मेवा (काजू , पिस्ता, बदाम, बेदाणे ) २ चमचे कॅस्टर शुगर, थोडे वितळलवलेले लोणी.  साखरेचा पाक करण्यासाठी - २ चमचे साखर, अंदाजे पाणी , लिंबाचा रस .  सजावटीसाठी - थोडे पिस्ता अर्धे सोललेले . 
कृती ः १ फिलो शीट घेऊन त्यावर लोणी लावावे. हे लोणी ब्रशने लावता येईल. या लोणीयुक्त फिलो शीटवर दुसरी फिलो शीट पसरून त्यालाही लोणी लावावे. आता कॅस्टर शुगरमध्ये ड्राय फ्रुट्‌स मिक्‍स करावेत, या शीटची रोल प्रमाणे गुंडाळी करावी. दोन्ही फिलो शिट्‌समध्ये सुका मेवा भरून त्याचा रोल करावा. प्री- हिटेड ओव्हन मध्ये १७० तापमानावर २० मिनिटे ठेवावे. पाक करण्यासाठी पाण्यात साखर विरघळून जाईल इतके घोळवावे. यात लिंबाचा रस मिक्‍स करावा. ओव्हनमध्ये ठेवलेले बकलावा बाहेर काढून ते रूम टेंपरेचरला ठेवावे. साखर-लिंबाचा द्राव बकलावाच्यावर ओतावा आणि पिस्त्याचे तुकडे शोभेसाठी पसरावेत .

एगलेस बनाना वॉलनट केक 
 आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात सुका मेवा खातो, वापरतो पण वोलनट अर्थात अक्रोड खाण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. म्हणूनच अक्रोड या सुक्‍या मेव्याचा केकमध्ये मी उपयोग केला आहे . 
साहित्य : पिकलेली केळी ३, ३/४ साखर (थोडी ब्राऊन शुग , थोडी कॅस्टर शुगर ), अर्धा कप रिफाइंड ऑइल, अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस, ३/४ कप मैदा , ३/४ कप गव्हाचे पीठ,  एक चमचा बेकिंग पावडर, एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा दालचिनी पूड (पावडर) , किंचित मीठ , मूठभर तुकडे केलेले अक्रोड , सजावटीसाठी आयसिंग शुगर. 
कृती ः सर्वप्रथम  पिकलेली केळी  एका बाऊलमध्ये फोर्कने ती कुस्करून घ्यावी .  यात ३/४ कप कॅस्टर शुगर घालावी . तुमच्या खाण्यात साखरेचे प्रमाण कमी असल्यास कॅस्टर शुगरमध्ये अर्धी शुगर ब्राऊन वापरावी. गंध विरहित अर्धा कप रिफाइंड तेल घेऊन ते  स्पेटूला घेऊन ढवळणे. यात अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस घालावा. या नंतर -एका बाऊलमध्ये ३/४ कप मैदा , ३/४ कप गव्हाचे पीठ घ्यावे. त्यात १ चमचा बेकिंग पावडर , १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा दालचिनी पावडर, १ चिमूट  मीठ व १ चमचा दालचिनी पावडर घेऊन हे मिश्रण एकरूप करून घ्यावे. ओव्हन १८० तापमानावर प्रीहीट करावे. अर्धा तास ते ४० मिनिटे केक बेक करण्यासाठी लागतो. केळी वगैरे ओले साहित्य या मैदा आदी सुक्‍या साहित्यात मिसळावे. यात कापलेले अक्रोड घालावेत. नंतर ब्रेड पॅन घेऊन याला सगळ्या बाजूने लोणी लावून घ्यावे. ह्या पॅनमध्ये ३/४ पॅन भरेल इतकेच केकचे मिश्रण ठेवून ४० मिनिटे केक ओव्हनमध्ये भाजावा. केक थंड झाल्यावर ओव्हनमधून काढावा . थंड झाल्यावर त्यावर आयसिंग शुगर  शिंपडावी . हा बनाना- वोलनट केक स्लाइसमध्ये कापून कॉफीसोबत खाण्यास घ्यावा . त्याची लज्जत वाढते हे नक्की .   
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या