ब्रार स्पेशल
दिवाळी फराळ
दिवाळी म्हटले, की फराळाचे पदार्थ आलेच. लाडू, चकली, शेव, चिवडा यासारखे पदार्थ घरोघरी केले जातात. यंदाच्या दिवाळी फराळासाठी नामवंत शेफ्सनी त्यांच्या काही खास पाककृती 'सकाळ साप्ताहिक'च्या वाचकांसाठी दिल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या आणि रुचकर पदार्थांच्या पाककृती दिवाळीची रंगत नक्कीच वाढवतील.
बदामी पुरी
(अंदाजे चार व्यक्तींसाठी )
साहित्य : एक कप पीठ, एक कप बदाम भिजवून, सोलून, सालं काढलेले, पाव कप गूळ, एक चमचा वेलची पूड, दूध अर्धा कप (आवडत असल्यास थोडे जास्त ), पाव कप मध, २ चमचे काजू, बदामाचे काप, केशर
कृती ः ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस तापमानावर सेट करावा. (प्री-हीट). बदामाची मिक्सरवर पूड करावी. एका बाऊलमध्ये पीठ, बदाम पावडर, गूळ, वेलची, केशर सगळे एकत्र करावे. दुधाचा वापर करत हे पीठ वरील सर्व जिन्नस एकत्र करून मळावेत. या पिठाचे लहान आकाराचे गोळे करत त्यांची पुरी लाटावी. पुरीचा अर्ध त्रिकोणी भाग करून, पुऱ्या तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवाव्यात. पुऱ्या लाटून झाल्या, की या पुऱ्या ओव्हनमध्ये १० ते १२ मिनिटे बेक कराव्यात. बेकिंग झाले, की त्यावर हलकेसे मधाचे थेंब शिंपडावे. त्यावर कापलेले ड्रायफ्रूट सजावटीसाठी मांडावेत.
चॉकलेट पाणियारम
(चार व्यक्तींसाठी )
साहित्य : अर्धा कप मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ , एक तृतीयांश कप कोको पावडर, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा अळशी पावडर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स , १०-१२ चॉकलेट्स क्यूब्ज
कृती ः एका मिक्सिंग बाऊलमध्ये चॉकलेट क्युब्ज्स सोडून बाकी साहित्य एकत्र करावे. हे सर्व पदार्थ एकत्र घोळून घेताना पाणी अथवा दुधाचा वापर करावा. हे मिश्रण अंमळ घट्ट झाले पाहिजे. गॅसवर पणियरम मोल्ड ठेवावा. त्यात एक चमचा मिश्रण आणि चॉकलेट क्यूब्ज ठेवून हे मिश्रण पुन्हा वरून ओतावे. २ ते ४ मिनिटे हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवावे. त्यानंतर गॅस बंद करावा. सजावटीसाठी मेल्टेड चॉकलेट ओतावे आणि हॉट असताना सर्व्ह करावे. अळशी पावडरीचा उपयोग अंड्याऐवजी करण्यात येतो.
आल्याची खारी शेव (जिंजर शेव)
(२ ते ४ व्यक्तींसाठी)
साहित्य : एक कप बेसन (डाळीचे पीठ ), अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा हळद पूड, एक चमचा लाल तिखट पूड, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, एक चमचा आल्याचा रस, मळलेल्या पिठात घालण्यासाठी चमचाभर तेल व डीप फ्राय करण्यासाठी १ वाटी तेल.
कृती ः एका मिक्सिंग बाऊलमध्ये वर उल्लेख केलेले सर्व साहित्य एकत्र करून चांगले घोटावे. एक चमचा तेल गरम करून या बेसन पिठात मिसळावे. नंतर आल्याचा रस व थोडे पाणी या तयार केलेल्या पिठात मिसळावे, जेणेकरून हे शेवेचे पीठ मऊ होईल. आता चकली किंवा शेवेचा साचा घेऊन त्यात हे शेवेचे पीठ भरून शेव थेट कढत तेलात सोडावी. शेवेचा साचा वर्तुळाकार फिरवल्यास मोठी गोलाकार शेव तयार होईल. जवळ स्वच्छ कात्री ठेवल्यास एक वर्तुळ पूर्ण झालं की कात्रीचा वापर करता येईल. ही शेव सोनेरी रंगात तळून काढावे. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
शुगर फ्री रसगुल्ले
(चार व्यक्तींसाठी)
लागणारा वेळ - १५ मिनिटे
साहित्य : अडीचशे ग्रॅम पनीर, अर्धा कप स्टीव्हिया (नॅचरल स्वीटनर) सजावटीसाठी दोन टीस्पून ड्रायफ्रूट्सचे तुकडे, गुलाबपाकळ्या
कृती ः हातांच्या तळव्याचा उपयोग करत पनीर मळून घ्यावे. पनीर हळुवार मळल्यानंतर त्याचा खवा तयार होईल. प्रेशर कुकरमध्ये पाणी उकळून घ्यावे. खव्याचे लहान बॉल्स तयार करून ते उकळत्या पाण्यात सोडावे. स्टिव्हिया त्यात घालून हे भांडे झाकून ठेवावे. १० ते १२ मिनिटे शिजवावे. गरम असलेले रसगुल्ले एका बाऊलमध्ये पाकासह ठेवावे. सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या किंवा ड्रायफ्रूट्स वापरावेत.
थाई चकली
(चार व्यक्तींना पुरेल इतकी चकली)
लागणारा वेळ - १० मिनिटे
साहित्य : पाऊण कप तांदूळ, पाव कप चणा डाळ, २ टेबल स्पून धुतलेली उडीद डाळ, १५ ग्रॅम पोहे पिठासाठी एक टेबल स्पून तेल आणि तेल तळणासाठी, ४ टेबल स्पून थाई रेड करी पेस्ट, १ टेबल स्पून थाई रेड चिली सॉस, ३ टेबल स्पून तीळ, चवीनुसार मीठ
कृती ः चकली करण्यासाठी वरील सर्व धान्य (तांदूळ,चणा डाळ,
उडीद, पोहे) असे सगळे जिन्नस स्वतंत्रपणे भाजून घ्यावे. भाजताना या धान्यांचा खमंग सुवास पसरला पाहिजे. ही धान्यं भाजून, थंड झाल्यावर ग्राइंडरवर किंवा चक्कीत बारीक दळून घ्यावी. आपले पीठ किती आहे ते मोजून घ्यावे आणि तितके पाणी उकळून घ्यावे. एक कप पीठ असल्यास तितकेच उकळते पाणी लागेल. उकळत्या पाण्यात लाल तिखट, मसाला पावडर, रेड चिली सॉस असे सगळे साहित्य त्यात घालावे. हळूहळू गरम पिठात हे साहित्य मिक्स केल्यावर थोडा वेळ पिठातून वाफ येईल. पीठ पूर्ण थंड झाल्यावर ते मळावे. गरज पडल्यास पीठ मळताना थंड पाणी आपण घालू शकतो. पण पीठ मऊ झाले पाहिजे. एका फडक्याने हे पीठ झाकून ठेवावे. १०-१५ मिनिटांनी चकलीची हे तयार झालेले पीठ चकलीच्या साच्यात भरून घ्यावे. गॅसवर कढई आणि कढईत गरम तेल तापल्यावर थेट कढईतील तेलात या चकल्या सोडता येतील गोल्डन रंग येईपर्यंत या चकल्या खरपूस तळून घ्याव्यात. थंड झाल्यावर घट्ट झाकण असलेल्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
मिठाई फालुदा
(एका व्यक्तीसाठी)
साहित्य : अर्धा कप उरलेली (शिल्लक राहिलेली मिठाई), अर्धा कप दूध फालुदा मिक्ससाठी साहित्य अर्धा कप चुरडलेली मिठाई, अर्धा कप गोड़ शेवया, २ टेबल स्पून गुलाब सरबत, १ टेबल स्पून सब्जा बिया, १ टीप्सून बदाम कुटलेला, १ टीप्सून पिस्ता कुटलेला शोभेसाठी - १ टीप्सून गुलाब सिरप
कृती ः एका भांड्यात शिल्लक राहिलेली मिठाई, दूध एकत्र करून ते एकजीव होतील असे घुसळावे. नंतर एक उभट ग्लास घेऊन मिठाईचे तुकडे त्यात घालावे. गोड़ शेवया, रोझ सिरप घालावे. आता मिठाईयुक्त दूध त्यात घालावे. सर्वांत शेवटी सब्जा घालावा आणि शोभेसाठी बदाम-पिस्त्याची पखरण करावी. यात जिलेबी आणि रोझ सिरप वरून घालता येईल. ज्यांना गोड़ आणि वेगळे काहीतरी डेझर्ट खाण्याची आवड आहे, त्यांना हा मिठाई फालुदा नक्की आवडेल.