चटकदार चटण्या, कोशिंबिरी

कांचन बापट 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
जेवणाच्या ताटामध्ये चटण्या-कोशिंबिरी डावीकडे असल्या, तरी चवीच्या बाबतीत त्या उजव्याच ठरतात. चटणी-कोथिंबिरीची चव जमली, की बाकी एखाद्या पदार्थात काही कमी-जास्त झालेलंही खपून जातं. जेवणाची चव वाढवण्यामध्ये चटणीची भूमिका महत्त्वाची आहे. जेवण जर थोडं कमी तिखट, सौम्य असेल, तर चटणी थोडी झणझणीत असली की मजा येते. मसालेदार जेवणाला थोडी सौम्य, आंबटगोड चटणी बॅलन्स करते.

लाल मिरचीची चटणी
साहित्य : सात - आठ लाल ओल्या मिरच्या, पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धा टीस्पून मिरे, छोटासा आल्याचा तुकडा, मीठ, अर्धा टीस्पून साखर, फोडणीचं साहित्य, टीस्पून जिरं.
कृती : मिक्‍सरमध्ये मीठ, साखर, जिरं आणि मिरं एखादा फिरवून घ्यावं. त्यात चिरलेल्या मिरच्या, आलं आणि खोबरं घालून जाडसर वाटून घ्यावं. अशी कोरडी चटणी फ्रीजमध्ये ५-६ दिवस सहज राहू शकते. जेव्हा चटणी खायची असेल, तेव्हा त्यात हवं तेवढं पाणी किंवा दही घालून कालवावं. साधारण १-२ टेस्पून तेल गरम करावं. त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि चिमूटभर मिरचीच्या बिया घालून मस्त, खमंग फोडणी बनवावी. ही फोडणी एकदम चटणीवर न घालता प्रत्येक वेळेस चटणी खाताना त्यावर थोडी थोडी घ्यावी.

सिमला मिरचीचा ठेचा 
साहित्य : एक मोठी सिमला मिरची, ७-८ लसूण पाकळ्या, २-३ साध्या हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून जाडसर दाण्याचा कूट, मीठ, कोथिंबीर, फोडणीचं साहित्य, पाव टीस्पून साखर
कृती : वांगी भाजण्याच्या जाळीचा वापर करून सिमला मिरची, लसूण आणि मिरच्या थेट गॅसवर भाजून, चिरून घ्यावं. मिक्‍सरवर ओबडधोबड वाटून घ्यावं. २ टेबलस्पून तेलाची हिंग आणि जिरं घालून खमंग फोडणी करावी. त्यात मिरचीचं वाटण घालून २ मिनीट परतावं. त्यात मीठ, साखर, दाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालून उतरवावं. ठेचा आवडतो पण फार तिखट नको अशा लोकांसाठी हा ठेचा छान आहे.

पालकाचं रायतं
साहित्य : एक मोठी वाटी पालकाची पानं, एक वाटी दही, २ टेबल स्पून ताजी साय, कोथिंबीर, एक मिरची, मीठ, १ टीस्पून साखर, फोडणीचं साहित्य
कृती : पालकाची पानं बारीक चिरून हलकी वाफवून घ्यावीत. दही आणि साय एकत्र करून हॅण्ड बिटरने/बलून व्हिस्कने फेटून स्मूथ करून घ्यावं. त्यात थंड झालेला पालक, मीठ आणि साखर घालून ढवळावं. १ टेबल स्पून तेल गरम करून त्यात जिरं, हिंग आणि मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. फोडणी थंड झाली, की भरतावर घालावी. ढवळून त्यात कोथिंबीर घालावी. विशेषतः वेगवेगळ्या प्रकारच्या भाताबरोबर हे रायतं छान लागतं.

टोमॅटोची चटणी
साहित्य : दोन लाल टोमॅटो, २ टेबल स्पून तिळाचा कूट, ७-८ हिरव्या मिरच्या (कमी तिखट हवं असेल तर कमी मिरच्या वापराव्यात) २-३ कढीपत्त्याची पानं, पाव वाटी कोथिंबीर, मीठ, २ टीस्पून (किंवा जास्त) साखर, २ टेबल स्पून तेल, जिरं, हिंग
कृती : टोमॅटो, मिरच्या चिरून घ्याव्यात. तेल गरम करून त्यात हिंग, जिरं, मिरच्या आणि कढीपत्ता घालून परतावं. त्यात टोमॅटो घालून परतावं. टोमॅटोचा रस आटून मिश्रण कोरडं झालं, की त्यात मीठ, साखर घालून गॅस बंद करावा. थंड झालं, की मिक्‍सरमध्ये टोमॅटोचं मिश्रण, कोथिंबीर आणि तिळाचं कूट घालून जाडसर वाटावं. आवडीप्रमाणे कमी-जास्त तिखट-गोड करता येईल.

हेल्दी मिक्‍स कोशिंबीर
साहित्य : प्रत्येकी १ कांदा, टोमॅटो, गाजर, प्रत्येकी पाव वाटी मोड आलेली मटकी, कोथिंबीर आणि मेथी किंवा कांद्याची पात, २ टेबल स्पून जाडसर दाण्याचा कूट, २-३ मिरच्या, १ लिंबू, मीठ, १ टेबलस्पून साखर, फोडणीचं साहित्य
कृती : सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. गाजर किसून घ्यावं. कांदा - टोमॅटो - गाजर - मटकी - मेथी - कांद्याची पात - दाण्याचं कूट - मीठ आणि साखर हे सगळं व्यवस्थित मिक्‍स करावं. २ टेबलस्पून (किंवा आवडीप्रमाणे कमी) तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि मिरच्यांचे तुकडे घालून खमंग फोडणी करावी. फोडणी थोडी थंड झाली, की कोशिंबिरीवर घालावी. त्यात लिंबू पिळावं. कोथिंबीर घालून ढवळावी. अत्यंत चविष्ट ही कोशिंबीर लागते.

ट्विस्टेड काकडी कोशिंबीर
साहित्य : दोन काकड्या, ८-१० तुळशीची पानं, २ टेबल स्पून ओलं खोबरं, २ मिरच्या, कोथिंबीर, लिंबू, मीठ, साखर १ टीस्पून
कृती : काकडी बारीक चिरून किंवा चोचवून घ्यावी. मिरच्या लांब चिराव्यात. काकडी, मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, मीठ आणि साखर एकत्र करावं. त्यात तुळशीची पानं हातांनी तोडून घालावीत. लिंबू पिळावं. व्यवस्थित ढवळून घ्यावं.

टॅंगी सॅलड
साहित्य : एक लाल, पिवळी किंवा हिरवी सिमला मिरची, एक गाजर, १०० ग्रॅम पनीर, पाव वाटी बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर ड्रेसिंगसाठी दोन टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, एक टीस्पून अगदी बारीक चिरलेला लसूण, अर्धा टीस्पून मोहरीची डाळ, एक टेबलस्पून व्हिनेगर, एक टेबलस्पून मिरपूड, अर्धा टेबलस्पून साखर
कृती : अगदी थंड पाण्यात मोहरीची डाळ फेसून घ्यावी. त्यात ऑलिव्ह ऑईल, व्हिनेगर घालून फेसावं. मीठ, साखर, मिरपूड आणि लसूण घालून नीट ढवळून घ्यावं. सगळ्या भाज्या चिरून त्यात तयार ड्रेसिंग घालून व्यवस्थित ढवळावं. एखादं सूप किंवा सॅण्डविचबरोबर असं एखादं सॅलड खाल्लं तरी सहज पोटभरीचं होतं.

मेयॉनिज सॅलड 
साहित्य : एक वाटी तयार मेयॉनिज, प्रत्येक अर्धी वाटी वाफवलेले स्वीटकॉर्नचे दाणे, उकडलेले बटाटे, २-३ आईसबर्ग लेट्यूसची पानं, थोडीशी पार्सले, मीठ, प्रत्येकी १ टीस्पून साखर आणि मिरपूड
कृती : बटाटे बारीक चिरून घ्यावे. मेयॉनिजमध्ये बटाटे, कॉर्नचे दाणे, मीठ, साखर, मिरपूड आणि पार्सले घालून व्यवस्थित ढवळून घ्यावं. त्यात लेट्यूसच्या पानांचे हातानं तुकडे करून घालावे आणि मिश्रण अलगद ढवळावं. लेट्यूसची पानं अगदी ऐनवेळेस मिक्‍स करावीत म्हणजे ती कुरकुरीत राहातात.

थाउजंड आयलंड सॅलड
साहित्य : एक वाटी तयार थाउजंड आयलंड ड्रेसिंग, एक वाटी चायनीज कॅबेज, एक गाजर, २-३ टेबलस्पून डाळिंबाचे दाणे, पार्सले, १ मीठ, साखर
कृती : चायनीज कॅबेज बारीक चिरून घ्यावा. गाजर जाड किसणीने किसून घ्यावं. थाउजंड ड्रेसिंगमध्ये कॅबेज, गाजर, डाळिंबाचे दाणे आणि पार्सले घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. चव बघून हवं असेल तर मीठ, साखर घालावं. या ड्रेसिंगमध्ये भरपूर सीझनिंग फ्लेव्हर्स असल्यामुळे वेगळं काही घालावं लागत नाही. यात आवडीप्रमाणे रंगीत सिमला मिरची, सॅलडची पानं, बेबीकॉर्न, पनीर, चीज, चेरी, टोमॅटो असं विविध साहित्य वापरून अगदी झटपट सॅलड बनवता येतं. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या