चवदार शंकरपाळे

निशा गणपुले/लिमये 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
येता-जाता खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळे. गोड शंकरपाळ्यापासून तिखट शंकरपाळ्यांचे प्रकार या दिवाळीत नक्की करून पाहा...

पुडाचे शंकरपाळे
साहित्य : पाव किलो मैदा, १ मध्यम आकाराची वाटी लाल भोपळ्याचा उकडलेला गर, चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटी गुळाची पावडर (बाजारात मिळते), ५ मोठे चमचे रिफाइंड तेलाचे मोहन, तळणीसाठी कोणतेही वनस्पती तूप, अर्धी वाटी पिठी (तांदूळ पीठ किंवा कॉर्नफ्लोअर)
कृती : प्रथम मैद्यात चवीपुरते मीठ घालून त्यात वनस्पती तुपाचे वा रिफाइंड तेलाचे कडकडीत मोहन घालावे व ते पूर्ण मैद्याला चोळावे. हा मैदा भोपळ्याच्या गराने भिजवावा. पीठ अगदी घट्ट भिजवावे. किमान १ तास तरी गोळ भिजू द्यावा. झाकून ठेवावा. आता शंकरपाळी करताना मैदा गोळा मळून घ्यावा. तयार गोळ्याच्या ४ ते ५ मोठ्या लाट्या वा.... पेढे करुन घ्याव्यात. त्यातील एक.... पेढा घेऊन तेल लावलेल्या पोळपाटावर वा ओट्याला तेल लावून त्यावर फुलक्‍यासारखी पोळी लाटावी. तिच्यावर अगदी गरम तेल १ चहाचा चमचा घालून फिरवावे. त्यावर पिठी किंवा कॉर्नफ्लॉवर (मक्‍याचे पीठ) व्यवस्थित पसरावे. पोळीची अर्धी घडी करावी व तिच्यावर वरील प्रमाणेच तेल व पिठी पसरावी. पुन्हा घडी घालून अगदी पातळ पोळी लाटावी व आवडतील त्या आकाराचे शंकरपाळे कापून घ्यावेत. मंद आचेवर चांगले तळावेत. हे छान फुलतात व त्याला पुढे पदर सुटतात. गरम असतानाच त्यावर गुळाची पावडर भुरभुरावी व हलक्‍या हाताने शंकरपाळे हलवावेत. या शंकरपाळ्या वजनाने हलक्‍या होतात. भोपळ्यामुळे पौष्टिक व सात्त्विक होतात. रंगपण छान येतो. 
टीप :  पिठी साखर वापरली तरी चालते.

मैद्याचे नेहमीचे शंकरपाळे
साहित्य : एक वाटी वनस्पती तूप, १ वाटी साखर, दीड वाटी दूध, १ पाव (२५० ग्रॅम) चाळलेला मैदा, चवीनुसार मीठ, तळणीसाठी वनस्पती तूप.
कृती : दूध गरम करुन त्यात साखर विरघळून घ्यावी. परातीत वा थाळ्यात वनस्पती तूप (डालडा) फेसून घ्यावा. त्यात मीठ व साखर घातलेले थंड दूध घालून मावेल तेवढा मैदा मिसळावा व तो घट्ट भिजवावा. एक तासभर भिजवलेला मैदा (पीठ) झाकून ठेवावे. नंतर त्याच्या पोळ्या लाटून कातण्याने किंवा सुरीने शंकरपाळे कातून घ्यावेत. कढईत तेल तूप मंद आचेवर तापवून त्यात खमंग चॉकलेटी रंगावर तळावेत.

गुळाचे शंकरपाळे
साहित्य : अगदी बारीक चिरलेला गूळ, २ वाट्या चाळलेला मैदा, अर्धी वाटी तापवलेले वनस्पती तूप, अर्धी वाटी दूध, अर्धा चहाचा चमचा बेकिंग पावडर, थोडी जायफळ पूड, वेलची पावडर. अर्धा मोठा चमचा साजूक तूप, तळण्यासाठी वनस्पती तूप.
कृती : गुळात दूध घालून तो विरघळवून घ्यावा. मैदा, बेकिंग पावडर, १ चिमटी मीठ सर्व एकत्र चाळून घ्यावे. त्यात गरम तुपाचे मोहन घालून मैद्याला चांगले चोळून घ्यावे. नंतर विरघळलेले गुळाचे मिश्रण, जायफळ, वेलची पावडर घालून मळून घ्यावे. मळलेला गोळा १ तास तरी झाकून ठेवावा. नंतर त्याच्या मोठ्या लाट्या कराव्यात एक लाटी लाटून त्याला शंकरपाळीच्या आकारात कापून मंद आचेवर तापलेल्या तुपात खमंग तळावेत. या शंकरपाळ्या चवीला खूपच छान लागतात.

पाकातले शंकरपाळे
साहित्य : एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, १ वाटी साखर,  १ चहाचा चमचा वेलदोडा पूड, ८-१० केशराच्या काड्या, १ चिमटी मीठ, २ मोठे चमचे वनस्पती तुपाचे कडकडीत मोहन, १ चिमटी कुकिंग सोडा, तळणीसाठी वनस्पती तूप.
कृती : साखरेचा दोन तारी पाक करुन घ्यावा. मैदा, रवा, मीठ व सोडा एकत्र करुन घ्यावे. त्यात तुपाचे कडकडीत मोहन घालून व ते मिश्रणाला चांगले चाळावे. हे मिश्रण चांगले घट्ट भिजवून अर्धा तास झाकून ठेवावे. आता साखरेत अर्धी वाटी पाणी घालून चांगला २ तारी पाक करुन त्यात केशर काड्या व वेलची पूड घालावी. केसर पूड घातली तरी चालेल. मळलेल्या पिठाच्या जाडसर पोळ्या लाटून त्याचे हवे त्या आकाराचे पिठाच्या जाडसर पोळ्या लाटून त्याचे हवे त्या आकाराचे शंकरपाळे कापून तुपात तळून घ्यावेत व पाकात टाकावेत. असे सर्व शंकरपाळे करावेत. किंवा सर्व शंकरपाळे तसराळ्यात ठेवून वरुन गरम पाक ओतून २-३ वेळा वरखाली करावेत. खूप छान वेगळ्या चवीचे, स्वादिष्ट शंकरपाळे होतात. 
टीप :  पीठ दुधात भिजवले तर जास्तच छान, चविष्ट होतात.

चीज शंकरपाळे
साहित्य : एक वाटी चीज वड्यांचा कीस, १ वाटी तेल (मोहन) १ वाटी पाणी, चवीप्रमाणे मीठ, पाव किलो मैदा किंवा मैदा चाळणीने चाळलेली कणीक, तळणीसाठी तेल.
कृती : एका तसराळीत चीज कीस, तेल व पाणी एकत्र करुन त्यात चवीला मीठ घालावे. चीजमधेही मीठ असते. हे लक्षात ठेवूनच मीठ वापरावे. मिश्रण कालवावे आणि त्यात मावेल एवढा मैदा किंवा कणीक घालून पीठ घट्ट भिजवावे. हे पीठ अर्धा तास तरी झाकून ठेवावे. याच्या ३-४ मोठ्या लाट्या करुन त्या पातळ लाटून शंकरपाळे कातावेत. मंद आचेवर गुलाबी वा बदामी रंगावर तळावेत.

कापण्या 
साहित्य : एक वाटी किसलेला गूळ, जाडसर भाजून वाटलेली बडीशोप २ चहाचे चमचे, अर्धा चहाचा चमचा जायफळ पूड, सुंठ पूड, चवीला मीठ, २ मोठे चमचे खसखस पूड, २ चिमटी खायचा सोडा, तळायला तेल.
पीठे : दोन वाटी कणीक, प्रत्येकी १ चमचा सोयाबीन, नाचणी, मका, ज्वारी, जवस वगैरेपैकी दोन तीन पिठे.
कृती : गुळात अर्धी वाटी पाणी घालून गूळ विरगळवून घ्यावा. नंतर त्यात बडीशेप, सुंठ, जायफळ, खसखस पूड, मीठ, सोडा घालून घ्यावे. आता सर्व पिठे एकत्र करुन चाळून घ्यावीत. त्यात चार ते पाच मोठे चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालावे. सर्व कालवावे व तयार गुळात ही पिठे घालून पीठ घट्ट भिजवावे. हे तयार पीठ चांगले मळावे. नंतर हा मोठा गोळा घेऊन पाव इंच जाडीची पोळी लाटावी. त्यावर भाजलेली खसखस लावून परत लाटावी. शंकरपाळी लाटावी व गरम तेलात खमंग तळावीत.

कोकोनेट शंकरपाळे
साहित्य : एक वाटी नारळाचा चव, १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी चणाडाळ पीठ, पाव वाटी  कणीक (इतर कोणतेही पीठ वापरता येतील), ७ मोठे चमचे वनस्पती तुपाचे कडकडीत मोहन, तळायला वनस्पती तूप. दीड वाटी पिठीसाखर+थोडा किसलेला मऊ गूळ, चवीला मीठ, थोडी दालचिनी व सुंठ पूड. 
कृती : प्रथम सर्व पिठे एकत्र घेऊन त्यात मीठ, सुंठ व दालचिनी पूड घालून ते चाळून घ्यावे. आता एका पातेल्यात सर्व पीठ, चाळलेले मिश्रण घेऊन, त्यात तुपाचे कडकडीत मोहन घालून ते मिश्रणाला चांगले चोळून घ्यावे. नारळचव वाटून घालावा व मिश्रण घट्ट शिजवून अर्धा तास झाकून ठेवावे. आता हे पाळे गुळाचे हवे असतील तर पिठात गूळ मिसळून गोळा तयार करुन नेहमीप्रमाणे शंकरपाळे तळावेत. नाहीतर सर्व शंकरपाळे तळून झाल्यावर त्याच्यावरवर पिठी साखर शिवरावी (शिंपडावी). ते सर्व हलकेच खालीवर करावेत. 
टीप्स :     १. नेहमीच गोडाचे शंकरपाळे करताना त्यात फक्त वनस्पती तुपाचेच कडकडीत मोहन घालावे. 
        २. शंकरपाळे तळताना नेहमी वनस्पती तूपच वापरावे.
        ३. शंकरपाळी तळणीत १ मोठा चमचा साजूक तूप घातले असता खूप छान चव येते व मस्त सुवास येतो. 
        ४. शंकरपाळे पूर्ण थंड (गार) झाल्यावरच डब्यात भरून ठेवावेत.

मोडाच्या कडधान्यांचे शंकरपाळे
साहित्य : तीन वाट्या कणीक वा मैदा वा दोन्ही अर्धे अर्धे, मोडाचे पिवळे+हिरवे मूग, मोडाची मटकी तसेच उडीद, मसूर, नाचणी वा कुठलेही आवडीचे मोडाचे कडधान्य घ्यावे. २ मोठे चमचे आले+लसूण+हिरव्या मिरच्या, १०-१२ कढीपत्ता पाने, पुदिना पाने यांची पेस्ट, आवडीप्रमाणे मीठ, ७ मोठे चमचे तेलाचे कडकडीत मोहन, तळण्यासाठी रिफाइंड तेल.
कृती : प्रथम एका पातेल्यात कणीक वा मैदा वा दोन्ही एकत्र पिठे घेऊन त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालून पिठाला चांगले चोळून घ्यावे. मोड कडधान्यांची मऊ पेस्ट करुन घ्यावी. पिठात तयार पेस्ट, मसाला वाटण, मीठ घालून सर्व एकत्र कालवावे व मिश्रण घट्ट भिजवावे. जरूर असल्यास पाणी वापरावे. ते पीठ काही वेळ झाकून ठेवावे. करायला घ्यायचे वेळी गोळा चांगला मळून घ्यावा. त्याच्या चार पाच मोठ्या लाट्या करुन, त्या लाटून कातण्याने वा सुरीने शंकरपाळे कातून मंद आचेवर तपकिरी रंगावर खमंग तळावेत.

पंचरत्न पिठांचे शंकरपाळे
साहित्य : दोन वाट्या कणीक, २ मोठे चमचे जवस पीठ, ३ मोठे चमचे नाचणी पीठ, २ मोठे चमचे तांदूळ पीठ, २ मोठे चमचे सोयाबीन पीठ (आपल्याला हवी ती व हाताशी असतील अशी कोणतीही पाच पिठे घ्यावीत.) ७ मोठे चमचे तेलाचे मोहन, आवडीप्रमाणे तिखट+मीठ, १ चहाचा चमचा ओवा, १ मोठा चमचा भाजलेले देशी तीळ, तळण्यासाठी रिफाइंड तेल. 
कृती : एका पातेल्यात सर्व पिठे एकत्र करावीत. ती चाळून घ्यावीत. त्यातच तेलाचे अगदी कडकडीत मोहन घालून पिठाला चोळून, त्यात तिखट, मीठ, ओवा, तीळ घालून लागेल तसे पाणी घालून ते घट्ट भिजवावे. भिजवलेला तयार गोळा ठेवावा. तासाभराने गोळा मळून मऊ करावा व त्याच्या ४-५ लाट्या लाटून कातण्याने शंकरपाळे कातून गरम तेलात खमंग तळावेत. 
टीप : यासाठी मेथी, पालक, चवळी, लाल माठ, कोथिंबीर आवडेल ती पालेभाजी व आवडतील त्या फळभाज्या वा पल्प (प्युरी) घालून शंकरपाळी करता येतात.

कसुरी मेथीचे शंकरपाळे
साहित्य : पाव किलो मैदा, ३ मोठे चमचे चुरडलेली कसुरी मेथी, ७ मोठे चमचे रिफाइंड तेलाचे कडकडीत मोहन, आवडीप्रमाणे लाल तिखट व मीठ, थोडीशी हळद, १ मोठा चमचा देशी तीळ, तळण्यासाठी तेल. 
कृती : एका तसराळीत चाळलेला मैदा घेऊन त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालावे व ते मैद्याला चोळून घ्यावे. त्यात तिखट, मीठ, हळद, तीळ घालावे. तसेच कसुरी मेथी घालून हे सर्व मिश्रण एकत्र करावे आणि लागेल तेवढे पाणी घालून घट्ट पीठ भिजवून झाकून ठेवावे. तासाभराने पिठाचा गोळा चांगला मळावा व त्याच्या ३-४ मोठ्या लाट्या करुन लाटाव्यात. कातण्याने लहान किंवा मोठे शंकरपाळे कातावेत. कढीत तेल गरम करुन मंद आचेवर शंकरपाळे खमंग तळावेत. हिरवी मिरची, आले, लसूण, कढीपत्ता हे वापरले तरी चालेल. यात हळद घालू नये. नुसत्या कणकेचे केले तरी चालेल.

उकडीचे शंकरपाळे
साहित्य : दोन वाटी तांदळाचे पीठ, पाऊण वाटी पाणी, अर्धा चहाचा चमचा लोणी, चवीप्रमाणे मीठ, २ चिमटी हिंगपूड, अर्धा वाटी डाळिंब दाणे, झिरो नंबरची बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, नारळ, लिंबू रस हे सर्व आवडीप्रमाणे घ्यावे. २ मोठे चमचे मका पीठ वा कॉर्नफ्लॉवर. केळीची पाने, साजूक तूप.
कृती : प्रथम तांदूळ पिठीची आपण मोदकासाठी जशी उकड करतो तशी उकड करुन घ्यावी. ती खूप मळून घ्यावी. उकडीच्या ३-४ लाट्या करुन त्या पिठीवर लाटाव्यात. साधारण मोठ्या फुलक्‍या एवढी पोळी करुन तिचे शंकरपाळे कातावेत. आता हे शंकरपाळे केळीच्या पानावर ठेवून वाफवावेत. त्याआधी ते गार पाण्यात बुडवून (एकेक) लगेच काढून मग केळीच्या पानावर ठेवावेत व एक दणकट वाफ घ्यावी व दोन मिनिटांनी ते गार पाण्याचा हात लावून प्लेटमध्ये ठेवावेत.

शेंगदाण्याचे शंकरपाळे
साहित्य : भिजवलेल्या शेंगदाण्याचा सालीसह लगदा १ वाटी, तांदूळ पीठ १ वाटी, अर्धी वाटी बेसन, ३ मोठे चमचे कणीक वा इतरही आवडतील ती पिठे, १ चहाचा चमचा हिरवी मिरची+आले+लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, १ चहाचा चमचा भाजलेले देशी तीळ, १ चहाचा चमचा लिंबूरस, १ मोठा चमचा सर्व मिळून धने+जिरे+बडीशोप पूड, अर्धा चमचा हळद, तळायला तेल.
कृती : एका तरसाळ्यात शेंगदाणे लगदा घ्यावा. सर्व पिठे एकत्र करुन त्यात ४ मोठे चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून पीठ मिश्रणाला चोळून घ्यावे. व ही मिश्रण पिठे वरील लगद्यात घालावीत व बाकी सर्व घटक पण त्यात कालवून पाण्याने पीठ घट्ट भिजवून अर्धा तास झाल्यावर नेहमीप्रमाणे शंकरपाळी कापून, खमंग तळावीत. हे शंकरपाळे चार दिवसाच्यावर ठेवू नयेत. 
टीप :  नारळचव वापरुनदेखील वरीलप्रमाणे शंकरपाळे करता येतात.

टीप्स : १.    तिखट शंकरपाळ्यांना तेलाचेच मोहन वापरावे व रिफाइंड तेलातच ते तळावेत. 
    २.    तळणीचा कोणताही पदार्थ करताना प्रथम तेल अगदी मंद आचेवर तापवावे व नंतर आच मध्यम करावी. तेल खूप तापले तर आच बंद करुन, पुन्हा हीच पद्धत वापरावी. असे केल्याने तळणीचे पदार्थ आत पोटात तळले जाऊन छान खमंग होतात. पदार्थ मऊ पडत नाहीत व चांगले टिकतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या