खमंग चिवडा

राजश्री बिनायकिया 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळी आली, की करंज्या, लाडू, अनारसे इत्यादी पारंपरिक पदार्थ बनवले जातात. या गोड पदार्थाबरोबरच सर्वांचा आवडता, प्रिय तिखट पदार्थ म्हणजेच ‘चिवडा’. चिवडा हा प्रत्येक स्त्रीचा हातखंडा. करण्यास सोपा, चटकन होणारा. अशा या चिवड्याच्या पाककृती.

भाजके पोहे चिवडा
साहित्य : भाजके पोहे ५०० ग्रॅम, १ वाटी पंढरपुरी डाळ, दोन वाटी शेंगदाणे, १ वाटी सुक्‍या खोबऱ्याचे पातळ काप, पाव वाटी कढीलिंबाची पाने, अर्धी वाटी वाळवून पातळ कांद्याचे काप (आवडीनुसार), आमचूर पावडर १ टीस्पून, धने-जिरे पूड १ टेबलस्पून, १ टेबलस्पून गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, पिठीसाखर चवीनुसार, तेल दोन वाटी.
कृती : तेल गरम करुन त्यामध्ये कांदा, डाळी, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, कढीपत्ता वेगवेगळे तळून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात दीड वाटी तेल तापवून त्यात मोहरी, हळद घालून फोडणी करावी. फोडणी खाली उतरवून त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, मीठ, धणे-जिरेपूड घालावी. मिश्रण एकसारखे करावे. नंतर त्यामध्ये खोबरे, कांदा, शेंगदाणे, पंढरपुरी डाळ घालावी. परत मिक्‍स करावे. नंतर भाजके पोहे घालावेत. व्यवस्थित मिश्रण मिक्‍स करावे. त्यामध्ये पिठीसाखर व आमचूर पावडर घालावी. परत मिश्रण मिक्‍स करावे. गार झाल्यावर डब्यात भरावे.

पोह्याचा तळलेला चिवडा
साहित्य : जाड पोहे ५०० ग्रॅम, १ वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी पंढरपुरी डाळ्या, अर्धी वाटी सुक्‍या खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी काजू काप, अर्धी वाटी बेदाणे, पाव वाटी भाजलेले तीळ, प्रत्येकी १ टेबल स्पून धनेपूड - जिरेपूड, चवीनुसार तिखट मीठ, पिठीसाखर, आमचूर पूड १ टीस्पून (आंबट चव हवी असल्यास), तळण्यासाठी तेल, फोडणी साहित्य, (मोहरी, हळद, तेल) चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता पाव वाटी.
कृती : कढईत तेल तापवून त्यात पोहे तळायची गाळणीतून पोहे तळून घ्यावेत. त्याच तेलात शेंगदाणे, काजू, खोबरे काप, कढीपत्ता, तळून घ्यावे. बेदाणे नुसते तेलावर परतून घ्यावे. दुसरीकडे वाटीभर 
तेलात मोहरी, हिंग, हळद फोडणी करुन घ्यावी. त्यामध्ये तीळ, कोथिंबीर घालून परतावी. कोथिंबीर कुरकुरीत करावी. नंतर गॅस बंद करावा. धणे-जिरेपूड, मीठ, तिखट व इतर सर्व तळलेले पदार्थ घालून मिक्‍स करुन घ्यावी. त्यामध्ये पोहे घालावेत. व्यवस्थित मिक्‍स करावे. त्यात पिठीसाखर टाकावी. व्यवस्थित मिक्‍स करावी. आंबटपणा हवा असल्यास आमचूरपूड सुद्धा टाकावी. चिवडा मिक्‍स करावा. गार झाल्यावर डब्यात भरावा.

पातळ पोहे चिवडा
साहित्य : पाचशे ग्रॅम पातळ पोहे, १ वाटी पंढरपुरी डाळ, शेंगदाणे २ वाटी, १ वाटी सुक्‍या खोबऱ्याचे पातळ काप, पाव वाटी कढीपत्ता, प्रत्येकी धने-जिरे पूड १ टेबल स्पून, २ टेबल स्पून हिरव्या मिरचीचे तुकडे, भाजलेले तीळ अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, चवीनुसार मीठ, पिठीसाखर, पाववाटी काजू काप, तेल व फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम पोहे मंद आचेवर किंवा मायक्रोव्हेवमध्ये छान भाजून घ्यावेत. एक वाटी तेलात शेंगदाणे, डाळे, खोबऱ्याचे काप तळून बाजूला काढून ठेवावे. नंतर मिरचीचे तुकडे व कढीपत्ता त्याच तेलात कुरकुरीत तळून घ्यावा. त्या तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. नंतर त्यामध्ये तळलेले सर्व साहित्य, मसाले, मीठ, तीळ, खसखस, पिठीसाखर घालावी व पोहे घालावेत. मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करावे.

कढीपत्ता चिवडा
साहित्य : अर्धा किलो तळलेले जाड पोहे, २ ते ३ वाटी कढीपत्त्याची ताजी पाने, अर्धी वाटी हिरवी मिरचीचे बारीक तुकडे, दीड वाटी शेंगदाणे, चवीनुसार मीठ, पिठीसाखर, १ टीस्पून आमचूर पूड, तेल.
कृती : एक वाटी तेलात शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची तुकडे खरपूस तळून घ्यावेत. एका पातेल्यामध्ये  तळलेले पोहे, शेंगदाणे, मीठ, आमचूर पूड एकत्र करावे. मिरच्या आणि कढीपत्ता हाताने चुरुन चिवड्यामध्ये घालावा. हातानेच चिवडा व्यवस्थित मिक्‍स करावा. हा चिवडा चवीला छान लागतो.

कांद्याचा चिवडा
साहित्य : दोन वाटी तळून वाळवलेला कांदा, अर्धा किलो जाड पोहे, अर्धी वाटी खारे शेंगदाणे, ३ ते ४ टीस्पून कांद्याचा मसाला, अर्धी वाटी चिवडा मसाला, चवीनुसार मीठ, साखर, तळण्यासाठी तेल. (टीप - चिवड्या मसाल्यामध्ये मीठ असेल तर टेस्ट करुन मीठ वापरा)
कृती : पोहे तेलात तळून कागदावर टिपून घ्यावेत. फोडणीसाठी तेल गरम करुन त्यामध्ये शेंगदाणे व कांद्याचा मसाला घालून परतावा. आच बंद करुन त्यामध्ये चिवडा मसाला घालावा. ही फोडणी व पोहे एकत्र मिक्‍स करुन त्यामध्ये वरुन तळलेला कांदा व मीठ, साखर घालावे. चिवडा व्यवस्थित मिक्‍स करावा. 
(टीप - तळलेला कांदा आवडत असल्यास जास्त वापरला तरी चालेल.)

कोथिंबीर चिवडा
साहित्य : भाजके पोहे ५०० ग्रॅम, शेंगदाणे दोन वाट्या, पंढरपुरी डाळे १ वाटी, खोबरे काप १ वाटी, कोथिंबीर १ गड्डी, हिरवी मिरची तुकडे १ टेबल स्पून, चवीनुसार मीठ, साखर, आमचूर पूड १ टीस्पून, धनेपूड २ टीस्पून, तीळ १ टेबल स्पून.
कृती : प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरावी व कोरडी करावी. (कपड्यावर पसरुन ठेवावी). कोरडी झाल्यावर तेलात तळावी. गार झाल्यावर हाताने परत चुरावी. खोबरे काप, शेंगदाणे, डाळे तळून घ्यावेत. हिरवी मिरचीचे तुकडे तळावेत. तेलात मोहरी, हिंग टाकावे. नंतर तळलेले सर्व पदार्थ टाकावेत. पोहे टाकावे. धनेपूड व आमचूर पूड टाकावी. चवीनुसार मीठ, पिठीसाखर टाकावी व मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. शेवटी कोथिंबीर चुरुन पोह्यात टाकावी. मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करावे.
टीप : अशाच पद्धतीने पालक, पुदिना तळून हिरवागार चिवडा करता येईल.

मका चिवडा
साहित्य : मका पोहे ५०० ग्रॅम, शेंगदाणे दोन वाट्या, काजू काप १ वाटी, बडीशेप पूड १ टेबल स्पून, अर्धी वाटी बेदाणा, लाल तिखट, मीठ, पिठीसाखर, चवीनुसार, १ टीस्पून आमचूर पूड, तळण्यासाठी तेल, फोडणी साहित्य हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता.
कृती : तेल कढईत गरम करावे. गरम झाल्यावर थोडे थोडे मका पोहे टाकून तळावे. तळण्यासाठी गाळणी मिळते त्यांनी तळावेत. त्या गाळण्यात पोहे घालावे. पोहे फुलले,की तेल निथळून पोहे परातीत टाकावे. सर्व पोहे तळून झाल्यानंतर शेंगदाणे, काजू तळावे. थोड्या तेलावर बेदाणा परतून घ्यावेत. परातीत पोहे टाकून त्यामध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, बडीशेप पूड, पिठीसाखर, मीठ, लाल तिखट, आमचूरपूड, बेदाणे टाकावेत. मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करावे. अर्धी वाटी तेलाची फोडणी तयार करावी. मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता हे सर्व फोडणीत घालावे. फोडणी गार झाल्यावर परातीमधील मिश्रणात ही फोडणी घालावी. मिश्रण मिक्‍स करावे.

खाकरा चिवडा
साहित्य : कणीक १ वाटी, तीन वाटी तळलेले पापडाची चुरी किंवा भाजलेल्या पापडाची चुरी (पापड, उडीद किंवा मुगाचे), मीठ, लाल तिखट, पिठीसाखर चवीनुसार, आमचूर पावडर अर्धा टीस्पून, मोहन फोडणी (हिंग, हळद, मोहरी)
कृती : मीठ व मोहन घालून गव्हाची कणीक मळून घ्यावी. त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात. तवा गरम करावा. आच मध्यम करावी. त्यावर पोळी टाकावी. बाजूने तेल सोडून कुरकुरीत खाकरा बनवावा. खाकरे गार झाल्यावर त्याची चुरी करावी. खाकरा चुरीमध्ये पापड चुरी मिक्‍स करावे. तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करावी. खाकरा चुरीमध्ये फोडणी टाकावी. मीठ, पिठीसाखर, आमचूर पूड, लाल तिखट टाकावे. मिक्‍स करावे. खाकरा चिवडा तयार. 
टीप : आवडत असल्यास यामध्ये मुरमुरे चिवडा मिक्‍स करावा.

नॉयलॉन पोहा चिवडा
साहित्य : नॉयलॉन पोहे ४ वाट्या, पंढरपुरे डाळे अर्धी वाटी, शेंगदाणे १ वाटी, काजूकाप अर्धी वाटी, हिरवी मिरची क्रश केलेली १ टेबल स्पून, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, पिठीसाखर, तेल.
कृती : पोहे उन्हात वाळवून घ्यावेत. कढईत तेल गरम करावे. त्यामध्ये पोहे चांगले परतावे. फुलल्यावर ते खाली उतरावेत. मोठ्या परातीत पसरावेत. शेंगदाणे, डाळे, काजूकाप तळून घ्यावेत. थोड्या तेलात कढीपत्ता, हिरवी मिरची क्रश केलेली परतावी. आता परातीमध्ये असलेल्या पोह्यामध्ये सर्व पदार्थ मिक्‍स करावेत. व्यवस्थित मिश्रण मिक्‍स करावे.

भडंग
साहित्य : जाड ५०० ग्रॅम भडंग, २ वाटी उभा चिरलेला (पातळ) कांदा, लसूण १ टेबल स्पून बारीक चिरलेला, आवडीनुसार लाल तिखट, पिठीसाखर, मीठ चवीनुसार, शेंगदाणे १ वाटी, मेतकुट २ टेबल स्पून, कढीपत्ता, लिंबाचा रस अर्धा टेबल स्पून, 
फोडणी साहित्य - मोहरी, हळद, धने-जिरेपूड १ टेबल स्पून, तेल.
कृती : प्रथम उन्हात भडंग तापवून चाळून घ्यावे. मोठ्या पातेल्यात किंवा कढईत तेल तापवून कांदा सोनेरी रंगावर तळून घ्यावा. त्याच तेलात लसूण तळून घेवून बाजूला काढून ठेवावे. शेंगदाणे तळून निथळून घ्यावे. उरलेल्या तेलात मोहरी, हळद, कढीपत्ता घालावा. लसूण, कांदा घालावा. लिंबाचा रस घालावा. १ मिनिटाने तिखट, मीठ, पिठीसाखर, भडंग घालून परतावा. मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करावे. गॅस बंद करुन खाली उतरवावे. नंतर मेतकुट घालावे. परत मिक्‍स करावे.तिखट, आंबटगोड, मसालेदार भडंग तयार. भडंग गार झाले, की हवाबंद डब्यात भरावे.

नाशिक चिवडा
साहित्य : भाजके पोहे ५०० ग्रॅम, शेंगदाणे २ वाटी, पंढरपुरे डाळे १ वाटी, कांद्याचे वाळवलेले काप १ वाटी, ७ ते ८ लसूण पाकळ्या, ३ ते ४ तळलेली आमसुले, पिठीसाखर, लाल तिखट, मीठ चवीनुसार, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, १ वाटी तेल. धने, जिरे, शहाजिरे, बडीशेप, मिरे, लवंग, तीळ प्रत्येकी अर्धा टेबलस्पून, तमालपत्र ३ ते ४.
कृती : धने, शहाजिरे, लवंग, तमालपत्र, बडीशेप, तीळ, मिरे थोड्या तेलात परतून भाजून घ्यावे. नंतर मिक्‍सरवर त्याची बारीक पूड करावी. तेल तापवून त्यात वाळलेले कांद्यांचे काप तळून कुरकुरीत काढावेत. त्या तेलात दाणे, डाळे, कढीपत्ता तळावा. नंतर त्याच तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. लसूण घालावा. आच बंद करावी. फोडणी खाली उतरवा. नंतर लाल तिखट, मीठ, वाटलेली मसाला पूड व आमसूल पूड व भाजके पोहे घालावेत. मंद आचेवर परतावे. नंतर शेवटी डाळ, शेंगदाणे, कांदा घालावा. गोड होईल इतकी पिठीसाखर (चवीनुसार) घालावी. परत चिवडा मिक्‍स करावा. गार झाल्यावर डब्यात भरावा.

मसूर चिवडा
साहित्य : अडीचशे ग्रॅम मसूर (आख्खे), १ वाटी शेंगदाणे, १ वाटी सुक्‍या खोबऱ्याचा किस, चवीनुसार मिरची पूड, जिरेपूड, मीठ, पिठीसाखर, तळण्यासाठी तेल. 
कृती : रात्री मसूर भिजत घालावी. सकाळी चाळणीत उपसून निथळत ठेवावी. नंतर एका कपड्यात पुरचुंडीप्रमाणे बांधून ठेवावी. त्याला मोड येतील. नंतर तेल तापत ठेवावे. त्यामध्ये पोहे तळायची गाळणी ठेवून त्यामध्ये थोड्या थोड्या मसूर तळावेत. शेंगदाणे भाजून घ्यावेत. साले काढून ओबडधोबड कूट करावा. खोबरे किस भाजून घ्यावा. तळलेले मसूर दाण्याचे कूट, खोबरे कीस, चवीनुसार मिरचीपडू, जिरेपूड, पिठीसाखर, मीठ घालून व्यवस्थित मिक्‍स करावे.

चिवडा उत्तम होण्यासाठी टिप्स

  • चिवड्यासाठी लागणारे पोहे, चुरमुरे, भडंग इत्यादी नीट निवडून घेऊन उन्हात तापवून वापरावे. चिवडा कुरकुरीत होतो. 
  • सर्व तयारी अगोदर करुन ठेवावी. उदा. शेंगदाणे सोलणे, खोबऱ्याचे काप, कांद्याचे वाळवलेले पातळ काप.
  • चिवडा करताना सर्वात शेवटी पिठीसाखर घालावी. आधी घातली तर खडे कडक होतील. 
  • पोहे चिवड्यात लाल तिखट घालायचे असल्यास पोहे, भडंग, चुरमुरे इत्यादीवर घाला. फोडणीत घातले तर फोडणी करपते. 
  • खोबऱ्याचे पातळ काप करण्यासाठी खोबरे फ्रीजमध्ये ठेवून मग पातळ काप करावे. 
  • पोहे तळताना गॅस मोठा व तेल एकदम गरम करावे. म्हणजे पोहे छान फुलतात व कुरकुरीत लागतात.
  • पोहे भाजून चिवडा करताना पोह्याबरोबर प्रत्येकवेळी चिमूटभर मीठ घालून भाजावे. कुरकुरीत भाजले जातात. पोहे आकसणार नाहीत. 
  • पोह्यात पुदिना, कोथिंबीर पूड वापरायची असेल तर अगोदरच तयार करुन ठेवावी. 
  • चिवडा पटकन खारट होतो. त्यामुळे मीठ बेतानेच घालावे. 
  • चिवड्यात तळलेला कांदा वापरायचा असेल तर कांदा पातळ चिरून उन्हात थोडा वाळवून घ्यावा व नंतर तळून ठेवावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या