भाताची नावीन्यपूर्ण पाककृती

रेवा कुलकर्णी 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
जेवणाची सुरवात वरण भात व वरती लोणकढी तूप आणि मीठ-लिंबाने झाली, तर जेवणाची लज्जत हमखास वाढते. भाताचे प्रकार प्रांतोप्रांती बदलतात. पुलाव, बिर्याणी या लोकप्रिय प्रकारांबरोबरच नारळी भात, खिमट असे प्रकारही आवडीने चाखले जातात. तृप्ती देणाऱ्या भातांचे चविष्ट प्रकार!

फ्रूट कोकोनट पुलाव
साहित्य : बासमती तांदूळ (इंडिया गेट) दोन वाटी, सफरचंद एक, अननस एक, सीताफळ एक, खोवलेलं ओलं खोबरं एक वाटी, गूळ चिरून/ किसून साधारण खोबऱ्याएवढा (साखर घातली तरी चालेल. खोबरे एक वाटी, साखर पाऊण वाटी), काजू-बेदाणे-पिस्ते-टुटीफ्रुटी अर्धी वाटी, रिफाइंड तेल किंवा तूप अर्धी वाटी, लवंगा ८, जाड बुडाचे पातेले
कृती : तांदूळ अर्धा तास भिजवून निथळून ठेवावेत. सफरचंदाच्या उभ्या फोडी करून घ्यावात. अननसाच्या चकत्या गाभा काढून, डोळा काढून घ्याव्यात. सीताफळ वाटीभर दुधात भिजत घालावे. सगळ्या बिया काढाव्या व गर आणि दूध मिक्‍सरला फिरवून घ्यावा. खोबऱ्याचे गोड सारण बनवून घ्यावे. (खोबरे+ गूळ/ साखर गरम करून मोदकाप्रमाणे सारण बनवावे. वेलची घालावी.) गॅसवर जाड बुडाचे पातेलं ठेवावे. तूप/ तेल घालून गरम होऊ द्यावे. तांदूळ घालून साधारण ३ ते ४ मिनिटे परतावे. आता खोबऱ्याचे सारण घालावे आणि साडेतीन वाटी पाणी घालून भात शिजवून घ्यावा. भात गरम असतानाच परातीत काढावा. आता तळाशी परत पातेल्यात चमचाभर तूप घालून त्यात भाताचा जाडसर थर द्यावा. पातेलं गरम करू नये, आता सीताफळाचा गर ओतावा वरून अननस व सफरचंदाची सजावट करावी (अननसाचे गोल काप लावावे व आत सफरचंदाच्या फोडी लावाव्यात, उलट केले तरी चालेल. काजू, बेदाणे, पिस्ते व टुटीफ्रुटी घालावी. परत दुसरा थर भाताचा द्यावा. अशाप्रकारे एकावर एक थर द्यावे व गॅसवर दहा मिनिटे तवा गरम करून घ्यावा. त्यात हे पातेले ठेवावे व एक वाफ द्यावी. (साधारण ५ मिनिटे) नंतर ३० मिनिटे भात तसाच राहू द्यावा.

सोया चंक्‍स बिर्याणी
साहित्य : बासमती तांदूळ दोन वाटी, सोया चंक्‍स एक वाटी, कांदा एक मोठा उभा चिरून, आलं+ लसूण+ मिरची - बारीक वाटून एक मोठा सूपचा चमचा, कोथिंबीर एक वाटी बारीक चिरून, तमालपत्र दोन पान, लवंग - दालचिनी -चक्रीफूल - वेलदोडे - प्रत्येकी ४ - २ - १ - ४ असे घ्यावे. जिरे चमचाभर, कांदा दोन मोठे तेलात कुरकुरीत तळून रिफाइंड तेल किंवा तूप अर्धी वाटी, जाड बुडाचे पातेले, मीठ चवीनुसार.
कृती : तांदूळ धुवून निथळून ठेवावे. सोया चंक्‍स आलं+ लसूण+ मिरची यांचे वाटण लावून साधारण बुडतील एवढ्या पाण्यात भिजवावे. सोया चंक्‍स मऊ झाल्यावर गॅसवर जाड बुडाचे पातेले ठेवून गरम झाल्यावर त्यात तेल/ तूप घालावे. जिरे घालून परतावे. तमालपत्र, लवंग, दालचिनी, चक्रीफूल, वेलदोडे घालून परतून घ्यावे २ ते ३ मिनिटे. आता तांदूळ घालून चार ते पाच मिनिटे परतावे. आता सोयाचंक्‍स घालावा व परतून घ्यावे. उरलेला हिरवा मसाला व साडेतीन वाटी पाणी व मीठ घालून भात शिजवून घ्यावा. वरून हिरवी कोथिंबीर व तळलेला कांदा पेरावा. भाकरीच्या जेवणात मूद पाडून सजवावे.

मसाले भात
साहित्य : बासमती तांदूळ दोन वाट्या, जाड बुडाचे पातेले, अर्धी वाटी मटार/ हिरवे वाटाणे, एक-दोन (काळी लहान) वांगी, बटाटा एखादा आवडत असल्यास एखादा, गोडा मसाला दीड चमचा, हिंग-मोहरी - हळद - मीठ - साखर/ गूळ चवीनुसार, लिंबू अर्धे, तेल/ तूप २ चमचे, कोथिंबीर - खोबरे एक वाटी, कढीपत्ता अर्धी वाटी.
कृती : तांदूळ भिजवून - निथळून घ्यावे. पातेले गॅसवर ठेवावे. त्यात दोन मोठे चमचे तूप/ तेल घालावे. तेल गरम होताच मोहरी घालावी. मोहरी तडतडताच कढीपत्ता घालावा. त्यात वांगी/ बटाट्याचे उभे काप घालावे. परतावे, त्यात हिंग हळद घालावी. काप परतून घ्यावे. आता तांदूळ घालावा. साधारण पाच ते सात मिनिटे मंद आचेवर परतावे. साडेतीन वाटी पाणी घालावे. मीठ + साखर चवीनुसार (एक चमचा प्रत्येकी) घालावा. गोडा मसाला घालावा. ढवळावे. भात शिजू द्यावा. पाणी आटलं आणि भात शिजला की मटार घालावे. एकदा हलवावा. गच्च बसवावा. भात झाकून ठेवावा. गॅस बंद करावा. १५ मिनिटे तसाच ठेवावे. ओलं खोबरे + बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने मूद सजवावी. तुपाची धार सोडावी. श्रीखंड पुरीच्या जेवणात आस्वाद घ्यावा. साधारण चार जणांना पुरतो.

गुलाब - मोगरा डिलाइट 
साहित्य : गुलाबाचे फूल/ तयार गुलकंद दीड वाटी, बासमती तांदूळ दोन वाट्या, मोगऱ्याची फूल दोन वाटी, काजू+ पिस्ते अर्धी वाटी, तूप पाव वाटी, मीठ चवीनुसार, जाड बुडाचे पातेले
कृती : साडेतीन वाट्या तांदूळ पाणी व मीठ घालून शिजवून घ्यावे. भात परातीत काढावा. पातेल्यात चमचाभर तूप घालावे. भाताच्या एका भागात गुलकंद कालवावा. एका भागात मोगऱ्याची फूल देठ काढून मिक्‍सरला फिरवून घ्यावी. थोडे पाणी घालून परत फिरवावी. आता भातात मिसळावे. पातेल्यात एक थर गुलकंदाचा त्यावर काजू-पिस्ते लावावे. एक थर गुलकंदाचा त्यावर काजू-पिस्ते लावावे. अशा प्रकारे थर लावावे. तवा २० मिनिटे गरम करावा. त्यात पातेले ठेवावे. दहा मिनिटे गरम करावा. त्यात पातेले ठेवावे. दहा मिनिटे ठेवावे. वाफ येऊ द्यावी. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवावे.

कॅप्सिकम राइस
साहित्य : ढबू मिरची सात ते आठ, बासमती तांदळाचा भात दीड वाटी, खोबरे+ कोथिंबीर+ मिरेपूड+ मीठ+ साखर - एक वाटी, बटर ५० ग्रॅम.
कृती : ढबू मिरची आतून बिया काढून स्वच्छ करून घ्यावी. वरची चोपण ठेवावी. मीठ घालून शिजवलेल्या भातात खोबरे+ कोथिंबीर+ मिरपूड+ मीठ+ साखर याच मिक्‍सरला फिरवलेले वाटण मिक्‍स करावे. भात हलवून घ्यावा. प्रत्येक ढबूत हा भात भरावा. वरून चमचाभर बटर लावावे. टोपण लावावे. ओव्हन १० मिनिटे १७० अंश प्रीहीट करावे. आता त्यात ढबू ठेवावा. साधारण सात ते आठ मिनिटे १७० ते १८० अंश तापमान ठेवावे. बाहेरून नरम होताच काढावा. केचप किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावे. साधारण तीन ते चार जणांना पुरतो.

चीज जिरा राइस
साहित्य : बासमती तांदूळ दोन वाटी, जाड बुडाचे पातेले, जिरे पाव वाटी (पाव), तूप पाव वाटी, मीठ चवीनुसार (२ चमचे), मिरेपूड एक चमचा, लिंबू अर्धे, चीज पार्मीजीन १०० ग्रॅम + मॉझेरेला १०० ग्रॅम, बेसील (मोठ्या पानांची तुळस) १० पान फ्रेश असल्यास - सुकवलेली असल्यास चमचाभर चुरा (बाजारात मिळते.)
टीप : प्रोसेस चीज वापरले तरी चालेल पण त्यात थोडे चेडर चीज मिसळावे (प्रोसेस १५०+ चेडर ५० ग्रॅम) प्रमाण घ्यावे.
कृती : तांदूळ धुवून निथळून ठेवावे. जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवून तूप घालून गरम करावे. मंद आचेवर परतावे. (जिरे लाल करू नयेत.) खमंग वास येताच त्यात तांदूळ घालावा. पाच मिनिटे परतावे. मीठ, मिरपूड घालावी. परतावे. साडेतीन वाट्या पाणी घालून लिंबू पिळून शिजवून घ्यावे. भात परातीत काढावा. पातेल्यात चमचाभर तूप घालावे. त्यावर भाताचा थर लावावा. त्यावर पार्मीजान व मॉजेरेला चीज किसून पसरावे. परत भाताचा थर लावावा. चीज किसून पसरावे. तवा दहा मिनिटे गरम करावा. त्यावर पातेले ठेवावे. दहा मिनिटे वाफ येऊ द्यावी. चीज सेट होऊ द्यावे. गॅस बंद करावा. रायत्याबरोबर सर्व्ह करावे.

मुगाची खिचडी
साहित्य : बासमती तांदूळ/ आंबेमोहोर/ इंद्रायणी मऊ होणारा कोणताही सुवासिक तांदूळ दोन वाटी, मूगडाळ विनासाल पावणेदोन वाटी, कांदा एक मोठा (पातळ उभे काप करून), आलं + लसूण वाटण दोन चमचे, मिरची बारीक चिरून तीन-चार, गोडा मसाला एक चमचा, तेल- तूप पाव वाटी, साखर + मीठ चवीनुसार, जिरे एक चमचा, लिंबू अर्धे, जाड बुडाचे पातेले
कृती : तांदूळ धुवून निथळून ठेवावे. साधारण १५ मिनिटे डाळ भिजत पातेले गॅसवर ठेवून तेल-तूप एकचतुर्थांश गरम करून घ्यावे. जिरे घालावे. आवडत असल्यास मोहरी घालावी. मिरची घालावी. मिरची परतून झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालावी. तीन ते चार मिनिटं परतावी. साधारण सात ते आठ मिनिटं मंद आचेवर परतून झाल्यावर तांदूळ घालावा व पाच मिनिटे परतून घ्यावे. चार वाटी पाणी घालावे. साखर + मीठ घालावे. गोडा मसाला घालून ढवळावे. एक उकळी येऊ द्यावी. लिंबू पिळावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. खिचडी मऊ शिजवावी. गोड लिंबू लोणचे, पापड याबरोबर खिचडीवर तूप घालून खायला द्यावे. (कांदा लसूण घातला नाही तरी चालेल)

तिरंगी बिर्याणी 
साहित्य : बीट एक साल काढून उकडून, बासमती तांदूळ, एक पालक जुडी, गरम पाण्यात काढून (ब्लांच), एक पुदिना जुडी निवडून वाटून , तीन ते चार कुरकुरीत तळलेले तळलेला कांदा, फ्लॉवर एक वाटी, मटार अर्धी वाटी, फरसबी, स्नेक बी प्रत्येकी अर्धी वाटी. सर्व भाज्या हलक्‍या उकडून घ्याव्या, गीर शिजवू नका. जिरे एक चमचा. मसाला - तमालपत्र दोन पाने, हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट दोन चमचे, मीठ चवीनुसार, गरम मसाला पावडर एक चमचा, कोथिंबीर एक वाटी बारीक चिरून, केशर/ खायचा केशरी रंग, जाड बुडाचे पातेले, तूप अर्धी वाटी
कृती : तांदूळ धुवून निथळून ठेवावे. बीट उकडून मिक्‍सरला फिरवून घ्यावे. ब्लांच पालक मिक्‍सरला फिरवून घ्यावे. पुदिना+ मिरची+ लसूण+ आलं मिक्‍सरला वाटून घ्यावे व पालकाच्या रसात मिसळावे. जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवावे. त्यात तूप घालावे. तूप गरम होताच जिरे घालावे. तमालपत्र घालून तांदूळ परतून घ्यावा. साडेतीन वाटी पाणी घालून भात मीठ घालून शिजवून घ्यावा. भात परातीत काढून घ्यावा. बीटाच्या गरात गरम मसाला मिसळून घ्यावा. भाताचे तीन समान भाग करावे. केशर गरम पाण्यात भिजवावे. खायचा रंग असल्यास एका भागात मिसळावा. एका भागात पालकाचे मिश्रण मिसळावे. पातेल्यात चमचाभर तूप घालावे. त्यात बीटाचा थर लावावा. त्यावर भाज्या पसराव्यात. त्यात तूप घालावे. त्यावर मीठ घालावे. आता पालकाचा थर लावावा. त्यावर परत भाज्या पसराव्यात. तूप घालावे. मीठ भुरभुरावे. त्यावर केशराचा थर पसरावा. थर भाज्या तूप व तळलेला कांदा पसरावा. तवा दहा मिनिटे गरम करून घ्यावा. त्यात पातेले ठेवावे. एक वाफ येऊ द्यावी. साधारण दहा मिनिटे गोडाच्या जेवणात सर्व्ह करावे. सुंदर मूद पाडावी. साधारण ५ जणांना पुरतो.

पनीर पुलाव 
साहित्य : बासमती तांदूळ दोन वाट्या, पनीर २०० ग्रॅम, मटार एक वाटीभर, काजू अर्धी वाटी, मिरेपूड दोन चमचे, गोड दही एक वाटी, पिस्ते पाव वाटी, जाड बुडाचे पातेले, तूप अर्धी वाटी, जिरे चमचाभर, मीठ
कृती : तांदूळ भिजवून निथळून ठेवावे. पनीरचे चौकोनी काप करून घ्यावे. जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवावे. त्यात अर्धी वाटी तूप घालावे, जिरे घालावे. तांदूळ घालून परतून घ्यावे. साडेतीन वाटी पाणी घालून भात शिजवून घ्यावा. गरम भात परातीत काढावा. पातेल्यात एक चमचा तूप घालावे. पातेले गरम करू नका. भातात दही मिसळून घ्यावे. आता पातेल्यात एक थर भाताचा लावावा. त्यावर मटार व पनीरचा थर लावावा. असे एकावर एक थर लावावे. सर्वांत शेवटी काजूचे गार्नीशिंग करावे. दहा मिनिटे तवा गरम करावा. त्यात पातेले ठेवावे आणि एक वाफ द्यावी. साधारण सात ते आठ मिनिटे गॅस बंद करावा. तीस मिनिटे तसाच ठेवावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या