फराळाची सोपी पद्धत

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
घरापासून लांब आहात? दिवाळीत घरच्या फराळाची आठवण येते? पण तुम्हीही फराळातील एखादा पदार्थ करू शकता. चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, करंजी करण्याची सोपी पद्धती... तुम्हाला नक्की जमेल, करू तर बघा!

चिवडा
साहित्य : चार वाट्या पातळ पोहे, पाऊण वाटी तेल, अर्धी वाटी शेंगदाणे, १०-१२ काजू, १०-१२ बदाम, दोन टेबलस्पून खोबऱ्याचे पातळ काप, अर्धी वाटी डाळ्या, दोन-तीन हिरव्या मिरच्या, १५-२० कढीलिंबाची पाने, चिमूटभर हिंग, एक चमचा हळद, एक चमचा तिखट, १चमचा खसखस, एक चमचा तीळ, एक ते दीड चमचा मीठ, दीड चमचा साखर, पाव चमचा सायट्रिक ॲसिड. 
कृती ः पातळ पोहे चाळून निवडून स्वच्छ करून घ्यावे. एका मोठ्या कढईत तेल तापत ठेवून त्यात प्रथम काजू बदामी रंगावर तळून घ्यावेत व पोह्यांवर टाकावे. त्यानंतर बदाम तळून घ्यावेत व पोह्यांवर टाकावेत. या क्रमाने, शेंगदाणे, डाळ्या, हवे असल्यास खोबऱ्याचे काप तळून घ्यावे. हिरव्या मिरच्या चिरून थोड्या पंख्याखाली तास-दोन तास सुकवून तेलात कुरकुरीत तळून घ्याव्यात. कढीलिंबाची पानेपण कुरकुरीत तळून काढावी. साखरेत सायट्रिक ॲसिड घालून मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावे. आता कढईतल्या तेलात मोहोरी घालून फोडणी करावी. मोहोरी फुटली की हिंग, तीळ व खसखस घालून परतावे. गॅस बंद करून एक मिनिटाने त्यात हळद व तिखट घालून तेल थंड होऊ द्यावे. तेल पूर्ण थंड झाल्यावर त्या फोडणीत पोहे, तळून घेतलेले सर्व जिन्नस, मीठ व बारीक केलेली साखर व सायट्रिक ॲसिड घालून एकत्र करून तेल सगळ्या पोह्यांना लागेपर्यंत ढवळावे. पंधरा मिनिटांनंतर गॅस सुरू करून आच अगदी मंद/मध्यम ठेवून चिवडा सतत सराट्याने अथवा झाऱ्याने परतत राहावा. साधारण १५ मिनिटे परतत राहिल्यावर चिवडा परतताना हलका वाटू लागेल. एखादा पोहा बोटाच्या चिमटीत पकडून वाकवून तोडून पाहावा. कटकन तुटला तर चिवडा तयार झाला असे समजावे किंवा हातावर चमचाभर चिवडा घेऊन खाऊन पाहावा. कुरकुरीत लागला तर चिवडा तयार झाला असे समजावे व गॅस बंद करून कढईवर एखादा मोठा कागद पसरून चिवडा थंड होऊ द्यावा. पूर्ण थंड झाला की चिवडा आणखी कुरकुरीत होईल तो लगेच हवाबंद डब्यात भरून ठेवावा. 
टीप्स : 

 • पातळ पोहे कडक उन्हात दोन दिवस वाळवले तरी कुरकुरीत होतात. मग फार भाजायची गरज पडत नाही. 
 • नागपूरसारख्या कमी आर्द्रता असलेल्या गावांमध्ये पोहे आधी भाजून किंवा उन्हात वाळवून मग फोडणीत घालतात. पण मुंबईला हवेत आर्द्रता जास्त असल्याने नुसते भाजायला घेतले तर पोहे चिमतात व कडकडीत होतात. त्यामुळे आधी फोडणीत मिसळून पोहे भाजले जातात म्हणजे छान कुरकुरीत चिवडा तयार होतो. 
 • चिवड्यात मुरमुरेही छान लागतात. चिवडा भाजून कुरकुरीत होत आला, की मग त्यात हवे तर कुरमुरे घालावे व चांगले परतून गॅस बंद करावा.

शंकरपाळे

साहित्य :  चार वाट्या मैदा, एक वाटी तूप, १ वाटी दूध, १ वाटी साखर, अर्धा चमचा मीठ व तळण्यासाठी ३-४ वाट्या तेल अगर तूप. 
कृती ः एका पातेल्यात एक वाटी दूध, एक वाटी साखर व एक वाटी तूप घेऊन उकळी आणावी. दूध फाटल्यासारखे दिसेल त्याची काळजी करू नये. आता या मिश्रणात अर्धा चमचा मीठ व तीन वाट्या मैदा घालून छान मिसळून घ्यावे. या मिश्रणात उरलेल्या मैद्यापैकी जितका मैदा लागेल तेवढा मैदा घालून घट्ट गोळा मळावा व गोळा झाकून ठेवावा. अर्ध्या तासाने गोळा मळून त्याच्या जाडसर पोळ्या लाटून कातणीने हव्या त्या आकाराचे शंकरपाळे कापून घ्यावेत. दुसरीकडे कढईत ३-४ वाट्या तेल किंवा तूप गरम करत ठेवावे. तेल/तूप गरम झाले, की शंकरपाळ्याचा तुकडा त्यात टाकून पाहावा. लगेच वर आला तर तेल गरम झाले आहे हे समजावे. आता आच मध्यम करावी व २०-२२ शंकरपाळे तेलात तळायला टाकावेत. झाऱ्याने वर खाली हलवत हलवत बदामी रंगावर शंकरपाळे तळून घ्यावेत. थंड झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. 
टीप्स : 

 • पोळ्या लाटताना फार जाड लाटू नयेत. घडीच्या पोळीसाठी लाटतो तितपतच जाड लाटावे. मैदा असल्याने कापताना व उचलेपर्यंत शंकरपाळे आक्रसतात व जाड होतात. 
 • तळण मंद किंवा मध्यम आचेवर केले तरच शंकरपाळे खुसखुशीत होतात. नाहीतर जास्त आच ठेवली तर शंकरपाळे वरून लाल झाले तरी आतून मऊ होतात. 
 • हे शंकरपाळे सहसा बिघडत नाहीत. अगदी सोपे आहेत. 
 • वरील साहित्यात साधारण ६०० - ६५० ग्रॅम शंकरपाळे होतील.

बेसनाचे लाडू 
साहित्य : चार वाट्या बेसन (डाळीचे पीठ), दोन वाट्या साजूक तूप, ३ वाट्या साखर, १५-२० वेलदोडे, १५-२० काजू. 
कृती ः गॅस मंद आचेवर पेटवून त्यावर एका जाड कढईत दीड वाटी साजूक तूप घ्यावे. त्यात चार वाट्या बेसन टाकून सतत हलवत सराट्याने तळापासून परतावे. साधारण १०-१२ मिनिटे परतल्यावर पिठाचा रंग बदलू लागेल व तूप सुटायला लागून पीठ पातळ होऊ लागेल. पीठ पातळ न झाल्यास एका वेळी एक चमचा तूप घालून परतावे. पीठ पातळ झाले, की भराभर परतावे कारण ते जळू शकते. पिठाचा घमघमाट सुटला व पीठ चांगले लालसर होऊ लागले की गॅस बंद करून कढई गॅसवरून खाली उतरवावी व लगेच पिठात अर्धी वाटी दूध घालावे व हलवावे. चुर्र आवाज करत दूध लगेच आटून जाईल व पिठाचे तापमान कमी होऊन पीठ लाल होण्याला अटकाव होईल. अधूनमधून पीठ हलवत राहावे. आता मिक्‍सरच्या लहान भांड्यात वेलदोडे सोलून त्याचे दाणे टाकावे व त्याबरोबर चार चमचे साखर घालून बारीक पूड करून घ्यावी. बाकी साखरेचीही पिठीसाखर करून घ्यावी. हाताने मळण्याइतके गार झाले, की पिठात ही पिठीसाखर व वेलदोडे पूड घालून खूप मळावे. एक काजू बाहेरच्या बाजूला लावून लाडू वळावे. मध्यम आकाराचे साधारण २०-२२ लाडू या साहित्यात होतील. 
टीप्स : 

 • पीठ जितके खमंग भाजले जाईल तितका लाडू चविष्ट होतो. 
 • गरमीमुळे लाडू सैल झाले आहेत असे वाटले तर थोडावेळ गोळा फ्रीजमधे ठेवावा किंवा थोडे बेसन कोरडेच भाजून त्यात मिसळावे. म्हणजे लाडू छान बांधता येतील. 
 • फूड प्रोसेसरमध्ये खूप मळला तरी लाडू छान मऊ लुसलुशीत होतो. खूप मळणे महत्त्वाचे. 
 • लाडू खूपच गोड आवडत असतील तर आणखी एक वाटी पिठीसाखर त्यात घालावी.

भाजणीची चकली 
साहित्य :
भाजणीसाठी - चार वाट्या तांदूळ, २ वाट्या हरभऱ्याची डाळ, १ वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, २ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जिरे. 
कृती ः तांदूळ धुऊन निथळून एखाद्या स्वच्छ कापडावर सुकत ठेवावे. एकेक डाळ कढईत घालून मध्यम आचेवर सतत झाऱ्याने परतत भाजून एका मोठ्या तसराळ्यात काढावी. अशा सगळ्या डाळी वेगवेगळ्या भाजून घ्याव्या. धणे व जिरेही भाजून घेऊन डाळींवर टाकावे. त्यानंतर धुतलेले तांदूळही कढईत घालून छान भाजून घ्यावे व डाळींमध्ये मिसळावे. या सगळ्या गोष्टी भाजताना करपू देऊ नये. वरील सर्व भाजलेल्या गोष्टी एकत्र करून दळून आणाव्यात. 

चकलीसाठी ः दोन वाट्या चकलीची भाजणी, चार चमचे तेल, १ चमचा तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा ओवा, १ चमचा तीळ, १ वाटी पाणी आणि ४ वाट्या तळण्यासाठी अंदाजे तेल. 
कृती ः एका मोठ्या वाडग्यात किंवा परातीत २ वाट्या विकत आणलेली भाजणी घ्यावी अथवा वर सांगितल्याप्रमाणे केलेल्या  भाजणीतील २ वाट्या भाजणी घ्यावी. एक छोटा गंज घेऊन त्यात चार चमचे तेल, १ चमचा तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा ओवा, १ चमचा तीळ व १ वाटी पाणी घेऊन उकळावे. उकळी येताच हे पाणी वाडग्यातल्या भाजणीत ओतून चमच्याने एकत्र करून भाजणी झाकून ठेवावी. हाताने मळता येईल इतपत थोडे कोमट झाले, की भाजणी छान मळून पोळ्यांसाठी कणीक मळून करतो तसा गोळा करावा. चकलीचा साचा घेऊन त्याला आतून तेलाचा हात लावून त्यात गोळा भरावा. एखाद्या प्लास्टिकच्या कागदाचे साधारण ३ इंच×३इंच आकाराचे १०-१२ तुकडे कापून घ्यावे. साचा बंद करून प्लास्टिकच्या कागदावर/पेपरवर गोल चकल्या पाडून घ्याव्या. आता गॅसवर एका कढईत ३- ४ वाट्या तेल तापत ठेवावे. तेल चांगले गरम झाले की चकलीचा छोटा तुकडा तेलात घालावा. लगेच वर आला तर तेल छान तापले हे समजावे व आच मध्यम करावी.  आता हातावर किंवा झाऱ्यावर घेऊन ३ - ४ चकल्या हलकेच तेलात सोडाव्या. बुडबुडे येऊन चकल्या वर येतील. साधारणपणे २ मिनिटे झाल्यावर चकल्या तेलात झाऱ्याने पलटवाव्या व दुसऱ्याही बाजूने फिका ब्राऊन रंग येईपर्यंत तळाव्या. तेलात बुडबुडे येणे जवळपास पूर्ण थांबले की चकली पूर्ण तळली गेली असे समजावे व चकल्या एखाद्या तसराळ्यात किंवा ताटात टिश्‍यू पेपरवर तेल निथळवण्यासाठी ठेवाव्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या. 
टीप्स : 

 • चकली सोऱ्यातून पिळताना मधेच तुटायला लागली तर गोळा सोऱ्यातून काढून पाण्याचा थोडा हात लावून पुन्हा मळून सोऱ्यात घालून चकल्या पाडाव्या. 
 • चकली पिळताना छान काटेदार दिसली नाही तर ओळखावे की पाणी जास्त झाले आहे. अशावेळी सोऱ्यातून गोळा बाहेर काढून त्यात चमचा - दोन चमचे भाजणी घालून मळून मग चकल्या पाडाव्या. 
 • चकली थोड्या वेळाने मऊ पडण्याची कारणे - अ. चकली मळताना पाणी जास्त घातले गेले. ब. चकली तळताना घाई केली व मोठ्या गॅसवर तळली आहे जेणेकरून ती वरून लाल व आतून कच्ची राहिली आहे. क. चकली पूर्ण (बुडबुडे येणे जवळपास पूर्ण थांबेपर्यंत) तळली गेली नाही. 
 • चकली खुसखुशीत न होता कडकडीत होते असे वाटले तर भाजणीच्या गोळ्यावर कढईतले चमचा - दोन चमचे गरम तेल टाकून मळून घ्यावे व चकल्या कराव्या. खुसखुशीत होतील. 
 • एक वाटी भाजणीच्या मध्यम आकाराच्या साधारण १० चकल्या होतील. 
 • भाजणीचे प्रमाण वाटीत दिले आहे. त्याऐवजी ते किलोमध्ये किंवा पावामध्ये घेऊन भाजणी करून घेतली तर छानच. भाजणी चार-सहा महिने टिकत असल्याने बरेचदा चकल्या करता येतील. फ्रीजमधे झिपलॉकमधे भाजणी ठेवल्यास जास्तच टिकते. 
 • तेल चांगले तापल्यावरच त्यात चकल्या टाकाव्या नाही तर त्या विरघळून तेलात खूप बुडबुडे/फेस येऊन तेल उतू जाते. असे झाल्यास मोठ्या गाळणीत एक पातळ कपडा टाकून दुसऱ्या कढईत तेल गाळून मगच बाकीच्या चकल्या त्यात तळाव्यात. 

ओल्या नारळाच्या करंज्या
साहित्य : सारणासाठी - दोन वाट्या भरून खवलेला नारळ, दीड वाटी चिरून बारीक केलेला गूळ, १ चमचा वेलदोडे पूड व आवडत असल्यास १० - १२ काजूंचे तुकडे. 
पारीसाठी ः दोन वाट्या मैदा, दोन वाट्या बारीक रवा, एक सपाट चहाचा चमचा मीठ, पाऊण वाटी तेल, दीड ते दोन वाट्या दूध/पाणी. 

कृती ः मैदा बारीक चाळणीने चाळून घ्यावा. रवाही चाळून, निवडून स्वच्छ करून घ्यावा. एका पातेल्यात २ वाट्या रवा घेऊन त्यात दीड वाटी दूध घालून एखादा तास भिजवून ठेवावे. तासाभराने त्यात दोन वाट्या मैदा, एक चमचा मीठ व पाऊण वाटी तेल घालावे आणि लागेल तसे दूध घालून चांगले कुटून अथवा मळून घट्ट गोळा करावा. 
    रवा दुधात भिजवून झाकून ठेवला, की एकीकडे सारण करून घ्यावे. त्यासाठी एका कढईत खवलेला नारळ व बारीक चिरून घेतलेला गूळ घालून मिसळून घ्यावे व गॅस पेटवावा. गॅस मध्यम आचेवर ठेवून मिश्रण सतत परतत राहावे. सुरूवातीला गूळ विरघळेल व मिश्रण सैल वाटेल पण नारळातील पाणी आटून मिश्रण मोकळे होईपर्यंत शिजवत राहावे. कढईतले मध्यभागीचे मिश्रण सराट्याने बाजूला केल्यावर मधे रस दिसला नाही की सारण शिजले असे समजावे. आता गॅस बंद करून या मिश्रणात वेलदोडे पावडर व काजूचे तुकडे घालावे व नीट मिसळून घ्यावे. 
    आता रव्या-मैद्याचा गोळा पुन्हा नीट मळून (प्रोसेसरमध्येही मळता येईल) त्याचे पुरीसाठी करतो तसे लहान गोळे करून झाकून ठेवावे. साधारण २५-३० गोळे करावे. त्यातील एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटावी. त्यात मध्यभागी साधारण एक दीड टीस्पून भरून सारण ठेवावे. पुरीच्या कडेवरून पाणी किंवा दुधाचे बोट फिरवून पुरी अर्धी दुमडून कडा एकमेकांवर नीट दाबून चिकटवून घ्याव्या व मग कातणीने कापून करंजीला आकार द्यावा. करंजी ताटात झाकून ठेवावी. अशा सगळ्या करंज्या करून घेतल्यावर एका कढईत २-३ वाट्या तेल अगर वनस्पती तूप अगर साजूक तूप घ्यावे. तेल गरम झाले की मैद्याची बारीकशी तांदुळाएवढी गोळी त्यात टाकून पहावी. लगेच बुडबुडे येत गोळी वर आली की तेल तापले आहे असे समजावे. आता गॅस मंद करावा व करंज्यांच्या कडा नीट बंद आहेत हे पाहून ४- ५ करंज्या तेलात सोडाव्या. एका मिनिटाने सगळ्या करंज्या एकएक करून झाऱ्याने उलटाव्या. खालच्या बाजूने बदामी रंग आला की करंज्या पुन्हा उलटाव्या व दुसऱ्याही बाजूने बदामी रंग येईपर्यंत तळाव्या व मग टिश्‍यू पेपरवर काढून ठेवाव्या. तळताना मंद आचेवर तळल्या तरच त्या खुसखुशीत राहतात नाहीतर मोठ्या आचेवर केलेल्या करंज्या लगेच थोड्या वेळाने मऊ पडतात. करंज्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भराव्या. ओल्या नारळाच्या करंज्या फार दिवस टिकत नाहीत. त्यामुळे लवकर २-४ दिवसात संपवाव्या. 
टीप्स : 

 • सारण फार ओलसर राहिले तर करंज्या मऊ होतात. 
 • मोहन कमी झाले तरीही करंज्या मऊ किंवा कडकडीत होतात. 
 • रवा-मैदा पोळीच्या कणकेपेक्षा घट्ट भिजवावा. आपण एकंदर ५ वाट्या रवा व मैदा घेतला आहे. त्यासाठी अंदाजे दोन ते अडीच वाट्या दूध/पाणी पुरे होईल. 
 • पुरी पातळ व मोठी लाटावी. कारण सारण भरून कातणीने कापेपर्यंत जरा आक्रसते. 
 • करंजीच्या साच्यात करंजी करायची असल्यास पुरी सपाट काठ असलेल्या भागावर ठेवून खोलगट भागात सारण भरावे. काठाला पाणी लावून उरलेला अर्धा भाग त्यावर चिकटवून घ्यावा व मग दाते असलेला भाग त्यावर दाबावा म्हणजे करंजी छान चिकटते. तळताना उकलत नाही. 
 • करंजी मंद आचेवर तळली तरच छान खुसखुशीत होते व रंगही छान येतो. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या