लाडू हवेतच!

सुजाता नेरुरकर 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळी हा आपल्या सर्वांचा लाडका सण आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आपण करंजी, चकली, शेव, चिवडा, शंकरपाळे असे विविध पदार्थ बनवतो. पण लाडवाशिवाय दिवाळीच्या फराळाला खरी मजा येत नाही. बेसनाचे, रव्याचे, खव्याचे लाडू आपण नेहमीच बनवतो. यासोबत इतरही अनेक प्रकारचे लाडू बनविता येतात. सर्वांना आवडणाऱ्या लाडवांचे विविध प्रकार...

बुंदीचे लाडू
साहित्य : दोन कप बेसन, ३ कप साखर, १५ हिरवे वेलदोडे, २ टेबल स्पून पिस्ते, २ टेबल स्पून तेल, २-३ थेंब लाल रंग, साजूक तूप बुंदी तळण्यासाठी
कृती : प्रथम बेसन एका मोठ्या बाऊलमध्ये चाळून घ्यावे. मग त्यामध्ये थोडे पाणी घालून मिक्‍स करून घेऊन गुठळ्या काढून मग परत थोडे पाणी घालून परत चांगले फेटून घ्यावे. साधारणपणे दोन कप बेसनसाठी सव्वा कप पाणी व रंग घालावे. मग १५ मिनिटे मिश्रण बाजूला ठेवावे.
पाक बनवण्यासाठी : तीन कप साखर व दोन कप पाणी घालून मध्यम विस्तवावर पाक बनवायला ठेवावा. मिश्रण सारखे हलवत ठेवावे. पाक थोडा चिकट म्हणजे एक तारी बनवून घ्यावा.
बुंदी बनवण्यासाठी : एका कढईमधे तूप गरम करून बुंदीच्या झाऱ्यांनी गरम तुपामध्ये बुंदी पडून घ्यावी. मग गोल्डन रंगावर बुंदी तळून घ्यावी. सगळी बुंदी तळून झाल्यावर बुंदी, पिस्त्याचे तुकडे, वेलची तयार पाकामध्ये घालून मिक्‍स करून २५-३० मिनिटे झाकून ठेवावे. मग त्याचे एकसारखे लाडू बनवून एका परातीत उघडेच ४-६ तास ठेवावे. लाडू थोडे सुकल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवावे.

गुलकंद लाडू
हे लाडू चवीला फार छान लागतात. गुलकंद लाडवांमध्ये खवा व गुलकंदाचे सारण भरले
आहे. त्यामुळे जरा नवीन प्रकार आहे. तसेच रोझ इसेन्समुळे सुगंध छान येतो.
साहित्य : दोन कप बारीक रवा, पाऊण कप तूप (साजूक तूप + वनस्पती तूप), दीड कप साखर, २-३ थेंब रोझ इसेन्स, सजावटीसाठी केसर कड्या व ड्रायफ्रूट सारणासाठी, पाऊण कप खवा, २ टेबल स्पून गुलकंद, थोडे काजू-बदाम जाडसर पूड व किसमिस
कृती : कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा मिक्‍स करून मंद विस्तवावर रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा किंवा रवा हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. खवा थोडासा परतून घ्यावा. त्यामध्ये गुलकंद काजू-बदाम घालून मिक्‍स करून घ्यावे. साखरेमध्ये ती पूर्ण भिजेल एवढे पाणी घालून पाक करायला ठेवावा. पाकएक तारी करावा. पाक झाला, की त्यामध्ये रोझ इसेन्स, भाजलेला रवा व किसमिस घालावे. मिक्‍स करून थंड करायला ठेवावे. दोन-तीन तासांनी त्याचे लाडू वळायला घ्यावेत. लाडू वळताना त्यात गुलकंदाचे सारण भरावे व छान गोल लाडू वळून घ्यावेत.

पनीर-खवा लाडू
पनीर-खवा लाडू हे दिवाळी फराळासाठी बनवता येतील. हे लाडू बनवताना होममेड पनीर वापरले आहे. खवा व नारळ वापरल्यामुळे हे अगदी चविष्ट लागतात. तसेच यामध्ये थोडे आटवलेले दूध घातले आहे.
साहित्य : एक कप पनीर (घरी बनवलेले), १ कप खवा, १ कप आटवलेले दूध (थोडेसे घट्ट), पाव कप दूध, २ कप नारळ (खोवलेला), २ कप साखर, १ टीस्पून वेलचीपूड, सजावटीसाठी ड्रायफ्रूट व केसरच्या काड्या
पनीर बनविण्यासाठी साहित्य : एक लिटर गाईचे दूध, पाव टीस्पून सायट्रिक ॲसिड
कृती : दूध तापवून घ्यावे. सायट्रिक ॲसिड पाण्यात विरघळून घ्यावे. दूध परत तापवत ठेवावे. त्यामध्ये सायट्रिक ॲसिडचे पाणी घालून एक मिनीट हलवत राहावे. दूध फाटले, की विस्तव बंद करावा. एका चाळणीवरती कपडा घालून फाटलेले दूध चाळणीमध्ये कापडावर ओतावे. मग थंड पाणी त्यावर ओतावे व घट्ट पिळून पाणी काढावे. पनीर तयार झाले की मग पनीर एकदा मिक्‍सरमध्ये काढावे. नंतर खोवलेला नारळ, आटवलेले दूध, साधे दूध मिक्‍स करून मंद विस्तवावर ८-१० मिनिटे शिजत ठेवावे. मग त्यामध्ये पनीर, खवा व साखर घालून परत आटवत ठेवावे. चांगले घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. मग त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्‍स करावे. मिश्रण इतके घट्ट झाले पाहिजे, की त्याचे लाडू वळता आले पाहिजेत. त्याचे लाडू वळून वरतून ड्रायफ्रूट व केसर घालून सजवावे.

बेसन लाडू
(चना डाळीच्या पीठाचे लाडू) बेसन लाडू बीन पाकाचा आहे. बनवायला एकदम सोपा आहे. महाराष्ट्रातील लोकांचे बेसन लाडू म्हणजे अगदी आवडतीचे व लोकप्रिय आहेत, बेसन लाडू बनवताना थोडा रवा घातला तर चव फार छान लागते.
साहित्य : साडेतीन कप बेसन, अर्धा कप बारीक रवा, एक कप तूप (अर्धे साजूक आणि अर्धे वनस्पती तूप) अडीच कप पिठीसाखर, अर्धा कप दूध, दोन टीस्पून वेलचीपूड, थोडे किसमिस, थोडे काजू-बदाम तुकडे करून
कृती : अर्धा कप वनस्पती तूप गरम करून त्यामध्ये बेसन चांगले खमंग भाजून घ्यावे. बाजूला ठेवावे. बारीक रवा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. बेसन व रवा मिक्‍स करून परत थोडे परतून घ्यावे व त्यामध्ये हळूहळू दूध घालून मिक्‍स करून विस्तव बंद करून मिश्रण परातीत काढून घ्यावे. थोडेसे थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर, वेलचीपूड, किसमिस, काजू-बदामाचे तुकडे घालून चांगले मळून घ्यावे. मग लाडू वळताना थोडे बेसन व थोडे तूप घालून चांगले मळून आणि मग लाडू वळून घ्यावे. अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यावे.

रवा नारळाचे लाडू
साहित्य : चार कप रवा, १ नारळ (खोवून), १ कप साजूक तूप, ३ कप साखर, १ टीस्पून वेलचीपूड, पाव टीस्पून जायफळ पूड, किसमिस
कृती : कढईमध्ये तूप गरम करून रवा छान गुलाबी रंगावर अथवा हलका होईपर्यंत मंद विस्तवावर भाजून घ्यावे. मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून, परत मंद विस्तवावर परतून घेऊन बाजूला काढून ठेवावे. कढईमधे साखर व ती बुडेल एवढे पाणी घालून पाक करायला ठेवावा. पाक हा एक तारी करावा. पाक झाल्यावर पाकामध्ये भाजलेला रवा, वेलचीपूड, जायफळ पूड, किसमिस घालावे व चांगले मिक्‍स करून दोन तास बाजूला ठेवावे. अधून मधून हलवत राहावे. नंतर त्याचे लाडू वळावेत.
टीप : पाक तयार झाला, की पाव वाटी पाक बाजूला काढून ठेवावा. मग बाकीच्या पाकामध्ये भाजलेला रवा मिक्‍स करून घ्यावा. लाडू वळताना गरज भासेल तसा बाजूला काढून ठेवलेला पाक वापरावा.

गव्हाच्या पिठाचे लाडू
साहित्य : दोन कप गव्हाचे पीठ, दीड कप पिठीसाखर, पाऊण कप साजूक तूप, पाव कप खारीक पावडर, अर्धा कप सुके खोबरे (किसलेले), अर्धा टीस्पून जायफळ, ५,६ बदाम, ५-६ काजू, ५-६ पिस्ता, १ टीस्पून वेलचीपूड
कृती : कढईमध्ये पाव कप तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. किसलेले खोबरे थोडे भाजून घ्यावे. हाताने कुस्करून घ्यावे. खसखस भाजून घ्यावी. खारीक पावडर थोडी परतून घ्यावी. काजू, बदाम, पिस्ता थोडे कुटून घ्यावे. मग भाजलेल्या पिठात, काजू-बदाम पावडर, खारीक पावडर, खसखस, भाजलेले खोबरे, पिठीसाखर, जायफळ पावडर वेलचीपूड घालून मिक्‍स करावे. नंतर थोडे मिश्रण व थोडे तूप घालून चांगले मळून घ्यावे. त्याचे लाडू बनवावे. असे सर्व लाडू बनवून घ्यावे.

आंबा-नारळ लाडू
आंबा नारळ लाडू हे मुलांसाठी बनवायला फार छान आहेत. तसेच ते बनवायला सोपे व लवकर होणारे आहेत. आंबा हा फक्त सीझनमध्ये मिळतो. त्यामुळे आंब्याचा रस हा टीनमधला वापरला तरी चालेल. हे लाडू उपासाला सुद्धा चालतात.
साहित्य : एक नारळ (खोवून), १ कप दूध, १ कप साखर, १ कप हापूस आंब्याचा रस, १ टीस्पून वेलचीपूड
कृती : एका कढईमध्ये खोवलेला नारळ, दूध घालून १०-१५ मिनिटे मंद विस्तवावर शिजत ठेवावे. मग त्यामध्ये साखर,आंब्याचा रस घालून परत शिजत ठेवावे. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्‍स करावे. थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावे.

चॉकलेट तिळाचे लाडू
चॉकलेट तिळाचे लाडू हे मकर संक्रांतीलासुद्धा बनवायला छान आहेत. तीळ हे थंडीच्या सीझनमध्ये मुद्दाम खातात.
साहित्य : अडीचशे ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाउंड, १ कप तीळ, पाव कप डेसिकेटेड कोकनट
कृती : तीळ थोडे भाजून घ्यावे. डार्क चॉकलेट कंपाऊंडचे बारीक तुकडे करून घेऊन डबल बॉईल पद्धतीने विरघळून घ्यावे. चॉकलेट विरघळले, की ४-५ मिनिटे थंड करायला ठेवावे. मग त्यामध्ये पाऊण कप भाजलेले तीळ व डेसिकेटेड कोकनट घालून मिक्‍स करून घ्यावे. एका बाऊलमध्ये उरलेले तीळ व डेसिकेटेड कोकनट मिक्‍स करून ठेवावे. तयार झालेल्या मिश्रणाचे एकसारखे छोटे लाडू बनवून बाउलमधील तिळामध्ये घोळून बाजूला ठेवावे. अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यावे. चॉकलेट-तीळ लाडू तयार झाले, की फ्रीजमध्ये ५ मिनिटे ठेवावे.

चॉकलेट कोकोनट लाडू 
साहित्य : दोनशे ग्रॅम कन्डेस्ड मिल्क, ५० ग्रॅम डार्क चॉकलेट बेस, १ कप डेसिकेटेड कोकनट
कृती : डार्क चॉकलेट बेस घेऊन डबल बॉईल सिस्टीमने चॉकलेट विरघळून घ्यावे. एका नॉनस्टिक भांड्यात कन्डेस्ड मिल्क घेऊन मंद विस्तवावर २ मिनिटे गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट मिक्‍स करून दोन मिनिटे मंद विस्तवावर ठेवावे. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागले, की विस्तव बंद करून भांडे बाजूला पाच मिनिटे थंड करायला ठेवावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू बनवावे. डार्क चॉकलेट घेऊन त्यामध्ये एक-एक लाडू बुडवून मग बाजूला बटर पेपरवर ठेवावे. अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊन फ्रीजमध्ये ५-७ मिनिटे सेट करायला ठेवावे. आपण यामध्ये अजून एक प्रकार बनवू शकतो. डार्क चॉकलेटमध्ये डेसिकेटेड कोकनट मिक्‍स करून घेऊन त्याचे लाडू बनवून घ्यावे. मग कन्डेस्ड मिल्क व डेसिकेटेड कोकनट मिक्‍स करून घेऊन त्याचे लाडू वळताना त्यामध्ये चॉकलेट लाडू घालून परत लाडू वळून घ्यावे. हे लाडूसुद्धा चवीला अप्रतिम लागतात. (फक्त हे लाडू बनवताना डार्क चॉकलेट बेस जास्त घ्यावा.)

ड्रायफ्रूट लाडू
साहित्य : एक कप खारीक पावडर, १ कप सुके खोबरे (किसून), १ टेबल स्पून खसखस, पाव टीस्पून जायफळ, २ टेबल स्पून गुलकंद, १० खजूर, २ टेबल स्पून काजू-बदाम (बारीक चिरून), १ टेबल स्पून पिठीसाखर, २ टेबल स्पून तूप
कृती : कढई गरम करून ड्रायफ्रूट थोडेसे कोरडेच भाजून घ्यावे. खसखस व सुके खोबरे किसून भाजून घ्यावे. खजूर बारीक चिरून घ्यावा. एका बाऊलमध्ये खारीक पावडर, भाजलेले सुके खोबरे, खसखस, जायफळ, गुलकंद, चिरलेला खजूर, काजू-बदाम, पिठीसाखर, तूप मिक्‍स करून चांगले मळून घेऊन त्याचे छोटे लाडू बनवून घ्यावे.

नाचणी ओट्‌स लाडू 
नाचणीलाच रागी म्हणतात. नाचणीपासून आपण शिरा, खीर, डोसे बनवतो. त्याचे लाडूसुद्धा बनतात. नाचणी ही खूप पौष्टिक आहे. लहान मुलांना मुद्दाम नाचणीची खीर देतात. थंडीत तर रोज नाचणी खावी. नाचणीचे लाडू फार स्वादिष्ट लागतात.
साहित्य : एक कप नाचणीचे पीठ, १ कप गव्हाचे पीठ, १ कप ओट्‌स, सव्वा कप पिठीसाखर, १ टीस्पून वेलचीपूड, पाव कप काजू-बदाम तुकडे, पाऊण कप साजूक तूप, २ टेबल स्पून वनस्पती तूप
कृती : कढईमध्ये १ टेबल स्पून वनस्पती तूप गरम करून त्यामध्ये नाचणीचे पीठ चांगले भाजून घेऊन एका प्लेटमध्ये काढून ठेवावे. मग १ टेबल स्पून वनस्पती स्पून गरम करून गव्हाचे पीठ छान गुलाबी रंगावर भाजून घेऊन बाजूला ठेवावे. ओट्‌स कढईमध्ये थोडेसे परतून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये थोडेसे एकदाच फिरवावे . भाजलेले नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, ओट्‌स, पिठीसाखर व वेलचीपूड घालून मिक्‍स करावे. लाडू वळताना थोडे पीठ व थोडेसे तूप घालून मळून घेऊन त्याचे लाडू वळून घ्यावेत. असे सर्व लाडू बनवून घ्यावे.

डिंकाचे लाडू 
डिंकांचे लाडू हे बिनपाकाचे आहेत. हे लाडू नेहमी थंडीच्या दिवसात करतात. तसेच बाळंतीणीसाठीसाठी करतात. ज्याची प्रकृती अशक्त आहे त्यांना हे लाडू खूप फायदेशीर आहेत. याला पौष्टिक लाडूसुद्धा म्हणता येईल.
साहित्य : तीन कप खारीक पावडर, ३ कप सुके खोबरे कीस, २ कप डिंक, अर्धा कप खसखस, २ कप तूप, अर्धा कप काजू-बदाम कुटून,पाव कप किसमिस, अर्धा टीस्पून जायफळ,१ टीस्पून वेलचीपूड, ४ कप गूळ किंवा ४ कप पिठीसाखर (किंवा आपल्याला जसे गोड कमी किंवा जास्त आवडत असेल तशी साखर अथवा गूळ वापरावे.
कृती : खारीक पावडर थोडी भाजून घ्यावी. सुके खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून हातांनी कुस्करून घ्यावे. डिंक तळून त्याची मिक्‍सरमध्ये पूड करून घ्यावी. खसखस भाजून कुटून घ्यावी. तूप वितळून घ्यावे. गूळ किसून घ्यावा. एका परातीत खारीक पावडर, सुके खोबरे, डिंक, खसखस, तूप, काजू-बदाम कूट, किसमिस, जायफळ, वेलची पूड, गूळ किंवा पिठीसाखर घालून चांगले मिक्‍स करून त्याचे लाडू वळावेत. सजावटीसाठी लाडू खोबऱ्याच्या किसात व तळलेल्या बारीक साबुदाण्यात घोळावे म्हणजे अजून छान दिसतील.

हळीवाचे लाडू 
साहित्य : दोन कप ओला नारळ (खोवून), २ टेबल स्पून हळीव, १ कप गूळ, अर्धा कप दूध, १ टीस्पून वेलचीपूड, पाव टीस्पून जायफळ पूड
कृती : प्रथम हळीव थोडेसे भाजून घेऊन थंड झाल्यावर दुधात २-३ तास भिजवून ठेवावे, म्हणजे ते चांगले फुलून येतील. नारळ खोवून, गूळ चिरून घ्यावे. एका जाड बुडाच्या भांड्यात खोवलेला नारळ, भिजवलेले हळीव, गूळ घालून मिक्‍स करून मंद विस्तवावर आटायला ठेवावे. मिश्रण हळूहळू घट्ट होईल व बाजूनी सुटायला लागेल मग विस्तव बंद करून भांडे उतरवून बाजूला ठेवावे. मिश्रण कोमट असताना लाडू वळून घ्यावे. हाळीव लाडू दोन दिवसाच्यांवर टिकत नाहीत. त्यामुळे ते लगेच संपवावे लागतात किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा बनवावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या