खुसखुशीत शेव

सुप्रिया सुधाकर खासनीस
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळीचा फराळ म्हटला, की शेव आलीच. सध्याही शेवेने सगळीकडे अधिराज्य गाजवले आहे. पोहे, उपमा, इडली सांबर इत्यादी पदार्थांवर शेव भुरभुरली जाते. फरसाणमधील शेव, शेवपुरी, मिसळ, रगडापुरी, भेळ, मसाला पापड यामध्ये तिचे मानाचे स्थान दिसते. एवढेच नव्हे तर उपासाच्या फराळातही शेवेने बाजी मारली आहे. या शेवेच्या विविध व सोप्या पाककृती.

साधी शेव
साहित्य : तीन वाट्या हरभरा डाळ, २ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, हिंग, २ चमचे ओव्याची बारीक पूड, दीड चमचे मोहनासाठी तेल व तळणीसाठी तेल. 
कृती : प्रथम ओव्याची पूड चाळून घ्यावी. चाळलेल्या ओवा पावडरमध्ये थोडे पाणी घालून ओवापूड एकसारखी करावी. डाळीच्या पिठात तिखट, हिंग, मीठ, हळद व गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण एकजीव करावे. सारखे करावे. आवश्‍यक तेवढे पाणी व ओव्याचे पाणी घालून पीठ साधारण सैलसर (कणकेसारखे) भिजवावे. शेवपात्रात (सोऱ्या) पीठ घालून शेव पाडावी. तेल चांगले तापल्यावर मंदाग्नीवर शेव तळावी.

पालक शेव
साहित्य : दोन वाट्या चिरलेला पालक, १ चमचा जिरेपूड, १०-१२ मिरच्या, चवीनुसार मीठ, ४ ते ५ वाट्या हरभरा डाळीचे पीठ, १ चमचा मोहनाकरिता तेल व तळणीसाठी तेल. 
कृती : प्रथम पालक बारीक चिरून स्वच्छ धुवावा. चांगला निथळून वाफवून घ्यावा. पालकांमध्ये मिरच्या घालून मिक्‍सरमधून त्याची चांगली पेस्ट करून घ्यावी. पेस्टमध्ये जिरेपूड, मीठ, मोहन घालून सर्व मिश्रण एकसारखे करावे. त्यात बसेल तेवढे पीठ घालून मिश्रण घट्टसर करावे. नंतर शेवपात्रातून शेव पाडून तळावी. 

कांद्याची शेव
साहित्य : दीड ते २ वाट्या डाळीचे पीठ, १ वाटी किसलेल्या कांद्याचे पाणी (रस) हळद, तिखट, मीठ, पाव वाटी मोहनासाठी तेल, हिंग, तळणीसाठी तेल. 
कृती : डाळीच्या पिठात मीठ, हळद, हिंग व तिखट चवीनुसार घालावे. पीठामध्ये मोहन घालावे. कांद्याचे पाणी (रस) घालावे. त्यात पीठ भिजवावे. जरूर पडल्यास थोडे साधे पाणी वापरावे. नंतर शेवपात्रात पीठ घालून शेव पाडून तळावी.

लसूण शेव
साहित्य : चार ते पाच वाट्या डाळीचे पीठ, २ चमचे तिखट, १२ ते १५ लसूण पाकळ्या, (साधारण १ मोठा लसूण गड्डा) हिंग, मीठ, १ चमचा मोहनासाठी तेल व तळणीसाठी तेल.
कृती : प्रथम लसूण मिक्‍सरमधून वाटून घ्यावा. त्यात थोडे पाणी घालून ठेवावे. ते पाणी थोड्या वेळानंतर ते पाणी गाळून घ्यावे. पीठामध्ये मीठ, हिंग, गरम तेल, तिखट, लसणाचे पाणी घालावे. गरजेनुसार साधे पाणी घालून पीठ कणकेप्रमाणे भिजवावे. शेवपात्रात पीठ घालून शेव करावी व तळावी.

लसूण शेव
साहित्य : चार ते पाच वाट्या डाळीचे पीठ, २ चमचे तिखट, १२ ते १५ लसूण पाकळ्या, (साधारण १ मोठा लसूण गड्डा) हिंग, मीठ, १ चमचा मोहनासाठी तेल व तळणीसाठी तेल.
कृती : प्रथम लसूण मिक्‍सरमधून वाटून घ्यावा. त्यात थोडे पाणी घालून ठेवावे. ते पाणी थोड्या वेळानंतर ते पाणी गाळून घ्यावे. पीठामध्ये मीठ, हिंग, गरम तेल, तिखट, लसणाचे पाणी घालावे. गरजेनुसार साधे पाणी घालून पीठ कणकेप्रमाणे भिजवावे. शेवपात्रात पीठ घालून शेव करावी व तळावी.

मसाला शेव
साहित्य : दोन वाट्या डाळीचे पीठ, १ चमचा तिखट, १ चमचा मिरेपूड, १ चमचा गरम मसाला चाळून, अर्धा चमचा पापडखार, १ चमचा तेलाचे मोहन, तळणीसाठी तेल.
कृती : मोहनाचे तेल गरम करून ते पिठात घालावे. पापडखार थोड्या पाण्यात कालवावा. नंतर पापडखाराचे पाणी व इतर सर्व पदार्थ घालून पीठ कणकेसारखे भिजवावे. सोऱ्यातील जाड छिद्राची ताटली वापरून शेव करावी. मध्यम आचेवर कळावी.

बिकानेरी शेव
साहित्य : पाव किलो हरभरा डाळ, पाव किलो मटकी डाळ एकत्र दळून आणावी. १ चमचा मिरेपूड, १ चमचा लवंगपूड, पाव चमचा सोडा, चवीनुसार मीठ, पाव वाटी मोहन, तिखट, तळणीसाठी तेल. 
कृती : मिरेपूड व लवंगपूड अर्धा तास थोड्या पाण्यात भिजत ठेवावी. पीठामध्ये मीठ, तिखट, तेलाचे मोहन घालावे. पीठ एकसारखे करावे. लवंग व मिरेपूडचे पाणी गाळून त्यात घालावे. गरजेनुसार पीठ पाण्याने भिजवावे. मध्यम ताटलीने शेव पाडून गरम तेलात मध्यम आचेवर तळावी.

मुगाच्या डाळीची शेव
साहित्य : अर्धा किलो मुगाची डाळ, १ वाटी चवळीची डाळ, ४ चमचे ओवा, चवीनुसार तिखट, मीठ, २ ते ३ चमचे मोहनसाठी तेल, हळद, हिंग, तळणीसाठी तेल. 
कृती : मूगडाळ, चवळीची डाळ व ओवा हे सगळे मिळून बारीक दळून आणावे. त्या पिठात मोहन घालून चवीला मीठ, तिखट, हिंग घालून भिजवावे. पीठ अर्धा ते एक तास भिजू द्यावे. मग शेव पात्रातून शेव पाडून तळावी. ही शेव पचण्यास चांगली आहे.

मसूराची शेव
साहित्य : दोन मोठ्या वाट्या मसूरडाळ, १ मोठी वाटी हरभरा डाळ, चवीला तिखटमीठ, २ मध्यम कांदे, तळणीसाठी तेल.
कृती : प्रथम दोन्ही डाळी एकत्र करून दळून आणाव्यात. कांदे किसून त्याचे पाणी बाजूला काढावे. चवीप्रमाणे तिखट-मीठ घालून कांद्याच्या पाण्यात पीठ भिजवावे. लागल्यास भिजवताना थोडे साधे पाणी वापरावे. हळद घालू नये. नंतर चकली पात्रातून शेव पाडून तळावी.

तांदळाची शेव
साहित्य : चारशे ग्रॅम तांदूळ, १०० ग्रॅम उडीद डाळ, १ चमचा जिरेपूड, १ चमचा मिरेपूड, पाव वाटी लोणी, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी डाळीचे पीठ, तळणीसाठी तूप.
कृती : प्रथम तांदूळ धुवून कपड्यावर पसरून वाळवावे. उडदाची डाळ कोरडीच भाजावी. नंतर डाळ व तांदूळ एकत्र करून आणावे. त्यात अर्धी वाटी डाळीचे पीठ घालावे. सर्व एकत्र कालवावे. त्यात लोण्याचे मोहन, जिरेपूड, मिरेपूड, चवीला मीठ घालून पीठ भिजवावे. शेवपात्रात पीठ घालून तुपात शेव तळावी.

गाठी शेव
साहित्य : अडीचशे ग्रॅम बाजाराचे तयार (फरसाण शेवेचे) पीठ, १ चमचा जाडसर ओवापूड, ३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन, अर्धा चमचा पापडखार पूड, चवीली मीठ, तळणीसाठी तेल. 
कृती : प्रथम थोड्या पाण्यात पापडखार विरघळून घ्यावा. मग पीठामध्ये पापडखाराचे पाणी, ओवापूड, तेलाचे मोहन व मीठ घालून पीठ भिजवावे. बाजारात मिळणारा गाठी शेवेचा झारा घेऊन त्यावर पीठ घालून शेव पाडावी व तळावी. नेहमीच्या सोऱ्यातील गाठीची ताटली घेऊन शेव करता येते. पण ती थोडी जाडीला कमी होते.

बटाट्याची उपासाची शेव
साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिऱ्याची पूड, थोडे राजगिरा पीठ, तळणीसाठी तूप, खाण्याचा सोडा, पिवळा रंग.
कृती : बटाटे घेऊन ते वाफवून, पुरण यंत्रातून बारीक वाटून घ्यावेत. या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, जिऱ्याची पूड व थोडे राजगिरा पीठ घालावे. थोडासा खाण्याचा पिवळा रंग घालावा व गोळा चांगला मळून शेवपात्राने पाहिजे त्या जाडीची शेव तुपात तळून काढावी.

बटाट्याची उपासाची शेव
साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिऱ्याची पूड, थोडे राजगिरा पीठ, तळणीसाठी तूप, खाण्याचा सोडा, पिवळा रंग.
कृती : बटाटे घेऊन ते वाफवून, पुरण यंत्रातून बारीक वाटून घ्यावेत. या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, जिऱ्याची पूड व थोडे राजगिरा पीठ घालावे. थोडासा खाण्याचा पिवळा रंग घालावा व गोळा चांगला मळून शेवपात्राने पाहिजे त्या जाडीची शेव तुपात तळून काढावी.

साबुदाण्याची शेव
साहित्य : दोन वाट्या साबुदाणा पीठ, १ चमचा तुपाचे मोहन, तिखट, मीठ, जिरेपूड, तळणीसाठी तूप.
कृती : सर्व एकत्र करून पीठ भिजवावे व मळून शेवपात्रातून शेव करावी.   

भावनगरी शेव
साहित्य : पाचशे ग्रॅम बाजारी डाळीचे पीठ, २ चमचे ओव्याची भरडसर पूड, १ चमचा पापडखार पूड, मीठ, हिंग.
कृती : प्रथम पापडखाराची पूड पाण्यात विरघळून घ्यावी. नंतर मीठ, हिंग, ओव्याची पूड एकत्र करून पीठामध्ये पापडखाराच्या पाण्यासह घालावे. जरूर वाटल्यास थोडे साधे पाणी वापरावे. सोऱ्यातील साधारण जाड छिद्राची ताटली घालून शेव पाडावी. हळद घातली नसल्यामुळे फिकट पिवळट रंगाची हलकी शेव होते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या