रोटी, पराठा आणि फुलका

सुरेखा भिडे 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळीत जेवणाचा बेत काय करावा, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे जेवणातील महत्त्वाचा पदार्थ रोटी, पराठा आणि फुलक्याच्या पाककृती देत आहोत....

कोकी
साहित्य : एक कप कणीक, एक बारीक कांदा चिरलेला, कोंथिबीर बारीक चिरलेली, एक टेबल स्पून आनारदाना पावडर किंवा आंबटपणासाठी लिंबाचा रस, दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली, अर्धा टेबल स्पून तिखट (कमी - जास्त आपापल्या चवीनुसार), दोन टेबल स्पून गरम केलेले तेल, मीठ चवीनुसार, तूप कोकीला लावण्यासाठी.
कृती : सर्व साहित्य कणकेत घालावे. थोडे तेल गरम करून घालावे. मग कणीक रोजच्याप्रमाणे भिजवावी. थोड्या जाडसर  पोळ्या लाटून तव्यावर तूप सोडून बाजून घ्याव्या. कोकी तयार. रायतासोबत छान लागते.

मसाला गाकर
साहित्य : दोन वाटी कणीक (नेहमीप्रमाणे भिजवून घ्यावी). मसाला साहित्य- दोन चमचे गोडा मसाला, लाल तिखट (चवीनुसार) कोथिंबीर दोन चमचे बारीक चिरलेली, ओवा चवीप्रमाणे, जिरे व तीळ पण, मीठ (हा सर्व मसाला एकत्र करावा)
कृती : कणकेचा गोळा घ्यावा. त्यात हे मसाल्याचे मिश्रण भरावे. जरा जाडसर लाटावे. मग तव्यावर तूप अथवा बटर लावून लालसर भाजून घ्यावे.

आटे का पुआ
साहित्य :  कणीक अर्धा वाटी, साखर (कमी - जास्त तुमच्या आवडीनुसार), दूध किंवा पाणी (हे सगळं एकत्र करून भजीप्रमाणे पीठ भिजवा)
कृती : साखर पूर्ण विरघळू द्या. मिश्रणात अर्धा टेबल स्पून खोबरेचे काप (सुखे खोबरे छोटे - छोटे काप) अर्धा टेबलस्पून बडीशेप मिक्‍स करावे. या मिश्रणाचे छोटे छोटे डाव पळीनी तुपात 
घालावे व तळून काढावे. सोबत रबडी व ड्रायफ्रूट्‌स घालून सर्व करावेत.

सांज्याच्या पोळ्या
साहित्य : एक मोठी वाटी जाड रवा, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, दीड वाटी पाणी, पाच-सहा वेलदोड्यांची पूड, अडीच वाटी कणीक, पाच-सहा छोटे चमचे मैदा, दोन  टेबल स्पून तेलाचे मोहन, मीठ
कृती : तुपावर रवा खमंग भाजावा व बाजूला ठेवावा. दीड वाटी पाण्यात बारीक चिरलेला गूळ घालून गॅसवर ठेवावे. गूळ विरघळला, की त्यात भाजलेला रवा घालून ढवळून घ्यावा. झाकण ठेवून वाफ आणावी व मऊ शिरा करावा. वेलदोड्यांची पूड घालावी. पाणी थोडं जास्त घालावे. मऊसर शिरा करावा. कणकेत मैदा, मीठ तेलाचे मोहन घालून रोजच्या पोळीचे कणकेसारखी बारीक भिजून ठेवावी. शिरा गार झाला, की मळून घ्यावा. नंतर कणकेची पारी करून त्यात सांज्याचे पुरण भरून तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी. दोन्ही बाजूने चांगली भाजावी. तुपासोबत खायला घ्यावे.

गोबी पराठा 
साहित्य : दोन वाटी कणीक, बेसन थोडं तीन-चार चमचे मैदा, तेल, दोन छोटे चमचे, एक टेबल स्पून गरम मसाला, बारीक कोबी (फ्लॉवर) किसलेली, एक छोटा कांदा बारीक चिरलेला, एक टेबल स्पून आलं व हिरवी मिरची बारीक केलेली, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, तेल किंवा तूप
कृती : कणीक व मैदा एकत्र करून नेहमीप्रमाणे तेल घालून कणीक भिजवून घ्यावी. नंतर कढईत तेल घालून, कांदा परतून घ्यावा. मग हिरवी मिरची व आल्याची पेस्ट घालावी. गरम मसाला व मीठ घालावे आणि त्यात कोथिंबीर भुरभुरा. सारणात थोडं बेसन घालावे. (यामुळे पराठा करताना तो फाटणार नाही) नंतर कणकेत हे सारण घालावे आणि लाटून घ्यावे. मग पराठा तुपात किंवा तेलात परतून घ्यावा. गरमागरम सर्व करावा. लोणचं किंवा दहीसोबत खायला घ्यावा.

प्लेन कुलचा 
साहित्य : दोन कटोरी मैदा, दोन छोटे चमचा साखर, थोडेसे दूध गरम केलेलं, तीन छोटे चमचे दही, मीठ चवीनुसलार, अर्धा चमचा तीळ (सफेद), बेकिंग पावडर
कृती : मैदा चाळून घ्यावा. नंतर त्यात सर्व मिळवून कणीक मुलायम भिजवून घ्यावे. गरज वाटली तर थोडं पाणी घालावे. दोन छोटे चमचे तेल गरम करून घालावे. गार झालं, की कणीक भिजवावी. ही कणीक अर्धा तास भिजवून ठेवावी. मग त्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून लाटावे. वरून बारीक तीळ व कोथिंबीर लावून बटरनी लालसर शेकावेत. हे कुलचे छोले किंवा पनीरच्या भाजीसोबत गरमागरम सर्व करावे.

बाजरे की रोटी 
साहित्य : दोन वाटी बाजरेची कणीक, मक्‍खन, गरम पाणी व मीठ
कृती : बाजरेच्या आटाची कणीक भिजवून घ्यावी. छोटे छोटे गोळे करून दोन्ही हातावर रोटी बनवावी. नंतर ती तव्यावर शेकावी. दोन्ही बाजूने झाली, की निखाऱ्यावर शेकावी. मक्‍खन व भरली वांगी किंवा पालेभाजीसोबत खायला द्यावी.

मिस्सी रोटी 
साहित्य : एक वाटी बेसन, अर्धा वाटी कणीक, अर्धा टेबल स्पून लाल तिखट (कमी-जास्त तुमच्या चवीनुसार), एक टेबल स्पून बडीशेप, अर्धा टेबल स्पून ओवा, एक  टेबल स्पून तेल, एक टेबल स्पून कसुरी मेथी, तूप
कृती : सर्व साहित्य एकत्र करून भिजवून घ्यावे. मग त्याचे छोटे - छोटे गोळे करून तूप लावून पोळी लाटावी. तव्यावर शेकून घ्यावी. गरम गरम कढी पकौडा या लोणच्यासोबत सर्व करावे.

मक्के की रोटी
साहित्य : दोन वाटी मक्केची कणीक, तकेल, मीठ व गरम पाणी घालून कणीक भिजवावी.
कृती : हातावर तेल लावून थोडं आटा घेऊन छोटी छोटी रोटी बनवा. तव्यावर वर - खाली शेका. खाताना लोणी व सरसों की साग सोबत सर्व करावे. खूपच छान लागते.

बेसन की रोटी 
साहित्य :  बेसनमध्ये मीठ, लाल तिखट, मिरची एक बारीक चिरलेली, कोथिंबीर, कांदा व टोमॅटो बारीक चिरलेला, ओवा, जिरं घालून लसूण आलं पेस्ट पण घालावी नंतर भज्यासारखं पिठ बनवा, तेल
कृती : कणीक रोजच्याप्रमाणे भिजवावी. एक फुलका बनवून घ्यावा. तव्यावर शेकावा. मग बेसन पीठ पोळीवर घाला. तेलानी वर - खाली शेकून घ्यावा. दोन्ही बाजूने मग बेसन रोटी सॉसबरोबर खायला द्यावे.

नारियल की मीठी रोटी 
साहित्य : मोदक करताना जसं सारण बनवतो. साखर घालून तसं बनवून घ्यावे. हे सारण थोडं ओलसर असतं म्हणून गार झालं, की त्यात काजू पूड व वेलची मिक्‍स करावी. काजू पूड एकदम बारीक हवी.
कृती : कणीक व मैदा घालून (मैदा थोडा) जरासा मोहन घालून रोजच्या प्रकारे कणीक भिजवा. त्यात हे सारण भरा व नारियल की मीठी रोटी तुपासोबत खायला घ्यावी. छान लागते. बच्चे कंपनीला नक्की आवडेल.

गुळाची पोळी 
साहित्य : पिवळा गूळ किसलेला (२ वाटी), खसखस पूड, तिळांची पूड, वेलदोडे पूड, खोबऱ्याचा किस, डाळीचे पीठ, 
कृती :  सर्व भाजून सर्व भाजून गुळात मिक्‍स करावे. कणीक व मैदा एकत्र करून मोहन घालून भिजवा. पोळ्याचं पीठ नेहमीप्रमाणे भिजवा. सर्व सारण नीट एकत्र मळून घ्यावे. नंतर कणेच्या दोन लाट्या लाटून त्यात गुळाचे सारण घालून कडा दाबा. हलक्‍या हाताने पोळी लाटावी व पुरण पोळीच्या तव्यावर, खमंग पोळी भाजावी. ही पोळी गारच चांगली लागते. तुपासोबत छान लागते.

व्हेज फ्रँकी 
साहित्य : दोन कप मैदा, मीठ व मोहन घालून भिजवून घ्यावे. कांदा बारीक चिरलेला, पत्ता कोबी बारीक चिरलेली, थोडं पनीर किसलेले, चीज क्‍यूब, मीठ, फैंकी मसाला (बाजारात मिळतो), बटाटे उकडून मीठ, तिखट, गरम मसाला घालून टिक्की करा. बटर किंवा तेल. चाट मसाला, सेजवान सॉस, टोमॅटो सॉस
कृती : कढईत तेल घालून कांदा परतावा. त्यात पत्ता कोबी पनीर मिक्‍स करावे. मग मीठ व फैंकी मसाला घालून परतावा. आता मैद्याची पातळ पोळी लाटावी. त्यात परतलेले मिश्रण घालावे. आलू टिक्की घाला, जरासा चाट मसाला भुरभुरा, वरून चीज सॉस घालून पोळी फोल्ड करा. बटर घालून पोळी परतावा.
टीप ः (मैद्याच्या जागेवर कणकेची पोळी पण करता येते, मैद्यापेक्षा कणीक जास्त चांगली)
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या