चविष्ट आमटी, गरमागरम सूप

वैशाली खाडिलकर 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि भाज्यांपासून बनवलेल्या आमटी व सूप्स यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. यामुळे जेवणाचे पोषणमूल्य वाढते. जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या आमटी व सूपच्या नावीन्यपूर्ण पाककृती...

खट्टी-मीठी डाळ आमटी
ही आंबटगोड चवीची, स्पेशल रसम्‌ मसाला व खास तडकावाली डाळ अप्रतिम लागते. 
साहित्य व कृती : तूरडाळ १ कप व हरभरा डाळ पाव कप स्वच्छ धुवावी. नंतर अर्धा तास पाण्यामध्ये भिजवावी. प्रेशर कुकरच्या स्टील डब्यात डाळ, १ टोमॅटो बारीक चिरलेला, १ आल्याचा तुकडा, २ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, चिमूटभर हळद व हिंग, अडीच वाटी पाणी घालून हे मिश्रण गरगट शिजवावे. साधारण ५ शिट्ट्या कराव्यात. नंतर मिश्रण रवीने घुसळून एकजीव करावे. गॅसवर नॉनस्टिक कढईत हे मिश्रण ओतावे. त्यात एक टेबल स्पून चिंचेचा कोळ व अर्धा टीस्पून गूळ  घालावा. स्वादानुसार मीठ व दोन कप पाणी घालावे. मध्ये चीर पाडलेल्या हिरव्या मिरच्या, लाल तिखट अर्धा टीस्पून, १ टीस्पून धना जिरा पावडर, १ टीस्पून रस्सम मसाला, पाव टीस्पून हळद घालावी. ढवळावे व मंद आचेवर ५ मिनिटे उकळावे. दुसऱ्या गॅसवर तडका पॅन ठेवावा. त्यात २ टेबलस्पून तूप घालावे. १ टीस्पून जिरे व राई तडतडले, की ६ लसूण कळ्या परतणे. २ सुक्‍या लाल मिरच्या, ६ कढीपत्ता पाने व हिंग घालून खमंग फोडणी करावी व वरील डाळीत घालावी. व्यवस्थित ढवळावे. खूप पातळ किंवा खूप घट्ट डाळ नसावी. मध्यमसर असावी. जरुरीप्रमाणे पाणी घालावे व ५ मिनिटे उकळावे. चांगला सुगंध आल्यावर गॅस बंद करावा.  सर्व्हींग बाऊलमध्ये ही तयार डाळ काढावी. वरून कोथिंबीर घालावी. गरमागरम जिरा राईसबरोबर सर्व्ह करावी. सोबत पापड व लोणचे घ्यावे.

चवळीची आमटी
साहित्य व कृती : एक कप काळे डोळेवाली चवळी घ्यावी. ती स्वच्छ धुवावी. नंतर बाऊलमध्ये पाणी घालून ६ तास भिजवावे. नंतर ही चवळी प्रेशरकुकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवावी.
    गॅसवर कॉपर बॉटम स्टील कढईत १ टेबल स्पून तूप घालावे. जिरे, खडा गरम मसाला १ टेबल स्पून घालावे. खमंग वास येईपर्यंत परतावे. २ टीस्पून आलं, लसूण पेस्ट घालून परतावे. पाव कप बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा. मग २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे व अर्धा कप टोमॅटो प्युरी घालून ढवळावे. २ मिनिटे शिजवावे. आता १ टीस्पून तिखट, चिमूटभर हळद व १ टीस्पून छोले मसाला घालावा. शिजलेली चवळी घालून एकजीव करावे व ५ मिनिटे शिजवावे. मॅशरने दाबून ग्रेव्ही घट्ट करावी. कस्तुरी मेथी हाताने चुरडून घालावी. गॅस बंद करावा.
    सर्व्हींग बाऊलमध्ये वरील झणझणीत आमटी काढावी.त्यावर आल्याचे लांब पातळ काप व कोथिंबीर घालून सजवावे. सोबत गरमागरम फुलका, नान किंवा वाफाळलेला भात द्यावा.

उडीद डाळ आमटी
साहित्य व कृती : एक कप काळी उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवावी. चार कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावी. नंतर घोटून ठेवावी. गॅसवर पॅनमध्ये २ टेबल स्पून तेल घालावे. १ टीस्पून जिरे व  दालचिनीचे २ लहान तुकडे घालून परतावे. साधारण दोन मिनिटे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा तळावा. १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट घालून मिनीटभर परतावे. टोमॅटो प्युरी १ कप घालावी व ढवळावे. लाल तिखट १ टीस्पून, चिमूटभर हळद, १ टीस्पून जिरा पावडर, चाट मसाला घालून मिनीटभर परतावे. मग शिजवलेली डाळ घालावी. स्वादानुसार मीठ व जरुरीप्रमाणे पाणी घालून ढवळावे व मंद आचेवर ५ मिनिटे शिजवावे. १ टीस्पून गरम मसाला व  १ टीस्पून कस्तुरी मेथी घालून मंद आचेवर २ मिनिटे सारखे ढवळत शिजवावे. फेटलेले क्रीम ३ टेबलस्पून घालून एकजीव करावे. गॅस बंद करावा. आता गॅसवर १ कोळसा लालसर होईपर्यंत तापवावा. मग तो मातीच्या बाऊलमधे ठेवावा व बाऊल डाळीमध्ये ठेवावा. त्यावर तूप घालावे. खडा मसाला मिरे, लवंगा इत्यादी घालावे व लगेच पॅनवर झाकण ठेवावे. (मिनीटभर). नंतर झाकण काढावे. बाऊल काढावा. पॅनमधील डाळ सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावी. वरती कोथिंबीर पेरावी.

पंचपोरन मसाला डाळ आमटी
साहित्य व कृती : पंचपोरन मसाला तयार करण्यासाठी मोहरी, मेथी, बडीशेप, जिरे, कलौंजी सर्व समप्रमाणात घेणे. तव्यावर कोरडे भाजणे व पावडर करणे. मेथी दाणे आपल्या आवडीप्रमाणे घ्यावेत.
    स्टीलच्या टोपात १ वाटी चणाडाळ १ तास पाण्यात भिजवावी. नंतर स्टील कुकरमध्ये, डब्यात दुप्पट पाणी, चिमूटभर हळद, स्वादानुसार मीठ घालून शिजवावे. गॅसवर नॉनस्टिक कढईत २ टीस्पून तूप घालावे. बेदाणे व ताज्या ओल्या नारळाचे अर्धा इंच जाडीचे तुकडे परतून घ्यावेत. प्लेटमध्ये पेपर नॅपकीनवर काढावेत. त्यातच २ लवंगा, ४ वेलची, जिरे अर्धा टीस्पून, १ लहान दालचिनी तुकडा, ४ लाल सुक्‍या मिरच्या व पंचपोर मसाला घालून परतावे. मग त्यात चणाडाळ व आलं, हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून घालावे व झाकण ठेवावे. १० मिनिटे मंद आचेवर शिजवावे. नारळाचे थोडे तुकडे घालावे. चाखून बघावे. डाळ शिजली आहे का ते बघावे व मिठाचा अंदाज घ्यावा. गॅस बंद करावा. भांड्यामध्ये काढावे. नारळ तुकडे व बेदाणे घालून शिजवावे. गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावे. ही खास वेगळ्या प्रकारची डाळ पंचपोरन मसाला घातल्यामुळे खूपच स्वादिष्ट होते. नारळ तुकडे व बेदाणे यांमुळे तर डाळीची लज्जत वाढते.

स्वीट कॉर्न ओट्‌स सूप
साहित्य व कृती : एक वाटी शिजवलेल्या स्वीट कॉर्नची पेस्ट करावी. गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालावे. पेस्ट घालावी. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. मंद आचेवर उकळत ठेवावे. पाच मिनिटांनी त्यात स्वादानुसार मीठ व साखर घालावी. काळी मिरेपूड व जिरे प्रत्येकी पाव टीस्पून घालावी. आता २ टेबल स्पून भाजलेले ओट्‌स व ५ टेबल स्पून ड्रायफ्रूटस्‌ (आपल्या आवडीचे) पावडर घालून ढवळावे. एकजीव करावे. १ वाटी टोमॅटो प्युरी व चिली फ्लेक्‍स अर्धा टीस्पून घालावे. मंद आचेवर २ मिनिटे उकळावे व गॅस बंद करावा. पौष्टिक, स्वादिष्ट सूप तयार.
    सर्व्हींग बाऊलमध्ये गरमागरम सूप काढावे. कोथिंबीर पेरावी व लगेच सर्व्ह करावे.

मटार सूप
साहित्य व कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये पाव टीस्पून लाइट ऑलिव्ह ऑइल घालावे. पाव टीस्पून जिरे, मिरे, २ लवंगा, २ वेलची, १ चक्रीफुल, १ तमालपत्र  घालावे. मग त्यात १ वाटी हिरव्या ताज्या मटाराची भरड घालावी. मंद आचेवर सारखे ढवळत मऊसर शिजवावे. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. नंतर गॅस बंद करावा. थंड होऊ द्यावे. मिक्‍सरमध्ये याचे वाटण करावे. पुन्हा पॅनमध्ये ही प्युरी ठेवावी. टोमॅटो प्युरी अर्धी वाटी, स्वादानुसार मीठ व साखर घालावे. पाणी घालावे, सूप पातळसर ठेवावे. चांगले उकळावे. नंतर गॅस बंद करावा. बाऊलमध्ये मिश्रण काढावे. त्यावर २ टेबलस्पून फ्रेश क्रीम, काकडीच्या चकत्या व कोथिंबीरने सजवावे. गरमागरम सूपचा आस्वाद घ्यावा.

कॅरेट जिंजर सूप
साहित्य व कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये २ टीस्पून बटर व १ बारीक चिरलेला लाल कांदा घालून मध्यम आचेवर लालसर परतावे. नंतर ४ वाट्या व्हेजिटेबल स्टॉक व २ वाट्या गाजर तुकडे घालून हे मिश्रण शिजवावे. गॅस बंद करावा. मिक्‍सर जारमध्ये काढावा. मऊसर प्युरी बनवावी. गॅसवर पुन्हा पॅन ठेवावे. त्यात प्युरी घालावी व १ टेबलस्पून आलं पेस्ट घालावी. ढवळावे. मंद आच ठेवावी. स्वादानुसार मीठ, अर्धा टीस्पून मिरेपूड घालावी. चांगली उकळी आणावी. सर्व्हिंग बाऊलमध्ये गरमागरम सूप काढावे. त्यात १ टीस्पून लिंबूरस पिळावे. मिश्रण ढवळावे. बदामाचे तुकडे १ टेबलस्पून व पार्सले पानांनी सजवावे. हे पौष्टिक सूप सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त आहे. घरगुती समारंभासाठी अवश्‍य करावे व पाहुण्यांना खिलवावे.

स्पाईसी पम्पकीन सूप
साहित्य व कृती : लाल भोपळा स्वच्छ धुवून फोडी कराव्यात. १ सफरचंद घेऊन त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. गॅसवर पॅनमध्ये बटर घालावे. त्यात ४ मद्रासी कांदा चिरलेले, १ लवंग, २ वेलची, दालचिनीचा लहान तुकडा, जिरे घालून परतावे. आता १ टेबल स्पून करी पावडर, १ टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून मिरपूड घालावी. हलकेसे परतावे. नंतर भोपळा व सफरचंदाचे तुकडे घालावे. व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी जरुरीप्रमाणे घालावे. झाकण ठेवावे व २०/२५ मिनिटे शिजवावे. थंड होऊ द्यावे. 
    मिक्‍सरमध्ये काढावे व याची प्युरी करावी. पुन्हा पॅनमध्ये ओतावे व स्वादानुसार मीठ व चिमूटभर साखर घालावी. मंद आचेवर सारखे ढवळावे. लगेच गरम सर्व्ह करावे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे. वाफवलेले मका दाणे पेरावे व पुदिना पानाने सजवावे. लाल भोपळा सहसा खाल्ला जात नाही. त्याचा असा उपयोग करून चविष्ट सूप बनवावे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या