इस्रोची व्यावसायिक झेप

डॉ. अनिल लचके
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कव्हर स्टोरी
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने अवकाशात सातत्याने उपग्रह यशस्वीरीत्या सोडून स्वतःला आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले आहे. आज जगभरात इस्रोकडे अंतराळ क्षेत्रातील एक प्रमुख संशोधन संस्था म्हणून आदराने बघितले जाते. अंतराळातील बाजारपेठेत वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या संस्थेचा लेखाजोखा...

अंतराळात सध्या विविध देशांनी प्रक्षेपित केलेले २२७१ उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करत आहेत. त्यात सर्वांत जास्त, म्हणजे १३२४ उपग्रह रशियाचे आहेत, तर अमेरिकेचे ६५८ आहेत. अशी माहिती गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरकडून मिळत असते. रशियाने ६१ वर्षांपूर्वी १९५७ मध्ये जगातील पहिला उपग्रह ‘स्पुटनिक-१’ आकाशात सोडला होता. त्यानंतर अमेरिकेनेही पुढील चार महिन्यांनी ‘एक्‍सप्लोरर-१’  उपग्रह अंतराळात सोडून अंतराळ-विज्ञानामध्ये बाजी मारली. लवकरच पुढारलेल्या देशांमध्ये उपग्रह सोडण्याची जणू अघोषित स्पर्धा सुरू झाली. भारताने हिंमत आणि आत्मविश्वासाच्या बळावर या क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिल १९७५ रोजी आर्यभटपासून झाली. पण भारताने स्वतःच्या भूमीवरून ‘एसएलव्ही-३’ चा वापर करून रोहिणी हा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला होता. त्यानंतर भारताने स्वतःच्या देशाला उपयोगी पडणारे, तसेच परदेशातल्या ग्राहकांचेही उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत. पहिला परदेशी उपग्रह इस्रोने २६ मे १९९९ रोजी प्रक्षेपित केला. तो ४५ किलोग्रॅमचा जर्मनीचा डीएलआर-टॅबसॅट होता. उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या बाबतीत इस्रोचे यशाचे प्रमाण आणि अचूकपणा वादातीत आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथील ‘फर्स्ट लाँच पॅड’ (एफएलपी) वरून पीएसएलव्हीच्या अग्निबाणाचे प्रक्षेपण होते. भारताच्या विश्वासार्हतेमुळे अमेरिकेने सर्वांत जास्त उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारताकडे सोपविलेले आहेत. भारताला अंतराळातील ‘बाजारपेठेत’ वर्चस्व मिळते. अजूनही जगातील लोक भारतासारख्या विकसनशील देशाची उपग्रह सोडण्याची प्रगती पाहून स्तिमित होत असतात.

ते बरोबरच आहे. ‘पीएसएलव्ही सी-३७’ च्या एकाच उड्डाणात १०४ उपग्रह अचूकपणे नियोजित कक्षेत प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्रोने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी करून दाखवला. सर्व उपग्रहांचे एकत्रित वजन १३७८ किलोग्रॅम होते. त्यात भारताचे तीन आणि इतर देशांचे १०१ उपग्रह होते. यासाठी गणितातला नेमकेपणा आणि तंत्रज्ञानामधील नेटकेपणा गरजेचा होता. हे आव्हान आपल्या संशोधकांनी यशस्वीपणे पेलले. याआधी एकाच अग्निबाणाच्या उड्डाणात रशियाने २०१४ मध्ये जास्तीत जास्त ३७ उपग्रह त्यांच्या कक्षेत प्रक्षेपित केलेले होते. 

इस्रोने २०१८ मध्ये पीएसएलव्ही आणि जीएसएलव्हीमार्फत अंतराळात प्रक्षेपित केलेले उपग्रह विविध प्रकारचे, विशिष्ट कार्य करणारे आहेत. त्यामध्ये आपल्या देशाचे उपग्रह कमी असून इतर देशांचे जास्त आहेत. साहजिकच भारत अंतराळातील स्पर्धात्मक बाजारपेठेत एक अग्रगण्य देश म्हणून गणला जातो. 

इस्रोने ‘पीएसएलव्ही-सी ४०’ अग्निबाण वापरून १२ जानेवारी २०१८ रोजी ३१ उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये सोडलेले होते. पीएसएलव्ही प्रज्वलित झाल्यापासून सूर्य संलग्न कक्षेत प्रवेश करायला १६ मिनिटे आणि ३७ सेकंद लागली. त्यानंतरच्या ७ मिनिटांमध्ये कार्टोसॅट सिरीजमधील ७१० किलोग्रॅम वजनाचा ‘कार्टोसॅट-२’ अंतराळात पाठवण्यात आला आणि लगोलग ‘आयएनएस- १ सी’ हा ७१ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह सोडण्यात आला. अन्य २८ उपग्रह इतर देशांकडून आलेले होते. ते नियोजित कक्षांमध्ये यशस्वीपणे सोडण्यात आले. त्यामध्ये कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, युके आणि यूएसए यांचा समावेश आहे. 

त्यानंतर ‘पीएसएलव्हीसी -४१’ मार्फत ‘आयआरएनएसएस - १ आय  (IRNSS-१I) उपग्रहाचे प्रक्षेपण १२ एप्रिल २०१८ रोजी श्रीहरिकोटा येथून करण्यात आले. हा उपग्रह २०,७३० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे. या यशानंतर ‘पीएसएलव्ही - सी ४२’ अग्निबाणाच्या साहाय्याने १६ सप्टेंबर २०१८ रोजी ‘पीएसएलव्ही - सी ४२’ मार्फत ‘NovaSAR’  आणि ‘S १-४’  दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. दोन्ही उपग्रह सरे सॅटेलाइट टेक्‍नॉलॉजी लिमिटेड यांचे आहेत. 

इस्रोने ‘पीएसएलव्ही - सी ४३’ प्रक्षेपक वापरून २९ नोव्हेंबर २०१८ रोजी भारताचा HYSIS आणि इतर देशांचे ३० उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत प्रक्षेपित केले आहेत. HYSIS म्हणजे ‘हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट’. हा उपग्रह ६४५ किमी उंचीवर सूर्य समकक्षेत परिभ्रमण करेल. अग्निबाण प्रज्वलित केल्यानंतर १७ मिनिटे आणि १९ सेकंद झाल्यावर पहिला भारताचा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत प्रक्षेपित झाला. जंगल आणि कृषी सर्वेक्षण, भूस्तरशास्त्र, सागरी किनारे आणि भूपृष्ठावरील पाण्याचे साठे शोधणे आदी कार्य भारताचा उपग्रह करेल.

‘पीएसएलव्ही-सी ४३’ वरील अखेरचा (तिसावा) उपग्रह एक तास ४९ मिनिटांनंतर प्रक्षेपित झाला. भारताच्या उपग्रहाचे नियंत्रण बंगळूरमधील इस्रो टेलीमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क यांच्याकडे आहे. परदेशी उपग्रहांत एक मायक्रो सॅटेलाइट आहे आणि २९ नॅनो सॅटेलाइट आहेत. हे उपग्रह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, मलेशिया, नेदर्लंड्‌स, स्पेन, यूएसए आदी देशांचे आहेत. या सर्व उपग्रहांचे वजन २६१.५ किलोग्रॅम आहे.

याखेरीज इस्रोने जीएसएलव्ही अग्निबाण वापरून १४ नोव्हेंबर २०१८ रोजी ३८२३ किलोग्रॅम वजनाचा जीसॅट-२९ त्याच्या नियोजित कक्षेत प्रक्षेपित केला. तथापि ‘जीसॅट-११’ अंतराळात पाठवण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीची मदत घेतली. आत्तापर्यंतचा हा सर्वांत जड उपग्रह असून त्याचे वजन ५८५४  किलोग्रॅम आहे.

सद्यःस्थितीत अंतराळातील एखाद्या देशाच्या उपग्रहांची एकूण संख्या ही काही एखाद्या देशाच्या प्रतिष्ठेची बाब राहिलेली नाही. कारण पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असणारे उपग्रह हे आता फक्त एखाद्या  देशाच्या मालकीचे असतातच, असे नाही. खासगी क्षेत्रातील काही कंपन्यांनी उपग्रह सोडण्याचे कंत्राट घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांचे स्वतःचे पण काही विशिष्ट सेवा देणारे उपग्रह असतात. आता उपग्रह ‘बाळगणारे’ मालक खासगी क्षेत्रातील असू शकतात. ते उपग्रह भाड्याने देतात. एकेकाळी उपग्रह अंतराळात ‘लाँच’ करणे म्हणजे त्याला ‘अंतराळातील मानवाची झेप‘, असे म्हटले जायचे. आता ही एक महत्त्वाची पण नित्याची बाब झाली आहे आणि ती जनमानसात रुळलेली आहेच ! व्यावसायिक कंपनी आता सॅटेलाइट (उपग्रह) असे रुक्षपणे न म्हणता त्याऐवजी त्यांना ‘बर्डस्‌‘ (पक्षी) असे म्हणतात!

बर्डसची व्यावसायिक भरारी       
अंतराळाची बाजारपेठ म्हणजे एक ‘रॉकेटिंग बिझनेस’ झालाय. त्यादृष्टीने बर्डस उपयुक्त असून त्यांचा वापर प्रामुख्याने चार व्यावसायिक सेवांमध्ये होतो. त्या सेवा म्हणजे (१) इंटरनेट (२) खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवहारातील समन्वय साधणे (३) मूल्याधिष्ठित सेवा-सुविधा आणि (४)आंतरराष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक व्यापार-उदीम यासाठी. दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची संख्या सर्व देशांमध्ये वाढत चाललेली आहे. त्यातून डीटीएच सिस्टिम, म्हणजे डायरेक्‍ट टू. होम सेवा उदयाला आली आहे. त्यामध्ये अत्यंत रेखीव चित्र आणि उच्च दर्जाचा ध्वनी थेट घरी येतो. त्यासाठी उपग्रह लागतील. व्यापारी दूरसंवेदन सेवा तर फारच महत्त्वाची आहे. जगातील केवळ हवा-पाण्याचीच नव्हे तर पीक-पाण्याची स्थिती जर लक्षात आली तर रास्त किमतीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येतील. उपग्रहांचा उपयोग स्थान निश्‍चितीसाठी करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला जीपीएस; ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणतात. या कामासाठी अमेरिकेचे ३२ ‘बर्डस‘ (उपग्रह) सतत कार्यरत असतात. या बत्तीसपैकी दोन उपग्रह केवळ ‘रिझर्व्हड्‌‘ (राखीव) म्हणून भ्रमण करतात. हे उपग्रह विशिष्ट उंचीवरून परिभ्रमण करतात. त्यांना एक पृथ्वी प्रदक्षिणा घालायला १२ तास लागतात. जगात असे जीपीएस सेवेसाठी उपग्रह बाळगणारे देश फक्त ६ आहेत. यूएसए, जपान, रशिया, चीन, युरोपियन युनियन आणि भारत. जीपीएस उपग्रह बोटी, विमाने आणि रस्त्यावरून जाणाऱ्या  मोटारींना सतत मार्गदर्शन करतात. आता जीपीएस-शूज (पादत्राणे) निघालेली आहेत. चालणाऱ्यांना ते मार्ग सांगतात. याचा अर्थ उपग्रहांची सर्व सेवा आता सामान्य माणसाच्या ‘डोअर स्टेप’ पर्यंतच नव्हे तर चक्क ‘स्टेप’ पर्यंत येऊन पोचलेली आहे! उपग्रहांची सेवा ही नित्याची गरज पडणार आहे. म्हणजेच अंतराळ-विज्ञान बाजारपेठेत येणार हे उघड आहे. अंतराळ-विज्ञान हे आंतरविद्याशाखीय झालेले आहे. याचा अर्थ भावी काळात फिजिक्‍स, केमिस्ट्री, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इंजिनिअरिंग, (मेटलर्जी, टेलिकम्युनिकेशन), अशा अनेक शाखांमधील तरुण देशाला आवश्‍यक आहेत.
आधुनिक उद्योजक हे उपग्रह-प्रक्षेपणामध्ये रस घेत नाहीत. मात्र ते उपग्रह सेवा सुविधांचे व्यवस्थापन करू इच्छितात. सहाजिकच कॉमर्स, व्यवस्थापन क्षेत्रातही अवकाश तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरलेले आहे.

‘अँट्रिक्‍स’ची स्थापना 
उपग्रहाचं प्रक्षेपण, उपग्रहांमार्फत मिळणारी सेवा, त्याचे वितरण, त्याची व्यवसायी बाजू ही दिवसेंदिवस महत्त्वपूर्ण ठरणार, हे भारताने ओळखून १९९२ मध्ये बंगळुरू येथे ‘अँट्रिक्‍स’या संस्थेची स्थापना केली. अँट्रिक्‍स ही इस्रोची एक शाखा आहे. अँट्रिक्‍स म्हणजे अंतराळ. तिचे काम म्हणजे इस्रोची उपग्रहासंबंधीच्या देशीय आणि आंतरदेशीय ‘बाजारपेठे‘ची  व्यावसायिक बाजू स्वतंत्रपणे सांभाळणे. अनेक देशांचे उपग्रह अंतराळात विशिष्ट कक्षेत प्रक्षेपित करायचे असतील, तर त्या बाबतची चर्चा-बोलणी अँट्रिक्‍स संस्था करते. अनेक देशांना विविध प्रकारची (डेटा) माहिती हवी असते.  सुदूर-संवेदनामार्फत ती मिळते. सुदूर संवेदनाचे काम आपले उपग्रह दर्जेदारपणे करतात. त्यामार्फत मिळणारी माहिती आपल्या डिझायनर्सनी उत्तम प्रकारे सादर केली असल्याने या क्षेत्रात भारताचे नाव चांगले झालं आहे. मुख्य म्हणजे ही माहिती योग्य (स्वस्त) किमतीत भारत देऊ शकतो. गोळा झालेली माहिती अँट्रिक्‍सने विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. अनेक छोटे-उद्योगधंदे अंतराळातील तंत्र सांभाळायला, स्पेअर-पार्ट पुरवायला उपयुक्त असतात. तो व्यवसाय वाढीला आणणे, हे पण कार्य अँट्रिक्‍स करत असते. ‘मूल्याधिष्ठित सेवा’मधून भरपूर पैसा मिळू शकेल, असे मत इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केलेलं होते. ते खरे ठरले आहे. उपग्रहांपासून मिळणाऱ्या मूल्याधिष्ठित सेवांचा व्यवसाय ऊर्जितावस्थेत येण्याची बरीच कारणे आहेत. मुलकी विकासासाठी पाइप लाइन टाकणे,  भूजल सर्वेक्षण करणे, मत्स्यशेती प्रकल्पाला मदत करणे, जंगलांचे मापन आणि नकाशे बनवणे, बर्फाच्छादित प्रदेशाचे सर्वेक्षण अशी कामे उपग्रहांकडे असतात. अंतरिक्षातील अन्य उपग्रहाच्या परिभ्रमणावर लक्ष ठेवणे हे कार्यदेखील बरेच महत्त्वाचे असते. कारण त्यांच्यापासून सतत माहिती आणि सेवांची देवाण-घेवाण मिळत असते. त्या माहितीचे वितरण आणि व्यवस्थापन करणे हे ही कार्य अँट्रिक्‍सच्या कक्षेत येते. अँट्रिक्‍सने पुरवलेल्या माहितीचा दर्जा उत्कृष्ट असल्यामुळे त्यांच्याकडे ‘बिझनेस’ चालून येतो ! ह्युजेससारख्या बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या अंतराळातील बाजारपेठेत घट्ट रोवून बसल्या आहेत. तिथे चंचुप्रवेश मिळणे हे इस्रोला अशक्‍य होते. या स्पर्धात्मक क्षेत्रात अँट्रिक्‍समधील आपल्या उत्साही तंत्रज्ञांनी वेळोवेळी बाजी मारलेली आहे. आपले वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मर्यादित, पण जेमतेम पुरेशा आर्थिक पाठबळावर, गगनभेदी झेप घेण्याचा यशस्वी प्रयत्न करत असतात हे विशेष!  आत्तापर्यंत भारताने २३९ उपग्रह सोडलेले आहेत. विशिष्ट काळानंतर उपग्रहाचे कार्य संपुष्टात येते. त्याची अनेक कारणे आहेत. कधी त्यावरील ऊर्जानिर्मिती थांबते तर कधी संपर्क तुटतो. डिसेंबर (२०१८) मध्ये भारताचे ४२ उपग्रह उत्तम कार्य करत आहेत. त्यामध्ये दळणवळणाशी संबंधित १५, हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे ४ , सुदूर-संवेदनासाठी १४,  नॅव्हिगेशनसाठी ७ आणि अंतराळ-विज्ञानाच्या संशोधनाकरिता २ उपग्रह आहेत.
परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्यामुळे भारताला स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करणे फायदेशीर ठरते. अर्थात याला व्यवसायातील ‘कॉस्टिंग‘ करणं अवघड असतं. 
पण एक अंदाज करता येईल.  स्पेस-एक्‍स कंपनी जर एखादा उपग्रह लॉन्च करायचे ६ कोटी डॉलर घेत असेल, तर इस्रो केवळ ३० लाख डॉलर घेते. यामुळे उपग्रह प्रक्षेपित करायचे कंत्राट अँट्रिक्‍सला मिळते. पण यशाचे प्रमाण आत्तापर्यंत १०० टक्के असल्याने अधिक लाभ मिळवायला वाव आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

संबंधित बातम्या