पाऊस आला; आजारपणे आली 

डॉ. अविनाश भोंडवे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा !. असे कवितेतील आई बाळाला सांगते खरी, पण प्रत्यक्षातील आजची आई तिच्या बाळाला, आला बघ हा दुष्ट पावसाळा, रेनकोट टोपी घाल बाळा !!  असंच सांगताना दिसते. कारण पाऊस म्हटले म्हणजे आरोग्याबाबत जागरूक आई-बाबांना पावसामुळे होणारी नेत्रसुखद हिरवळ दिसतही असेल; पण रस्त्यांवर होणारा चिखल, चिकचिक आणि पावसात भिजण्यामुळे होणारी सर्दी, खोकला, ताप ही वस्तुस्थिती त्यांना स्वस्थ बसू देत नसते. सर्व ऋतूंमध्ये पावसाळ्यातच अनेकविध विकार, साथींचे आजार यांचे थैमान सुरू होते. 

सर्दी-खोकला 
पावसाळ्यात वारंवार पावसात भिजणे, कपडे ओले झाल्यावर अंगावरच वाळवल्यामुळे आणि अंग विशेषतः केस ओले राहून ते कोरडे न केल्यामुळे शरीरावर विषाणूंचा त्वरेने हल्ला होतो आणि मग शिंका सुरू होतात, नाकातून पाणी व्हायला लागते, घसा सुजून तो दुखायला लागतो, थोडीशी थंडी भरून कडाडून ताप येतो. अगोदर कोरडा आणि नंतर कफ पडणारा जोरदार खोकला सुरू होतो. त्यातच जर त्यावेळेला ढगाळ हवामान असेल तर हे तापाचे प्रमाण जरा जास्त असते. अशा काळात एच्‌.वन. एन्‌ वन आणि त्याच्या जातीच्या विषाणूंचा संसर्ग होऊन स्वाईन-फ्लूची लागण होऊ शकते. पावसाळ्यात अशाप्रकारे झालेल्या सर्दी खोकल्याचे पर्यवसान अनेकदा ब्राँकायटिस, अस्थमा, न्यूमोनिया अशा गंभीर आजारांमध्ये होऊन प्रसंगी रुग्णाला इस्पितळातल्या अतिदक्षता विभागात दाखल करून उच्च दर्जाची औषधे देऊन प्राणवायूदेखील लावावा लागतो. अशा आजारांचा पूर्वेतिहास असलेल्या रुग्णांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घेणे जरुरीचे असते. पावसाळ्यात शक्‍यतो भिजणे टाळावे. पावसात भिजावे लागल्यास लगेच अंग कोरडे करून पूर्ण वाळलेले स्वच्छ कपडे घालावेत. केस पूर्णतः कोरडे करावेत, विशेषतः लांब केस असलेल्या महिलांनी व मुलामुलींनी ही खबरदारी घ्यायलाच लागते.

मलेरिया 
पाऊस पडून गेला, की जागोजागी पाणी साचते आणि डबकी तयार होतात. या डबक्‍यांमध्ये तयार होणाऱ्या डासांद्वारे मलेरिया फैलावतो. मलेरियाचा डास म्हणजे ॲनाफेलिस जातीचा डास.  या डासाच्या पोटात मलेरियाचे ’प्लाझ्मोडीयम फाल्सिपेरम’ आणि ’प्लाझ्मोडीयम व्हायवॅक्‍स’ नावाचे जिवाणू असतात. मलेरियाचा डास चावल्याने हे जिवाणू त्या माणसाच्या रक्तात जातात आणि त्याच्या लाल रक्तपेशींच्या आतमध्ये ते वास्तव्य करतात. असे हजारो जिवाणू माणसाच्या शरीरात मुक्काम  करून राहतात. योग्य संधी मिळताच हे प्लाझ्मोडीयम, लाल रक्तपेशींचे कवच फोडून माणसाच्या रक्तामध्ये पसरतात. हे जिवाणू रक्तपेशी जेंव्हा फोडून रक्तामध्ये मुक्त विहार करू लागतात, तेंव्हा त्या माणसाला थंडी वाजून ताप येणे सुरू होते. मलेरिया मध्ये फक्त तापच येत नाही तर रक्तपेशी नष्ट झाल्याने त्याचे हिमोग्लोबिन कमी होऊ लागते. त्याला एक प्रकारची कावीळ होते आणि त्याची प्लिहा या निकामी रक्तपेशींना नष्ट करण्याच्या प्रक्रियेमुळे वाढते. मलेरियाच्या एका प्रकारात हा आजार मेंदूमध्ये शिरून रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होतो.  मलेरियाचे पक्के निदान करण्यासाठी रक्ताची तपासणी अत्यावश्‍यक असते. मलेरियाची नेहमीची औषधे म्हणजे  क्‍लोरोक्विन हे सर्वत्र मिळते. पण त्याचा वापर करण्याची पद्धत काहीशी वेगळी असल्याने ती डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणेच घ्यावीत. वेळीच योग्य औषधोपचार झाल्यास मलेरिया पूर्ण बरा होऊ शकतो अन्यथा त्याचे पर्यवसन गंभीर आजारात होऊ शकते.      

डेंगी 
हा एक विषाणूजन्य आजार देखील डासांमुळेच पसरतो. एडीस इजिप्ती नावाच्या डासांमुळे हा होतो. डेंगीचे विषाणू डासांद्वारेच माणसाच्या शरीरात शिरतात. या आजारात अचानक खूप ताप येतो, प्रमाणाबाहेर डोके दुखते, हातापायांचे सांधे, हाडे खूप दुखतात आणि महत्त्वाचे म्हणजे शरीरावर विशेषतः पाठीवर एक बारीक लालसर, न खाजणारी पुरळ येते. डेंगीमध्ये  विषाणू डास चावल्यावर रक्तातील पांढऱ्या पेशीत शिरतात आणि तिथे त्यांची वाढ होते. यामध्ये यकृत आणि हाडातील मगजावर परिणाम होतो. त्याबरोबरच रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन रुग्णाचा रक्तदाब अतिशय कमी होतो. रक्तातील प्लेटलेट्‌स प्रकारच्या पेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. त्यामुळे रक्ताची गोठण्याची क्रिया नष्ट व्हायला लागते आणि शरीरांतर्गत तसेच सह्रेरातून बाहेर पडणाऱ्या इतर स्त्रावांमधून रक्तस्त्राव व्हायला लागतो. यामध्ये रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर होऊन तो दगावू शकतो. डेंगीचे पक्के निदान रक्ताच्या तपासणीतून होते.  

चिकुनगुनिया 
आफ्रिकन भाषेतील नावाच्या या आजाराचा चिकन किंवा कोंबडीचा तिळमात्रही संबंध नाही. डेंगीसारखाच याचा विषाणू हा एडीस जातीच्या डासांद्वारे पसरतो. मात्र हा डास आपल्याच बगीच्याच्या कुंडीत साठलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतो. याची लागण झाल्यावर दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ, पोट, कंबर या भागांवर पुरळ येते. पण चिकुनगुन्याचे सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे या आजारात हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. बहुधा हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. कित्येक रुग्णांमध्ये तर साधे चालणे अशक्‍य होते किंवा पायांची मांडी घालणे सुद्धा खूप वेदनाकारक होते. चिकुनगुन्याचीदेखील आय्‌.जी.जी. आणि आय्‌.जी.एम्‌. अशी रक्ताची तपासणी करून खात्री करता येते. वैद्यकीय इतिहासामध्ये हा आजार तुलनात्मक दृष्ट्या नवा असल्याने, दुर्दैवाने  अजून तरी यावर लस आणि प्रभावी उपाय गवसलेला नाही. क्‍लोरोक्विनसारखी औषधे वापरल्यास ही सांधेदुखी कमी होऊ शकते. परंतु चिकुनगुन्याच्या सांधेदुखीकरिता ॲस्पिरीन, आयबुप्रोफेन, नाप्रोक्‍सेन किंवा स्टेरॉइडस अशी संधिवाताची औषधे मुळीच वापरू नयेत.
अतिसार 
पावसाळ्याबरोबर येणारी दुसरा जंतूवाहक कीटक म्हणजे माशी. पावसाळ्यामुळे होणारी चिकचिक आणि अस्वच्छता माशांच्या वाढीला पोषक ठरतात. उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, पेये, सरबते, रस अशा खाद्यपदार्थांतून, माशांच्या पायांना लागून आणि त्यांच्या पोटातील स्त्रावांसमवेत अनेकविध प्रकारचे जंतू आणि जिवाणू ते पदार्थ खाणाऱ्या माणसांच्या शरीरात प्रवेश करतात. यामुळेच या काळात अनेक साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यातील महत्त्वाचा आजार म्हणजे अतिसार किंवा जुलाब-उलट्यांचा त्रास.  या आजारामध्ये विषाणूंमुळे होणारे उलट्या जुलाब, आमांश, वेगवेगळ्या जंतूंनी होणारे हगवणीसारखे आजार, कॉलरा यांचा समावेश होतो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी उकळून गार करून प्यावे किंवा चांगला फिल्टर वापरून गाळलेले पाणी प्यावे. उघड्यावरचे अन्न, गाडीवरचे पदार्थ, भेळ, वडा, भजी, समोसा अशासारखे कनिष्ठ दर्जाच्या उपाहारगृहात मिळणारे पदार्थ टाळावे. असा त्रास झाल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घावीत. 

विषमज्वर 
बाजारातील उघड्या अन्नपदार्थांवर बसणाऱ्या माश्‍यांमुळे अन्न दूषित होऊन विषमज्वर म्हणजेच टायफॉईड हा एकेकाळी खूप भयंकर समजला साथीचा जाणारा आजार होतो. या आजारात ताप सुरवातीला कमी असतो पण नंतर तो वाढत जातो आणि दिवस-दिवस उतरत नाही. ताप खूप चढल्यास रुग्ण असंबद्ध बडबड करतो. योग्य उपचार न मिळाल्यास पोटात शरीरांतर्गत रक्तस्त्राव होऊन रुग्ण दगावू शकतो. विषमज्वराची चिकित्सा ’विडाल टेस्ट’ या रक्ताच्या चाचणीतून होते. त्याचबरोबर हिमोग्राममध्ये रक्तामधील पांढऱ्या पेशी खूप कमी झाल्याचे लक्षात येते. या तपासण्या मात्र ताप आल्यावर पाचव्या दिवसांनंतर करावी लागतात. त्याअगोदर केल्यास त्या चाचण्यांचे निकाल अपुरे किंवा ’नॉर्मल’ येतात. रुग्णाला विषमज्वराचा आजार नसल्याची दिशाभूल होऊन, या आजाराचा औषधोपचार न होऊन आजार मात्र बळावण्याचा धोका असतो. आज विषमज्वरावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. या आजारासाठी रुग्णाला इस्पितळात दाखल न करता, घरच्या घरी औषधे घेऊन त्याला पूर्णपणे बरे करता येते. परंतु औषधे अपुऱ्या मात्रेत किंवा डॉक्‍टरांच्या सल्ल्यापेक्षा कमी दिवस घेतल्यास तो बळावण्याची शक्‍यता असते. 

 लेप्टोस्पायरोसिस 
 एकेकाळी क्वचितच आढळणाऱ्या या आजाराची लागण झालेले रुग्ण आता वरचेवर सापडतात. या आजाराचे जंतू माणसाच्या शरीरात जाण्याची एक जगावेगळी पद्धत आहे. हा आजार उंदरांपासून पसरतो आणि तो सुद्धा त्यांच्या मूत्रातून. पावसाळ्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर येतो. मुंबईसारख्या महानगरातदेखील पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. अशावेळेस जमिनीखालच्या भुयारी ड्रेनेजमधील आणि रस्त्यावरील गटारांमधील उंदीर या सांडपाण्यात वाहू लागतात. त्यांचे मूत्र आणि पर्यायाने लेप्टोस्पायरोसिसचे जंतू या सांडपाण्यात मिसळतात. हे सांडपाणी यावेळेस रस्त्यावरून वाहताना त्यातून येजा करणाऱ्या व्यक्तींच्या पायांवर जर एखादा जखम किंवा ओरखडा जरी असला, तरी त्यातून हे जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्याला लेप्टोस्पायरोसिसची बाधा होते. 

या आजारात सुरवातीला थंडी येते, ताप येतो, हातपाय, डोके व अंग दुखते परंतु ही लक्षणे लगेचच बरी होतात. त्यानंतर काही दिवसांनी या रुग्णाला कावीळ होते आणि त्याचे यकृत मूत्रपिंडे यांच्या कार्यात मोठा गंभीर अडथळा निर्माण होऊन ती निकामी होऊ लागतात. या आजाराच्या जंतूंमुळे मेंदूच्या आवरणाना सूज येऊन (मेनिंजायटिस) रुग्ण दगावू शकतो. पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्याशी निगडीत असलेल्या या आजारापासून संरक्षण करण्यासाठी जर आपल्या पायांना जखम असेल तर रस्त्याने जाताना साचलेल्या पाण्यातून जायचे टाळा. रस्त्यावर सगळीकडेच जर पाणी साचले असेल तर पायात चांगली पादत्राणे शक्‍यतो बूट असावेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पाण्यातून चालत आल्यावर साबण वापरून भरपूर पाण्याने पाय पूर्णपणे स्वच्छ करावेत.

त्वचारोग 
पावसाळ्यात सततच्या ओलसरतेमुळे काही त्वचाविकारदेखील होतात. पावसाळ्यात भिजल्यावर अंगावरच ओले कपडे वाळून देणे, पावसाळ्यामुळे नीट न वाळलेले कपडे विशेषतः अंतर्वस्त्रे वापरणे यामुळे काखांमध्ये, जांघांमध्ये गजकर्णासारखे त्वचेचे विकार होतात. पावसाळ्यात पाय सतत ओले होतात. पाय नीट कोरडे न केल्यास, पायाच्या बोटांमधील बेचक्‍या ओल्या राहतात. त्यामुळे तिथे चिखल्या होतात. पावसातून येता जाता, पायातले मोजे आणि बूट ओले होतात. असे ओले बूट-मोजे सतत वापरूनसुध्दा पायांना चिखल्या होतात. जर मधुमेही रुग्णाला अशा चिखल्या झाल्यातर त्यात जंतूंचा संसर्ग होऊन संपूर्ण पायावर सूज येऊ शकते आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. कित्येकदा पाय तोडण्याची शस्त्रक्रियासुद्धा करण्याची वेळ येते. त्यामुळे पावसात पाय कोरडे ठेवा आणि पायाच्या बेचक्‍यासुद्धा व्यवस्थित पुसून कोरडे  ठेवण्याची काळजी घ्या असे आवर्जून सांगावेसे वाटते. या साऱ्या आजारांची यथायोग्य जाणीव जर आपण बाळगली आणि आपल्या आरोग्याचे रक्षण केले तर पावसाळ्यातील, हरित तृणांच्या मखमालीने नटलेले हिरवे हिरवे गार गालिचे आपण निश्‍चितच आनंदाने उपभोगू शकू. 

संबंधित बातम्या