बौद्धिक सामर्थ्य

डॉ. अ. ल. देशमुख 
शुक्रवार, 15 जून 2018

कव्हर स्टोरी
 

दहावीच्या परीक्षेत यंदा ८९.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून ६३,३३१ विद्यार्थ्यांना ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साडे चार लाखाच्या घरात आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, अभ्यासाचे, प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. इयत्ता दहावीला तीन भाषा, गणित, विज्ञान, इतिहास-राज्यशास्त्र व भूगोल असे विविध स्वरूपाचे विषय असल्याने वेगवेगळ्या विषयांची तोंडओळख होऊन मुलांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. मुले अभ्यासाला, कष्टाला, प्रयत्नांना तयार आहेत. शिक्षक, पालक सांगतील तसे ते करतात. परंतु दहावीचा जीवच फार लहान आहे. मोजका अभ्यासक्रम, त्या अनुषंगाने तयार केलेली छोटी छोटी पाठ्यपुस्तके, चाकोरीबद्ध व साचेबंद परीक्षा पद्धती, प्रश्‍नपत्रिकेत ९० टक्के प्रश्‍न पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायातले विचारणे, गुणांची टक्केवारी वाढवण्याऐवजी प्रत्येक विषयाला अंतर्गत मूल्यमापन म्हणून वीस गुण, गावोगावी खासगी शिकवण्या घेणाऱ्यांचे पॅटर्न्स या सर्वांचा परिपाक म्हणून रट्टा मारून अभ्यास करणारा सामान्य विद्यार्थीसुद्धा ८० टक्‍क्‍यांपुढे गुण मिळवतो. मुलाच्या यशाने पालक हुरळून जातात. त्यांच्या अपेक्षा वाढतात. विद्यार्थ्याला गृहीत धरून पुढील परिणामांचा विचार न करता पुढचे निर्णय ते स्वतःच घेतात. इथेच खरी मेख आहे. या निर्णयाने अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. स्वतःच केलेली चूक असल्याने त्याची वाच्यताही कुठे होत नाही. त्यामुळे या समस्येची तीव्रता जाणवत नाही. परंतु, पुढील निकालांवरून त्यातील सत्य, वास्तव बाहेर आले आहे. गुंतागुंत वाढत चालली आहे. अपेक्षापूर्तीच्या ओझ्याखाली असंख्य मुले गुदमरून जात आहेत. गुण आणि गुणवत्ता याचा काही संबंध आहे का यावर संशोधन करायला हवे. 

महाराष्ट्रातील सद्यःस्थिती 
महाराष्ट्रात स्टेट बोर्डाच्या एसएससी परीक्षेत ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे साडे चार लाख विद्यार्थी आहेत. त्यात सीबीएसई व आयसीएसईची भर घातली तर हा आकडा साडेपाच लाखाच्या घरात जाईल. या पार्श्‍वभूमीवर राज्यात ‘एमएचटीसीईटी’मध्ये २०० पैकी १९० च्या वर गुण मिळविणारे केवळ १० विद्यार्थी आणि ७५ टक्के म्हणजे १५० गुण घेणारे केवळ २८८९ विद्यार्थी आहेत. म्हणजे केवळ १ टक्का; आता बोला या दहावीच्या गुणवत्तेचे काय करायचे? बिचारी मुले विनाकारण भरडली जातात. यात ग्रामीण भागातील मुले सर्वांत जास्त भरडली जातात. कारण ते काही स्वप्न घेऊन तुटपुंज्या साधनांसह शहरांत येतात, क्‍लासवाल्यांकडून अनेकदा निराश होतात. एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या अनेकांची हीच स्थिती आहे. 

शिक्षणप्रक्रिया 
प्रस्तुत समस्येचे मूळ शिक्षण प्रक्रियेत आहे, यावर कोणी भाष्य करायला तयार नाहीत. यावर विचार करून बदल करायला हवेत. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील शिक्षण यांचे अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि आशय, अध्यापन व अध्ययन पद्धती, तंत्रे व साहित्य किंवा उपकरणे, मूल्यमापन आणि परीक्षा पद्धती, शैक्षणिक आकृतिबंध या सर्वच बाबतीत आमूलाग्र बदल करणे आवश्‍यक आहे. अभ्यासक्रम कालसुसंगत आणि जीवनोपयोगी हवेत. आकृतिबंध लवचिक आणि सुलभ संरचित, व्यवस्थापन कार्यक्षम व सोयी-सुविधांनी सज्ज हवे. माध्यमिक शाळेतील विद्यार्थी चिकित्सक, अवांतर वाचन करणारा, पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन अभ्यास करणारा, ज्ञानाच्या उपयोजनावर भर देणारा, संशोधक वृत्ती वाढवणारा, व्यावहारिक व संवादकौशल्यात पारंगत, इंग्रजी माहिती-तंत्रज्ञान व संगणक वापरावर प्रभुत्व असलेला तयार करणे ही काळाची गरज आहे. असा पारंगत व परिपूर्ण विद्यार्थी कमी गुण मिळाले तरी उत्तम करिअर करेल. शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मानसिक तयारी करून घेतली, त्यांना नियमित अभ्यासाची गरज पटवून दिली, परिश्रम करण्यासाठी प्रेरणा दिली, अभ्यासासाठी लागणारी संदर्भ-पुस्तके त्यांना मिळवून दिली तर विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागेल. स्वयंअध्ययनामुळे अभ्यासाविषयीचे स्वरूप स्पष्ट होत जाते व विषयाचे पूर्ण आकलन होते. शंका आणि समस्यांची उकल होते. बुद्धिमत्ता चाचणी, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा यामधून यश मिळविण्यासाठी स्वयंअध्ययनाचा खूप उपयोग होतो. लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते. बुद्धी प्रगल्भ होते. धैर्य आणि आत्मविश्‍वास प्राप्त होतो. 

नव्वद टक्‍क्‍यांचे पुढे काय होते? 
आज महाराष्ट्रात ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ६० हजार विद्यार्थी आहेत. प्रत्येक राज्यात ही संख्या आहे. याचा अर्थ भारतात दरवर्षी १५ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बुद्धिमान म्हणून बाहेर पडत आहेत. हा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्धिक क्षेत्रात आपले प्रभुत्व हवे. प्रत्यक्षात आपल्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठे यांचा जागतिक पातळीवर पहिल्या शंभरातदेखील क्रम लागत नाही. आपले काही तरी चुकते आहे, हे निश्‍चित. शैक्षणिक संस्थांनी अध्ययन-अध्यापनाबरोबर संशोधनावर भर दिला, विकसित देशातील शैक्षणिक संस्थांशी व विद्यापीठांशी संवाद साधून आपले अभ्यासक्रम अद्ययावत केले, तर हे ९० टक्‍क्‍यांपुढचे विद्यार्थी आपल्याला जागतिक क्रमवारीत वरचे स्थान मिळवून देतील. सरकारने या विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय या सर्व विद्याशाखांतून सॅंडविच अभ्यासक्रम सुरू करावेत. शिकाऊ उमेदवारी योजनेची व्याप्ती (Apprenticeship Act) सर्व विद्या शाखांकरता वाढवावयास हवी. आज आमच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक शक्ती वाया जात आहे. काही परदेशी संस्था भारतीयांची बौद्धिक शक्ती वापरत आहेत. बौद्धिक ज्ञानाचा झरा युवा विद्यार्थ्यांमधून सतत वाहात असतो. त्यांना संशोधनात जाणीवपूर्वक वाव दिल्यास देश विकासाकडे जातो. जे शिकविले जाते त्यावर शाळेतील सर्व विद्यार्थी विश्‍वास ठेवतात. 

हुशार विद्यार्थी प्रश्‍न विचारतात व ९० टक्‍क्‍यांच्या वरचे विद्यार्थी नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. जगाच्या लाटेत महाराष्ट्राला अग्रेसर स्थान मिळवायचे असेल तर या बौद्धिक संपदेस आतापासूनच खतपाणी देण्याची व्यवस्था सरकारने, समाजाने केली पाहिजे. अन्यथा, ही बौद्धिक संपदा नकारात्मक कामाकडे वळली, तर ते आपल्याला परवडणार नाही. यांना नुसते शिक्षण देऊन भागणार नाही. त्यांनी उद्योजक होण्याकरता योग्य वातावरणनिर्मिती करावयास हवी. टेक्‍नॉलॉजी पार्क, रिसर्च पार्क, इनोव्हेशन सेंटर काढायला पाहिजेत. तंत्र विद्यापीठे हवीत. जगातील प्रगत देश बौद्धिक संपदा व तंत्रज्ञानामुळे पुढे आलेत. हा मूलमंत्र सरकारने समजून घेतला पाहिजे आणि कृतीत आणला पाहिजे.

संबंधित बातम्या