रानभाज्यांचा ऋतू

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

सह्याद्री खूप वैशिष्ट्यपूर्ण पर्वत आहे. पण या साऱ्या प्रदेशातल्या जीवनाचे सारे आयाम ठरवतो पावसाळा. दरवर्षी नित्याप्रमाणे मेघमाला येतात, अन सह्याद्रीतील सगळ्या सजीवांच्या जगण्याचा रागरंगच बदलतो. गवते, छोट्या वनस्पती वाढायला लागतात, कीटकांची विपुलता होते, प्राण्यांसाठी खूप सारं अन्न उपलब्ध होतं. जसं प्राण्यांचं, तसंच इथं राहणाऱ्या गिरीजनांचं. पावसाळ्यापूर्वी त्यांनीही अनेक गोष्टींची तयारी पूर्ण केलेली असते. 

चैत्रात बऱ्याच गावांच्या देवराईतील देवतांच्या जत्रा संपल्यावर लगबग होते ती पावसाळ्याच्या तयारीची, घराला कारवीचं कुडण घातलं जातं, कोळीमसारख्या गवताने घर शेकरली जातात, अन्‌ पावसाळ्यात जळणासाठी गरजेच्या काड्या कुड्यांची साठवणूक केली जाते. पावसाळ्यात इथल्या लोकांसमोर सगळ्यात मोठे आव्हान असते ते सह्याद्रीतल्या महामूर पावसात आधल्या वर्षीचे शिल्लक धान्य कोरडे ठेवण्याचे आणि हे अन्न कीटकांपासून दूर ठेवण्याचे. पण पावसाळा जसा या काही अडचणी निर्माण करतो तसे अन्नाचे नवनवे पर्याय ही उपलब्ध करून देतो. हे नवे पर्याय असतात केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांचे अन कंदमुळांचे. सह्याद्रीत मानवाची वस्ती झाल्यानंतर गेल्या चारेक हजार वर्षात इथल्या मानवानं आपल्या निरीक्षणातून, अनुभवातून आपलेसे केलेल्या या वनस्पती. 

सह्याद्रीतल्या स्थानिक रहिवाशांचे शाकाहारी अन्नाचे दोन महत्त्वाचे दोन स्रोत असतात एक आहे त्यांनी शेतात पिकवलेलं धान्य, कडधान्य आणि भाज्या. आणि दुसरा स्रोत म्हणजे एक जंगलातून जमा केलेल्या भाज्या आणि फळे. शेतात लावल्या जाणाऱ्या वानसजाती अगदी थोड्या, बोटावर मोजता येतील इतक्‍या. मग अशा वेळी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरतो जंगलातून जमा केले जाणारे अन्न. ऋग्वेदातील अरण्यसुक्तात वनभूमीचे वर्णन केले आहे.

वनपुष्पांच्या सुरभीने गंधित, नांगरल्याविण बहूअन्ना, पशुपक्षांची तू तर माता, अरण्यदेवी नमोस्तुते जिच्यावर नांगर चालवला जात नाही, अशी अकृषीवला वनभूमी नांगर चालवलेल्या जमिनीपेक्षा अन्नाची जास्त विविधता देते. उन्हाळ्यात फळांची विविधता, तर पावसाळ्यात या रानभाज्यांची. उन्हाळ्यात करवंदे तोरणे, भोकरे, अळू तहानभूक भागवतात. तसे पावसाळ्यातल्या अनेक रानभाज्या त्याच्यातील औषधी गुणांमुळे पावसाळ्यातले अनेक आजार दूर ठेवतात. मात्र या जंगली रानभाज्या आपल्या शहरी लोकांच्या रोजच्या खाण्यात असलेल्या भाज्यांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत.

शहरात मिळणाऱ्या भाज्या शेतात लावल्या जातात त्यांना वेळेवर पाणी घातले जाते, त्यांची चांगली वाढ व्हावी त्यांचे कीटकांपासून, रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना खते, कीटकनाशके घातली जातात. रानाभाज्यांची एवढी चैन नसते. या जंगली वनस्पती रानात वाढत असल्यामुळे त्यांना इतर वनस्पतींशी वाढण्यासाठी स्पर्धा करावी लागते, तर कीटकांसारख्या, बुरश्‍यांसारख्या भक्षकांच्या हल्ल्याला सदोदित तोंड द्यावे लागते. या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी वनस्पतींना स्वतःमध्ये अनेक रसायने निर्माण करावी लागतात. ही रसायने म्हणजे तांत्रिक भाषेत अल्कलॉइड्‌स. 

औषधी वनस्पतींमध्ये हीच संरक्षक रसायने म्हणजे या वनस्पतींचे आपण उपयोगात आणतो ते औषधी गुण. मात्र भाज्यांमध्ये अशा रसायनांची विपुलता असल्याने त्या चवीला कडवट असतात त्यामुळे स्थानिक लोकांच्या पाककृतीमध्ये या भाज्यांमधील कडवटपणा घालवणे हा एक महत्त्वाचा भाग असतो. बरेचदा हा कडवटपणा भाजी उकळून वरचे पाणी

टाकून देऊन घालवला जातो. भारंगी, घोळू, साळकांदा ही अशा भाज्यांची काही उदाहरणे. कारंद्या सारख्या कंदांचाही कडवटपणा घालवण्यासाठी बरेच दिवस ते वाहत्या पाण्यात ठेवले जातात एकदा हा कडवटपणा गेला की या भाज्या खाण्यायोग्य होतात. बरेचदा या भाज्या गोळा करतानाचे अजून एक पथ्य म्हणजे या भाज्या फुले येण्यापूर्वी गोळा करणे. कारण एकदा वनस्पतीला फुले आली, की त्यांना संरक्षणाची अजून गरज भासते आणि त्यांच्यामध्ये या संरक्षक रसायनांचे प्रमाण वाढते. भाज्या कोवळ्या असताना गोळा करणे हे इतके सर्वमान्य आहे, की सह्याद्रीच्या पठारावर मिळणाऱ्या ‘कळवा’ किंवा ‘बरका’ नावाच्या रानभाजीच्या नावातच कळवा म्हणजे कोवळेपणी जमा करायची भाजी असा स्पष्ट संकेत आहे. ‘कुळी’ नावाचे सुंदर फुले येणारी पालेभाजीसुद्धा फुले येण्यापूर्वीच गोळा केली जाते. चांगल्या वाढलेल्या वनस्पतीची पाने भाजीसाठी गोळा करायची असतील तर सर्वांत वरची टोकाची, कोवळी पाने गोळा करतात. ‘शेंडवेल’ या वनस्पतीच्या नावातच ही टोकाची पाने आहेत. बहुतांश पालेभाज्यांना उकळल्यानंतर पाणी काढून टाकून फोडणीला टाकलेल्या कांद्यासोबत परतून त्याची भाजी केली जाते. मात्र काही रानभाज्यांच्या पाककृती थोड्या वेगळ्या आहेत.

कोष्टच्या पानाची भाजी शिजवताना ती नारळाच्या दुधात शिजवतात, तर चवेणीचे फुलोरे शिजवताना त्यात चिंच घातली जाते. पावसाळ्यात मिळणाऱ्या रान भाज्यांमध्ये सगळ्या पालेभाज्या आहेत असे नाही तर ‘शेवळा’ या वनस्पतीसारख्या फुलोऱ्यापासून केल्या जाणाऱ्या भाज्यासुद्धा आहेत. अलिबाग परिसरातील गावांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारात पावसाळ्याच्या थोडा आधी ‘शेवळा’ विकायला येतो. शेवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात तशी फुलोऱ्याचीही, शेवळ्याच्या वाळलेल्या पानांना म्हणतात ‘लोत’. ही पाने पावसाळ्यात जमा करून मिळेल तशा उन्हात वाळवून वर्षभर साठवली जातात. कोवळे फुलोरे थेट चिरून भाजी करून खाल्ले जातात. शेवाळाच्या भाजीत काकड नावाच्या वृक्षाची उन्हाळा सरता सरता पक्व झालेली फळे घातली जातात. ‘अबई’ सारख्या शेंगावर्गीय रानवनस्पतीच्या कोवळ्या शेंगांची भाजी करतात. पण सगळ्याच काही वनस्पती थेट भाज्या म्हणून वापरल्या जातात असे नाही तर काही इतर पाककृतीमध्ये दुय्यम म्हणूनही त्यांचा वापर होतो. अंबाडी किंवा गजकर्णिका नावाची बदामाच्या आकाराच्या आंबट पानांची, मोठ्या खडकांवर किंवा वृक्षांवर वाढणारी वनस्पती तिच्या आंबटपणासाठी खेकड्याच्या रश्‍श्‍यात घातली जाते.

उन्हाळ्यात फुले येणाऱ्या अन पावसाळ्यात फळे धरणाऱ्या वाघाटी सारख्या वनस्पतीच्या फळांचे लोणचे केले जाते, तर खानदेश मराठवाड्यात माकड शिंगी या सुमारे वीस सेंटीमीटर वाढणाऱ्या वनस्पतीच्या पूर्णच्या पूर्ण झाडाचीच भाजी करतात. हे अशी भाज्यांची भरपूर उदाहरणे असली तरी सह्याद्रीत कच्चा पालेभाज्या खाण्याची प्रथा फारशी नाही याचे कारण अर्थातच पानांमध्ये असलेला कडवटपणा. याच्या उलट वनस्पतींनी रसदार फळे निर्माण केली ती खाल्ली जावीत आणि बीजप्रसार व्हावा म्हणूनच. त्यामुळे सह्याद्रीतल्या लोकांच्यामध्ये फळे थेट खाल्ले जाणे जेवढे सहज आहे तेवढे भाज्यांच्या बाबतीत नाही. कडवट असूनही खाल्ले जाण्याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे खरपुडी नावाच्या वनस्पतीचा जमिनीत असलेला बटाट्यासारखा कंद. हा कंद गुराखी लोक आपल्या पोत्यावर घासून त्याची साल काढून कच्चाच खातात. पण या खाण्यामुळे खरपुडीच्या अनेक प्रजाती सह्याद्रीतून कमी होत चालले आहेत. पण कडवटपणा आणि विषारीपणा यांच्यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे आणि सह्याद्रीमधील गिरिजनांना अनेक पिढ्यांच्या ज्ञानातून ती चांगलीच माहिती आहे. पण एखाद्या वनस्पतीमध्ये विषारी घटक आहेत पण त्यांचे खाद्य गुण आणि विपुलता या विषारीपणावर उजवे ठरत असतील तर? याचे एक उदाहरण सह्याद्रीतच आहे. दक्षिण सह्याद्रीमध्ये कोवळे बांबू अत्यंत पोषक मानले जातात, पण या बांबूमध्ये सायनाईड सारखी विषे असतात. स्थानिक लोक या बांबूंवर मात्र अशा काही प्रक्रिया करतात, की ते खाण्यायोग्य होतात. आपल्याकडेही खाजवट भाज्यांमध्ये आंबट घटक घालून त्या त्यातले खाज आणणारे घटक नामशेष केले जातात यासारखेच हे उदाहरण. रानभाज्या म्हणजे सगळ्या फुलणाऱ्या वनस्पतीच नाहीत तर गोव्यासारख्या ठिकाणी, तळकोकणात दाट सदाहरित जंगलात वसणाऱ्या मुंग्यांच्या वारुळावर वाढणाऱ्या एक प्रकारच्या बुरशी किंवा आळंब्यासुद्धा आहेत. नागपंचमीच्या दरम्यान या अळंब्याची रेलचेल जंगलात असते. अभयारण्याच्या आसपास राहणारी कुटुंबेच्या कुटुंबे या आळंब्या जमा करण्यासाठी जंगलात जातात. एक मोठी घोंगडी मध्यभागी एका उद्या मोकळ्या ठिकाणी अंथरली जाते आणि कुटुंबातले लोक वेगवेगळ्या दिशेने पांगतात आणि मिळतील तशा अळंब्या आणून या घोंगडीवर जमा करतात.

कुर्डू, केनी, आंबटवेल, नादेन, खांडवेल, चीचुरा, हुलागावरी, पुंगळी, पाथरी, दिंडा, बेंदर, आटकी, गोगी, बासिल, तिळवण, टाकळा, खापट यासारख्या अनेक रानभाज्या सह्याद्रीत खाल्ल्या जातात. काही नेहमीच खाल्ल्या जातात तर काही दुसरा इतर काहीच स्रोत उपलब्ध नसेल तरच. गेल्या काही वर्षांमध्ये या रानभाज्या एकदम प्रकाशात आल्या आहेत. पण यामुळेच भविष्यात त्या संकटात येतील की काय अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. या रानभाज्या कमी होत चालल्या आहेत ते सह्याद्रीमधील गिरीजनांच्या अतिरिक्त वापरामुळे नव्हे तर शहरी लोकांच्या गेल्या काही वर्षातच निर्माण झालेल्या रान भाज्यांवरच्या प्रेमामुळे. हे प्रेम केवळ आपल्या रानभाज्या आपला समृद्ध वारसा आहे तो टिकवला पाहिजे म्हणून नव्हे, तर या रानभाज्यांच्या चर्चेत असलेल्या औषधी गुणांमुळे. पण यामुळे स्थानिक लोकांच्या दृष्टीने रोजगाराची एक संधी निर्माण झाली आहे. जी भाजी आपण फारसे इतर पर्याय उपलब्ध नाहीत म्हणून खातो त्याऐवजी ती मी विकून त्यामुळे चार पैसे गाठीशी बांधता येत असतील चांगलेच या वाढत्या मागणी पोटी या रान भाज्या जंगलातून तोडल्या जात आहेत. तालुक्‍याच्या किंवा शहराच्या बाजारात विकण्यासाठी पाठवल्या जात आहेत. काही ठिकाणी शहरी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रानभाज्या महोत्सव भरवले जात आहेत. यामुळे भाज्यांची संख्या निसर्गातून रोडावत आहे.

पूर्वी जी भाजी गावाजवळच्या झाडोऱ्यात मिळायची ती शोधण्यासाठी आज थोडे दूर जावे लागते. उद्या कदाचित फर्लांग भर दूर डोंगरात जावे लागेल अशी खंत सह्याद्रीतील गिरीजन बरेचदा बोलून दाखवत आहेत. हे या रान वनस्पती कमी होत असल्याचे एक चालते बोलते उदाहरण आहे. अर्थात हा धोका म्हणावा तसा गहिरा अजून तरी नाही पण तो दार ठोठावत आहे हे नक्की. शेवटी निसर्ग ह्रासाची सगळीच कारणे शहरी लोकांपाशी येऊन थांबतात हेच खरे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या