तापमानवाढीचे वास्तव

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कव्हर स्टोरी
तापमानवृद्धी आणि हवामानबदल हे सध्याच्या काळाचे वास्तव बनले आहे. भविष्यात या संकटाचा सामना करायचा असल्यास त्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे केले तरच तापमानवाढीच्या या दाहक वास्तवाला सामोरे जाणे शक्‍य होईल. ‘आयपीसीसी’चा (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्‍लायमेट चेंज) हवामान बदलाविषयीचा नवीन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. याविषयी...

आधुनिक काळातील जागतिक तापमान नोंदींची सुरवात १८८०पासून झाली. गेल्या काही वर्षातील तापमानाच्या नोंदी तापमानात उच्चतम वाढ दाखवीत असल्यामुळे या घटनेच्या परिणामांबद्दल सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. आयपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्‍लायमेट चेंज)चा हवामान बदलाविषयीचा नवीन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यानुसार सध्या जगभरात चालू असलेला तापमान बदलाचा वेग असाच पुढे चालू राहिला, तर भविष्यात पृथ्वीवरील तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि त्याचे अनेक गंभीर परिणाम होतील. आयपीसीसीचा हवामान बदलाविषयीच्या या नवीन अहवालाच्या पहिल्या भागांत वर्ष २०३० नंतर ०.५ अंश तापमानवाढून ते २ अंश झाल्यास त्याचे  जगात कसे विविध परिणाम होतील त्यावरही भर दिला गेला होता. अहवालाच्या दुसऱ्या भागात भारतीय उपखंड आणि आजूबाजूच्या प्रदेशांत किती भयानक परिणाम होऊ शकतात याचा अंदाज देण्यात आला आहे.

सध्या जगभरात चालू असलेला तापमान बदलाचा वेग असाच पुढे चालू राहिला तर वर्ष २०३० पर्यंत पृथ्वीवरील तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि त्याचे अनियमित पाऊस, दुष्काळ , हिमविलयन, वाळवंटीकरण, वादळे आणि समुद्रपातळीत वाढ असे अनेक गंभीर परिणाम होतील. ही जागतिक तापमानवाढ न रोखल्यास अशा भयंकर व सर्वदूर परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच जागतिक जैव साखळीवर विपरीत परिणाम होतील असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाने (युनायटेड नेशन्स ) यापूर्वीच देऊन ठेवलाय. गेल्या काही दिवसांपासून जवळजवळ दर वर्षी हवामान बदलाच्या ‘उष्णता’ या घटकातील बदलांचे आकृतिबंध स्पष्ट करणारे संशोधन समोर येत आहे.

अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, उन्हाळ्याची वाढती तीव्रता, थंडीच्या लाटा, अनपेक्षित हिमवृष्टी, ढगफुटी, गारपीट, समुद्राचे किनाऱ्यावर वाढते आक्रमण या गेल्या काही वर्षातील कोणाच्याही सहजपणे लक्षात याव्या अशा घटना आहेत. आपल्या आजूबाजूचे हवामान लक्षणीयरीत्या बदलत असल्याची आणि तापमानवाढत असल्याची जाणीव गेल्या काही दिवसात जवळजवळ सगळ्यांनाच होऊ लागली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील तापमानवाढीच्या, त्याचबरोबर वादळे, पूर अशा काही हवामानशास्त्रीय आणि पर्यावरणीय घटना पाहता हवामान बदलाची प्रक्रिया तीव्र होऊन तिचा वेगही खूपच वाढल्याचे पृथ्वीवर अनेक ठिकाणी जाणवते आहे. पृथ्वीवरील भूप्रदेशात आणि हवामान विभागांत असलेल्या वैविध्यांमुळे; सगळ्या जगात होणारे या तापमानवाढीचे परिणामही वेगवेगळे असतील. मात्र भारतासारख्या उष्ण कटिबंधीय (Tropical) देशात उष्णतेच्या दाहकतेचा कहर जाणवेल. तापमानात होणारे हे बदल कशामुळे होत आहेत याचे नेमके उत्तर खरे म्हणजे आजही आपल्याला संपूर्णपणाने गवसलेले नाही. आत्तापर्यंतच्या हवामान शास्त्रीय संशोधनातून एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे, की पृथ्वीवर विविध ठिकाणी असे अल्पकालीन तीव्र तापमान बदल यापूर्वी अनेक वेळा झालेले आहेत. मात्र त्या वेळची बदलामागची कारणे आतापेक्षा नक्कीच वेगळी होती आणि त्यातली बरीचशी नैसर्गिक होती. आज जगभरात वाढत असलेला माणसाचा हस्तक्षेप या बदलास मोठ्या प्रमाणावर हातभार लावतो आहे याबद्दल शास्त्रज्ञांच्या मनात अजिबात संदेह नाही.

सध्याचा तापमानवाढीचा वेग असाच राहिला तर वर्ष २०३० पर्यंत ही वाढ २ अंश सेल्सिअस इतकी होऊ शकेल. सध्याची होणारी वाढ ही १.५ अंशांपर्यंतच स्थिर राहावी म्हणून जगातील सर्वच देशांनी कसून प्रयत्न करणे आता आत्यंतिक गरजेचे आहे. ऑक्‍टोबर महिन्यात दक्षिण कोरिआतील इंचियोन शहरामध्ये १.५ अंश तापमानवाढीसंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला. यावर्षी  डिसेंबरमधे पोलंड इथे होऊ घातलेल्या कटोविस (Katowice) हवामान बदल परिषदेत जगातील विविध देशांनी या संबंधांत कोणत्या योजना कार्यान्वित करणे सुरू केले आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे.

आपण तातडीने काहीच उपाययोजना केल्या नाहीत, तर या शतकाच्या अखेरीपर्यंत ही तापमानवाढ ३ अंश सेल्सिअस एवढ्या भयावह पातळीपर्यंत जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. प्रिन्स्टन विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे, की आयपीसीसीने १९९१ ते २०१६ या काळासाठी समुद्राचे पाणी तापण्याचा जो वेग सांगितला आहे, त्यापेक्षा सरासरी ६० टक्के जास्त वेगाने समुद्राचे तापमान त्याच काळात वाढले आहे. जगातल्या सगळ्या महासागरांच्या सरासरी तापमानात सध्या वाढ होत आहे. समुद्राच्या सातशे मीटर खोलीपर्यंत एक दशांश अंश सेल्सिअसने वाढ जाणवते आहे. अंटार्क्‍टिकाच्या द्वीपकल्पीय भागात समुद्राचे तापमान पाच दशांश अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले आहे. पृष्ठीय तापमानात होणाऱ्या या वाढीमुळे हिमआवरणाचे खालचे थरही आता वितळू लागले आहेत. याचाच अर्थ असा, की नजीकच्या भविष्यात या वाढीचे विध्वंसक परिणाम सगळीकडे जाणवू लागतील. समुद्राची पातळी वाढेल, किनारी प्रदेश जलमय होतील, प्रवाळ नष्ट होतील आणि अन्नाचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवेल ! 

तापमानात होणारी १.५ अंशापासून २ अंशापर्यंतची वाढ आणि त्यामुळे येणारी संकटे थांबवायला आपल्या हाती केवळ डझनभर वर्षेच उरली आहेत. याबद्दल अनेक शास्त्रज्ञांमधे एकमत दिसून येते. हे आव्हान खूप मोठे आहे, पण जगातील सर्व देशांना परिणामकारक उपाय योजून ही वाढ रोखण्याशिवाय कोणताही पर्याय आता शिल्लक नाही. औद्योगिकरणपूर्व काळातील तापमानापेक्षा आज अनेक ठिकाणी एक अंशांपेक्षा जास्त तापमानवाढ झालीच आहे. ती २०३० ते २०५२ मध्ये १.५  अंशांपर्यंत होण्याचा कल दिसू लागला आहेच. जगात अनेक ठिकाणी वाढणारी विध्वंसक वादळे, वाढती दुष्काळी परिस्थिती, जंगलांच्या आगीचे वाढणारे प्रमाण अशा घटनांतून याचे संकेतही मिळत आहेत.

ही वाढ २ अंशापर्यंत झाली तर ती पृथ्वीला भविष्यात मारक ठरू शकेल ! यामुळे जागतिक लोकसंख्येतील ५० टक्के लोकसंख्येला पाण्याच्या तीव्र दुर्भिक्षाला सामोरे जावे लागेल. उष्ण दिवसांच्या संख्येत मोठी वाढ होईल. असे दिवस अतिउष्ण होतील आणि ते जगाच्या मोठ्या भागात अनुभवास येतील. वाढलेल्या उष्णतेमुळे बळींची संख्या वाढेल. दोन अंश तापमानवाढीमुळे कीटकांची ५० टक्के प्रजा नष्ट होईल, अन्न धान्याचे उत्पादन घटेल आणि प्रवाळ (Corals) संपूर्णपणाने नष्ट होतील. वर्ष २१०० पर्यंत जगातील एक कोटी जनसंख्या वाढत्या समुद्रपातळीच्या संकटाने ग्रस्त होईल. उंच डोंगररांगांत शिल्लक राहिलेला बर्फ वितळून जाईल आणि समुद्राच्या पातळीत आणखी १० सेंमीनी  वाढ होईल.

अंटार्क्‍टिकच्या तापमानातील वाढीचा नजीकच्या काळात जाणवू शकेल असा मोठा परिणाम म्हणजे जागतिक सागर पातळीतील वाढ. दरवर्षी ३ मिमी वेगाने ही वाढ होऊ  शकते. हिमविलयन क्रियेमुळे जागतिक समुद्रात गोडे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळून सगळ्या समुद्रांच्या पाण्याची क्षारता कमी होईल. वाढत्या उष्णतेमुळे आणि हिमविलयनामुळे अंटार्क्‍टिकच्या थंड प्रदेशात कधीही न आढळणारे पक्षी व प्राणी दिसू लागतील. आत्तापासूनच या खंडावरच्या पक्षांच्या काही प्रवृत्तीत बदल होऊ लागल्याचे पक्षी तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. अंटार्क्‍टिकवरचे तापमानवाढू लागल्यावर आणि त्यामुळे बर्फ कमी होऊ लागल्यावर अनेक भाग बर्फाच्या आवरणातून मुक्त होतील. उत्तर धृवाकडील आर्क्‍टिक महासागरात बर्फ वितळून त्याचे नीचांकी प्रमाण अलीकडच्या निरीक्षणात दिसून आले . १९८१ ते २०१० च्या तुलनेत आर्क्‍टिकवरचे हिमआवरण २० लाख चौरस किमी क्षेत्रातून नष्ट झाले आहे. आर्क्‍टिकच्या हिमविलयन प्रक्रियेवर एल निनोचा परिणाम असावा असे नक्की सांगता येत नसले, तरी अंटार्क्‍टिकावरील हिमविलयनावर आणि वाढीवर एल निनोचा परिणाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

तापमानवाढीमुळे जगातील व विशेषतः आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिकावरील हिम वितळत असून, हिमालय ,युरोपियन आल्प्स येथील हिमनद्याही वेगाने वितळत असल्याचे निरीक्षण गेल्याच वर्षी जगभरात प्रसारित करण्यात आले  होते. गमतीचा भाग म्हणजे अमेरिकेतील बोल्डर,कोलोरॅडो येथील राष्ट्रीय हिम आणि बर्फ सांख्यिकी केंद्र (NSIDC-National Snow and Ice Data Center ) यांनी अंटार्क्‍टिक खंडावरील हिमाच्या विस्तारात व साठ्यात मोठी वाढ झाल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. अशी निरीक्षणे शास्त्रज्ञांच्या मनात थोडा गोंधळही निर्माण करीत आहेत.

आत्ताच्या बदलांमुळे समुद्रजलाची आम्लता भरपूर वाढली आहे आणि त्यातील प्राणवायूचे प्रमाणही घटते आहे. अंशाच्या वाढीमुळे सागरी जीवन मोठया प्रमाणावर बाधित होईल. मासे ३० ते ३५ लाख टनांनी कमी होतील. शतकात एकदा येणारे आर्क्‍टिक प्रदेशातील बर्फविरहित उन्हाळे या वाढीमुळे दशकांत एकदा इतके जलद अनुभवाला येतील ! 

आपल्या आवाक्‍याबाहेर जात असलेली ही तापमानवाढ थांबविण्यासाठी, पुनर्वनीकरण (Reforeststion) आणि भूमी उपयोजनात  (Landuse) बदल, शेती तंत्रात बदल आणि कार्बन उत्सर्जन शुन्याकडे नेण्याचे प्रयत्न हेच उपाय परिणामकारक ठरू शकतील. वर्ष २०३० पर्यंत कार्बन प्रदूषण ४५ टक्‍क्‍यांनी कमी होणे व २०५० पर्यंत ते पूर्णपणे थांबणे गरजेचे आहे. हे सगळे प्रत्यक्षात येण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही तेवढीच गरज आहे. प्रत्येक देशाचा यात मनापासून सहभाग असेल तरच या संकटाला जग सामोरे जाऊ शकेल. 

कार्बनमुक्त जग करण्यासाठी आपल्याकडे दुसरी योजनाही (Plan B) तयार हवी. यात भारताने पुढाकार घ्यावा अशीही इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती आणि मानवनिर्मित कारणे यामुळे या तापमानवाढीचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. ७००० किमी लांबीचा समुद्र किनारा, समुद्राचे सतत वाढते तापमान , उष्ण कटिबंधीय हवामान, वातावरणाचे प्रदूषण, मॉन्सूनवर अवलंबून असलेली शेती, अनियोजित आणि अनियंत्रित विकास, कोणत्याही आपत्तीसाठी पूर्णपणे तयार नसलेली यंत्रणा आणि गरिबी ही यामागची मुख्य कारणे आहेत असेही म्हटले गेले आहे.

धुरामुळे आणि शहरातील अतिरेकी वाहन संख्येमुळे, भारतावरच्या हवेत आढळणारे सूक्ष्म तरंगत्या कणांचे (Aerosols) प्रचंड प्रमाण यामुळे भारतात तापमानवाढीला चालना मिळेल. हे तरंगते कण, हरितगृह (Greenhouse) वायूंच्या कणांपेक्षा आकाराने मोठे असल्यामुळे ते सहजगत्या आजूबाजूला पसरत नाहीत. ते जिथे तयार होतात त्या प्रदेशावर तरंगत राहतात. उत्तर भारतात हिमालयाच्या रांगांमुळे वारे अडवले जातात. त्यामुळेही तरंगत्या पदार्थांची पसरण (Dispersal) कमी होते. त्यामुळे भारताला ही तापमानवाढ रोखणे खूप कठीण जाऊ शकते.

आजच्या घडीला भारतातील मॉन्सूनचे वेळापत्रक बरेच विस्कटलेले आहे. तरंगत्या कणांचे प्रमाण वाढले तर पावसावर आणखी प्रतिकूल परिणाम होईल. पावसाच्या वितरणात आणि आकृतिबंधात पराकोटीचे बदल (Extreme changes ) होतील. उष्णतेच्या लाटांची वारंवारिता वाढेल. 

३५ अंशांपेक्षा तापमान सतत जास्त राहील आणि त्याचा दूरगामी परिणाम जनजीवनावर होईल.
भविष्यातील दोन अंश तापमानवाढीच्या अशा संहारक आणि विध्वंसक परिणामांना इतक्‍या तीव्रतेने सामोरे जाऊ लागणाऱ्या उष्णकटिबंधीय देशांच्या यादीत भारताचे स्थान बरेच वरचे असेल असे दुर्दैवाने म्हणावे लागेल !

तापमानवृद्धी आणि हवामानबदल हे सध्याच्या काळाचे वास्तव बनले आहे. जंगलांचे संवर्धन व रक्षण, नदी-नाल्यांची निगा आणि संरक्षण, हितैशी परिसराची निर्मिती, बदलत्या तापमानाला तोंड देणारी पीकरचना आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर या गोष्टी देशाच्या कानाकोपऱ्यातील गावांनी आणि शहरांनी आत्मसात केल्या, तरच तापमानवाढीच्या या दाहक वास्तवाला सामोरे जाणे शक्‍य होईल.

आपल्या सर्वांनाच आयपीसीसीच्या या संशोधन अनुमानामुळे जागरूक राहता येईल व परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील आणि यादृष्टीनेच या अहवालाकडे पाहणे इष्ट ठरेल. आयपीसीसीच्या या अहवालावर, डिसेंबरमध्ये, पोलंडमधे भरणाऱ्या हवामान बदलासंबंधीच्या परिषदेत पुन्हा चर्चा होणार असून त्यात जागतिक पातळीवर काही ठोस कार्यक्रम सुचविले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र भारतातील प्रत्येक राज्याने, येऊ घातलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी निश्‍चित योजना आखण्याचीही तितकीच निकड आहे हे नक्की. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या