जटिल जलसमस्या 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 18 मार्च 2019

कव्हर स्टोरी
 

आज संपूर्ण जगांत दोन अब्ज लोक पिण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. यापैकी ८० टक्के लोक ग्रामीण वस्त्या आणि खेड्यांत राहात असून दूषित आणि असुरक्षित, अशुद्ध पाण्यावरच जगत आहेत. लहान-मोठी तळी, थोडेफार पाणी वाहून नेत असलेल्या नद्या आणि त्यांत तयार झालेली डबकी यातून मिळेल तेवढे पाणी जमवणे एवढेच त्यांच्या हातात उरले आहे. त्यामुळेच पाण्याचे परिणामकारक नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीला सध्या जगभरात अग्रक्रमाने महत्त्व दिले जात आहे. तरीही त्यात म्हणावे तसे यश अजूनही मिळवता आलेले नाही. पृथ्वीवरील पाण्याचा होणारा वापर व त्याची अनेक ठिकाणी जाणवणारी कमतरता यामुळे पाणी या निसर्गदत्त संपत्तीचे काळजीपूर्वक जतन करणे सगळ्याच देशांना आता अत्यावश्‍यक झाले आहे. 

पृथ्वीवर चालणाऱ्या जलचक्रातून म्हणजे बाष्पीभवन - सांद्रीभवन - पाऊस - पुन्हा बाष्पीभवन या साखळीतून पृथ्वीवर पाऊस पडल्यानंतर, पृष्ठीय जलाचे (Surface Water) अनेक स्रोत निर्माण होतात. नदीनाले, सरोवरे, पाणथळी आणि खाड्या अशा विविध पृष्ठजल स्रोतांतून पाण्याचा भरपूर साठा तयार होतो. यातले काही पाणी अर्थातच बाष्पीभवन क्रियेतून पुन्हा वातावरणात जाते, पण बरेच पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जमिनीत झिरपते व पृथ्वीच्या कवचाखाली अंतरंगात दगड, माती, गाळ यातील छिद्रात साठून राहते. 

विविध प्रकारच्या दगडात, खूप खोलीपर्यंत साठून राहिलेल्या पाण्यास भूजल किंवा भूमिगत जल (Ground water) असे म्हटले जाते. पृष्ठजलात नदीनाले, ओढे यातील पाण्याला जास्त महत्त्व असते. सिंचनासाठी, पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो. पृष्ठजल आणि भूजल हे वास्तविक पाहता एकमेकांशी निगडित असे जलप्रकार आहेत. पृष्ठीय जलाचाच फार मोठा भाग खडकात झिरपत असल्यामुळे, पृष्ठीय जल जेवढे जास्त, तेवढे भूजलही जास्त. त्यामुळे पृष्ठजलाचा नाश म्हणजे भूजलाचाही ऱ्हास, असे सर्वसाधारण गणित मांडता येते. पृष्ठजल हे जमिनीच्या उताराला अनुसरून सर्वत्र वाहत जात असल्यामुळे व वाहत जात असताना झिरपत असल्यामुळे खूप मोठ्या प्रदेशाला भूजल म्हणून त्याचा काही भाग मिळतोच. मात्र जास्त उंचीवर, डोंगराळ भागात, सच्छिद्र (porous) व पार्य (permeable) खडकातून हे पृष्ठजल, मोठ्या प्रमाणात भूजल म्हणून खूप खोलवर झिरपते व झऱ्यांच्या रूपात, नदी-खोऱ्यांत खालच्या टप्प्यात, दोन खडकांच्या सीमारेषेवर बाहेर पडते. 

नदीमार्गात जलाशये निर्माण करून पाणी अडवले तर ते जास्त काळ पृष्ठभागावर उपलब्ध होते आणि ते भूमिगत व्हायलाही मदत होते. पृष्ठजलाचे किती पाणी भूमिगत होईल हे खडकांची सच्छिद्रता, पार्यता, त्यांचे विदारण (weathering), डोंगरउतारांची झीज, जंगलांची घनता यावर प्रामुख्याने अवलंबून असते. आजकाल खूप ठिकाणी झालेल्या जंगलतोडीमुळे, पाणी पृष्ठभागावरून वाहत जाते व त्याला भूमिगत व्हायला अवधी मिळत नाही. त्यामुळे नदीपात्रात झऱ्याच्या स्वरूपातही पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे नदीपात्रे कोरडी पडतात. 

भूजल पातळी भूपृष्ठाखाली ज्या पातळीच्या वर आढळते, त्याला भूजल संपृक्त विभाग (aquifer) म्हटले जाते. वेगवेगळ्या खडकानुसार त्याची खोली व जाडी बदलते. उथळ व खोल विहिरी, आर्टेशियन विहिरी, त्यांचे पुनर्भरण (recharge) होण्याचा काळ, या सर्व गोष्टी भूजल संपृक्त विभागावरच ठरतात. विंधन विहिरींची संख्या वाढली, तर या थरातील पाणी कमी होते. ज्या वेगाने पाणी वर उपसले जाते, त्यापेक्षा खूपच कमी वेगाने भूजलाचे नैसर्गिक पुनर्भरण होत असते. 

पृष्ठजल आणि भूजल सहजपणे दूषित होऊ शकते. विविध खाणींच्या प्रदेशात झिरपणारे पाणी, रासायनिक उद्योगांतून जमिनीत मुरणारे पाणी, त्याज्य उत्सर्जन (waste disposal) यामुळे पृष्ठजल प्रदूषित होते. ही सगळी प्रदूषके भूजलातही मिसळतात व भूजल प्रदूषित होते. मोठ्या शहरांच्या आजूबाजूला असणारे भूजल नेहमीच प्रदूषित असते. 

पृष्ठजल व भूजलाची ही यंत्रणा पूर्णपणे निसर्गनियमांनी नियंत्रित आहे. ती नीट समजावून घेऊनच त्यात हस्तक्षेप करणे हिताचे असते. आजकाल पृष्ठजल व भूजलाबद्दल सर्वत्र अनास्थाच दिसते आहे. हे सगळे चित्र तातडीने बदलणे आता गरजेचे बनते आहे. 

आजकाल पृष्ठजलाच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह दूरसंवेदन, हवाई छायाचित्रण अशा आधुनिक तंत्रांचा उपयोग केला जातो. पृष्ठजलाच्या उपलब्धतेवरून प्रदेशाची भूजल क्षमता नक्की करणे, भूजल पातळी शोधणे, पृष्ठजल व भूजल प्रदूषणाचे प्रमाण शोधणे, विंधनविहिरींचा परिणाम तपासणे अशा अनेक गोष्टींसाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच अशा आधुनिक तंत्रांचा वापरही केला जातो. यासाठी प्रगत अशा  संगणक प्रणालीसुद्धा (softwares) वापरल्या जातात. 

पृथ्वीवर असलेल्या एकूण पाण्यापैकी ९१ टक्के पाणी समुद्रात व महासागरात सामावलेले आहे. हे पाणी खारे आहे आणि याने पृथ्वीचा  ७१ टक्के भाग व्यापला आहे. उरलेल्या पाण्याने पृथ्वीचा २९ टक्के भाग व्यापला असून अशा गोड्या पाण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. आर्क्‍टिक आणि ग्रीनलंडमध्ये २ टक्के व नदीनाले, तळी, सरोवरे यात केवळ एक टक्काच पाणी आहे. या आकडेवारीवरून गोड्या पाण्याचे स्रोत किती अल्प आणि म्हणून मौल्यवान आहेत याची कल्पना करता येईल. पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अति महत्त्वाच्या असलेल्या या गोड्या पाण्याच्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांत फारशी घट झालेली नसली, तरी त्याची प्रत मात्र झपाट्याने खालावली आहे. भारतासारख्या देशात तर ही समस्या फार उग्र बनली आहे आणि शहरातील पाण्याप्रमाणे गावे आणि खेड्यांतील पाण्याचीही प्रत बिघडते आहे. 

पृथ्वीवरचे गोड्या पाण्याचे मुख्य स्रोत पाऊस, पृष्ठजल (नदीनाले, जलाशये) आणि भूजल हेच आहेत. केवळ भारताचा विचार केला, तर भारताला दरवर्षी ११०० ते १२०० मिमी पावसापासून ३० लाख घनमीटर पाणी मिळते. हे पाण्याचे प्रमाण खूप मोठे आणि जगात सर्वाधिक आहे. या महत्त्वाच्या जलस्रोतानुसार पश्‍चिम किनारपट्टी व ईशान्य भारत हा भरपूर पावसाचा प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, हिमाचल व केरळ हा पुरेशा पावसाचा, मध्य भारत व दक्षिण भारताचा अर्ध आर्द्र प्रदेश आणि बहुतांश राजस्थान, गुजरातचा कोरडा प्रदेश असे विभागही करता येतात. दुसरा स्रोत आहे, पृष्ठजलाचा. गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा व कावेरी या मुख्य नद्या, त्यांची खोरी, त्यातील उपनद्या याबरोबरच हजारोंच्या संख्येने असलेली तळी, जलाशये, सरोवरे यांचा यात समावेश होतो. भूजल हा तिसरा महत्त्वाचा जलस्रोत. भारतात फार मोठ्या प्रदेशात भरपूर पाणी साठवून ठेवणारे जलजशैल (Aquifer) आहेत. पृष्ठभागावरून खाली झिरपलेल्या या भूजलाचे प्रमाणही खूप मोठे आहे. इतके प्रबळ व प्रभावशाली जलस्रोत असूनही आज भारतात गोडे पाणी केवळ त्याची प्रत बिघडल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वापरासाठी निरुपयोगी ठरते आहे. 

सर्व प्रकारच्या पर्यावरण संरचना किंवा परिस्थितीकी (Ecosystems) संतुलित राहाव्यात म्हणून पाण्याचे, विशेषतः भूजलाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहेच. भूजलाची अनुपलब्धता किंवा टंचाई, त्याचा गैरवापर आणि अतिरेकी वापर याचे फार मोठे दूरगामी परिणाम खरे तर आत्ताच दिसू लागलेत आणि म्हणूनच हा विषय इतका संवेदनशील झाला आहे. 

नैसर्गिकदृष्ट्या, महाराष्ट्रातील भूजलाचे वितरण हे अनियमित (Uneven) स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. हे वितरण स्थळ - काळ आणि भूजलाची खोली (Depth) या तीनही बाबतीत अनियमित आहे. याचे मुख्य कारण अर्थातच राज्यातील खडकांच्या प्रकारातील व संरचनेतील एकजिनसीपणाचा अभाव (Heterogeneity) आणि पर्जन्यातील प्रादेशिक वैविध्य हेच आहे. राज्यातील ९२ टक्के क्षेत्र हे लाव्हाच्या उद्रेकाने बनलेल्या कठीण अशा बेसाल्ट खडकाने बनलेले आहे. या खडकातील मूलभूत विविधता, त्यावर निर्माण झालेल्या भूरूपातील वैविध्य आणि पर्जन्यातील असमानता याचा परिणाम भूजल वितरणावर झालेला आहे. बेसाल्टमधील अंगभूत संवरचनीय (Structural) भूजल उपलब्धतेवर राज्यात नैसर्गिक मर्यादा आहेतच हे विसरून चालणार नाही. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या ईशान्येकडील भागात व सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात वेगळे खडक असल्यामुळे भूजलप्रणाली थोडी वेगळी आहे. 

या सर्व गोष्टींमुळे राज्याचा विचार करता भूजल वितरणात एकसारखेपणा (Uniformity) नाही असे दिसून येते. राज्यात पृष्ठीय जलामुळे (Surface water) भूजलाचे जे भरण (Recharge) होते तेही एकसारखे नाही. भूगर्भीय रचना व मानवी हस्तक्षेप यामुळे भूजलाचे नेमके मूल्यमापन करणेही कठीण जाते. असे असले तरीही राज्यात जलधारक खडकांच्या (Aquifer) निश्‍चितीकरणाचे चांगले प्रयोग झालेले दिसतात. सरकारी यंत्रणेमार्फत भूजल पातळी, खोली, त्याची प्रत याबद्दल दरवर्षी सर्वेक्षण करून आढावा घेतला जातो. यातून हेही लक्षात येते आहे, की भूजलाचा अतिरिक्त व अनियंत्रित वापर आणि भूजलाचे अपुरे नियोजन व व्यवस्थापन हे या समस्येमागचे मुख्य कारण आहे. 

भूजल ही राज्यातील महत्त्वाची नैसर्गिक संपदा असून पिण्यासाठी, जलसिंचनासाठी, उद्योगधंद्यासाठी, नदीपात्राची जलधारण व प्रवाही क्षमता टिकून राहण्यासाठी आणि पाणथळ जागांच्या अस्तित्वासाठी भूजलाचे यात मोठेच योगदान आहे. मात्र आज हे भूजल माणसाच्या हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. राज्यात जाणवणारा भूजलाचा तुटवडा आणि टंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम भरपाईचा ( Replenishment) प्रयोग होणे आवश्‍यक आहे. टंचाईचे मुख्य कारण हे कमी खोलीवरच्या जलधारक खडकांचे न होणारे पुनर्भरण आणि खोल विंधन विहिरींच्या अनिर्बंधपणे वाढणाऱ्या संख्येमुळे खोल जलधारक खडकातील झपाट्याने कमी होणारा भूजलाचा साठा हेच आहे. 

सांडपाण्याच्या अत्यंत चुकीच्या व्यवस्थापनामुळे बरेच पृष्ठ व भूजल प्रदूषित झाले आहेत. निरनिराळ्या उद्योगसमूहांतून कोणत्याही प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया न करता पृष्ठजलात अनेक रसायने व प्रदूषके सोडली जात आहेत आणि यावर कुठलाही कायदेशीर वचक नाही. 

भारतात अजूनही सगळ्या जलस्रोतांविषयी विश्‍वासार्ह माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे पूर्वीचे किती जलस्रोत नष्ट झाले, किती नद्या कोरड्या पडल्या, किती आक्रसल्या, किती नद्यांचे अरुंद नाले झाले याविषयी काहीच अंदाज करता येत नाही. भूजल आणि जलजशैल यांची दुर्दशा तर वर्णन करण्यापलीकडे आहे. अजूनही सर्वसमावेशक असे जलजशैल मानचित्रीकरण (Aquifer mapping) नाही. नेमके किती भूजल स्रोत उपलब्ध आहेत याची माहिती नाही. 

जलस्रोतांच्या बिघडलेल्या प्रतीमुळे जगभरात अनेक ठिकाणी लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. भूरचनेचा आणि खडकांचा विचार करता, जलस्रोत, नदी, विहीर, कालवा, तलाव.. कुठलाही असला तरी त्यातील पाण्यात अनेक क्षार थोड्याफार प्रमाणात असतातच. त्यावरूनच या पाण्याची प्रत ठरते. पण यातील क्षारात वाढ झाली, की तो जलस्रोत हानिकारक ठरू शकतो. भारतातील नद्यांच्या पाण्याची प्रत सामान्यपणे पावसाळ्यात सुधारते. राजस्थानातील अनेक विहिरींच्या पाण्याची क्षारता नेहमीच खूप वाढलेली आढळते. असे ऱ्हास पावणारे जलस्रोत प्राधान्याने सुरक्षित करणे आता गरजेचे बनले आहे. नदीखोऱ्यांचा अनिर्बंध वापर कमी करणे, नदीमार्ग त्याच्या उगमापासूनच प्रदूषणरहित कसे राहतील त्याच्या योजना तयार करणे, तळी व सरोवराच्या पाण्याची निगा वाढविणे, भूजल प्रदूषित करणारे सर्व उद्योग बंद करणे, भूजलाचा अनिर्बंध व अविवेकी वापर थांबविणे या सर्व उपायांची आता तातडीने अंमलबजावणी होणे आवश्‍यक झाले आहे. 

प्रत्येक नदीचे बंदिस्त असे एक खोरे असते. या खोऱ्यात मुख्य नदी व तिच्या अनेक उपनद्यांचे जाळे असते. नैसर्गिक जलोत्सारणाचा तो एक परिणामकारक असा आकृतिबंध असतो. नद्या-उपनद्यांच्या या जाळ्यातील प्रत्येक उपनदी ही त्या खोऱ्यातून होणाऱ्या जलोत्सारणातील एक आवश्‍यक अशी शृंखला असते. नाले, ओढे, प्रवाह अशा नावांनी नदीखोऱ्यांतील हे नदीप्रवाह ओळखले जात असले, तरी त्या प्रत्येकाचे जलोत्सारण आकृतिबंधात आणि पृष्ठजल व भूजल निर्मितीत विशिष्ट असे स्थान असते. 

प्रदेशातील खडकांचा प्रकार, त्यांचा कठीणपणा, सच्छिद्रपणा अथवा त्यांची पार्यता, त्या प्रदेशात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, प्रदेशाचा उतार, जंगलाचे प्रमाण यानुसार मुख्य नदीच्या खोऱ्यात पृष्ठजल आणि पर्यायाने भूजल निर्माण होते. ही एक निश्‍चित अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती बिघडवून टाकणाऱ्या, मनुष्याच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जलसमस्या दिवसेंदिवस अधिकच जटिल होऊ लागली आहे, हे आता नक्कीच नाकारून चालणार नाही.   

संबंधित बातम्या