आवश्‍यकता उन्हाळी शिबिरांची

डॉ. श्रुती पानसे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कव्हर स्टोरी
 

कोणत्याही वयात कोणालाही सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे समवयीनांमध्ये रमणं. आपल्याला आपल्या यापेक्षा लहान किंवा मोठ्या वयाच्या माणसांमध्ये रमायला आवडतं. पण आपल्या वयाच्या मित्र- मैत्रिणींना भेटून जास्त छान वाटतं हे खरं. तसंच मुलांचंही असतं. मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांशी खेळायला, मजा करायला खूप आवडतं. सुट्टीत मुलं कंटाळतात, ते यासाठीच. शाळेत अभ्यास करायला जात असले तरी तिथे रोज मित्रमैत्रिणी भेटतात, गप्पा मारतात, एकत्र डबा खातात, खेळतात, एकमेकांच्या गंमती करतात. सुट्टीत शाळा- अभ्यास नसतो म्हणून सुट्टी हवीशी वाटते. पण मित्रमैत्रिणींविना लवकरच कंटाळा येतो. 

आजची मुलेमुली जरा रिकामा वेळ मिळाला की आपसूकच टीव्ही, मोबाईलकडे वळतात. थोडा वेळ टीव्ही बघून बाकीचा वेळ हवं ते करणं - हा एक पर्याय असू शकतो. पण या दोन्ही गोष्टींपासून शालेय मुलांना जास्तीत जास्त लांब ठेवण्यासाठी घरात, परिसरात भरपूर आणि तऱ्हेतऱ्हेच्या ॲक्‍टिव्हिटीजची जंत्री असली पाहिजे. आणि ती करण्यासाठी नवे-जुने मित्रमैत्रिणी पाहिजेत. एवढं झालं की सुट्टी अगदी मजेत जाते. ‘जाते’ असं नाही तर सत्कारणी लागते.  

खरं तर जर मित्रमैत्रिणी किंवा भावंडं भरपूर असतील तर रोज काय करायचं हे तेच ठरवतात आणि खेळतात, मजा करतात. दिवस आनंदात घालवतात. पण आईबाबांना ही सुट्टी वाया घालवणं वाटतं, या मोकळ्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी मुलांनी नवं काही तरी शिकावं असं वाटतं. त्यासाठी आपल्याकडे मुलांची उन्हाळी शिबिरं हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. काही वर्षांपूर्वी हा एक पर्याय आहे, असं वाटायचं. ज्याला तो स्वीकारायचा आहे, त्याने स्वीकारावा. आणि इतरांनी स्वत:ची सुट्टी स्वत:च आखावी असं वाटायचं. पण गेल्या वर्ष-दोन वर्षात बालवयाचं चित्र बदललं आहे. मुलांना बाहेर खेळण्यापेक्षा, नव्या कला आत्मसात करण्यापेक्षा मोबाईल-कॉम्प्युटरला जवळ करावंसं वाटतं आहे. हे खूप घातक आहे. रिकामा वेळ + आराम + मोबाईल = शून्य असं समीकरण अयोग्य. चुकीचं. त्यापेक्षा शिबिरांचा पर्याय योग्य वाटतो. मात्र या शिबिरांची निवड मुलांच्या आवडी-निवडी विचारात घेऊन करावीत. जसं नेहमी म्हटलं जातं तसं ही शिबिरं म्हणजे मुलांसाठी दुस-या शाळा होऊ नयेत.

खेळ शिबिर
कालपरवापर्यंत ‘खेळा’ असं मुलांना सांगावं लागायचं नाही. मुलं खेळायचीच. पण आता खेळायचं असलं तरी कुठे? हा प्रश्न असतो. खेळण्यासाठी मोकळी जागा सहज उपलब्ध असायला हवीत. पण शहरात आता मैदानं नाहीत हे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने वाईट आहेच; पण लहान मुलांच्या दृष्टीने तर त्यांच्या सर्वांगीण वाढीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. मोकळेपणाने खेळण्यातून मुलांना जे काही मिळतं त्याची कसर इतर कशातूनही भरून काढणं केवळ अशक्‍य आहे. खेळण्यातून कमालीचा शारीरिक विकासच होतो. त्याबरोबरच भावनिक-मानसिक विकासही होतो. सध्याच्या भाषेत बोलायचं तर एक प्रकारचं ‘डिटॉक्‍सीफिकेशन’ म्हणता येईल. भरपूर खेळण्यांमुळे घाम येऊन जातो. भूक लागते. शरीराला नवी ऊर्जा मिळते. रक्ताभिसरण वाढतं. याबरोबर काही अदृश्‍य पण महत्त्वाचे परिणाम म्हणजे शरीरात हॅपी हार्मोन्सची निर्मिती होते. चिडचिड त्रागा निघून जातो. मनातला एकलकोंडेपणा कमी होऊन संघभावना वाढते.

याशिवाय एक महत्त्वाचं शास्त्रीय कारण जे अनेकांना माहीत नसतं ते म्हणजे मुलांनी हालचाल करणं ही त्यांच्या शरीराची अत्यंत प्राथमिक गरज आहे. आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. दोन्ही मेंदूचा समतोल साधण्यासाठी हा भाग विकसित होणं आवश्‍यक असतं. हा विकसित व्हायचा असेल तर एकच गोष्ट मुलांना दिली पाहिजे ती म्हणजे हालचाल करण्याच्या अमाप संधी. म्हणून या वयातील मुलं सतत हालचाल करत असतात. जे नैसर्गिक आहे, ते विकसित करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. 

सहल-शिबिरं
मुलांच्या मानसिक-शारीरिक-बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी काही गोष्टी उन्हाळी सुट्टीत घडून यायला हव्यात.  त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहल. मोकळं फिरणं. ही सहल आई-बाबांबरोबर असायला हवी. एखादी सहल गिर्यारोहण, सायकलिंग, जंगलातले वास्तव्य अशी असेल तर मुलांना त्यातून अनुभवांचा खजिना मिळतो. जो इतर कोणत्याही प्रकारे मिळणार नाही, असे अनुभव मिळतात. घरापासून वेगळं राहण्याचा अनुभव, स्वत:चा कस लागेल अशी अवघड कामगिरी करण्याची संधी, खूप चालणं- चढणं यातून दमणं, खूप थकणे, कडकडून भूक लागणं- जेवायला मिळेपर्यंत थांबणं, समोर येईल ते मुकाट्याने जेवणं. निसर्गाच्या सहवासात असणं. नेटवर्कची रेंज नसणं, स्वत:च्या हाताने काम करणं, हातापायांना कष्ट होणं,  स्वत:च्या वस्तू आणि स्वत:लाही सांभाळणं. या आणि अशा किती तरी गोष्टी. आईबाबांबरोबरच्या सहलीची मजा वेगळी आणि अशा सहल-शिबिरातून शिकणं हे वेगळंच. अशी सहल-शिबिरं वाढत्या वयातल्या मुलांसाठी हवीतच. शहरात-गावात राहणाऱ्या सर्वांना यात सामील होता येतं. ज्या संस्था मुलांना पंचतारांकित सुविधा देतात, अशा संस्थांकडून न जाणं यातच शहाणपण आहे. आवश्‍यक ती सुरक्षितता आणि साधेपणा जिथे असेल, तो पर्याय स्वीकारावा.

वाचन शिबिर
गरवारे बालभवनमध्ये मुलांमध्ये वाचनाची आवड रुजावी म्हणून खास वाचन शिबिर घेतलं जातं. पुस्तक वाचायची आवड कमी होते आहे असं म्हटलं जातं, पण ज्यांना वाचनाची आवड आहे, अशी मुलं चांगली पुस्तकं मिळण्याची वाट बघत असतात. त्यांना बौद्धिक खाद्य हवं असतं. अशी शिबिरं ठिकठिकाणी घ्यायला हवीत. यासाठी शिक्षक-पालक- सोसायट्या-वस्ती-स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. 

कलाकौशल्य
हल्ली अभ्यासाला, अभ्यासाशी संबंधित लेखन-वाचनाला इतकं जास्त महत्व दिलं जातं की त्यापुढे कला या गौण वाटतात. या कलाही पुन्हा मार्कांशी जोडल्या गेल्यामुळे काही टक्के वाढण्यासाठी याचा उपयोग होतो असा तद्दन चुकीचा दृष्टिकोन पसरला आहे. 

वास्तविक कोणत्याही कलेची अभिव्यक्ती ही एक बौद्धिक क्रिया आहे. लहान मुलांनी एखादं चित्र काढलं, त्यात मनसोक्त रंग भरले, कोणते रंग, किती भरायचे, कसे भरायचे, याची स्वत: निवड केली. घडीकामातून एखादी वस्तू बनवली तर ती  सर्जनशीलता आहे. मुलांनी जे काही केलं आहे, ते स्वत:च्या आकलनातून- स्वत:च्या बुद्धीतून घडवून आणलं आहे. ते चांगलं झालं नाही, जमलं नाही तर त्यांच्यात बुद्धीचे ते अंग नाही, असं समजायचे कारण नाही. संगीत- वाद्यवादन याबाबतही हेच म्हणता येईल. या कलांसाठी साधना करावी लागते. उन्हाळी शिबिरातून फक्त ओळख होऊ शकते. त्यातून आवड निर्माण झाली, तर मुलं आपणहून मागणी करतील. या शिवाय ॲनिमेशन, फिल्ममेकिंगचे पर्याय काही ठिकाणी असतात.  विविध प्रकारचे देशी विदेशी डान्सचे प्रकार शिकायचीही संधी उपलब्ध होऊ शकते. आवड असली तर नक्की स्वत:ला आजमावून बघावं. कलेचे बीज एखाद्या क्षणी आपोआप पेरलं जातं. मात्र तशा संधी मिळायला हव्यात. मात्र या बाबतीत घाई-गडबड करून चालणार नाही. मुलांना मारून-मुटकून कुठेही पाठवण्यात अर्थ नसतो. अनेक संधी दिल्यावर त्यातल्या एका संधीचं चीज होतं.

घरी काय?
आपल्या मुलांची सुट्टी चांगली जावी असं वाटत असेल तर ठराविक दिवसांचं कस लागणारं एक सहल शिबिर + कोणत्याही आवडीच्या विषयाचं आणि खेळाचं शिबिर+ भरपूर मोकळा वेळ = शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास असं समीकरण जुळायला हरकत नाही. कारण प्रत्येक मूल प्रत्यक्ष अनुभवातून शिकतं. प्रत्येक अनुभव मेंदूत न्यूरॉनची जुळणी (सिनॅप्स) घडवून आणतो. या साध्यासुध्या अनुभवांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर- त्याच्या शिकण्यावर आणि एकूणच व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम होत असतो.

या शिबिरांच्या शिवाय आईबाबांबरोबर करायची मजाही हवीच. थोडी लुडबूड स्वयंपाकघरात, थोडी घराला लागणाऱ्या सामानखरेदीत आणि त्याचा हिशोब ठेवण्यात हवीच. आवडलेल्या गोष्टी लिहून काढणं, वर्तमानपत्रातले फोटो कापून चिकटवणे, आपली वही तयार करणं,  ती सजवणं हा तर वेळ सत्कारणी लावण्याचा आणि त्यातून स्वत:ला घडवण्याचा, शोधण्याचा खूप चांगला मार्ग आहे. 

कोशातून बाहेर पडू बघणारं फुलपाखरू आपले नाजूकसे पंख सुटे करण्यासाठी धडपडत असतं. ही धडपड त्याच्या अवघ्या अस्तित्वासाठीच चाललेली असते. स्वत:चे पंख विलग करणं हे काम अजिबात सोपं नसतं. खूप धडपड केल्यानंतरच ते शक्‍य होतं. असं म्हणतात की पंख सुटे करण्यासाठी दुस-या कोणी मदत केली तर त्याच्या पंखात पुरेशी ताकद येत नाही. म्हणून जोर-जबरदस्ती करून, त्याच्या मनाविरुद्ध पंख उघडायला जाऊ नका. मात्र एकदा का हे पंख उघडले की ते कशाचीही वाट बघत नाही. त्याला स्वत:ची दिशा मिळतेच. 

संबंधित बातम्या