सुट्टी एके सुट्टी 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कव्हर स्टोरी
 

एके काळी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मामाच्या गावाला जाण्याचा, निसर्गात भरपूर हुंदडण्याचा, भरपूर खेळण्याचा काळ असायचा. आता परिस्थिती बरीच बदलली. पालकांचे सगळे प्रयत्न, ’सुटीचा प्रॅक्‍टिकल उपयोग’ स्पर्धेच्या जगात मूल यशस्वी व्हावं त्यासाठीच्या ’स्कील सेट्‌स’त्याच्यात उतराव्यात ह्या दृष्टीने होऊ लागले. त्यात मुलांचा नैसर्गिक आनंद हा भाग थोडा मागे पडायला लागला. बाहेरची परिस्थितीही बदलली. सुटीचे मार्केटिंग सुरू झाले. भारंभार शिबिरे आणि कोर्सेस निघाले. त्यात दहा दिवसात गिर्यारोहणापासून, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संभाषण कलेपासून सॉफ्ट स्किल्स पर्यंत सर्व काही एकत्रित, एकाच कोर्समध्ये शिकवणारे कोर्सेसही निघाले. बऱ्याच पालकांनी, जर इतक्‍या सगळ्या गोष्टी आपल्या मुलाला पटकन शिकता आल्या तर किती छान, या भावनेने भरमसाट फी भरून ही निराशाही पदरी पाडून घेतली. या कोर्सेसचा व पालकांचा उद्देश चांगला असला तरी इतक्‍या कमी वेळात इतके सगळे होईल का, हा विचार केला गेला नाही. मुलांचा कल, आवड लक्षात घेवून त्यांना काय जमू शकेल याचा विचार करूनच शिबिर निवडायला हवे.                 

सुटीचा काळ हा अतिशय आनंदाचा काळ असायला हवा. मुलांनी भरपूर मैदानी खेळ खेळायला हवेत. मुख्य म्हणजे अनेकांना पटणार नाही पण मोबाईल नावाची गोष्ट, एकूणच व्हिडिओ गेम्स पूर्ण बंद असायला हवेत. गुलझार यांची एक अतिशय सुंदर कविता आहे.

खाली पडा है 
मेरे पडोस का मैदान 
एक मोबाईल बच्चोंकी 
गेंद चुरा ले गया   

अशी अवस्था खरच आली आहे, ती बदलायला हवी. मोबाईल ही गोष्ट महत्त्वाची आहेच. पण त्याचा आवश्‍यक तेंव्हा आणि तेवढाच वापर मुलांनी करायला हवा. सुटीचा उपयोग खरंतर एकूण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आणि भरपूर आनंद मिळावा ह्या दृष्टीने करायला हवा. त्यात आईवडिलांचा सहवास आणि निसर्गाचा सहवास हवाच. किंबहुना निसर्ग वाचन, ट्रेकिंग या गोष्टी वर्षभर शक्‍य होईल तेंव्हा, सगळ्यांनी मिळून करायला हव्या. निसर्ग खूप गोष्टी शिकवतो. सौंदर्याच्या अनुभूतीबरोबरच कठीण परिस्थिती, चढउतार इत्यादी अनुभव येतात. mindfulness सारखी तंत्रे शिकून घेऊन, त्याचा वापर करत  प्रत्येक ठिकाणाचा आनंद घेता यायला हवा. असे झाले, की मग, बागेतल्या पानापानाचा हिरवा रंग वेगवेगळा दिसतो. पायाखालच्या हिरवळीचा गारगार स्पर्श आणि कुठल्याही खडकाचा उबदार कठीणपणा त्या त्या क्षणी छान अनुभवता येतो. सूर्योदय किंवा सूर्यास्त दृश्‍याशी समरसून जाऊन, त्याच्याशी एक होऊन पाहाता येतो. आयुष्यातला लहानातला लहान आनंदसुद्धा भरभरून अनुभवता येतो. मुख्य म्हणजे आपला दृष्टिकोन आनंदी बनवता येतो. हे सगळे सुट्टीत शिकायला हवे. साधारण मुलांना समजायला लागल्यापासून मेंदूतील न्युरॉनल स्ट्रक्‍चरमध्ये महत्त्वाचे बदल घडत असतात. कोटयावधी नवीन सिन्याप्टिक कनेक्‍शन्स तयार होत असतात. याच वयादरम्यान अवतीभवतीच्या वातावरणाचा, संगतीचा, चांगल्या वाईट मूल्यांचा पगडा आपल्यावर बसत जातो. व्यक्तिमत्त्वाची इमारत चांगल्या पायावर उभी करण्याचे म्हणूनच हेच वय असते.  

मुलांसाठी सुटीच प्लानिंग करताना
कुठलीही गोष्ट करताना त्यामागची धारणा, विचार महत्त्वाचा. त्याप्रमाणे सुटीतील आनंद मिळवून देणाऱ्या ॲक्‍टिव्हीटीझ प्लान करताना मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास योग्य अर्थाने होण्याची सुरवात करण्याचा हाच सुवर्णकाळ आहे. आणि या विकासाच्या संदर्भात करायच्या गोष्टी पुढे वर्षभर सुरू हव्यात. हे का महत्त्वाचे आहे, तर आपण लक्षात घ्यायला हव, की सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे आणि चंगळवादाचेही आहे. टेक्‍निकल प्रगतीबरोबर येणारे सारे मोह इथे आहेत. या काळात यशस्वी व्हायचे आहे आणि मोहमयी वातावरणात विवेकाने मनावर ताबाही ठेवायचा आहे. अशा या स्पर्धेच्या युगात म्हणूनच ताण तणाव अपरिहार्य आहेत. त्यांना तोंड देण्याची क्षमता आपल्यामधे  निर्माण होणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आसपास निर्माण होत राहणाऱ्या मोहाच्या गोष्टी, चंगळवादी गोष्टी खरंच आपल्याला सुख देऊ शकतात का? याचे ॲनालेसीस करता यायला हवे. चकाकते ते सगळे सोने नसते हे जाणवायला हवे. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल हे महत्त्वाचे आहे. आपला व्यक्तिमत्त्व विकास असा व्हायला हवा, की त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर, कणखर आणि आनंदी असायला हवे. मनाची अशी जडणघडण बनवणे आता शक्‍य आहे. म्हणजेच मनाचे positive programming बऱ्याच अंशी शक्‍य आहे. त्यासाठी आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात  ‘व्यक्तिमत्त्व विकास ‘ या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्‍चितच नव्हे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणे, समाजाप्रती संवेदनाशील बनणे त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारे सकारात्मक आणि कणखर आणि विवेकी व्यक्तिमत्त्व बनणे हे जास्त महत्त्वाचे. आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणे महत्त्वाचे.  असे व्यक्तिमत्त्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येते. एकाग्रता, सकारात्मक विचार इत्यादी जमू शकते. मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकते. अगदी कुणालाही. या व्यायामाचे उद्दिष्ट काय असावे, तर दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी (Outer Journey) तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी (Inner Journey).  म्हणजेच आतले विश्व शांत,स्वस्थ आणि आनंदी  बनविणारी. हे जमले, की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास झाला असे म्हणता येईल. सुटीतील उपक्रम ह्या सर्वांची सुरवात करून देऊ शकतात. त्यासाठी आवश्‍यक ती स्वयंशिस्त आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी पालक, शिक्षक आणि तज्ज्ञ एकत्र येऊन योजना आखू शकतात. पण हे सगळे उपक्रम व्हायला हवेत मात्र मजेत हसत खेळत. त्यातील सुट्टीचा फील जपून. आमच्या घराच्या मागच्या बाजूला झाडे आहेत बरीच. तिथे बरेच वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे छोटे मोठे पक्षी, खारी, वगैरे बागडताना दिसतात. छान आवाजात किलबिल चालू असते. खारींचा पाठलागाचा खेळ, पक्षांचा लहान पक्षांना भरवण्याचा उपक्रम. पिलांचे धड्‌पडणे, पुन्हा उभं रहाणे, सावरणे, पुन्हा नव्याने उडणे किंवा पळणे असे सगळे उद्योग सकाळच्या जादुई प्रकाशात सुरू असतात. मला बऱ्याचदा वाटतं, की ही पिल्ले सुद्धा नव्याने काही ना काही तरी शिकतायत. तेही खूप आनंदात. वाटत यांचीसुद्धा उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या