पावसाळी ट्रेकचा ‘श्रीगणेशा’

गणेश कोरे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

‘सह्याद्री’ गड किल्ले-भ्रमंती करत असताना, नाशिक विभागात किल्लांचा ट्रेक करण्याचा विचार आमच्या सर्वांचा होता. अनेक वर्षांपासून वृत्तपत्रे, इंटरनेट आणि सोशल मिडीयावर दिसणाऱ्या ‘हरिहर’ किल्ल्याच्या उभ्या कातळात कोरलेली पायऱ्यांची वाट आम्हाला साद घालत होती. चर्चा झाली आणि हरिहर किल्ला जूनमधील पहिल्या पावसात करून पावसाळी ट्रेकचा यंदाच्या मोसमातील ‘श्रीगणेश’ करायचा हे आम्ही ठरवले. सर्वांनी बैठकीमध्ये होकार दिला. यामध्ये मी, संजय खत्री, राहुल जोशी, धनंजय कुलकर्णी, जितेंद्र आणि कृष्णा देशमुख, कौस्तुभ राक्षे यांनी सर्वांनी होकार दिला. ट्रेकच्या नियोजनाची ‘जबाबदारी’ म्हणा किंवा ‘नेतृत्व’ कौस्तुभकडे सर्वानुमते देण्यात आले.

मे महिना संपल्यानंतर सर्वांना वेध लागले ते नियोजित हरिहर ट्रेकचे ! व्हॉटसग्रुपवर चर्चा करून सर्वानुमते तारखा ठरल्या. चर्चा करून त्यानुसार अंजनेरी आणि हरिहर असे दोन किल्ले करण्याचे ठरवले. तर जाता जाता सिन्नर येथील गारगोटी संग्रहालय आणि प्रसिद्ध प्राचीन हेमांडपंथी गोंदेरश्‍वर मंदिरदेखील पाहण्याचे ठरले. जसे जसे ट्रेकला निघण्याचे दिवस जवळ येऊ लागले तसे भरवशाचे एक एक जण काही कारणांनी गळायला सुरू झाले.

अखेर ट्रेकसाठी आम्ही सहा जण उरलो. रात्री सॅक भरल्या. सकाळी साडे सहा वाजता सर्वजण आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर लक्ष्मी ऑइल मिलजवळ जमलो. सचिनची ‘सफारी’ गाडी घेऊन अखेर निघालो. गप्पा मारत आम्ही सिन्नरला पोहचलो. सिन्नरला झकास नाष्टा करून, गोंदेश्‍वर मंदिर पाहण्यासाठी गेलो. मी दोन वेळा मंदिर पाहिले होते. इतरांनी एकदाही पाहिले नव्हते. प्रत्यक्षात मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर सर्वांना सुखद धक्का होता. अरे...एवढे सुंदर आणि प्राचीन मंदिर असून, आपण एकदाही आलो नाही. अशी चर्चा करत मंदिराचे सौंदर्य कौतुकाने न्याहाळत मोबाईल आणि कॅमेऱ्यामध्ये छायाचित्रे घेतली. आणि तासाभराने गारगोटी संग्रहालयाकडे मार्गस्थ झालो. गारगोटी संग्रहालयातील खजिना बघितल्यावर सर्वच जण अवाक्‌ झाले. संग्रहालयातील मार्गदर्शकाकडुन माहिती घेत एक तासाने अंजनेरीकडे मार्गस्थ झालो.

अंजनेरीकडे मार्गस्थ
अखेर एक वाजण्याच्या सुमारास नव्याने काम सुरू असलेल्या नागमोडी वळणाचा अरुंद घाटरस्त्याचा आनंद घेत अंजनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. त्र्यंबकेश्वराचे देवस्थान जवळ असल्याने महाविद्यालयीन तरुण - तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची वर्दळ चांगली होती. आम्ही गड चढण्यास सुरवात केली. भग्न पायऱ्यांवरून चढण सुरू होती. पहिल्या टप्प्यापर्यंत काही ठिकाणी सिमेंटच्या पायऱ्या होत्या. हा टप्पा पार केल्यानंतर सपाटीचा भाग आला. सपाटी होती तरी चढण चांगली होती. हा टप्पा पार करत हनुमानाच्या मंदिरात थांबलो. पुढील टप्पाच्या चढाई दरम्यान वाटेत एके ठिकाणी तळे होते. हनुमानाच्या जन्मानंतर त्याने सूर्याकडे झेप घेताना पायाच्या रेट्यामुळे हे तळे निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. हा टप्पा पार करत पुढील पायऱ्यांच्या वाटेने किल्ल्यावरील पठारावर पोहचलो. अंजनेरी देवीच्या मंदिराकडे जात असताना वन विभागाचे अधिकारी भेटले. त्यांनी येथे छायाचित्रणाला परवानगी नसल्याचे सांगत मला कॅमेरा बंद करून बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले.

यावेळी छायाचित्रणाला का बंदी आहे यावर संजय आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी देखील सविस्तर माहिती देताना सांगितले, की अंजनेरी किल्ला आणि पठार नव्याने अभयारण्य घोषित झाले आहे. या पठारावर अतिशय दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती असून, त्याची तस्करी होऊ नये, या प्रजातींच्या छायाचित्रांचा इंटरनेट आणि सोशल माध्यमाच्या माध्यमातून प्रसार होऊन तस्करीला प्रोत्साहन मिळू नये म्हणून छायाचित्रणाला बंदी आहे. त्यांचा हा दावा मला मान्य नव्हता. आता व्यावसायिक कॅमेऱ्याच्या बरोबरीने मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपता येतात. मोबाईलमधील छायाचित्रांचा अधिक प्रसार होतो. अखेर चर्चेनंतर आम्ही अंजनेरी देवीच्या मंदिरात जाऊन विसावलो. नंतर गडाचा परिसर पाहून छायाचित्रे घेत, पुन्हा गड उतरण्यास सुरवात केली. गडाच्या मधल्या टप्प्यावर आला असतानाच अचानक आभाळ भरून काळ्याकभिन्न ढगांनी आभाळ व्यापले होते. वातावरणाबरोबर मनदेखील उल्हसित झाले होते. अचानक पावसाची जोरदार सर आली. आम्ही मनसोक्त पावसात भिजलो. उन्हाने तापलेल्या मातीवर पडलेल्या पहिल्या पावसाने माती सुगंधित झाली होती. या सुगंधाने वातावरण अधिकच रोमांचकारी झाले होते. पावसाचा आनंद घेत आम्ही हळूहळू खाली येत होतो. एव्हाना चार वाजले होते. गडाच्या पायथ्याशी आल्यावर ओल्या कपड्यांसह जेवणावर ताव मारला आणि मस्त चहा घेऊन हरिहरकडे मार्गस्थ झालो.

हरिहरकडे मार्गस्थ
हरिहरकडे जाताना त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने डाव्या हाताला अंजनेरी किल्ल्याची बाजू न्याहाळत निघालो होतो. आज हरिहरवर रात्री मुक्काम करू उद्या सकाळी लवकर खाली येऊन ‘पट्टा’ किल्ला करू असा विचार सुरू होता. गप्पांचा फड रंगवत हरिहरच्या पायथ्याशी असलेल्या हर्षेवाडीला कधी पोहचलो समजले नाही. वाडीत पोचतानाच दोन चार चारचाकी वाहने दिसली. शनिवार असल्याने काही गिर्यारोहक अगोदरच किल्ल्यावर गेल्याचे कळाले. वाडीतील नामदेव बांगारे यांच्या अंगणात गाडी लावली. आजच गडावर मुक्कामाला जाण्याच्या तयारीने सॅक आवरत होतो. सर्वानुमते निर्णय घेऊन गडावर जाण्यासाठी निघालो. आभाळ भरूनच आले होते पण पावसाची शक्‍यता दिसत नव्हती. काही अंतर चालत गेल्यावर आभाळ अधिकच गडद झाले आणि हळूहळू पावसाला सुरवात झाली. पाऊस वाढणार नाही या अंदाजाने मार्गक्रमण सुरू होते. मात्र अचानक पाऊस वाढला आणि पुढे जाण्याचा निर्णय रद्द करत माघारी फिरलो.

चिंब अंग..उकडलेली अंडी आणि खेकडा सूप... व्वा....
नामदेव यांच्या घरी आल्यानंतर भिजलो होतो. पावसाचा जोर वाढला होता. पावसातच पुढे जाण्याचा निर्णय रद्द केल्याचे योग्य ठरले होते. एव्हाना सात वाजले होते. ओले कपडे काढून अंग कोरडे केले. ओले कपडे वाळत घातले आणि कोरडे कपडे घालून गप्पा मारत बसलो. पावसामुळे गावातील वीज गेली होती. त्यामुळे बॅटरीच्या मंद प्रकाशात तंबू लावला. यानंतर नामदेव यांच्याशी चर्चा करून जेवणाचे नियोजन करत गावरान अंड्याचा बेत आखला, चुलीवरील उकडलेल्या अंड्यावर ताव मारत अंड्याचे कालवण (अंडाकरी) केले. यासाठी हॉटेल व्यावसायिक असलेल्या कौस्तुभने मदत केली. तर नामदेव यांच्या घरात अगोदरच खेकड्याची आमटी केली होती. या गरमागरम आमटीवर ताव मारत आम्ही जेवायला बसलो. उकडलेली अंडी, अंड्याचे कालवण आणि खेकड्याच्या आमटीवर यथेच्छ ताव मारत, मस्त ढेकर देऊन किचन आवरले व अंगणात गप्पांसाठी आलो.
संध्याकाळच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अंगणाच्या शेजारीच गायांचा गोठा असल्याने शेण आणि गोमूत्राच्या सुगंध ग्रामीण जीवनशैलीचा आनंद देत होता. रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले होते. मी आणि संजुने ओट्यावर झोपण्याचा निर्णय घेतला. तर सचिन,वैभव, सुमेर आणि कौस्तुभ तंबूमध्ये झोपले. तंबूत झोपण्याचा सचिनचा पहिलाच अनुभव होता. त्याला हा अनुभव रोमांचकारी होता. सर्वच जण अंजनेरी किल्ल्याच्या ट्रेक मुळे दमलेले होते. मी माझ्या स्लिपिंग बॅगमध्ये शिरलो आणि उद्या पहाटे लवकर उठण्याची सूचना देऊन, गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळालेच नाही. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने जाग आली. साडेपाच वाजता उठलो. तसा सर्वांना आवाज दिला. थोड्या वेळाने आम्ही उठलो. तर नामदेव यांच्या पत्नीने आमच्यासाठी गरम पाण्याची बादली अंगणामध्ये आणून ठेवत सुखद धक्का दिला. गरम पाण्याने तोंड धुवून कोरा चहा (ब्लॅक टी) घेऊन सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा हरिहरकडे मार्गस्थ झालो.

सकाळचे आल्हाददायक पावसाळी वातावरणाने उत्साह वाढला होता. धुक्‍याच्या दुलईत हर्षेवाडी आणि हरिहर किल्ला लपला होता. आम्ही निघताना तरुणांचा एक ग्रुप नाशिकवरुन दुचाकीवरून आले होते. ते नवखेच होते. त्यांच्या बरोबर आम्ही प्रत्यक्ष चढाईला सुरवात केली. एक एक टप्पा पार करत गडाच्या मुख्य चढाईच्या कातळाखाली पोचलो. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. हृदयात साठवलेले हरिहरचे चित्र समोर दिसल्याने हायसे वाटले होत. धुक्‍यामध्ये पायऱ्या लपल्या होत्या. पावसामुळे चढाई अधिकच कठीण वाटत होती. पायऱ्यांवरून पहिल्या पावसाचे मातीमिश्रित लाल पाणी वाहू लागले होते. त्यातच हळूहळू गर्दी वाढू लागल्याने चढाईला वेळ लागत होता. आम्ही पावसातच चढाईचा निर्णय घेतला व पायऱ्या चढण्यास सुरवात केली. प्रत्येक पायरीला खोबणी केली असल्याने पकड मजबूत होती त्यामुळे चढाई सुरक्षित झाली होती. मात्र भिती होती पहिल्या पावसामुळे दगड कोसळण्याची. एक एक पायरी सर करत पहिला टप्पा सर केला. दुसऱ्या टप्प्यातील चढाईमध्ये देखील अरुंद पायऱ्या होत्या. या पायऱ्यांवरून पाणी जोरात वाहत होते. दुसऱ्या टप्प्यातील चढाई दरम्यान उभ्या गुहेप्रमाणे चढाई होती. ती चढाई पार करत भग्न दरवाजा पार करत पठारावर पोहचलो. त्यापुढेही धुक्‍यामध्ये हरवलेल भगवा ध्वज फडकणारे एक शिखर आम्हाला साद घालत होते. हे शिखर किल्ल्यावरील सर्वोच्च ठिकाण होते. या शिखराच्या पायथ्याशी पोहचलो.  शिखरावर केवळ १० फूट बाय १० फूट एवढीच जागा होती. आम्ही शिखर सर करून या ठिकाणचे छायाचित्रे टिपत पुन्हा खाली आलो. शिखरासमोरील पठारावर एक दगडी इमारत आहे. या इमारतीमध्ये दोन खोल्या आहेत. या ठिकाणी आतमध्ये जाऊन आराम केला. थोडी पोटपूजा करत पुन्हा आल्या मार्गाने खाली उतरण्यास सुरवात केली.

एव्हाना १० वाजले होते. गडावर येणाऱ्या पर्यटकांची (गिर्यारोहक नव्हे) संख्या वाढली होती. रविवार असल्याने पुण्यावरून दोन मोठ्या बसमध्ये आयटी क्षेत्रातील हौशी पर्यटक दाखल झाले होते. यामुळे वरून खाली जाणाऱ्यांची आणि खालून वर येणाऱ्यांची संख्या वाढली होती. यामुळे अरुंद पायऱ्यांवर कोंडी झाली होती. ही कोंडी समन्वयाने कमी करत वर येणाऱ्यांना थांबवून हळूहळू खाली येत होतो. अखेर भर पावसात पायऱ्यांवरून पाणी कोसळत असताना खाली आलो. मुख्य टप्पा उतरल्यानंतर आणि गर्दीतून बाहेर आल्याचे समाधान मानत खाली उतरण्यास सुरवात केली. मध्ये स्थानिकांनी उभारलेल्या झोपडीमधील चहाचा आस्वाद घेत साडे बारा वाजता नामदेवच्या घरी पोहचलो.

ओलेचिंब झालेले कपडे बदलून बरोबर एक वाजता जेवायला बसलो. आज पण खेकड्याची चटणी, पिठलं, नाचणीची भाकरी आणि भातावर ताव मारला. जेवणानंतर पुन्हा एकदा कोरा चहा घेऊन तीनच्या दरम्यान नाशिककडे मार्गस्थ झालो. नाशिकमधील राज ठाकरे यांच्या संकल्पनेतुन उभारण्यात आलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्याचे नियोजन केले. आम्ही (सह्याद्री गिरीभ्रमण संस्था) देखील शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना इमारती मध्ये शस्त्रास्त्र संग्रहालय करण्यासाठी २००७ पासून शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याने हे प्रदर्शन सहकाऱ्यांना दाखविण्याचा माझा हट्ट होता. प्रदर्शन स्थळी पोचलो. मी प्रदर्शन पूर्वी पाहिले असल्याने मला विशेष आनंद नव्हता. मात्र सर्व सहकाऱ्यांना दाखविण्यास विशेष आनंद वाटत होता. प्रदर्शन पाहताना हेच प्रदर्शन, संग्रहालय शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीमध्ये कसे दिसेल याचे स्वप्न पाहत आम्ही वासुदेव कामत यांची चित्रे न्याहाळत शिवकाळात गेलो होतो.

संग्रहालय पाहून झाल्यावर निवांत वेळ होता. फर्जंद चित्रपटाबाबत प्रवासादरम्यान चर्चा झाली होती. संग्रहालयाच्या परिसरातील लॉनवर निवांत बसल्यावर फर्जंद चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. चित्रपट संपल्यानंतर पुढचा ट्रेक पन्हाळगड ते विशाळगड करण्याचे निश्‍चित करत. सिन्नरला ढाब्यावर जेवण करून रात्री साडेबारा वाजता जुन्नरला पोहचलो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या