रेस्ट year बेस्ट year ठरवा...           

हेरंब कुलकर्णी   
शुक्रवार, 15 जून 2018

कव्हर स्टोरी
 

दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागातील दोन्हीकडे प्रवेशाचा प्रश्न गंभीर आहे. निवडणुकीत यश मिळविल्याचा आनंद बहुमत सिद्ध करायचे असल्याने कर्नाटकात फार काळ टिकला नाही अशी परिस्थिती या मुलांची होते. इतके गुण मिळूनही प्रवेशासाठी होणारी वणवण बघवत नाही. दहावी नंतर तरी किमान फक्त ११ प्रवेशाचा एकच मुख्य रस्ता असल्याने तो मिळविणे एवढा निर्धास्तपणा तरी असतो पण बारावी नंतर मुळात अनेक रस्ते माहीतच नसणे, माहीत असले तरी तिथे नंबर लागण्यातील अडचणी, नंबर लागला तरी तिथे राहण्याचा प्रश्न हे सारे तणाव देणारे मुद्दे असतात आणि सर्वांत महत्त्वाचा क्‍लेशदायक भाग हा असतो, की जरी एखादा कोर्स आवडला तरीसुद्धा तो आपल्या पालकांना परवडणार नसल्याने मुलांना होणारा मानसिक त्रास खूप वेदनादायी असतो. त्यामुळे मोठ्या हौसेने सायन्सला गेलेली मुले अनेक कोर्सची माहिती असूनही आपल्या पालकांना परवडणार नाही म्हणून ते सारे रस्ते विसरून केवळ फक्त बीएस्सीचा मार्ग निवडतात तेव्हा त्यांचे नैराश्‍य बघवत नाही. 

मला बारावीच्या परीक्षेनंतर एखादा कोर्स आवडला आहे पण पालकांना परवडत नाही म्हणून प्रवेश घेता येणार नाही, अशा प्रकारच्या मुलांशी संवाद करण्याची गरज वाटते. अशा मुलांनी एकतर एज्युकेशन लोनच्या  शक्‍यता पाहिल्या पाहिजेत आणि तरीही ते आवाक्‍याबाहेरचे असले तर आपल्या पालकांना समजून घ्यायला हवे. कारण पालक काही मुद्दाम असे वागत नसतात. अशावेळी इतर श्रीमंत मुलांचे प्रवेश बघण्यापेक्षा जे अजिबात शिकू शकले नाहीत अशा मुलांची उदाहरणे पहायला हवीत. त्याचवेळी पालक आपल्याला ज्या कोर्सला शिकवू शकतात आणि एज्युकेशन लोनची मदत जितकी मिळू शकते ती घेऊन तितके शिकले पाहिजे आणि त्यानंतर नोकरी पकडून आपल्याला पाहिजे ते करू असा व्यावहारिक विचार करायला हवा. आज अनेक प्राथमिक शिक्षक स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत आहेत. त्यांनी त्या काळात कौटुंबिक स्थितीमुळे डीएड केले नोकरी धरली अभ्यास केला आणि आज नंतर अधिकारी झाले.त्यामुळे आपण विशिष्ट कोर्सला जाऊ शकलो नाही म्हणजे आपण आयुष्याला बाद झालो, असे नसते. राजकारणात ज्याप्रमाणे टिकून राहण्याला आणि संयमाला महत्त्व असते संधी कधीही येऊ शकते त्याचप्रमाणे पालक जितके शिकवतात त्याने शिकणे आणि नंतर आपल्या हिमतीवर आवडीच्या गोष्टी करणे असा दृष्टिकोन जर घेतला नाही तर आपण विनाकारण न्यूनगंड आणि पालकांविषयी नकारात्मक भावनेचे बळी ठरतो. 

ग्रामीण भागातील मुलांना अनेकदा  १२वीच्या निकालानंतर शहरी भागातील अनेक संधी बघून आपले जन्म शहरी भागात का झाला नाही, असेही कधी कधी वाटून जाते. पण आपण जिथे असतो तिथले अनेक फायदे आपल्या व्यक्तिमत्त्वाला झालेले असतात. ग्रामीण भागात दगदग नसण्याने व सतत नैसर्गिक जगण्याने आपल्या अनेक क्षमता फुललेल्या असतात. व्यक्तिमत्त्वात एक सहजता आलेली असते. आरोग्यसंपन्नता आलेली असते. त्यामुळे याबाबत कोणताही न्यूनगंड बाळगता कामा नये. 

बारावी पास झालेल्या ग्रामीण भागातील मुलींनी तर जास्तीत जास्त शिकण्याचा हट्ट धरला पाहिजे. कारण या मुलींनी जर शिकण्यात थोडाही निरुत्साह दाखवला तर लग्नाची दबलेली चर्चा लगेच मोठ्या आवाजात सुरू होते. बालविवाहाचा अभ्यास करताना लक्षात येते, की जोपर्यंत मुलगी शिकत शिकत जाते तोपर्यंत लग्नाचा धोका नसतो, पण ज्याक्षणी तिचे शिक्षण थांबते त्याचवेळी लग्न चर्चा जोर धरते. त्यामुळे बारावी नंतर चिकाटीने मुलींनी शिकले पाहिजे. आज ग्रामीण भागात मुली नक्कीच शिकत आहेत पण व्यावसायिक कोर्सेस किंवा विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेण्याचे प्रमाण अजून वाढत नाही. कला शाखेलाच मुलींचा ओढा आहे. याबाबत मुलींशी माध्यमिक स्तरावरच प्रबोधनाची गरज जाणवते. 

ग्रामीण भागातून अनेक मुले आता दहावी आणि बारावीला शहरी भागात जातील, अगदी एखाद्या आदिवासी खेड्यातून तालुक्‍याच्या गावाला जातील. आदिवासी आणि दलित विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृह शहरी भागात असल्याने अनेक मुले तिथे प्रवेश घेतात. त्याचबरोबर शहरातील अनेक महाविद्यालयीन वसतिगृहात अनेक विद्यार्थी शिकायला येतात. या मुलांच्या मानसिक समायोजनाचा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. मी स्वत: ग्रामीण भागातून शहरी भागात  ११वी  १२वीला शिकायला गेल्यावर ती मानसिकता अनुभवली आहे. घराबाहेर राहण्याची सवय नसते, संध्याकाळ खूपच उदास वाटते. आपल्या घरातील त्यावेळचे वातावरण कसे असते याचे चलत चित्र डोळ्यासमोर येत असते. मित्र इथे नसतात आणि आपले कपडे, भाषा यातून न्यूनगंड विकसित होतो. या मनःस्थितीत फारतर ४ महिने जातात त्याला खूप धाडसाने सामोरे जायचे असते.आपल्यासारखे इतर ठिकाणाहून आलेले मित्र शोधून काढावेत आणि आत्मविश्वासाने सामोरे जावे. 

 • दहावी पास झाल्यावर अकरावी सायन्सला प्रवेश घेताना सर्व तासिका इंग्रजीत असतात. त्याने अनेक मुले बावरतात (मी देखील सायन्स सोडून कला शाखेत आलो होतो) त्यावेळी चिकाटीने सर्व लेक्‍चर ऐकणे, इंग्रजी सायन्सचा शब्दकोश वापरणे ही सवय करायला हवी. अलीकडे सेमी इंग्रजीतून आलेल्या मुलांना ही समस्या कमी जाणवते. 
 • अकरावीच्या वर्षांत आणि बारावीनंतर तुम्ही ज्या कोर्सला गेला आहात तिथेही पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे.
 • एकतर  दहावी, बारावीला आपले आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले असते. पुरेशी झोप घेतलेली नसते, की व्यायाम केलेला नसतो. त्यामुळे आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. व्यायामाला महत्त्व द्यावे. एखाद्या खेळावर लक्ष केंद्रित करून तो खेळ विकसित करावा. 
 • ध्यान करण्याची पद्धती शिकून घ्यावी. त्याचे खूप फायदे आहेत. 
 • या वर्षात कोणताही एखादा छंद विकसित करावा.  
 • घरच्यांना मोबाईल मागण्याचा हट्ट धरू नये, आणि जरी मोबाईल असेल तरी अतिशय कमी वेळा बघण्याची सवय लावावी. मोबाईल असेलच तर सोशल मीडिया वापरण्यापेक्षा युटूब व इतरत्र जास्तीची माहिती पहावी.   
 • इंग्रजी ऐकणे, वाचणे आणि तसा एखादा मित्र असेल तर ती भाषा बोलण्याचा सराव करावा. इंग्रजी भाषेतला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तो मिळायला हवा  
 • संगणक प्रभुत्व, त्यातील विविध वापर शिकायला हवे 
 • दहावी, बारावीच्या वर्षात आपण अवांतर वाचनाकडे फार लक्ष देऊ शकलो नाही.त्यामुळे या वर्षात रोज किमान २५ ते ५० पाने वाचण्याची सवय लावावी. 
 • मोबाईलवर रोज १ जीबी डाटा फ्री मिळतो आहे. त्याचा उपयोग करून जगातील उत्तम चित्रपट बघण्याचा प्रयत्न करू या. torrent app विविध वेबसाइट तसेच IMDB या ॲपवर चांगले चित्रपट त्यांचे रेटिंग दिलेले असते. त्याआधारे चित्रपट बघावे. विविध विज्ञानविषयक डॉक्‍यूमेंटरी पाहाव्यात. 
 • स्वत:ला व्यक्त होण्याची सवय लावली पाहिजे. त्यासाठी लिहायला हवे. रोज डायरी लिहिण्याच्या सवयीतून आणि आपल्या भावना व्यक्त करण्यातून अभिव्यक्ती विकसित व्हायला लागते.

दहावी पास झालेले आणि बारावी नंतर बीए, बीकॉम, बीएस्सी या शाखा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा  अकरावी व पदवीचे पहिले वर्ष हे रेस्ट इयर वाटते. दहावी बारावीच्या तुलनेत हे वर्ष नक्कीच तसे कमी तणावाचे असते पण त्यात करण्यासारखे खूप काही असते. ’शांततेच्या काळात युद्धाची तयारी करायची असते’ या उक्तीप्रमाणे बारावीची तयारी करणे किंवा पदवीनंतर ज्या क्षेत्रात आपल्याला जायचे आहे त्या क्षेत्राचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. या वर्षात जर आपण इतर गोष्टीत वेळ घालवला तर नंतर पश्‍चात्ताप होतो. आज रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. त्यासाठी होणाऱ्या मुलाखती आणि त्याची तयारी म्हणून अनेक प्रकारची करावी लागणारी तयारी याने मुले भांबावून जातात. पण तुम्ही भविष्यात कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी काही विशिष्ट क्षमता आपल्याला आवश्‍यक असणार आहेत आणि त्या व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित आहेत. अनेक मुलाखत घेणाऱ्या किंवा निवड करणाऱ्या व्यक्तींशी बोलल्यावर जाणवते, की तुमच्यातील औपचारिक दिखाऊपणा फारसा बघितला जात नाही. तुमचे विषयातील ज्ञान, त्याचे ॲनालिसेस करण्याची क्षमता, तुमची कल्पनाशक्ती आणि संवाद करण्याची पद्धत याच गोष्टी कोणत्याही क्षेत्रांत जोखल्या जातात.त्यामुळे आपण या क्षमता आपल्यात विकसित करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. उगाच कोणी तरी सुचवते आणि आपण कोणता तरी कोर्स लावतो असे करता कामा नये. त्यापेक्षा आपण जे वाचतो शिकतो त्यावर प्रभुत्व आणि भाषिक संवादात आत्मविश्वास याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्त्वात एक आश्वासकता यायला हवी.आपल्याकडे बघितल्यावर समोरच्याला तो फील यायला हवा. 

दहावी नंतरच्या जगातील काही धोक्‍याची वळणेही आपण लक्षात घेऊ या. आज शहरी आणि निमशहरी भागात व्यसन करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तंबाखूजन्य पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपात तरुणांसमोर येते आहे. वाढदिवस किंवा तत्सम पार्टी करणे, चिल्लर पार्टी यात बिअर घेणे हळूहळू वाढते आहे. घरापासून दूर शिकायला असताना आणि आईवडील दोघेही नोकरी करत असतील तर हा धोका अधिक वाढतो.त्यामुळे या व्यसनाच्या मोहापासून दूर राहणे हे खूप महत्त्वाचे आहे. मी गम्मत म्हणून हे करतो, हे म्हणण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्या नकळत आपण त्यात गुरफटून जातो. त्याचबरोबर शहरी आणि निमशहरी भागात आपल्याला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नसणे हे जणू खूप मोठे पाप आहे, अशी भावना रुजते आहे. प्रेम ही भावना खूप सुंदर आहे फक्त आपल्या करिअरमध्ये त्याचा अडथळा बनता कामा नये, एवढे फक्त लक्षात ठेवले पाहिजे. दुर्दैवाने करिअर घडण्याचा कालखंड आणि ही प्रेमभावना फुलण्याचा कालखंड हा एकच आहे. तेव्हा प्रश्न प्राधान्यक्रम ठरवण्याचा आहे कारण त्या भावनेतील  नैराश्‍य आपली जीवनउर्जा शोषून घेते. त्यामुळे आपण आपल्या भावना नीट ओळखून आपल्या करिअरचे गांभीर्य आणि भावना याचे तारतम्य राखायला हवे. 

थोडक्‍यात  दहावी  बारावी नंतरचे वर्ष हे पुढील करिअरचा पाया घालणारे वर्ष म्हणून आपण बघायला हवे. भविष्यात आपल्याला कोणत्याही क्षेत्रात जाताना ज्या मूलभूत क्षमता लागणार आहेत त्या क्षमता विकसित करण्यासाठी हे वर्ष वापरायचे आहे. या वर्षाचा आपण चांगला वापर केला तर हे 

रेस्ट year नव्हे तर बेस्ट year ठरेल. या वर्षात खूप अभ्यास करावा असे मी सुचविणार नाही. 

संबंधित बातम्या