रडीचा डाव

किशोर पेटकर        
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कव्हर स्टोरी

ऑस्ट्रेलियन्स... त्यांना प्रेमाने ‘कांगारू’ असे संबोधण्यात येते. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू गुणवान आणि नैपुण्यसंपन्न; पण तेवढेच रडवे आणि अखिलाडूवृत्तीचे! प्रतिस्पर्धी खेळाडूंवर स्लेजिंगचा (टोमणे) मारा करण्यात अतिशय पटाईत. त्यांच्या खेळाचा तो एक भागच ठरला आहे. प्रतिस्पर्ध्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात त्यांना मोठा आनंद वाटतो. क्रिकेटमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, इतर तुच्छ; हा टेंभा मिरविण्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू धन्यता मानतात. त्यांच्या क्रिकेटपटूंप्रमाणेच चाहतेही उद्धट आणि अहंकारी. यश मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू दाखवतात. साऱ्यांनाच एका तराजूत ठेवता येणार नाही, ऑस्ट्रेलियाचे बरेच क्रिकेटपटू सज्जनही आहेत, दुर्दैवाने लबाडी करणारे वारंवार ठळकपणे दिसतात. असेच एक ऑस्ट्रेलियन त्रिकूट चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामुळे नुकतेच कलंकित झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची इज्जतही खोल समुद्रात बुडाली आहे. 

माजी कर्णधार स्टीव स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्या प्रेरणेने नवोदित खेळाडू कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याने टीव्ही कॅमेऱ्यांची तीक्ष्ण नजर असूनही चेंडूशी ‘छेडछाड’ करण्याचा भ्याडपणा केला. यास धिटाई मानण्याऐवजी, पळपुटेपणाच म्हणावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज प्रभावी ठरत असताना, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना अपेक्षित यश मिळत नव्हते. केप टाऊन येथील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यजमानांचे पारडे वरचढ होत आहे हे पाहून कांगारूंचा तोल ढळला. उपाहाराच्या वेळी ‘मास्टर माईंड’ वॉर्नरने चेंडूशी ‘छेडछाड’ करण्याचा कट रचला. त्यात आपला सलामीचा सहकारी बॅंक्रॉफ्ट याला सहभागी करून घेतले व कर्णधार स्मिथची संमती मिळविली. कट त्यांनी प्रत्यक्ष मैदानावर राबविलाही. या गटाने प्रशिक्षक डॅरेन लिहमन यांनाही अंधारात ठेवले. वॉर्नरबाबत क्रिकेट मैदानावर नेहमीच प्रतिकूल मत व्यक्त होते. हा ‘भ्रष्ट मेंदू’चा खेळाडू. फलंदाज या नात्याने अतिशय प्रतिभावान, मात्र वृत्तीने गलिच्छ! प्रतिस्पर्धी खेळाडूंशी त्याचे नेहमीच खटके उडतात. तो आजीवन कर्णधार बनणार नाही अशी कारवाई ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने केलेली आहे, पण त्यास उशीर झालेला आहे. या माजी उपकर्णधाराने ऑस्ट्रेलियाला चिखलात पार बुडवून टाकले आहे. त्याच्यावर आणि स्मिथवर एका वर्षाची, तर बॅंक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी आली आहे. पण क्रिकेटवर अतीव प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या विश्‍वासाला तडा मात्र कायमचाच गेला आहे. या तिघाही क्रिकेटपटूंकडे यापुढे पाहताना ‘गुन्हेगार’ याच नजरेने पाहिले जाईल. त्यांची मैदानावरील कामगिरी मातीमोल झालेली आहे. 

कर्णधाराचा ‘फिकट मेंदू’ 
खरे म्हणजे, स्मिथला संघाचा प्रमुख या नात्याने हा गैरप्रकार रोखता आला असता, पण ‘फिकट मेंदू’मुळे तो स्वतःची जबाबदारी विसरला. ‘ब्रेन डेड’ होणे स्मिथसाठी नवलाची बाब नाही. मागे भारतात कसोटी मालिका खेळत असताना ‘रिव्ह्यू’ घेण्यासाठी त्याला ड्रेसिंग रुमची मदत घ्यावी लागली होती. ‘फिकट मेंदू’मुळेच हे असे होते. तशी त्याने कबुलीही दिली होती. तेव्हा स्मिथवर टीका झाली, पण कारवाई झाली नव्हती. आता मात्र तोच चक्रव्यूहात पुरता फसला. स्मिथने क्रिकेटपटू म्हणून यश मिळविण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम कौतुकास्पद आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघात लेगस्पिनर या नात्याने त्याने स्थान मिळविले, नंतर फलंदाजीवर प्रचंड मेहनत घेत तो संघाचा आधारस्तंभ बनला. त्याची वाटचाल आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी केलेली धडपड, नंतर कर्णधाराचा सन्मान मिळविण्यापर्यंत केलेली वाटचाल यामुळे त्याचे कौतुक वाटत होते; पण एक नेता या नात्याने तो सपशेल अपयशी ठरला हे मान्य करावेच लागेल, स्वतः स्मिथही याबाबत सहमत असेल. गेल्या तीसेक वर्षांचा विचार करता, ॲलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव वॉ, रिकी पाँटिंग, मायकेल क्‍लार्क यांनी कर्णधार या नात्याने ऑस्ट्रेलियाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. स्मिथने २०१५ मध्ये क्‍लार्ककडून कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली, मात्र ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पूर्वीप्रमाणे अधिराज्य गाजविताना दिसले नाही. आपण ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवू शकत नाही, ही सल त्याला सतावत होती. त्यामुळे जिंकण्यासाठी त्याने केप टाऊनला वॉर्नरच्या कुप्रवृत्तीस साथ दिली हे स्पष्टच आहे. कर्णधार या नात्याने प्रचंड दडपण तो पेलू शकला नाही. तो आता पुरता उद्‌ध्वस्त झालेला आहे, भक्कमपणे उभे राहण्यास त्याला बराच काळ लागेल. 

ऑस्ट्रेलियात जनक्षोभ 
केप टाऊनला चेंडू कुरतडण्याच्या प्रयत्नाची कर्णधार स्मिथने कबुली दिल्यानंतर ऑस्ट्रेलियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एरवी खेळाडूंच्या चुका सांभाळून घेत, त्यांच्या आक्रमकतेला व स्लेजिंगला छुपा पाठिंबा देणाऱ्या ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’लाही सावरण्यासाठी धडपड करावी लागली. क्रिकेटपटूंच्या अखिलाडूवृत्तीमुळे देशाची नाचक्की झाली व त्यामुळे देशाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल कमालीचे चिडले. ‘धक्कादायक निराशा’ या शब्दांत नाराजी व्यक्त करून त्यांनी या प्रकरणी कडक पावले उचलण्याचे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला बजावले. ते स्वतः ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे’ प्रमुख डेव्हिड पीव्हर यांच्याशी बोलले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ऐन तोंडावर असताना त्यांच्या क्रिकेटपटूंनी क्रीडा संस्कृतीस काळिमा फासला होता. ऑस्ट्रेलिया सरकारने स्मिथला कर्णधारपदावरून पदच्युत करण्याची मागणी केली. तेथील क्रीडा मंडळानेही कठोर भूमिका घेतली. चाहते तर कमालीचे दुखावले. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाबाबत, त्यांच्या खेळाडूंच्या कामगिरीबाबत कमालीचे अभिमानी असलेल्या कट्टर चाहत्यांच्या माना स्मिथ, वॉर्नर आणि बॅंक्रॉफ्टच्या अखिलाडू कृत्यामुळे झुकल्या. ऑस्ट्रेलियातील जनतेच्या भावनांचा आदर करत लगेच प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने दिले. चौकशी समितीचे प्रमुख इयान रॉय यांनी तातडीने चौकशीची चक्रे फिरविली. संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड त्वरित जोहान्सबर्गला रवाना झाले. चौकशी वेगात पूर्ण झाली आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने बदनाम त्रिकुटावरील कारवाई जाहीर केली. या वेगवान घडामोडींमुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने प्रतिमा स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत सदरलॅंड यांचा पडलेला चेहरा परिस्थितीचे गांभीर्य आणि नाचक्की कथन करत होता. 

पायावर कुऱ्हाड... 
चेंडू कुरतडण्याचा कट शिजवून आणि त्यात सहभागी होऊन स्मिथ व वॉर्नर यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतलेली आहे. क्रिकेटमधील वर्षभराच्या निलंबनाबरोबरच आर्थिक बाबतीतही त्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर स्मिथ व वॉर्नर भारतातील ‘आयपीएल’ स्पर्धेत सहभागी होणार होते. स्मिथ राजस्थान रॉयल्स, तर वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. त्यांच्यासाठी संबंधित फ्रॅंचाईजींनी प्रत्येकी १२ कोटी रुपये मोजले होते. केप टाऊन येथील कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार व उपकर्णधाराच्या अंगात सैतान संचारला, परिणामी त्यांच्यावर ‘लक्ष्मी’ रुसली. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने आपल्या खेळाडूंवर कठोर कारवाई केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडक निर्णय घेत, या दोघाही कलंकित खेळाडूंवर ‘आयपीएल’मध्ये बंदी घातली. हा निर्णय योग्यच आहे. राजस्थानच्या संघाचा कर्णधार म्हणून भारताच्या अजिंक्‍य रहाणेला नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी लाभेल, तर हैदराबादने न्यूझीलंडच्या केन विल्यम्सन याला कर्णधारपदी नियुक्त केले. चेंडू कुरतडण्याच्या शापित नाट्यामुळे स्मिथ याला अंदाजे ४३ कोटी रुपये, तर वॉर्नरला अंदाजे ४१ कोटी रुपये नुकसान होण्याचे संकेत आहेत. त्यांच्या बंदीच्या कालावधीत ऑस्ट्रेलिया बारा महिन्यांत १३ कसोटी, २४ एकदिवसीय व २० टी-२० क्रिकेट सामने खेळणार आहे. याशिवाय आयपीएल, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, तसेच इंग्लंडमधील व्यावसायिक टी-२० या प्रमुख क्रिकेट स्पर्धांस त्यांना मुकावे लागेल. या साऱ्या स्पर्धा आणि सामन्यांतील मानधनाचा विचार करता, अनैतिकतेची कास धरत या अनुभवी क्रिकेटपटूंनी आत्मघात ओढवून घेतला आहे. 

प्रायोजकांचीही पाठ 
बंदी कालावधी संपविल्यानंतर स्मिथ २९, तर वॉर्नर ३२ वर्षांचा होईल. तुल्यबळ क्रिकेट मैदानापासून दूर राहिल्यामुळे निलंबनाच्या कालावधीत त्यांच्या फलंदाजी फॉर्मवर परिणाम होण्याची भीती आहे, तसेच संघातील जागा पुन्हा मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागेल. ते पुन्हा जोमदार खेळ करू शकतील का, हा प्रश्‍न आहेच. बंदीनंतर काही क्रिकेटपटूंनी पुनरागमन केलेले आहे, पण त्यांचा दरारा पूर्वीप्रमाणे दिसलेला नाही. तुलनेत बॅंक्रॉफ्टचे आर्थिक बाबतीत फार नुकसान होणार नाही, पण या नवोदित खेळाडूला पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याबाबत साशंकता आहे. हा २५ वर्षीय सलामीवीर कसोटी पदार्पणानंतर चार महिन्यांत मोठा पराक्रम बजावू शकला नव्हता. त्यामुळेच त्याची जागा घेणाऱ्या फलंदाजाने सलामीचे स्थान बळकट केल्यास बॅंक्रॉफ्टची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अकाली कोमेजेल. पुनरागमन करणे खडतर असेल ही बाब स्वतः बॅंक्रॉफ्टने कबूल केलेली आहे. स्मिथ व वॉर्नर यांच्याकडे आता प्रायोजकही पाठ फिरवतील हे निश्‍चित आहे. बंदी संपविल्यानंतर भविष्यातही त्यांना पुरस्कर्ते मिळतील का, हा प्रश्‍न आहे. कारण कलंकितांना ‘सदिच्छा दूत’ बनविले, तर त्या कंपनीचाही दर्जा आणि विश्‍वासार्हता घसरेल. ‘एलजी’ कंपनीने सर्वप्रथम पाऊल उचलले. त्यांनी वॉर्नरबरोबरचा करार न वाढविण्याचे ठरविले आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने आपल्या खेळाडूंवर तातडीने कारवाई केली नसती, तर त्यांच्यावरही प्रायोजकांचा कोप झाला असता. नुकसान ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला अजिबात परवडणारे नाही. त्यामुळेच त्यांनी झटपट कारवाईचे अस्त्र उगारत प्रायोजक संघटनेपासून दूर जाणार नाहीत याची दक्षता घेतली. 

सभ्य खेळास काळिमा 
स्मिथ, वॉर्नर व बॅंक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करताना, ‘आम्ही या तिघांवर सभ्य खेळास काळिमा फासल्याबद्दल शिक्षा ठोठावली आहे. खेळापेक्षा कोणीही मोठा नाही, हा संदेश द्यायचा आहे,’ असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड म्हणाले. त्यांचे म्हणणे बरोबरच आहे. मागील काही वर्षांत क्रिकेटमध्ये मागील दाराने कितीतरी कुप्रवृत्तीने शिरकाव केलेला असला, तरी हा खेळ अजून ‘सभ्य’ मानला जातो. त्याला ऑस्ट्रेलियन कलंकित त्रिकुटाने छेद केला आहे. आताच कुठे क्रिकेट शिकणाऱ्या मुलांपर्यंत चुकीचा संदेश गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपूर्वी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया झटपट केली. त्यामुळे ‘गुन्हेगारां’ना माफी नाही हा इशारा देत ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने तडा गेलेल्या प्रतिमेची डागडुजी करण्यास प्राधान्य दिले. ‘सभ्य’ लोकांच्या खेळात घाण नको ही साऱ्यांचीच भावना आहे. ‘मॅच फिक्‍सिंग’मुळे क्रिकेटचे अतोनात नुकसान झाले, तरीही हा खेळ डगमगला नाही. चाहत्यांचे उदंड प्रेम कायम राहिले. ‘मॅच फिक्‍सिंग’ची कीड वेळीच ठेचण्यासाठी ‘आयसीसी’ अतिशय जागरूक असते. आता ‘बॉल टॅंपरिंग’बाबतही ‘आयसीसी’ला दक्ष राहावे लागेल. खेळात हार-जीत असतेच, पण मैदानावरील निकाल खिलाडूवृत्तीने स्वीकारण्यास शिकले पाहिजे. स्मिथ व वॉर्नर यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सात-आठ वर्षांची; त्यामुळे ते नवखे अजिबात नाहीत. अवघे आठ कसोटी सामने खेळलेल्या नवोदित बॅंक्रॉफ्टला हाताशी धरून त्यांनी कट रचला आणि तो प्रत्यक्षात आणण्याचे ‘पाप’ही केले. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज यश मिळवत आहेत, तर आपले वेगवान गोलंदाज का कमी पडत आहेत याचा पाठपुरावा करून त्यावर तोडगा काढण्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार व उपकर्णधाराने घाणेरडा ‘शॉर्टकट’ अवलंबिला. रिव्हर्स स्विंगसाठी पाकिस्तानी गोलंदाज चेंडू कुरतडतात हा आरोप त्यांच्यावर वारंवार झालेला आहे, पण ते कधी पकडले गेले नाहीत. रिव्हर्स स्विंग ही एक कला आहे हे पाकिस्तानी गोलंदाजांचे म्हणणे, तसेच आता इतर देशांतील गोलंदाजही रिव्हर्स स्विंग शिकले आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाच्या ताज्या कटू प्रकारामुळे गोलंदाजीच्या या कौशल्याबाबत संशय कायम आहे. 

माफीचा काय फायदा? 
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या कारवाईनंतर मायदेशी परतलेला स्टीव स्मिथ सिडनी येथील पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला. आधार देण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवून वडील पीटर उभे होते, पण कलंकित माजी कर्णधार भावना आवरू शकला नाही. ‘इतरांना धडा ठरावा,’ असे माफीनामा सादर करताना तो म्हणाला. या पश्‍चात्तापाचा काय फायदा? ‘भ्रमिष्ट’ झालेल्या वॉर्नरच्या धोकादायक योजनेला वेळीच रोखले असते, तर स्मिथवर रडण्याची वेळ आली नसती. दुसरी बाब म्हणजे, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने दोषमुक्त केलेल्या प्रशिक्षक डॅरेन लिहमन यांची सदसद्विवेकबुद्धी बऱ्याच उशिरा जागी झाली. दोषी नसल्याचे प्रमाणपत्र मिळताच त्यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. कलंकित त्रिकुटाच्या गुन्ह्यास प्रारंभीच्या काळात लिहमन यांची मूक संमती होती असाच याचा अर्थ होतो. त्यांना ‘क्‍लीन चीट’ मिळाली, पण ते स्वतःला माफ करू शकले नाहीत हे राजीनाम्याने स्पष्ट केले आहे. चेंडू कुतरडण्याचा गुन्हा करणारा बॅंक्रॉफ्ट खोटे बोलला. त्याला वाटले, अपराध पचणार, पण खेळाडूंच्या मैदानावरील अखिलाडूवृत्तीला ठेच लागलीच. सुरवातीच्या पत्रकार परिषदेत बॅंक्रॉफ्टने आपण पिवळ्या रंगाच्या चिकटपट्टीचा वापर केल्याचे सांगितले, प्रत्यक्षात ती वस्तू म्हणजे सॅंडपेपरचा तुकडा होता. खोटारडे आणि क्रिकेटचे गुन्हेगार ठरलेले स्मिथ, वॉर्नर, बॅंक्रॉफ्ट हे नवोदितांसाठी, लहान मुलांसाठी ‘रोलमॉडेल’ निश्‍चितच नाहीत. 

घटनाक्रम.. 

 • तारीख २४ मार्च ः तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंतच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व. उपाहारानंतरच्या खेळात रिव्हर्स स्विंगच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टकडून पॅंटच्या खिशातून पिवळी वस्तू काढून चेंडूवर घासण्याचा प्रयत्न. थेट प्रक्षेपणाच्या वेळी कॅमेऱ्यांकडून ही कृती टिपली गेली. पिवळी वस्तू ‘सॅंडपेपर’ असल्याचे स्पष्ट. दिवसअखेर पत्रकार परिषदेत चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न झाल्याचे कर्णधार स्टीव स्मिथकडून मान्य. संघाच्या नेतृत्वाची सूत्रे असलेल्या गटातून हा मुद्दाम डाव रचल्याची कबुली. 
 • तारीख २५ मार्च ः खेळाच्या कालावधीत खेळ भावनेस तडा दिल्याचे कृत्य केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) स्मिथवर कारवाई. आचारसंहितेच्या नियम २.२.१ अनुसार दोषी मानूम स्मिथला शंभर टक्के आर्थिक दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित. चेंडूवर पिवळी वस्तू घासण्याचा प्रयत्न करणाऱ्या बॅंक्रॉफ्टला ताकीद देऊन सोडण्यात आले. त्याला ७५ टक्के आर्थिक दंड. सामन्यातील उर्वरित कालावधीसाठी यष्टिरक्षक टिम पेन याच्याकडे नेतृत्व. दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ३२२ धावांनी दणदणीत विजय. 
 • तारीख २६ मार्च ः राजस्थान रॉयल्सचे कर्णधार स्टीव स्मिथने सोडले. 
 • तारीख २७ मार्च ः ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व चेंडूच्या स्वरुपाशी छेडछाड करणारा बॅंक्रॉफ्ट या तिघांना दोषी ठरविले. 
 • तारीख २८ मार्च ः ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून तिघाही कलंकित क्रिकेटपटूंवरील शिक्षा जाहीर. त्यानुसार, स्मिथ व वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची, तर बॅंक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी. वॉर्नरवर कर्णधारपदाची आजीवन बंदी, तर स्मिथ व बॅंक्रॉफ्ट यांचा कर्णधारपदासाठी दोन वर्षे विचार नाही. ‘बीसीसीआय’कडून स्मिथ व वॉर्नर यांना आयपीएल स्पर्धेचे दरवाजे बंद. 
 • तारीख २९ मार्च ः ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर सिडनी येथे स्मिथचा माफीनामा, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीनंतर प्रशिक्षकपद सोडण्याचा डॅरेन लिहमन यांचा निर्णय. 

वादग्रस्त ठरलेली मालिका 

 • डर्बन येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ११८ धावांनी विजय, त्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर व दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक यांच्यात खडाजंगी. 
 • पोर्ट एलिझाबेथ येथील दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्‌स राखून विजय व मालिकेत बरोबरी. 
 • दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथला पायचीत बाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज काजिसो रबाडा याची फलंदाजास खांद्याने धडक. 
 • याच कसोटीत वॉर्नरला बाद केल्यानंतर ‘परत जा’ या हावभावात रबाडाकडून ‘सेंडऑफ.’ 
 • वरील दोन्ही अखिलाडू कृतींमुळे रबाडावर सामनाधिकाऱ्यांची कारवाई. त्या विरोधात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने दाद मागितली. नंतर केप टाऊनमधील तिसऱ्या कसोटीत खेळण्याची परवानगी मिळाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘बॉल टॅंपरिंग’च्या काही घटना 

 • जानेवारी १९७७ ः भारत दौऱ्यात चेन्नई कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन लिव्हर याने चेंडूवर व्हॅसलिनचा वापर केल्यामुळे ‘बॉल टॅंपरिंग’चा आरोप, पण इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाची गोलंदाजांवर कारवाई नाही. 
 • जुलै १९९४ ः लॉर्डस येथील कसोटीत मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या मायकेल अथरटनने पॅंटच्या खिशातून माती काढून चेंडूवर घासली. सामना मोबदल्यापैकी पन्नास टक्के रक्कम कापण्याची शिक्षा. 
 • नोव्हेंबर २००१ ः पोर्ट एलिझाबेथ येथे भारताच्या सचिन तेंडुलकरवर कारवाई. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पंचांच्या परवानगीशिवाय चेंडूशी छेडछाड केल्याचा ठपका. निषेधानंतर एका सामन्याची बंदी शिथिल. 
 • जानेवारी २००४ ः ब्रिस्बेन येथे झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या राहुल द्रविडने चेंडू चकाकीसाठी सर्दीची गोळी घासल्याचे थेट प्रक्षेपणाद्वारे दिसले. त्याबद्दल द्रविडला पन्नास टक्के मानधन कपातीची शिक्षा. 
 • ऑगस्ट २००६ ः ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पाकिस्तानने चेंडू कुरतडल्याच्या ठपका ठेवत पंचांनी चेंडू बदलला व पाकिस्तानला पाच धावांचा दंड केला. यामुळे चवताळलेल्या पाकने सामनाच सोडून दिला. 
 • जानेवारी २०१० ः पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने दाताने चेंडू कुरतडला. थेट प्रक्षेपणात ही कृती स्पष्टपणे दिसली. आफ्रिदीवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी.
 • ऑक्‍टोबर २०१३ ः दुबई येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फाफ दू प्लेसिस याने पॅंटच्या खिशावर असलेल्या ‘झिपर’जवळ चेंडू जोराने घासला. त्याबद्दल दू प्लेसिस याला मानधनातील पन्नास टक्के रकमेचा दंड व दक्षिण आफ्रिकेस पाच धावांची पेनल्टी.
 • नोव्हेंबर २०१६ ः होबार्ट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ दू प्लेसिस याने तोंडात चघळण्याची गोळी असताना लाळ चेंडूला लावली. आपण अपराध केलेला नाही हे प्लेसिस याचे म्हणणे, पण दोषी मानून त्याचे सामन्याचे संपूर्ण मानधन कापून घेण्यात आले.

फोटो फीचर

संबंधित बातम्या