ढवळगड-एक अभ्यास

ओंकार ओक 
गुरुवार, 24 मे 2018

कव्हर स्टोरी
'ढवळगड' हे ठिकाण स्थानिकांना परििचत असले, तरी 'किल्ला' म्हणून या जागेचे अवशेष व वास्तू याची नोंद कुठे नव्हती. यामुळे या गडाच्या अभ्यासाला वाव होता. या किल्ल्याच्या शास्त्रशुद्ध व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासामुुळे या किल्ल्यावर दुर्गप्रेमींचा राबता पुन्हा सुरू होईल...

महाराष्ट्राचं दुर्गवैभव ही खरी महाराष्ट्राची संपत्ती. सह्याद्रीच्या तालेवार रांगेवर,समुद्राच्या खळाळत्या लाटांच्या मधोमध उभ्या असणाऱ्या बेटांवर, मुलायम रुपेरी वाळूच्या मखमली किनाऱ्यावर आणि भुईकोट म्हणून आज आपले अविस्मरणीय अस्तित्व दाखवणा-या अनेक गडकिल्ल्यांनी महाराष्ट्र सजला आहे. यातले काही किल्ले आज ट्रेकर्सचं, अभ्यासकांचं आणि दुर्गप्रेमी मित्राचं आकर्षण ठरले आहेत तर काही किल्ले मात्र खऱ्या अर्थाने उपेक्षित आणि अजूनही ट्रेकर्सच्या नकाशावर येण्याची आस लावून बसलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातला "ढवळगड' हा किल्ला अशाच काही किल्ल्यांपैकी एक. दुर्गप्रेमी व गिर्यारोहक यांच्यासाठी किल्ला म्हणून अपरिचित असलेला इतकंच नाही तर सरकारी गॅझेटियर मध्येही हजेरी नसलेला हा किल्ला तसा ट्रेकर्सच्या दृष्टीने दुर्लक्षितच. कित्येक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका संदर्भाशी त्याची नाळ जोडली आहे. एका अवचित घडलेल्या भटकंती दरम्यान या किल्ल्याला भेट देण्याचा योग आला, कुठेतरी याबाबत अधिक सखोल अभ्यास करून हा किल्ला ट्रेकर्सच्या नकाशावर आणणे गरजेचे आहे हे जाणवलं आणि ऐतिहासिक अस्सल संदर्भग्रंथाच्या आधारावर उभा राहिला एक अभ्यास आणि या किल्ल्याला नव्याने संजीवनी मिळवून देण्याची निश्‍चिती! 

कुठे आहे हा ढवळगड 
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्‍यात आंबळे नावाचं एक टुमदार गाव आहे. पेशवाईतले रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकारांमुळे या गावाला एक मानाचं पान लाभलंय. आंबळे गावातच दरेकारांचा विशाल वाडा आहे त्यामुळे या गावाला एक छान ओळख आहे. याच गावच्या पाठीमागे उभा राहिला आहे ढवळगड. 

पुण्याहून ढवळगडाला जाण्यासाठी सासवड वनपुरी - सिंगापूर - पारगाव चौफुला - वाघापूर -आंबळे असा रस्ता आहे. हे अंतर साधारणपणे १८ ते २० किलोमीटर्सचं आहे. आंबळे गावातून कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्यावर गेला आहे. गडाचा दुसरा मार्ग उरुळीकांचन गावातून असून तिथून जवळच असणारं "डाळिंब' हे गाव ढवळगडाच्या पलीकडच्या पायथ्याला आहे.

तासाभराचा खडा चढ चढलं, की ढवळगडाचा माथा गाठता येतो. ढवळगडावर ढवळेश्वराचं जुनं शिवालय असून ते शिवालय तसंच ढवळगड किल्ला स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक भाविक तसेच आजूबाजूच्या गावातील भक्त गडावर जात असल्याने, ढवळेश्वर महादेव व ढवळगड हे तिथे स्थानिकांना अपरिचित नाहीत. 

ढवळगडाचे उल्लेख 
ढवळगडाचा सर्वांत पहिला उल्लेख येतो तो ज्येष्ठ इतिहास अभ्यासक कृ.वा पुरंदरे यांच्या "किल्ले पुरंदर' पुस्तकामध्ये. १९४० मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक पुरंदरे दफ्तर तसेच पेशवे दफ्तर यांच्यातील अस्सल साधनांचा आधार घेऊन लिहिलेले असल्याने हे पुरंदर परिसरासाठी प्राथमिक संदर्भ मानले जाते. पुस्तकाच्या पान नंबर ३ वर भुलेश्वर डोंगररांगेचे वर्णन करताना पुरंदरे यांनी मल्हारगड,भुलेश्वर ऊर्फ दौलतमंगळ व ढवळगडाचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद केले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती' या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो. अगदी अलीकडच्या काळात शिवाजीराव एक्के यांच्या "पुरंदर परिसर व "पुरंदरचे धुरंधर' या पुस्तकात ढवळगडाचे नाव आढळून आले आहे. "पुरंदरचे धुरंधर' या पुस्तकात ढवळगडाचा फोटोही एक्के सरांनी दिला आहे. पण या किल्ल्याच्या अवशेषांचे वर्णन फारसे नसल्याने हा किल्ला प्रकाशझोतापासून लांबच होता. तसेच या पुस्तकांमध्ये ढवळगडाचा उल्लेख आल्याने व स्थानिक जनतेला किल्ला आधीपासूनच माहीत असल्याने किल्ला आधीपासूनच अस्तित्वात होता. फक्त त्यावर सखोल अभ्यास करून व त्याच्या अवशेषांचे पुरातत्वीय दृष्ट्या विश्‍लेषण करून ढवळगड हा समस्त दुर्गप्रेमी मित्रांपर्यंत पोहचवण्याचं काम करणं बाकी होतं. 

साधारण फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा. ऊन नुकतंच तापायला सुरवात झालेली. सासवडचा हा परिसर लांडग्यांचे कळप व माळरानावरील पक्षी यांच्यामुळे वन्यजीव अभ्यासकांसाठी अगदी सुप्रसिद्ध. एका शनिवारी एका वन्यजीव अभ्यासक मित्राने फोन करून आपल्याला त्या परिसरात फोटोग्राफीसाठी जायचं आहे ही वर्दी दिल्यावर काहीतरी नवीन करायचं म्हणून मीही त्याला होकार दिला. पुण्यातून आम्ही निघालो. सासवडमार्गे वनपुरी गावाच्या पुढे आल्यावर चिंकारा व गरुडाचे फोटो काढण्यात मग्न झालेल्या वन्यजीव अभ्यासक मित्रांना मात्र हलवून जागं करावं लागलं. उजाड माळरान असूनही तिथली जैववैविध्यता मात्र जबरदस्तच आहे. पारगाव चौफुला या गावावरून आंबळे गावाच्या दिशेने जाऊ लागल्यावर अचानक एका डोंगराने माझं लक्ष वेधून घेतलं. उंचीला फार नसला तरी त्या डोंगरावर लांबून काहीतरी बांधकाम असल्याचं दिसत होतं. एक गिर्यारोहक असल्याने साहजिकच माझी उत्सुकता चाळवली गेली. जसजसं आम्ही जवळ जात होतो तसतसं ती तटबंदीची भिंत अधिकच जवळ येऊ लागली. या दरम्यानच्या काळात बरोबरच्या वन्यजीव अभ्यासकांची फोटोग्राफीची हौस उन्हामुळे भागल्याने मी त्यांना त्या डोंगरावर नक्की काय आहे ते बघायला जाऊ असा आग्रह केला आणि जातानाच एका पाटीने माझं लक्ष वेधले "श्री क्षेत्र ढवळेश्वर मंदिर'. काहीतरी आठवून मन एकदम ७-८ वर्ष मागे गेलं. वाचलेले संदर्भ आठवू लागले व नक्की या डोंगरावर काहीतरी सापडेल ही खात्री पटली. सुट्ट्या खडीचा कच्चा रस्ता वरवर जात होता. हा खडीचा रस्ता जिथे संपत होता त्याच्या अलीकडच्या वळणावर एका गोष्टीमुळे गाडीला करकचून ब्रेक लागले. रस्त्याच्या डावीकडे चुन्याच्या घाण्याचं मध्यम आकाराचं खळं व त्याशेजारी भग्नावस्थेतलं एक बांधकाम स्पष्टपणे दिसत होतं. किल्ल्याच्या मध्यावर एक चौकीपहाऱ्याची जागा असते. किल्ल्यांच्या भाषेत तिला "मेटं' असं म्हटलं जातं. अगदी आपल्या पुण्याच्या सिंहगडालाही अनेक मेटे असल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. त्यामुळे आपण संदर्भग्रंथामध्ये वाचलेला "ढवळगड' हाच आहे, की काय हा प्रश्न खात्रीत  बदलत चालला होता. पुढे गेल्याच्या नंतर एका व्यवस्थित बांधलेल्या चौथऱ्यावर एक हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला त्या पाषाणावर दोन्ही बाजूंनी मूर्ती कोरली आहे. 

ढवळेश्वर महादेवाला जाण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी काही पायऱ्या रचल्याने वाट अगदी सोपी आहे. गडाची तटबंदी उजवीकडे ठेवत गेल्यावर समोर आलं ते एका छोट्या घुमटीत असलेलं गणपतीचं देऊळ. गणपतीची मूर्ती मात्र निश्‍चितच जुन्या काळातली आहे हे बघूनच कळत होतं. या मंदिरापासून वाट उजवीकडे वळाली आणि समोर आला तो ढवळगडाचा भग्न दरवाजा! 

ढवळगडाचा हा दरवाजा म्हणजे त्याचं गडपण असल्याचं प्रतीकच! गडाच्या दरवाजाची उजवीकडची कमान मात्र तग धरून असली तरी डावीकडची कमान मात्र पूर्ण ढासळली आहे. दरवाजाच्या अगदी समोर गडाचा माचीसादृश भाग असून तिथे मात्र कोणतेही अवशेष नाहीत. ढवळगडाच्या दरवाजाच्या पायऱ्या मात्र शाबूत आहेत. दरवाजाला बिजागारीच्या जागा असून त्याची देवडी (पहारेकऱ्याची खोली) मात्र आज कुणाचंतरी घर बनली आहे. कदाचित गडावरच्या ढवळेश्वर मंदिराचा पुजारी इथे राहात असावा. या दरवाजातून पुढे गेलो, की एक बुजलेले पाण्याचे टाके दिसले ज्याची नजीकच्या काळामध्ये डागडुजी केलेली आढळली. गडावरील आद्यस्थान म्हणजे ढवळेश्वर महादेवाचे मंदिर. 

मंदिराला सभामंडप असून आतल्या गाभाऱ्यात मात्र एक निराळीच प्रसन्नता आहे. मंदिराला गोमुखही असून त्यावरील नंदी सुस्थितीत आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचीही डागडुजी स्थानिक ग्रामस्थांनी केली व महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो. मंदिराच्या बरोबर समोर पाण्याचे खांबटाके असून त्याचीही डागडुजी केल्याचे दिसून आले. टाक्‍याच्या समोरच तटबंदीचे अगदी भग्न झालेले अवशेष असून आम्ही बारकाईने पाहिल्यावर ते लक्षात आले. 

ढवळेश्वर मंदिराचा परिसर फार मोठा नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला तुळशीवृंदावन असून त्याला लागूनच आणखी एक छोटी घुमटी व त्यापुढे नंदी आढळून आला. पण गडाच्या घेऱ्यामध्ये अजून काही अवशेष सापडत आहेत का? हे बघणं गरजेचं होतं. गडाच्या पलीकडच्या बाजूने चढणारा म्हणजेच डाळिंब गावातून वर येणारी वाट मात्र वेळेअभावी सोडावी लागणार होती. आम्ही ढवळेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने गडाच्या घेऱ्याला फेरा मारायला सुरवात केली. या भागात बऱ्यापैकी घसारा असल्याने घसरत जाणारी पावलं सांभाळताना तीच पावलं एका ठिकाणी अडखळली कारण समोर पाण्याचं एक खोदीव टाकं आलं होतं! साधारणपणे दहा फूट खोलीचं ते टाकं मात्र कोरडंच होतं. इथून समोर पाहिल्यावर शिंदवणे गावाचा बोरघाट दिसला आणि पुरंदरे आणि एक्के सर यांच्या पुस्तकात नमूद केलेलं ढवळगडाचं स्थान हेच आहे याची खात्री पटली. ढवळगडाचा संपूर्ण घेरा फिरून झाला होता. तरी एक प्रश्न अनुत्तरीतच होता...की इतके सगळे गडाचं गडपण सिद्ध करणारे अवशेष असूनही हा गड अपरिचित का राहिला? पुण्याकडे गाडी निघाली तेव्हा हा प्रश्न मात्र स्वस्थ बसू देईना. 

पुण्यात आल्यावर मी इतिहास अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांची भेट घेऊन हा सगळा वृत्तांत त्याच्या कानावर घातला. ढवळगडाचा पुरातत्वीयदृष्ट्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मागोवा घेण्यासाठी व त्याच्यावर नव्याने प्रकाश टाकण्यासाठी ढवळगडाची आणखी एक भेट घडणं गरजेचंच होतं. मी काढलेले गडाचे फोटो बघून हे नक्की होतं की या गडावर अजून संशोधन करून व त्याच्या  वास्तूंचा अभ्यास करून विस्मृतीत गेलेल्या या किल्ल्याच्या वास्तूंची स्थाननिश्‍चिती करणे गरजेचे आहे. ढवळगडाच्या सर्व वास्तू दाखवणारा नकाशा कुठेही उपलब्ध नव्हता. तसेच पुरंदरे यांच्या पुस्तकात आणि एक्के सरांच्या पुस्तकात किल्ल्याचा फक्त उल्लेख आलेला होता पण आजवर कोणत्याही पुस्तकात किंवा संदर्भग्रंथांमध्ये गडावरच्या अवशेषांचं समग्र वर्णन न आल्याने आमच्या अभ्यासाला भरपूर वाव होता. एक मात्र नक्की होतं, की माझ्या भेटीदरम्यान स्थानिकांना परिचित असलेला असा ढवळगड काही नव्याने समोर आलं नव्हता. तो आधीपासून तिथेच होता त्यामुळे मी गड "शोधलेला' नव्हता. 

त्याच्या अवशेषांची रचना, स्थापत्य इत्यादींचा अभ्यास करून ढवळगड प्रकाशात आणण्याची नितांत गरज होती जेणेकरून दुर्गप्रेमींना ढवळगडाकडे बघताना एक अभ्यासपूर्ण दृष्टिकोन देता येईल. थोडक्‍यात जे समोर होतं तेच आम्ही अभ्यासपूर्वक मांडून त्यावर नव्याने प्रकाश टाकणार होतो. महाराष्ट्रात अनेक अशी देवस्थाने आहेत ज्यांच्याभोवती तटबंदी असल्याने त्यांचा उल्लेख "गड' असा केला जातो. उदाहरणार्थ जेजुरीगड, कानिफनाथगड, सप्तशृंगगड, साताऱ्याजवळील साखरगड इत्यादी. पण ही सगळी तटबंदीयुक्त देवस्थाने असून त्यांना "किल्ला' किंवा "दुर्ग' याची परिमाणे लागू होत नाहीत. आणि म्हणूनच आज त्यांना धार्मिक महत्त्व आहे. ढवळगडाच्या बाबतीत मात्र तसं नव्हतं. ढवळगडाची तटबंदी, मेटाच्या जागा, चुन्याच्या घाण्याचे अवशेष, दरवाजाची कमान, देवडी, पाण्याची खोदीव टाकी इत्यादी किल्ल्याला लागू होणारी सर्व परिमाणे उपस्थित होती. त्यामुळे ढवळगड हा एक फक्त देवाचा गड नसून तो "किल्ला' किंवा "दुर्ग' यांच्या व्याख्येत बसणारा व लष्करी महत्त्व असणारा गड आहे हे सिद्ध होत होते. किंबहुना पुरंदरे यांच्या पुस्तकात त्याचा "किल्ला' म्हणूनच उल्लेख आहे. आम्हाला फक्त हे सगळे निकष व्यवस्थित अभ्यासून त्यावर प्रकाश टाकायचा होता व ट्रेकर्सच्या नकाशावर या गडाची नोंद करायची होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आम्ही पुण्यातून निघालो आणि पुन्हा सासवड ते आंबळे हा प्रवास पार पाडून ढवळगडावर कच्च्या रस्त्याने पोहोचलो. 

गडाच्या वास्तूंची मोजमापे घेणे व त्यांचे स्थान नकाशावर निश्‍चित करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम होते. जेणेकरून हे सर्व कार्य सादर केल्यानंतर दुर्गप्रेमींना गडावरच्या वास्तूंना भेट देणे सोपे जावे. आंबळे गावाकडच्या मेटाची जागा, चुन्याच्या घाण्याचे अवशेष इत्यादी अवशेषांची मोजमापे घेतली. तसेच मधल्या हनुमान व मारुती यांच्या मूर्तींची नोंद आमच्या वहीत झाली. गडाची तटबंदी दगडातील असून प्रवेशद्वाराकडील बुरुजाची दुरुस्ती होऊन त्याच्यावर विटांचे काम झाले आहे. पेशवे काळामध्ये अशा प्रकारच्या विटा वापरल्या गेल्याने गडाचे काम कदाचित पेशवे काळात झाले असावे असा एक अंदाज होता. पुढे डाळिंब गावाकडील वाटेवर काही अवशेष सापडतात का? हे बघण्यासाठी त्या वाटेवर साधारणपणे २०० मीटर उतरून गेल्यावर झाडीमध्ये पत्र्याच्या शेडखाली पगडी घातलेली गणपतीची सुरेख मूर्ती व त्यासमोर एक शिवलिंग ठेवलेले दिसले. 

कदाचित डाळिंब भागातील गावकऱ्यांनी या मंदिराची थोडीफार डागडुजी केली असावी. मंदिरासमोर भलेमोठे पाण्याचे टाके असून त्याचीही जुजबी दुरुस्ती केल्याच्या खुणा आढळून आल्या. मंदिराचा परिसर व तिथले पाण्याचे टाके बघता जसं आंबळे बाजूला मेटं आहे तसंच हे डाळिंब गावाच्या बाजूकडील मेटं असल्याचे दिसून येत होते. ढवळगडाच्या अवशेषांमध्ये आणखी अवशेषांची नोंद झाली होती. हे सगळं जवळच्या नकाशावर रेखाटून पुन्हा चढ चढून वर आलो. ढवळेश्वर मंदिराच्या मागे असणारी घुमटी ही गडाच्या तटातली एक खोली असावी. कारण गडाच्या तटबंदीमध्ये अनेक किल्ल्यावर खोल्या आढळून येतात त्याच पद्धतीची ही रचना आहे. संपूर्ण किल्ल्याच्या अवशेषांची शास्त्रशुद्ध मोजमापे घेऊन तसेच तिथे आढळलेले खापरांचे तुकडे पुढच्या अभ्यासासाठी सोबत घेऊन आम्ही निघालो. उतरताना गडाच्या डाळिंब बाजूकडील पाण्याच्या टाक्‍याचीही नोंद केली आणि गडावरच एक अंतिम नकाशा रेखाटून गड उतरायला सुरवात केली. आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचं होतं ते म्हणजे आंबळे गावातील ग्रामस्थांशी होणारी चर्चा. दरेकरांच्या वाड्याजवळ आम्ही पोचलो तेव्हा ग्रामस्थ तिथल्या प्राचीन भैरवनाथ देवस्थानातून नुकतेच बाहेर पडत होते. ग्रामस्थांना ढवळगड माहीत होता पण त्यावर आमच्या आधी कोणी असा अभ्यास केला आहे का किंवा किल्ला म्हणून त्याचा काय इतिहास ग्रामस्थांमध्ये प्रसिद्ध आहे याची माहिती नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना हा किल्ला आधीपासूनच माहिती असल्याने आम्ही किल्ला नव्याने शोधलेला नसून त्याच्यावर आमच्या अभ्यासाद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रकाश टाकणे व त्याची नव्याने ओळख दुर्गप्रेमींना करून देणे गरजेचे होते हेही लक्षात आलं. 

पुण्यात आल्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या इतिहास अभ्यासकांच्या व्यासपीठावर हा अभ्यास मांडून त्याद्वारे विस्मृतीत गेलेला हा किल्ला ट्रेकर्सच्या नकाशावर आणणे हे आमच्या  अभ्यासाला आणखी बळकटी देणारे महत्त्वाचे कार्य बाकी होते. किंबहुना आमच्या मोहिमेतला तो एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. ढवळगडाच्या दुसऱ्या भेटीवरून आल्यावर सुमारे दोन महिने यावर अभ्यास करून व आपण ठरवलेले सगळे निष्कर्ष पडताळून त्याची आमच्या एका मित्राकरवी रेखाटने बनवून घेण्याच्या प्रक्रियेला आम्ही लागलो. कृ.वा. पुरंदरे तसेच शिवाजीराव एक्के सरांनी उल्लेख केलेला ढवळगड आज आपण सविस्तररीत्या मांडणार आहोत याचा एक अभिमान होताच. या विषयाचे एक सविस्तर सादरीकरण "भारत इतिहास संशोधक मंडळ' येथे दिनांक १९ मे २०१८ रोजी मी व डॉ. सचिन जोशींनी एक पाक्षिक सभा घेऊन उपस्थित अभ्यासकांसमोर मांडले. आनंदाची गोष्ट म्हणजे या पाक्षिक सभेस स्वतः शिवाजीराव एक्के सर उपस्थित असल्याने आमचाही आनंद द्विगुणित झाला. स्वतः एक्के सरांनीही आमच्या अभ्यासास सकारात्मक दाद दिल्याने व त्यांच्या पुस्तकात उल्लेख असलेला ढवळगड विस्ताराने अभ्यास करून मांडल्यामुळे आमच्या पाठीवर कौतुकाची थापच पडली. 

आमचे ढवळगड संबंधित कार्य नक्की काय आहे? मी वर दिल्याप्रमाणे दोन्ही पुस्तकांमध्ये ढवळगडाचा स्पष्ट उल्लेख आहे. एखादा किल्ला 'शोधला' असं आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा तो पूर्णतः अगदी स्थानिकांनाही अनभिज्ञ असतो. ढवळगड हा स्थानिकांना माहीत होता पण तो दुर्गप्रेमी व ट्रेकर्सपर्यंत पोहोचलेला नव्हता. शिवाजीराव एक्के सरांनी त्यांच्या पुस्तकात ढवळगडाचा ओझरता उल्लेख केला पण किल्ल्याचे वर्णन केले नाही कारण तो त्यांच्या अभ्यासाचा विषय नव्हता असे त्यांनी आम्हाला सांगितले व त्यामुळे आम्हाला एक सखोल अभ्यास करायला वाव मिळाला. आमच्या ढवळगडाच्या शास्त्रशुद्ध व पुरातत्वीय दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासामुळे या किल्ल्याची कवाडे दुर्गप्रेमींसाठी खुली झाली. तसेच आजवर या किल्ल्याचे समग्र वर्णन कुठेही न आल्याने ट्रेकर्सचा राबता ढवळगडाकडे नगण्यच होता. कदाचित आमच्या या सादरीकरणानंतर या किल्ल्याला ट्रेकर्सच्या नकाशात एक नावे स्थान मिळेल व महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या यादीत एका नावाची भर पडेल अशी आशा आहे.   

संबंधित बातम्या