निसर्गरम्य सिक्कीम

ले. डॉ. दीपा नाईक, दिल्ली
शुक्रवार, 27 जुलै 2018

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

सिक्कीम हे भारताच्या ईशान्येला असलेले एक छोटे पर्वतीय राज्य. उत्तरेला चीन, तिबेट, पश्‍चिमेला नेपाळ, पूर्वेला भूतान, दक्षिणेला पश्‍चिम बंगाल यांनी वेढलेले आहे. या निसर्गरम्य व वैशिष्ट्यपूर्ण राज्याला भेट देण्याचा मला नुकताच योग आला. उत्तर पूर्वेतील सात राज्ये मेघालय, आसाम, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम व अरुणाचल यांना ‘सेव्हन सिस्टर्स’ असे म्हणतात. ही राज्ये ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत. सिक्कीम हे त्या लगतचेच पण मंगोल वंशाच्या प्रजेचे एक साम्य सोडता इतर दृष्टीने (सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक) ते या राज्यांपासून ते थोडे वेगळे आहे. १९७५ मध्ये सिक्कीम हा स्वतंत्र देश भारतात विलीन झाला, आणि २००२ मध्ये सिक्कीम हा नॉर्थ ईस्ट कौन्सिलचा सदस्यही झाला. त्यामुळे या राज्याला ‘सात बहिणींचा’ एक भाऊ असेही म्हणतात.

गंगटोकला जाण्याकरिता दिल्लीहून आम्ही बागडोगरा या पश्‍चिम बंगालमधील विमानतळावर उतरलो. बागडोगरा विमानतळ साधारणच; पण गजबजलेला. कारण सिक्कीम, नेपाळ, दार्जिलिंग, कोलकता येथे जाण्याकरिता मध्यवर्ती. गंगटोकला जाण्यासाठी तशी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे, जी तुम्हाला अर्ध्या तासात तेथे पोचविते. पण एक तर बेभरवशाच्या हवामानात ती बऱ्याचदा बंद होते व महागही आहे, सहा हजार रुपये माणशी. तेव्हा, खासगी गाड्यांमधून आम्ही बागडोगरा, सिलिगुडी, जलपैगुरी असा सहा तासांचा प्रवास करीत आम्ही गंगटोकला पोचलो. रस्त्याला लागून गावांमधून जाताना अधूनमधून चहाचे मळे, लष्करी तळ तसेच शहरीपणाच्या आधुनिक खुणा म्हणजे मोठमोठे मॉल्स, दार्जिलिंग व सिलिगुरीहून नेपाळला जाणारे फाटे पार करुन तुम्ही लवकरच तिस्ता नदीच्या किनाऱ्याने प्रवास करू लागता. या डोंगर दऱ्यातून वळणावळणाच्या रस्त्याने जाताना तिस्ता कधी इकडून तर कधी तिकडून, कधी शेजारी तर कधी  खोल दरीतून, कधी खळाळणारी तर कधी कोरड्या पात्राची तिस्ता तुमच्याबरोबर प्रवास करीत असते. तब्बल सहा तासांनी आम्ही सिक्कीमच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या गावात प्रवेश केला, तेव्हा रिमझिम पावसाला सुरवात झालेली होती. रंगीबेरंगी ड्रॅगन व फुलापानांच्या प्रवेशद्वारातून जेव्हा आपण सिक्कीममध्ये प्रवेश करतो, तेव्हा आपण एका सधन हिलस्टेशनला चाललो आहोत, याची जाणीव होते. चार, पाच, सहा मजल्यांच्या नीटस रंगीबेरंगी इमारती ज्यांचा पहिलाच नव्हे, तर चौथा पाचवा मजलाही बऱ्याचदा रस्त्यावर असतो. कारण, पहिला मजला खालच्या लेव्हलच्या रस्त्यावर व वरचे मजले तुम्ही जसे चढ चढता, तसे वरच्या मजल्यावर उघडतात. गंगटोकच्या गर्व्हनर गेस्ट हाऊसमध्ये पोचेपर्यंत धोधो पावसाला सुरवात झाली होती. थंडगार वाऱ्यात पावसाचा मारा चुकवत, कुडकुडत अखेर आम्ही गेस्ट हाऊसच्या प्रशस्त सुंदर खोल्यांमध्ये विसावलो. ही ट्रीप आम्ही सिक्कीमचे माननीय गव्हर्नर श्रीनिवास पाटील यांनी माझी भाची विद्युत हिला दिलेल्या वैयक्तिक आमंत्रणावर आम्ही आयोजित केली होती. 

रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळी खिडकीतून बाहेरचे दृश्‍य पाहून आम्ही हरकूनच गेलो. समोर, हिरव्यागार टेकडीवर गव्हर्नरांचा बंगलामध्ये फुलांचे गालिचे, पलीकडे उंचावर आणखी एक इमारत आणि आकाशातून खाली उतरणारे ढग, कधी ते इतके खाली उतरत, की समोरचे काही एक दिसत नसे. तर, कधी एकदम अदृश्‍य होत. गेस्ट हाऊसच्या मागच्या बगीच्यातून समोर दूरवर बर्फाच्छादित कांचनगंगा शिखर व इतर पर्वररांगाचे दर्शन, जेव्हा ढग आपला पडदा उचलीत तेव्हाच होत असे. भोवतालच्या हिरवळ व फुलांनी बहरलेल्या बागांमधून हिंडताना खाली गंगटोक शहराचेही दर्शन होत होते. 

पहिल्या दिवशी आमचा स्थानिक स्थळांना भेट देण्याचा कार्यक्रम होता. प्रथम आम्ही हनुमान टोक या उंचावर बांधलेल्या रंगीबेरंगी स्वच्छ, सुंदर हनुमान व राम मंदिराला भेट दिली. अतिशय देखण्या अशा या मंदिराच्या पायऱ्यालगत औषधी वनस्पतींचे वाफे केले आहेत. त्याला नाव आहे, द्रोणागिरी. मंदिरातील हनुमानाची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे, शेंदूर फासलेली नव्हे. त्यानंतर गणेश टोक, नवा बौद्धमठ या सर्व उंचावरील ठिकाणाहून गंगटोक आणखी नयनरम्य दिसते. त्यानंतरचा थांबा होता वॉटरफॉल पार्क. खालच्या लेव्हलच्या धबधब्यावरुन या सात मजल्यापर्यंत तुम्ही चढायला सुरवात करता, तेव्हा प्रत्येक धबधब्याच्या शेजारी सुंदर फुलांचे छोटे उद्यान अशी प्रत्येक मजल्यावर सजावट आहे. सातव्या मजल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याजवळ असलेल्या खडकावर उभे राहून तुम्ही ओलेचिंब होण्याचा आनंद घेऊ शकता. त्यानंतरचा स्टॉप होता केबल कार. गंगटोकच्या मुख्य रस्त्यावरून तुम्ही वरच्या टोकाला पोचता ते विधानसभा इमारतीजवळ. खालून वर जाताना रंगीबेरंगी टपांच्या मजल्या मजल्यांच्या सुबक इमारती, रस्ते व प्रत्येक इमारतीसमोर असलेल्या मोटारी, बिग बझार सारखे मॉल्स व हॉटेल्सचे दर्शन होते. 

दुसऱ्या दिवशी आम्ही लाचुंग या गंगटोकच्या उत्तरेला असलेल्या हिल स्टेशनला जाण्यास निघालो. हे अंतर जास्त नसले, तरी डोंगराडोंगरातून जाणारा हा रस्ता खडतरच होता. रस्ता कच्चा असला, तरी अतिशय निसर्गरम्य गच्च हिरव्यागार डोंगरामधून जातो. सर्व बाजूंनी वाहणारे झरे व उंचावरून कोसळणारे धबधबे दिसतात. त्यातील एकाला तर ‘अमिताभ बच्चन फॉल’ असे म्हणतात. कारण तो इतक्‍या उंचावरून कोसळतो, की तुम्हाला मान वर करुन पाहावे लागते. हा सहा तासांचा प्रवास करुन आम्ही लाचुंगला पोचलो. हे छोटेसेच गाव फार आकर्षक नसले, तरी तुम्हाला तिस्ता नदी व भोवतालची बर्फाच्छादित शिखरे यांचे दर्शन होत राहते. तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही युमथांग व्हॅलीला जाण्यास निघालो. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे सकाळ स्वच्छ सूर्यप्रकाशाची होती हे आमचे भाग्यच. डोंगर दऱ्यामधला हा प्रवास, बर्फाच्छादित शिखरांच्या जवळ जाणारा होता. युमथाम व्हॅलीला ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ असे म्हणतात. ऱ्होडेन्ड्रम ही पाच लाल चुटूक फुलांच्या खाली वळलेल्या गुच्छांनी लगडलेली झाडं, तसेच पिवळ्या, जांभळ्या व पांढऱ्या फुलांनी बहरलेली झाडं सर्व प्रवासभर तुमची नजर व मन तृप्त करत राहतात. जमीनीलगतही रंगीबेरंगी फुलांचे गालिचे पसरलेले दिसतात. अडीच तीन तासांत आम्ही युमथांग व्हॅलीत पोचलो. समुद्र सपाटीपासून चौदा हजार फूट उंचीवरील या खोऱ्यात भोवतालचे उंच बर्फाच्छादित डोंगर, फुलांचे गालिचे व त्यामधून खळाळत जाणारी तिस्ता हे पाहून मन तरल होऊन जाते. हे सौंदर्य मनात साठवत आम्ही आणखी उंचीवरील पंधरा हजार फुटावरील झीरो पॉईंटला जायला निघालो. या रस्त्यावर हिमनद्या वरुन वाहत येत होत्या. बऱ्याच ठिकाणी कडे कोसळल्यामुळे दगड व पाणी यातून मोठ्या कौशल्याने आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. एका ठिकाणी आम्हीही गमबुट घालून बर्फावर चालण्यातला थरार अनुभवला. त्याही पलीकडे काही फर्लांगावर तिस्ता नदीवरचा पूल आहे, तो झिरो पॉइंट. तेथून काही अंतरावर पुढे सैनिकांचे बंकर्स दिसत होते. त्या पलीकडे चीनची सीमा आहे. तिथं जाण्यास परवानगी नसते. संध्याकाळी आम्ही लाचुंगला परतलो. तिथं मुक्काम करुन आम्ही दुसऱ्या दिवशी गंगटोकच्या परतीच्या मार्गाला लागलो. लाचुंगच्या विरुद्ध दिशेला एक फाटा लाचेन या ठिकाणीही जातो. लाचेनला साडे सतरा हजार फूट उंचीवर ‘गुरुडोमगार’ तलाव आहे. पण प्रचंड वारा व उंची व प्राणवायूची कमतरता असल्याने तिथं फक्त पंधराच मिनिटे थांबू देतात. लहान मुले व ज्येष्ठांना जाण्यास परवानगी नसते असे सांगण्यात आले.  परतताना आम्ही सिक्कीमच्या पश्‍चिम टोकाला असलेल्या प्रसिद्ध रुमटेक बौद्ध मठाला भेट दिली. हा सर्वांत श्रीमंत मठ असून, त्यात खजिना असल्याने सर्वत्र लष्कराचे सशस्त्र जवान दिसत होते. 

गंगटोक हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सधन शहर आहे. इथं सत्तर हजार सरकारी कर्मचारी असून त्यात महिलांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. विद्यापीठापर्यंतचे शिक्षण विनामूल्य असते. हॉटेल्स चालविण्यापासून सारी कामे करताना महिला दिसतात. गुन्ह्यांचे प्रमाण नगण्य. प्रत्येक घरासमोर गाड्या दिसतात. देशातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून सिक्कीमची ख्याती असून रासायनिक खत वापरल्यास दंड केला जातो. रोटी, कपडा, मकान याची चिंता नसल्याने बाहेरच्या राज्यात स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. स्वच्छता मोहीम खरीच अस्तित्वात असल्याच्या खुणा जागोजागी दिसतात. कुणीही गाड्यांचे भोंगे वाजवत नाही व स्वतः दोन पावले मागे येऊन दुसऱ्याला पुढे जाऊ देण्याची अदब सिक्कीमच्या वाहनचालकांमध्ये आहे. इथल्या लोकसंख्येत लेपचा हे स्थानिक, नेपाळी व भुटिया हे भूतानी असे तीन जाती समुहाचे लोक आहेत. मोठ्या संख्येने बौद्ध धर्माचे लोक असून हिंदू व इस्लाम धर्माचेही काही लोक आहेत. या तिन्ही समुदायाच्या लोकांची वैशिष्ट्ये यांचे दर्शन घडवून आणणारा सांस्कृतिक कार्यक्रम आम्हाला राज्यपालांच्या उपस्थितीत पाहावयास मिळाला. त्यातील याक नृत्याने तर आमची खूप करमणूक केली. उरलेल्या दोन दिवसात आम्हाला नथू ला पास व उरलेल्या गंगटोकचे दर्शन करावयाचे होते. गंगटोकमधील तिबेटियन इन्स्टिट्यूटचे संग्रहालय, हॅंडलूम हाउस, फ्लॉवर शो व येथील प्रसिद्ध बाजार यांना आम्ही भेट दिली. गंगटोक मधील इतर सर्व रस्ते चढ उतारांचे असले, तरी बाजाराचा मैल भराचा रस्ता सपाट, सुंद व दुतर्फा शोभिवंत दुकानं मधे सुंदर झाडाफुलांचा डिव्हायडर, आकर्षक दिव्यांची रचना व त्यासोबत बसायला बाकं असल्याने आपण जणू काही पाश्‍चात्त्य देशातील बाजारात स्मार्ट सिटीत आल्याचा भास होतो. वाहनांना येथे येण्यास मनाई असल्याने खरेदीचा आनंद भरपूर लुटता येतो. 

शेवटच्या दिवशी गंगटोकच्या उत्तरेला चीनच्या सीमेला लागून असलेल्या पन्नास कि.मी. दूर असलेल्या त्सांगू लेक व नथू ला पास ला भेट देण्याचा कार्यक्रम होता. पासेस तयारही होते. पण आदल्या दिवशी सायंकाळपासून सुरू असलेल्या व रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे नथू ला ला जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याची बातमी सकाळीच मिळाली. अकरा वाजेपर्यंत वाट पाहून अखेर हा कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागला. तरीही शेवटच्या दिवसापर्यंत सिक्कीमच्या निसर्गसौंदर्याचा भरपूर आनंद लुटता आला याचे समाधान मानत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या