निसर्गसंपन्न भूतान 

डॉ. महेश गायकवाड
शुक्रवार, 27 जुलै 2018

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

सर्वांत आनंदी देश अशी आपली ओळख भूतानने जपली आहे. शिस्त आणि नियम याबद्दल भूतान जागरूक आहे. येथे निसर्ग आणि संस्कृती यांचे नाते जपले जाते. पर्यावरण आणि निसर्ग जितका शक्तिशाली किंवा बळकट असेल तेवढा तो देश आनंदी मानावा लागेल, असे आता पाश्‍चिमात्य देशही मानू लागले आहेत. 

भूतानमध्ये प्रत्येक जण शिस्तीत वागतो. गाइड ते बसचालक सगळे पोटतिडकीने सांगतात, की आमच्या देशात कुठेही कचरा टाकू नका. तसा टाकल्यास आमच्याकडे त्यासाठी दंड आहे. भूतानमध्ये असताना आम्ही सर्वांनी त्यांचे नियम पाळले आणि पहिलेसुद्धा! त्यातून एक गोष्ट लक्षात आली, की स्वच्छता स्वतःपासून करायची असते. आपल्याकडे याउलट आहे - दुसऱ्याला स्वच्छ राहायला सांगितले जाते, स्वतः मात्र काहीच केले जात नाही. 

तेथील पर्यावरण बघितल्यास, लक्षात येईल, की जंगल, मानव आणि मग विकास असा त्यांच्या विकासाचा क्रम आहे. जगात सर्वत्र जंगल कमी होतेय, पण भूतानसारख्या देशात ते वाढते आहे. सुमारे ४० हजार चौ.कि. भूभाग असणाऱ्या या छोट्या देशात १९७४ मध्ये एकूण भूभागाच्या ६० टक्के असणारे जंगल आज २९ वर्षांनी ७२.५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढले आहे. जंगल आणि मानव यांचे अतूट नाते असून यात शेतीचे नुकसान झाले तरी वन्यजीवांना ते मारत नाहीत. त्यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी स्वतःच्या शेतीच्या कडेने विविध पिके लावून त्यांचे संरक्षण करणे हिताचे समजले जाते. जंगलातील विविधता टिकल्यास त्यांना खूप आनंद मिळतो असे सांगायला ते विसरत नाहीत. 

या देशाचा राष्ट्रीय पक्षी कावळा असून याचे संरक्षण करताना अनेकदा त्याच्याविषयी लोक खूपच आदराने बोलतात. कावळा हा पक्षी परिसर स्वच्छ ठेवतो, तर आपण का नाही ठेवू शकत? असे सर्वजण बोलून दाखवितात. 

राजाविषयी सर्वांना खूपच आदर आहे. एकदाही राजाबद्दल अपशब्द ऐकायला मिळाला नाही हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. प्रत्येकजण आदराने राजचे कौतुक करीत आहे हे नवलच म्हणावे लागेल. 

आपले मातीशी खूप घट्ट नाते आहे, असे भूतानचे लोक सांगतात. अगदी जुनी झाडे या देशात तोडली जात नाहीत. कारण ही जुनी झाडे अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे असे ते मानतात. तसेच जुनी झाडे म्हणजे निसर्गातील चक्र असून, देवाचे स्थान त्यात असते असे ते मानतात. भूतानची लोककला आणि जंगल याचे नाते खूप जवळचे असून त्यांचे पर्यटनसुद्धा यावर अवलंबून आहे. पर्यटकांचे ते अवास्तव लाड करीत नाहीत. पर्यटनाबदादल त्यांनी काही नियम तयार केले आहेत. त्यात कचरा व्यवस्थापन, शिस्त, लोककलांचे प्रदर्शन नियमितपणे सांभाळले जाते. तसेच निसर्गसंरक्षण केल्याने शारीरिक आणि मानसिक समाधान मिळते असे ते मानतात. 

आपल्याकडील गाइड, स्वयंपाक करणारे, प्लास्टिक पिशव्या तयार करणारे उद्योजक यांना ते आपल्या देशात प्रवेश देताना खूप काळजी घेतात. त्यांच्याच देशातील गाइड किंवा जेवण घेतले पाहिजे, असा त्यांचा शक्‍यतो कटाक्ष असतो. 

भूतान म्हणजे गरीब देश असा आमचा समज होता. मात्र प्रत्यक्ष भूतानला गेल्यानंतर समजले, की भूतान हा सर्वांत सुखी आणि आनंदी, समाधानी देश आहे. थिंपू हे राजधानीचे शहर वाटलेच नाही; आपल्यासारखी गर्दी इथे कुठेच दिसत नाही आणि या भूतानमध्ये कुठल्याही शहरात सिग्नल नाही, इथले रस्ते खूपच रुंद आणि प्रत्येक रस्त्याला पादचारी रस्ता; तोही अतिक्रमण नसलेला पाहावयास मिळाला. 

भूतानी स्त्री-पुरुष कमालीचे भाविक आहेत. इथे बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे. भूतानमध्ये अनेक प्रकारच्या पताका रस्त्याच्या कडेला फडकताना दिसून येतात. कारण माणसांच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून लावलेल्या पताका पाच रंगांमध्ये असतात. यात आकाश, पाणी, वायू, अग्नी व पृथ्वी अशा पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व हे पाच रंग करतात. म्हणून अशा पताका पवित्र म्हणून बांधण्याची प्रथा आहे. 

भूतानमध्ये वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. वाघ, स्नो लेपर्ड, रेड पांडा, टोपीवाले माकड, तसेच बगळे, फिश ईगल, तितर असे प्राणी-पक्षी सापडतात. पुनाखामधील शेतकऱ्यांना आम्ही भेटलो. इथले शेतकरी वन्यजिवांची शिकार करीत नाहीत, त्यांचे संरक्षण करतात आणि आपल्या शेतीच्या कडेला वन्यजीवांच्या आवडीचे खाद्यही लावतात. 

या भागात रानडुकरांचे प्रमाण वाढल्यास ते मारत नाहीत. उलट रानकुत्री येण्याची वाट पाहतात. कारण रानकुत्री वाढली की रानडुकरे कमी होतात आणि रानडुकरे कमी झाली की रानकुत्रीही कमी होतात.. त्यांच्या मते आपण कोणत्याही जिवाला मारण्यापेक्षा त्यांचे संरक्षण केल्यास निसर्ग त्याचे संतुलन राखतो. त्यामुळे आम्ही वन्यजीवांना मारत नाही. 

भूतानचा जरी पर्यटन हा मुख्य व्यवसाय असला, तरी पर्यटकांनी मोठ्या संख्येने भूतानला यावे असे येथील सरकारला अजिबात वाटत नाही. गर्दीमुळे भूतानचे नैसर्गिक सौंदर्य, पर्यावरणाला धोका पोचू नये अशी इथल्या सरकारची भूमिका आहे. मात्र ज्यांना भूतान बघायचे आहे त्यांनी शिस्त पाळलीच पाहिजे हा भूतानच्या पर्यटनाचा नियमच आहे.. आणि तो अतियोग्य आहे!

फोटो फीचर

संबंधित बातम्या