इंद्राचे उद्यान-नंदन कानन

प्रा. डॉ. अपर्णा महाजन
शुक्रवार, 27 जुलै 2018

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

उत्तरांचल म्हणजेच उत्तराखंड - म्हणजेच पूर्वीचे गढवाल. इथे असलेल्या ‘फूलों की घाटीतील’ फुलांचा अनुभव घेऊन नुकतीच परत आले. पुण्यातल्या ‘बियाँड-वाइल्ड’ या संस्थेबरोबर अगदी अचानकपणे, फार नियोजन न करता आमची ट्रीप ठरली. १० ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत अत्यंत सुनियोजित, प्रवाशांच्या प्रत्येक गरजेचा, मानसिकतेचा आणि लहरींचासुद्धा विचार करून ‘बियाँड-वाइल्ड’चे डॉ. पराग महाजन आणि त्याचा मुलगा मिहीर हे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला’ ५० लोकांना घेऊन गेले होते. 

संपर्क क्रांतीच्या AC डब्यातून प्रवास सुरू होण्यापूर्वी आम्हाला सगळ्यांना पुणे स्टेशनवर ‘बियाँड-वाइल्ड’च्या ग्रे रंगाच्या टोप्या दिल्या आणि नवीन लोकांच्या ओळखी पालखी होत, गप्पा मारत आम्ही ११ ऑगस्टला दिल्लीत पोचलो. तिथे टेम्पो ट्रॅव्हलरनी आम्ही सगळे अक्षरधाम हे नारायण स्वामी नामक एका गुरूंच्या मंदिरात गेलो. त्याला मंदिर तरी कसं म्हणावं? १०० एकराच्या प्रत्येक कोपऱ्यातून सौंदर्यपूर्ण नटविलेल्या श्रीमंतीचे दर्शन घडत होतं. तिथे नारायण स्वामींचा सोन्याचा पुतळा आहे. तिथल्या अनेक भिंतीवर त्यांच्या आयुष्यातील प्रसंग चित्रबद्ध केलेत. कलात्मक कलाकुसर, मोठमोठाले पुतळे, रत्नांनी नटविलेला महाल की मंदिर ? चबुतरे, लॉन, मोठ्या मोठ्या पितळी हंसाच्या चोचीतून महाप्रचंड तलावात पडणारे पाणी; हे पाहून भक्तांच्या मनात नेमका कुठला विचार येत असेल असा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. असो! तिथून हरिद्वार.

आतापर्यंत फक्त पुस्तकातून माहीत असलेली ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना मजा वाटत होती. हरिद्वार हे गंगेच्या आरतीसाठी प्रसिद्ध आहे. आरती करण्यापूर्वी प्रत्येकजण गंगा मलिन होऊ देणार नाही अशी शपथ घेतो आणि तेलाने भरलेल्या पानांच्या पणत्या दररोज संध्याकाळी गंगेत सोडल्या जातात. आजूबाजूला भक्तांची, साधूंची गर्दी, गलिच्छ गंगा, बकाल रस्ते पाहून मनस्वी त्रास झाला. तिथे रात्री राहून आवली नावाच्या एका सुंदर गावी पोचलो. १२-१३ तासांचा टेम्पो ट्रॅव्हलरचा प्रवास. हिमालयातला घाटाचा रस्ता. आजूबाजूला भलंमोठं चित्र असावं असं अतिशय सुंदर दृश्‍य. हिमालयातील शिवालीक पर्वताच्या रांगा, त्यावरचे अनेकविध प्रकारचे वृक्ष, एकापाठोपाठ Copy-Paste केल्यासारखी शिखरं, मध्येच भलेमोठे.. महाकाय चिरोट्यासारखे पापुद्य्राचे डोंगर आणि सोबतीला सतत खळखळणारी अलकनंदा ! 

आम्ही ११ हजार फूट उंचीवर जात होतो. सूचीपर्णी वृक्ष, हळदू, कांचन, तून, रोहितक, वाव्हळ अशा अनेक झाडांची पुण्यातले प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ बापू महाजन ओळख करून देत होते. गोष्टी सांगितल्याप्रमाणे झाडांचे स्वभाव सांगत होते. वाव्हळच्या शेंगांना मंकी बिस्किट्‌स म्हणतात. वर उंच कुठेतरी कांचन वृक्षांवर चढलेले दोन वेगवेगळे वेल दाखवताना झाडांमध्येसुद्धा कशी सहजीवनाची भावना असते; ठराविक झाडांच्या सानिध्यात झाडे कशी बहरतात, फुलतात हे त्यांच्या तोंडून ऐकताना भारी वाटत होतं. मध्ये मध्ये छोटेमोठे ब्रेक घेत आम्ही पंचप्रयाग आणि हिमालय पहात चाललो होतो. सगळ्या नद्या अलकनंदेला येऊन मिळतात. तरी गंगेला महत्त्व का? असा माझ्या मनात प्रश्‍न आला. भागीरथी ही मोठी नदी ती अलकनंदेला मिळते आणि त्या संगमापासून खाली जाणारी नदी म्हणजे गंगा, हे नवं ज्ञान मला मिळालं. या प्रयागाला देवप्रयाग म्हणतात.

अलकनंदेचे किती विविध रंग पहायला मिळाले! कधी अवखळ, कधी धाडधाड कोसळणारी, कधी अगदी परिपक्वतेनी संथ वाहणारी पुन्हा दुसऱ्या नदीला कवेत घेऊन पुढचा अखंड प्रवास सुरू ठेवणारी.

कर्णप्रयागच्या तिथे पिंडार नदी अल्लड वाटत होती आणि अलकनंदा शांत... नंतर पुन्हा खळखळाट. नंदप्रयागाशी नंदाकिनी आणि लक्ष्मण प्रयागशी लक्ष्मणगंगा... सतत पाण्याचा खळखळाट; उजवीकडे डोंगर आणि डावीकडे दऱ्या... खोल खोल! मज्जा वाटतीय असं म्हणायला भीती वाटावी इतक्‍या खोल!

जसजसे आम्ही वर जात होतो. तसे तिथल्या प्राण्यांमध्येसुद्धा बदल जाणवत होता. तिथली गायीगुरं बुटकी, फताड्या पायांची होती. उंचीवरून स्वतःचा बॅलन्स टिकवून ठेवायला निसर्गाने केलेली ती व्यवस्था होती. अवलीतला मुक्काम हलवून गोविंद घाटला गेलो. घोड्यावरून सामान पुढे पाठवलं आणि १३ किमीचा डोंगर चढायला सुरवात केली. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली माणसं. सगळे एकमेकांना मदत करत होते. एकमेकांशी बोलत होते. पण सगळे आपापल्या गतीने वर चढत होते. पुढे वाटेत शिकंजी (फळाच्या रसात ड्रायफ्रुटस्‌ घातलेलं पेय) लिंबूपाणी, ग्लुकॉन डी. वगैरे घेत, स्वतःचे लाड करत आम्ही चाललो होतो. सोबतीला अलकनंदा होतीच. मध्येच पऱ्यांच्या राज्यात दिसावेत अशा मोठमोठ्या मोत्यांची रास नदीकिनारी दिसली... अक्षरशः पांढरेशुभ्र चकाकणारे दगड. मी सहप्रवाशांनी दाखवत होतो.. ‘मोती पहा मोती’.. एक अविस्मरणीय क्षण होता तो. सात किमीनंतर वाटलं आता सहा तर किलोमीटर जायचंय... पण म्हणता म्हणता पाय थकून गेले. निग्रह लेचापेचा होऊ लागला. पण आजूबाजूला अनेक शीख बांधव चालले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी अडीच-तीन किमी बिनबोभाट चालले. नंतर मात्र प्रत्येक पावलागणिक मानसिक धैर्य खचू लागलं. माझे पती विदुरनी ‘अर्ध पाऊल टाक; आपल्याला पूर्ण करायचाय ट्रेक, ढेपाळू नकोस, सावकाश जाऊ पण शेवटपर्यंत जाऊ, असं मला समजावत आम्ही शेवटी देवलोक हॉटेलमध्ये जाऊन पोचलो. पुन्हा जेवायलासुद्धा खाली उतरणं अशक्‍य होतं.  आमच्यातले अनेकजण ५ तासातच पोचले होते. आम्हाला ८ तास लागले. वाटेत नाही म्हणायला एक जंगली अस्वल दिसलं. रात्री पूर्ण आराम होता. 

दररोज रात्री आम्ही सगळे एकत्र यायचो. बापू महाजनांचं व्याख्यान होत असे. जीवसृष्टी कशी निर्माण झाली? जाबाल नावाच्या एका माणसाने आर्यावर्तातून हिमालयात येऊन जगण्याचा संघर्ष कसा केला. तेव्हाच कळलं ‘गाय’ हा भारतीय प्राणी नाही असं ! हिमालयातल्या अनेक गुणधर्म असलेल्या वनस्पती वगैरे अनेक विषय असत. त्यातच आदले दिवशी त्यांच्या बोलण्यात ‘बिच्छू का पौधा’ नावाची वनस्पती आली होती. या वनस्पतीला स्पर्श झाला, की विंचू चावल्यासारख्या वेदना होतात, पण त्याच्याच आजूबाजूला ऱ्हुमेक्‍स नावाचा जंगली पाला त्याच्यावरचा उतारा असतो. याचा प्रत्यक्ष अनुभव आमच्या ग्रुपमध्ये मला एकटीलाच आला. मी एकटी माझ्या गतीने चालत होते. तेवढ्यात एक घोडा घसरून माझ्या अगदी जवळ पडला. घोड्यांना आजूबाजूचं काही दिसत नसावं. त्यांचे कान त्यांच्या मालकाच्या आवाजाकडे असतात. त्यामुळे ‘चलो चलो’ अशा आवाजासरशी घोडा ताडकन उठला व मागचे घोडे पण पळायला लागले. माझा बॅलन्स गेला, मी पडले ती नेमकी ‘बिच्छू का पौधा’वर. अर्ध्या सेकंदात कोपरापासून बोटापर्यंत लाल भडक रॅश येऊन आग आग व्हायला लागली. ‘बिच्छू का पौधा’ मला नक्की कळला होता. पण उताऱ्याचे काय? मी साबणाने हात धुतले, विको टर्मरिक लावलं. पण आग कमी होईना. तिथे एक सरदारजी होता. त्याचं माझे आधीपण बोलणं झालं होतं. त्यानी पाहिलं आणि पटकन त्याच्या विद्यार्थिनीला ऱ्हुमेक्‍स आणायला सांगितलं. मी सतत हाताला त्याचा पाला चोळत होते. २-३ तासांनी आग कमी झाली. पण बधिरता होती. पण ही दोन्ही झाडं पक्की लक्षात राहिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजेतवाने होऊन ज्यासाठी आलो होतो, ती व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पहायला पुन्हा चाललो. अप्रतिम सुंदर वातावरण ! घांगरिया, अक्षरशः पर्वताच्या बेचक्‍यात वसलेले गाव. तिथून कोणी घोड्यावर, कोणी पिठ्ठू (पाठुंगळीवर) आणि आम्ही सगळे चालत निघालो.  सुरवातीला फक्त जांभळा तेरडाच दिसत होता. एक इस्राईलचा ग्रुप होता. विस्फारित नजरेने त्याकडे पहात ‘किती सुंदर’! असं ते म्हणत होते. मला मात्र इतकी धडपड करून येऊन तेरडाच काय? असं वाटतं होतं. पण तेवढ्यात कधी न पाहिलेली फुलं दिसू लागली... अनेक रंगांची. तिथे एक लाल चुटूक फूल होतं. त्यापासून विको वज्रदंती करतात असं समजलं. मोरेना नावाची फुलं, संकोचून डोके खालीच करून बसलेली फुलं, काही मोदकासारखी दिसणारी, काही बडीशोपेसारखी. त्यांच्या देठांचा रस इन्स्टंट एनर्जी देणारा असतो म्हणे. तिथे महाप्रचंड दगडांपलीकडे एक फूल होतं. सगळेजण ते पहायला धडपडत होते. रजनीश नावाचा तिथला एक्‍स्पर्ट सांगत होता त्या फुलाबद्दल. ‘ब्लू पॉपी’ म्हणतात त्याला. जसं जसं उंच जाऊ तशी दिसतात. खूप दुर्मिळ असतात वगैरे. ४ पाकळ्यांचे लुसलुसीत मऊ, नाजूक, फिकट आकाशी निळ्या रंगाचे ते फूल. एकाच फांदीला ओळीत ४-४, ५-५ फुलं येणारं. माझं तर ते सगळ्यात ‘फेव्हरिट’ झालं. आणि मोठ्या झाडांच्या बुंध्याशी असणारी अशीच छोटी छोटी चिमुकली निळ्या रंगाची ‘forget me not’ ं. नाव एवढं मोठं आणि आकार करंगळीच्या अर्ध्या नखाएवढा. 

इथेपण आमची अलकनंदा होतीच. आमच्या ग्रुपमध्ये असल्यासारखी. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला ‘इंद्राचे उद्यान’ म्हणतात. नंदन कानन म्हणजे आनंद मिळण्यासाठी तयार केलेले उद्यान. पुराणकाळात स्वतः इंद्रदेव फेरफटका मारण्यासाठी या पुष्पदरीत येत असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याला इंद्राचे उद्यान असे नाव पडले.

हिमालयाच्या एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्‍चर्य वाटत होतं. एवढा प्रचंड मोठा हिमालय, विविध वनस्पतींनी नटलेला, बर्फाच्छादित शिखरांमुळे, खळाळणाऱ्या नद्यांमुळे, उंच उंच सुळके असलेला, पण इथे सह्याद्रीच्या रांगामध्ये दिसतात तशी पर्यटन स्थळेच नाहीत. इथे पठारच नाही कुठे! शिवाय त्या खडकांमध्ये खूप चुनखडी असल्यामुळे तो अतिशय ठिसूळ आहे. त्यामुळे प्रवासात जिथे तिथे लॅंडस्लाईडच्या धोक्‍याचा पाट्या !

दुसऱ्या दिवशी हेमकुंड साहेबला गेलो. ६ किमीचाच ट्रेक होता. पण दीड दीड फूट पायऱ्यांचा आणि नाकात दम आणणारा चढ असं ज्याचं वर्णन केलं जात असा. सगळे शीख लोक ‘सतनाम; वाहे गुरू’ च्या घोषात गुरुद्वाराला वरती चालले होते. त्यांची यात्रा चालू होती. लहान, मोठे, तरुण, वृद्ध सगळे दमत, भागत भक्तिभावाने जात होते. हे १४,५०० फूट उंचीवर आहे. जसजसे वर जात होतो तसे हिमालयाची शिखरं, वर चमकणारे बर्फिले पहाड, काही ज्येष्ठ नागरिकांसारखे पांढरे शुभ्र ढग डोक्‍यावर घेऊन वसलेले, आजूबाजूला ब्रह्मकमळं, ब्लू पॉपीज, वरची ग्लेशिअर्स, वर्षानुवर्षे न वितळणारा बर्फ आणि या सगळ्यातून झिरपत गेलं होतं, आणि वरती पोचलो तर सारे शीख बांधव आपापल्या धार्मिकतेने, भक्तिभावात दंग झाले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझ्या डोळ्यातून अश्रूच यायला लागले. अनेक विचार मनात येत होते. निसर्गाशी खूप एकरूप व्हावसं वाटतं होतं. तेवढ्यात अचानक एक सरदारची, वयोवृद्ध आमच्याजवळ आले. त्यांच्या भाषेतील काही स्तोत्र म्हणून अर्थ सांगू लागले. एक क्षण असा होता, की मी विदुर आणि ते सरदारजी आजोबा आम्ही तिघं एकत्र होतो, निःशब्द, पण तिघांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.

दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. पुन्हा माणसांच्या जगात. पुन्हा गोविंदघाट, तिथून बद्रिनाथला गेलो. आम्ही गेलो तेव्हा बद्रिनाथाच्या जेवणाची आणि वामकुक्षीची वेळ झाली होती. त्यामुळे त्यांनी मंदिराचं दार लावून घेतलं होतं. बाहेर बद्रिनाथाच्या अंघोळीचे तीर्थ विकणारे गुरुजी होते. देवासमोर मोठमोठ्या दानपेट्या आणि मंदिराबाहेर हात पसरून डब्यात पैसे टाका असं खुणेने सांगणारे भिकारी होते. तिथून माणा नावाच्या ठिकाणी गेलो. माणा हे भारत व तिबेटच्या सरहद्दीवरील भारतातले शेवटचे गावं. तिथून अवघ्या ३६ किमीवर चीनची सीमारेषा. व्यासऋषींनी महाभारत गणपतींनी लिहून घेतले अशी ती जागा. अशी आपल्या देशातून बॉर्डर पाहताना वाईट वाटलं. इतका वेळ आपला वाटणारा हिमालय, परका झाल्यासारखा वाटला. ‘सरहद इन्साकोके लिए है, सोचो तुमने और हमने क्‍या पाया इन्सान होते’? या ओळी आठवल्या. येताना मनात प्रश्‍न येत होता. इतका ऐश्‍वर्यसंपन्न, विपुल,सुंदर हिमालय एकीकडे आणि त्याच्या कुशीतील माणसं मात्र अत्यंत हलाखीत आयुष्य जगत होती. केवढी गरिबी ! हरिद्वारहून दिल्लीला जाण्यासाठी अनेकांनी हमालाला सामान दिले. दोन बॅगा उजव्या खांद्यावर, दोन डाव्या खांद्यावर, पाठीवर सॅक, डोक्‍यावर दोन बॅगा आणि त्याच्या मागे मागे चालत जाणारा या सामानांचा मालक. दोन्ही माणसंच. एक पैसे असणारा, दुसरा पैसे नसणारा. आता परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. डोळ्यापुढे निसर्गाची, हिमालयाची, फुलांची, इथल्या वेगळ्या वातावरणाची, पंचप्रयागाची, गरिबी, कर्मकांड वगैरे दृश्‍य येत होती. हेमकुंडसाहेबला डोळ्यातून येणारे अश्रू, निसर्गाबद्दल वाटणारं अतीव प्रेम, निसर्गाशी एकरूप होण्याची ओढ; या साऱ्यांनी माझ्या अनुभवसंपन्नतेत केवढी मोठी भर टाकली होती. ब्रह्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग कदाचित असाच असला पाहिजे असा अस्फुट विचार मनात येऊन गेला. प्रवासात एव्हाना अनेकांशी मैत्री झाली होती. नवीन झालेली मैत्री वृद्धिंगत होवो असं प्रत्येकाला वाटत होते. अशा आश्‍वासक विचारांनी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या