बदाबदा कोसळणारा पाऊस...

प्राजक्ता ढेकळे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

कायम दुष्काळात असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील माणदेशाच्या पट्ट्यात मी वाढले आहे. त्यामुळं साधारण जून-जुलैपासून इतर ठिकाणी कोसळायला सुरुवात झालेल्या मॉन्सून, हवामान खात्याचा अंदाज.. अशा गोष्टी केवळ पेपरमधल्या बातम्यांमधूनच कळायच्या. हाच पाऊस आमच्याकडं पोचायला सप्टेंबर-ऑक्‍टोबर उजाडायचा. पण आमची तयारी मात्र जूनपासूनच सुरू व्हायची. शाळेला जाताना गुरांना खायला द्यायच्या पेंढेच्या पांढऱ्या पोत्याच्या खोळी मला आताच्या रेनकोटपेक्षा कितीतरी सुखावह वाटतात. घोळक्‍यानं शाळेत जाणं व्हायचं. मात्र जास्त पाऊस आला, की वढ्याला पूर आला म्हणून अनेकदा शाळाही लवकर सुटायची. त्यामुळं कधी एकदा मुसळधार पाऊस येतोय, असं नेहमी वाटत राहायचं. पावसाला सुरुवात झाली, की घरातल्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साही भाव दिसायचा. आजही तो कमी-अधिक प्रमाणात तसाच दिसतो. गावातल्या वढ्या वगळी भरून वाहणारं पाणी बघितलं, की हायसं वाटायचं. गावाच्या चावडीवर, पारावर, ग्रामपंचायतच्या हाफिसात नुसत्या पावसावर चर्चा झडायच्या. मोठ्या विश्‍वासानं लोक आता पीक-पाणी काय करायचं यावर चर्चा करायची. अन पेरलंच असेल, तर पावसामुळं ते कसं चांगलं जोमदार येईल यावरही सल्लामसलत करायची. पावसाळ्याचा काळ आणि पावसानंतरचे दोन ते तीन महिने माझ्यासाठी मोठे ऊर्जा देणारे असायचे. त्याचबरोबर खूप काही शिकवणारेदेखील! पावसाच्या काळात घरातील ज्येष्ठांकडून पावसाच्या तीव्रतेनुसार असलेली बुरंगाट, झिरंगाट, थुका, राप, आखाड, श्रावणसरी यांसारखी मजेशीर नावंदेखील कळायची. घरात नेहमी पावसावर बोलत असताना मराठी महिन्यांच्या नावांची उजळणी व्हायची. खाण्यासाठी आवर्जून शिजवलेली मक्‍याची कणसं, हुलग्याचं माडगं, बोट्‌व्याचा भात, गरमागरम चकुल्यांची  रेलचेल असायची. या सगळ्यात भाव खाऊन जायचा तो म्हणजे डालग्यातील कोंबडीच्या मटणाचा रस्सा... 

पावसामुळं अनेकदा आमच्यात असलेल्या अनेक कौशल्यांना वाव मिळायचा. वढ्यात जाळीच्या नव्हे, तर साडीच्या साहाय्यानं चिलापी माशांच्या चिंगळ्या पकडून आणणं, कधी कधी खेकडं पकडून फीस्टदेखील रंगायच्या. रानात फिरताना पेंढाळलेल्या चपलांना चिखल लागून बऱ्याचदा हायहिल्स तयार व्हायच्या. मात्र त्याच चपला घालून चालता येईनासं झालं, की सवंगड्यांच्या मदतीनं एका लांबड्या काठीला या चिखलानं बरबटलेल्या चपला अडकवून आपण अनवाणी चालायचं. पावसात भिजून घरी आलं की सगळ्यात उबदार वाटायचा तो आजीचा धडप्यालदंड घालून तयार केलेला मऊसूत धडपा. ज्यातील उब ही इतर कशातूनच वाटायची नाय. सगळीकडचा परिसर हिरवाकंच शालू पांघरलेल्या नव्या नवरीसारखा दिसायचा. जनावरांना हिरवा चारा मिळतोय बघून शेतकरी कष्टकरी सुखावायचा. या दिवसात सगळ्या वढ्याच्या कडेनं, तलावाच्या भराव्यावरनं गुरं-शेरडं चरत फिरायची. त्यात घरात दुभतं जनावर असेल तर मग दुधाची चंगळच व्हायची. पावसामुळं घरांच्या कौलावर बसलेली धूळ धुऊन जाऊन घरं अगदी नव्यासारखी वाटायची. शेतकऱ्याच्या मनात नेहमी आशेचं चित्र निर्माण करणारा पाऊस हा अगदी त्याच्या मोठ्या भावासारखा वाटायचा. तो आला, की जणू चांगल्या गोष्टी घडणार याचं भाकीत करून जायचा. अनेकदा पावसामुळं पीकपाणी चांगलं येईल, या आशेवर आपण घरातील बारक्‍या-चिरक्‍यांनी मागितलेल्या अनेक मागण्यांना, ‘औंदा पाऊसपाणी चांगलं हाय. पीक निघाली, की नक्की दिऊ’ असे संवाद कानी पडायचे. माणूस आणि निसर्ग एकमेकांशी किती वेगळ्या पद्धतीनं जोडला गेलाय याचा अनुभव येतो. इतक्‍या साऱ्या गोष्टी घडवून आणणारा पाऊस आजही तितकाच हवाहवासा वाटत राहतो.

संबंधित बातम्या