पाऊस न आवडे सर्वांना 

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
 

पावसाबद्दलची ही नावड सुरू झाली ती काऊ चिऊच्या गोष्टीपासून. आजीच्या कुशीत शिरलं, की काऊ चिऊची गोष्ट सुरू व्हायची. चिऊच घर असायचं मेणाचं आणि काऊचं शेणाचं.. मला काऊ आवडायचा. पण मग गोष्टीत नेमका पाऊस पडायचा आणि काऊचं घरटं तेवढं वाहून जायचं. त्यामुळे पावसात भिजून दार उघड असं काऊ म्हणत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी चिऊ आणि तिचं घरटं तेवढं शाबूत ठेवणारा पाऊस हे दोघे माझे नावडते झाले ते तेव्हापासून. आजोळी अंगणाच्या ओसरीवर बसून पाऊस पाहताना, वळचणीला आलेल्या प्रत्येक कावळ्याचं घरटं पावसामुळे वाहून गेलंय असंही वाटायचं मला आणि मग पाऊस अजूनच आवडेना व्हायचा. पुढे कधी दादासोबत भांडण झाल्यावर, ’आपण त्याचं घर उन्हात बांधू’ असं म्हणणाऱ्या आजीला, पालथ्या हाताने डोळे पुसत, ’ नको, तू त्याचं घर पावसात बांध’ असंही सांगायला कमी केलं नाही मी. पावसात घर बांधणं ही सर्वात मोठी शिक्षा वाटायची त्यावेळी.

मग शाळेत जायला सुरवात झाल्यावर हा नावडता पाऊस पुन्हा आयुष्यात आला. शाळा सुरू व्हायची आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात मराठीच्या बाई दरवर्षी हमखास ’माझा आवडता ऋतू-पावसाळा’ यावर निबंध लिहायला सांगायच्या. म्हणजे परंपराच असायची ती. नवीन शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या मुलांनी असा निबंध लिहिला नाहीच तर पाऊस  रुसेल अशी भीती असायची त्यामागे की काय हे माहीत नाही. पण या सक्तीच्या निबंध प्रकरणामुळे पाऊस न आवडण्यात भरच पडली. तिसरी- चौथीपासून अगदी बारावीपर्यंत फक्त सुरवात आणि शेवट बदलून, पावसाचं तेच तेच गोडमिट्ट वर्णन करायचा कंटाळा यायला लागला. ’आवडता ऋतू’ वगैरे अंधश्रद्धा असतात याचा शोध इंजिनिअरिंग ग्राफिक्‍सच्या असाईनमेंट पावसात भिजू न देता कॉलेजपर्यंत घेऊन जाण्याच्या प्रवासात लागला.

शाळेतल्या निबंधात पहिल्या पावसाचा सुवास दरवळायचा, ’उन्हाने तापलेली धरणी, पावसाच्या शिडकाव्याने कशी प्रफुल्लित होते‘ याचा शाब्दिक फुलोरा असायचा. कावळा, चिमणी फारफार तर पोपट, साळुंकी यापलीकडे एकही पक्षी घराच्या अंगणात पाहिलेला नसतानाही, ’चातक’ नावाचा पक्षी पावसाचा पहिला थेंब कसा चोचीत घेतो याचं मनसोक्त वर्णन असायचं. झालंच तर मोर पिसारा  फुलवून नाचायचा. पावसाच्या पाण्यात सोडलेल्या होड्या असायच्या, चोहीकडे दाटलेली हिरवळ असायची, पावसाचं महत्त्व सांगणार एखादं संस्कृत सुभाषित किंवा ओढूनताणून सुचलेली वा सापडलेली इंग्रजी कवितेची ओळ असायची. या जगात पावसाशिवाय दुसरं काहीच वर्णन करण्यासारखं नाहीये अशा आविर्भाव, वहीच्या एका बाजूच्या पानावर, दोन्ही बाजूला आखीवरेखीव समास सोडून, शाईपेनाने सुवाच्च अक्षरात लिहिलेला हा निबंध खाकी कव्हर घातलेल्या वहीमध्ये गुडूप व्हायचा. त्याची आठवण मग पुन्हा अनुक्रमणिकेतला शेरा आणि गुण बघूनच व्हायची.

शाळेत असताना निबंधा व्यतिरिक्तही अनेक कारणं होती पाऊस न आवडण्याची.  मुळात ’शाळेभोवती तळे साचून सुट्टी’ आणि ’ए आई, मला पावसात जाऊ दे’ अशी सरळसरळ मागणी करणाऱ्या पोट्टयाच कौतुक वगैरे करणारी आई या दोन्ही गोष्टी फक्त कवितेत असतात याची जाणीव झाली होती. त्यामुळे आई घरी असताना, पावसात भिजत, घोटीव कागदाच्या रंगीत होड्या करून त्या पाण्यात सोडण्याचं ॲडव्हेंचर माझ्या हातून घडण्याची कोणतीच शक्‍यता नव्हती. गृहपाठ-वर्गपाठाच्या वह्या, पुस्तकं, डबा, पाण्याची बाटली या पसाऱ्याने आधीच पोट फुगलेल्या दप्तरात, रेनकोट नावाच्या, तसा फारसा काही उपयोग नसणाऱ्या प्रकाराला कोंबायची सक्ती व्हायची.

हौसेनं घातलेल्या पांढऱ्या शुभ्र सॉक्‍सवर उमटणारी चिखलाची नक्षी, वॉटरप्रूफ दप्तराच्या आत असणाऱ्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगची नजर चुकवून पुस्तकाच्या कव्हरवर जाणारा पावसाचा ओघळ, अर्धवट भिजणारे कपडे, ओली डब्याची पिशवी असं साग्रसंगीत छळणाऱ्या आणि माझा एवढूसा जीव मेटाकुटीला आणणाऱ्या पावसाच्या प्रेमात वगैरे पडण्याचा प्रश्नच नव्हता. खेळाच्या तासालाही खिडकीतून कोसळणारा पाऊस पाहावा लागायचा. जेवणाच्या सुट्टीत डबेही बाकावर बसून दाटीवाटीने खावे लागायचे. पुन्हा चित्रकलेच्या तासाला, पावसाचंच चित्र. मग हे अति कोडकौतुकाने लाडावलेल्या लहान मुलासारखं पाऊस प्रत्येकाकडूनच आपलं कौतुक करून घेतोय असं वाटतं राहायचं. एकूण शाळेसंपेपर्यंतचं माझं आणि पावसाचं नातं मनात नसतानाही झालेल्या अरेंज मॅरेजसारखं होतं, कसाबसा संसार केला आम्ही. पुढे कॉलेजला गेल्यावरही फारसं काही जमलं नाही आमचं, पण कामचलाऊ सोबत कायम होती. ’लेक्‍चर बंक’ मारणं हा उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने, पावसात भिजत, कपडे ओले करत कॉलेजला जायची फारशी गरज वाटली नाही (त्याचा परिणाम पुढे बारावीच्या मार्कशीटमध्ये दिसून आला तो वेगळा, पण.. असो). फर्ग्युसनच्या भल्या थोरल्या कॅम्पसमध्ये फिरतानाही पावसात हिरवीगच्च दिसणारी हनुमान टेकडीही ’लांबून बघायला ठीक’ वाटायची. मोठ्या उत्साहाने चिखल तुडवत टेकडीवर चालणारे लोकं मला परग्रहावरून आल्यासारखे वाटायचे.  ’चला पावसात  फिरायला जाऊ’ या अतिउत्साही प्रकारातही, ज्याच्या नुकतीच प्रेमात वगैरे पडले होते त्या वर्गमित्रासोबत आणि कॉलेजच्या ग्रुप सोबत वेळ काढता यावा म्हणून सहभागी व्हायचे मी. मग उगाचच सिंहगड, ताम्हिणी, माळशेज या प्रकरणांना, पावसात भिजत, थंडीत कुडकुडत आणि चिखल तुडवत भेट द्यायचो आम्ही. पण त्या भेटीला कारणीभूत असणारी  ’हिरवळ’ वेगळी असायची, त्यामुळे नावडता पाऊस, कामचलाऊ व्हायचा खरा, पण त्यापलीकडे नाही.  मुळात  दरवर्षी ’वर्षासहली’ला जाणाऱ्यांबद्दल अजूनही मला आदरयुक्त भीती वाटते. दोनचार दिवस प्लॅनिंग करून पावसात भिजायला जावं, कोणत्यातरी धबधब्यात उभं राहून फोटो काढावेत आणि हे असं दरवर्षी, न चुकता करावं असं वाटणारी लोकं माझा आदर्श आहेत. दरवर्षी पांडुरंगाच्या भेटीसाठी वारीत चालणाऱ्या  वारकऱ्यांइतकंच श्रद्धेने हे करणाऱ्या लोकांच्या अंगी कुठून येते ही जिद्द आणि चिकाटी हा आजही प्रश्न आहे माझ्यासाठी. ’बाकी काही करायला सांगा, फक्त पावसात घराबाहेर पडायला सांगू नका’ हे असे विचार असणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला या ’वर्षासहल’ प्रकरणाचं कौतुक वाटणं अगदी साहजिक आहे. मुळात काय तर प्रेमात पडूनही, पाऊस कधी रोमॅंटिक वाटला नाही. भर पावसात त्याला भेटायला जावं, एका छत्रीत अर्धअर्ध भिजावं, झालंच तर वाऱ्याने छत्री उडून वगैरे जावी आणि मग त्याने आपल्याला मिठीत घ्यावं, या अशा गोष्टी उड्यामारूनही कधी कराव्याश्‍या वाटल्या नाहीत. आता पावसावर काहीतरी लिहुयात किंवा निदान कविता तरी करूयात अशी इच्छा कितीही ठरवलं तरी का झाली नाही कुणास ठाऊक.  चिखल, रस्त्यावरचे खड्डे, मुद्दाम तुमच्याच अंगावर पाणी उडवत जाणारे ड्रायव्हर्स, बाईकच्या मागच्या मडगार्डमधून उडणारे चिखलाचे तुषार हे आपल्यामागे गाडी चालवण्या व्यक्तीचे तोंड रंगविण्याठीच आपण उडवत असतो अशी नितांत श्रद्धा असणारे दुचाकीस्वार, गळणारे बसस्टॉप,  या सगळ्या गदारोळात, इतरांना आवर्जून सापडणार पावसाचं रोमॅंटिक- गोडुलं रूप शोधायला वेळच मिळाला नाही. नाही म्हणायला, पावसात रस्त्यावर सांडलेलं सप्तरंगी शाईसारख पेट्रोल किंवा जागा मिळेल तिथे उगवणाऱ्या छोट्या छोट्या मश्रुमच्या छत्र्या हाच काय तो माझा विरंगुळा असायचा. पडणाऱ्या पावसाचं मानवी स्वभावात वर्णन करावंसं वाटलं नाही किंवा कधी प्रियकराच्या  आठवणींनी व्याकूळ वगैरे झाले नाही. पावसाची रिपरिप असुदे, श्रावणसर किंवा ऊन पावसाचा सो कॉल्ड खेळ... हे प्रत्येक रूप मी एकाच मख्ख चेहऱ्याने पाहिलं. नाही म्हणायला  ’नदीपात्रातलं पाणी वाढलं की शाळेला मिळणारी सुट्टी’ या एकमेव कारणासाठी  धो धो कोसळणारा पाऊस शाळेत असताना जवळचा वाटला, पण तोही तेवढ्यापुरताच.

पावसाला एकांतात, एकट्याने समजून घेण्याचा प्रयत्न अनेकदा केलाय मी. इतरांना ’सृजनाचा आविष्कार’ वगैरे वाटणारा हा ऋतू, मला फारसा जवळचा- आपलासा का नाही वाटत याचाही विचार अनेकदा केलाय. सरींमधून कोसळणाऱ्या पावसाला उगाच एक उदासीची किंवा रितेपणाची किनार असते, असे शोधही लावलेत. पण कितीही प्रयत्न केले तरी मला तो आपलासा वाटत नाही हेही खरं. शाळेत असताना असणाऱ्या टोकाच्या नावडतेची धार एव्हाना  बोथट झाली असली, तरी पावसाच्या सहवासात रुळायला अजून किती वर्ष खर्ची पडतील माहीत नाही. ’आपण पावसाचा त्रास करून घ्यायचं कमी केलं, तर पाऊसही आपल्या त्रास द्यायचं कमी करतो’ हा फंडा मी माझ्यापुरता सेट केलाय. त्यामुळे पावसाच्या मूड स्विन्ग्स सोबत जुळवून घेणं थोडंतरी शक्‍य होत. तसंही, पाऊस अनुभवण्याची, पावसावर रिॲक्‍ट करण्याची प्रत्येकाची पद्धत एकसारखी कशी असेल? पावसात भिजणाऱ्या प्रत्येकाला आपण पावसात का भिजतो याच असं ठराविक उत्तर थोडीच देता येत असेल? पावसासोबत जुळलेली प्रत्येकाची गणितं वेगळीच असणार. त्यामागे गुंतलेल्या भावनाही वेगळ्याच असणार.

 पावसातली माझी सुखाची कल्पना एकच आहे...... बाहेर धो धो पाऊस कोसळत असावा... घरी तुमच्याशिवाय कोणी नसावं... स्वतःला आवडतो अगदी तसाच उत्तम चहा जमून यावा आणि सोबतीला जीए किंवा प्रकाश संतांचा लंपन असावा... उघडलेल्या खिडकीतून किंवा गच्चीच्या उघड्या दारातून, तो अगदी वेड्यासारखा कोसळताना दिसावा तुम्हाला पण तुमचं एकमेकांशिवाय  काही अडत मात्र नसावं... तो कोसळतोय म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करताय हे त्याच्या ध्यानीमनी नसावं आणि तुम्हीही त्याची ती नकोशी सोबत अलिप्तपणे स्वीकारलेली असावी...

संबंधित बातम्या